शक्तीशाली पात्रावरचा दुबळा चित्रपट : कॅप्टन मार्व्हल

“A hero can be anyone, even a man doing something as simple and reassuring as putting a coat on a young boy’s shoulders to let him know that the world hadn’t ended”. नोलनच्या ‘द डार्क नाईट राईज़ेस’मधील (२०१२) श्रेष्ठतम संवादांपैकी एक असा हा संवाद. नायक किंवा नायिका कुणाला म्हणावं याची साधी-सोपी तरीही गहन अशी परिभाषा सांगणारा. या संवादाचं किंचितसं सामान्यीकरण केलं तर काय हाती येतं? नायक किवा नायिका कुणाला म्हणावं, तर ज्या व्यक्तीच्या ह्रदयात मानवता भरलेली आहे आणि गरज पडेल तेव्हा जी व्यक्ती त्या मानवतेला अभिव्यक्त करायला कचरत नाही, अशी व्यक्ती! मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा नुकताच प्रदर्शित झालेला २१वा चित्रपट ‘कॅप्टन मार्व्हल’ नेमक्या याच आघाडीवर तोकडा पडतो.

चित्रपटाची सुरुवात होते ती क्रींच्या ‘हाल’ नावाच्या ग्रहावर. उदात्त योद्ध्यांचा हा ग्रह. त्यांच्यापैकी एक असते व्हिर्स (ब्री लार्सन). या ग्रहाची सत्ता सुप्रिम इंटेलिजन्स नामक शक्ती चालवते. ही शक्ती प्रत्येकाला ‘भाव तसा देव’ न्यायाने वेगवेगळी भासत असते. व्हिर्सला सातत्याने एकसारखीच स्वप्नं पडत असतात. त्यात दिसणाऱ्या व्यक्ती, घटना यांपैकी कशा कशाचीच तिला काही एक माहिती नसते. एवढंच नाही तर तिला सुप्रिम इंटेलिजन्सदेखील त्या स्वप्नातीलच एका व्यक्तीच्या स्वरूपात दिसते. लवकरच व्हिर्स ही त्यांच्या ग्रहाचं ज्या स्क्रल सभ्यतेशी सातत्याने युद्ध सुरू असतं, त्या युद्धातील एका अभियानावर जाते. गोष्टी चुकतात आणि व्हिर्स येऊन पडते ‘प्लॅनेट सी-५३’ अर्थात, पृथ्वीवर! पृथ्वीवर एकापाठोपाठ एक घटना घडू लागतात आणि व्हिर्ससमोर तिचा भूतकाळ साऱ्या दडलेल्या रहस्यांसह उभा राहातो. यातूनच व्हिर्स तथा कॅरोल डेन्व्हर्स बनते, शक्तीशाली कॅप्टन मार्व्हल!

हे सारे वाचायला किती रंजक वाटते ना? पाहाताना नाही वाटत! का? कारणं बरीच आहेत. एक तर ही आगळीवेगळी कथा लिहिताना अतिशय घासूनघासून गुळगुळीत झालेल्या चौकटबद्ध रितीने लिहिलेली आहे. इतकी की आपण कोणतीही घटना घडण्याच्या ५-१० मिनिटं आधीच सांगू शकतो, नेमके काय घडणार आहे ते! क्लिषेज़ ठासठासून भरलेले आहेत चित्रपटात. त्यात दुसरी भर म्हणजे अॅना बोडेन आणि रायन फ्लेक या द्वयीचे दिग्दर्शन इतके काही नीरस आहे ना की, सगळी मजाच निघून जाते. ब्री लार्सन चित्रपटाची नायिका आहे. साधीसुधी नायिका नाही, तर मार्व्हलच्या पहिल्यावहिल्या ‘फिमेल सुपरहिरो लेड’ चित्रपटाची नायिका! तिचे पात्र कॅप्टन मार्व्हलदेखील साधे नाही, तर मार्व्हल युनिव्हर्समधील सर्वाधिक शक्तीमान पात्रांपैकी एक! इतके असून तिने काय केले? ती बनली चित्रपट कंटाळवाणा वाटण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण! “..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर”मधील सुमित राघवनच्या तोंडी असलेला “चेहरा असाच” संवादाचं जिवंत रूप म्हणजे ही ब्री लार्सन! चेहऱ्याची घडी बिघडली तर परत लाँड्रीवाल्याकडे पाठवायला लागेल या भितीमुळेच की काय, तिने बहुतांश वेळेस चेहऱ्यावर सुरकुतीसुद्धा पडू दिलेली नाही. कित्येक पंचलाईन्ससुद्धा तिच्या तोंडी सपाट वाटतात. ती पडद्यावर सुंदर दिसते, पण मार्व्हलचीच नताशा रोमनॉफ जशी इन्स्पायरिंग वाटते, तशी चुकूनसुद्धा वाटत नाही. उलट दिखाऊ वाटते! या बाबतीत तिच्या इतकाच दोष लेखक-दिग्दर्शकांचासुद्धा आहे. सबंध चित्रपटच बऱ्याच तथाकथित उदात्त मुद्यांवर दिखाऊ भूमिका घेतो आणि पात्रांनाही घ्यायला लावतो. चित्रपटांना काहीतरी राजकीय वगैरे धोरण असेल, तर हरकत नाही; पण तुमचे धोरण त्या कथेशी एकरूप करता नाही आले तर ते दिखाऊ आणि उथळच वाटते. भूमिका नीट लिहिल्या-मांडल्या न गेल्यामुळे म्हणा वा नीट न वठवल्यामुळे म्हणा, कॅरोल डेन्व्हर्स अर्थात कॅप्टन मार्व्हल ही चुकूनही डायना प्रिन्स अर्थात वंडर वुमनच्या तोडीची वाटत नाही.

जवळजवळ १२४ मिनिटं चालणाऱ्या चित्रपटात मोजकेच प्रसंग निर्भेळ आनंद देतात. एक म्हणजे मार्व्हलचा लोगो येतो तो. तिथे त्यांनी काय मजा केलीये, ते चित्रपट पाहाताना आवर्जून पाहा. दुसरा म्हणजे स्टॅन-लीचा मरणोत्तर कॅमिओ. सबंध चित्रपट ज्या दोनच माणसांमुळे सहन होतो ते म्हणजे अत्यंत गुणवान अभिनेता सॅम्युअल जॅक्सन आणि दुसरा बेन मेंडेल्सन. यांपैकी सॅम्युअल एल. जॅक्सन तर एकमेवाद्वितीय आहेच, परंतु मेंडेल्सनला उत्तरार्धात जरासा वाव मिळताच त्यानेही त्याचे सोने केलेय. पण चित्रपटाची सगळ्यांत भारी गोष्ट जर कोणती असेल, तर ती आहे एक मांजर! या मांजराच्या एकही संवाद नसलेल्या पात्राने तिच्या वाट्याला आलेले जवळजवळ सगळेच प्रसंग शब्दशः खाऊन टाकलेयत. असा स्क्रिन-प्रेझेन्स मुख्य नायिकेलाही तिच्या अंतिम रूपांतर प्रसंगाचा अपवाद वगळता साधलेला नाही!

सगळ्यांत सुरुवातीला जो नोलनचा संवाद दिलाय ना, तो दिसायला साधा असला तरीही हिरोईझमप्रधान चित्रपटांसाठी अक्षरशः वस्तुपाठ म्हणावा असा आहे. ‘कॅप्टन मार्व्हल’मध्ये लेखक-दिग्दर्शक त्यांच्या नायिकेला वेगवेगळ्या दिखाऊ धोरणांच्या बाजूने उभे करताकरता नेमके तिला मानवतेच्या बाजूने उभे करायलाच विसरले. म्हणजे ती बोलते मानवता वगैरे, पण नुसती बोलतेच. ते काही चित्रपटात तिच्या कॅरेक्टरचं मोटिव्हेशन ठरत नाही. यामुळेच चित्रपट सगळ्यांत जास्त अडखळतो. तिच्या भूतकाळातील प्रसंगही इतके जेमतेम दाखवलेयत आणि जे दाखवलेयत ते ही असे उथळपणे हाताळलेयत की, तिच्या पात्राबद्दल प्रेक्षकांना सहानुभूती तर सोडाच, साधी अनुभूतीदेखील वाटत नाही. या गोष्टीसाठी नोलनने ‘बॅटमॅन बिगिन्स’मध्ये (२००५) केवढा वेळ दिला होता, आठवा! आणि नोलनच कशाला, कोणताही चांगला सुपरहिरो-ओरिजिन चित्रपट घ्या, कथा, कादंबरी, कॉमिक्स किंवा मालिका घ्या. त्या प्रत्येकात त्या त्या नायक-नायिकेचं पूर्वायुष्य, त्या व्यक्तीच्या हिरो बनण्यामागच्या प्रेरणा, त्या व्यक्तीचा संघर्ष यांना पुरेसा वेळ दिला तरच नंतर त्या हिरोबद्दल आपल्याला ममत्त्व वाटते. पूर्वायुष्य जितकं ताकदवान तितकीच त्या नायकाबद्दलची सहानुभूती अधिक! इथे हा चित्रपट कॅप्टन मार्व्हल कशी अस्तित्वात आली ते सांगतो, पण कॅरोलच्या आयुष्यात, तिच्या संघर्षात, तिच्या सुख-दु:खात, तिच्या भावविश्वात पुरेसं डोकावतच नाही. त्यामुळे आपण चित्रपटगृहातून बाहेर पडताना कॅप्टन मार्व्हलच्या ताकदीची स्तुती करतो, पण जी आपुलकी आपल्याला मार्व्हलच्या इतर कोणत्याही अगदी दुय्यम पात्रांबद्दलसुद्धा वाटते, ती कॅप्टन मार्व्हलबद्दल वाटत नाही, हे चित्रपटाचं अपयश आहे. नि:संशय हा चित्रपट भरपूर पैसा कमावेल, पण तो चांगला चित्रपट म्हणून नव्हे तर मार्व्हलच्या आधीच्या सुमारे दिड डझन चित्रपटांची पुण्याई म्हणून! ती बाजूला काढली तर कॅप्टन मार्व्हल हा निव्वळ एका शक्तीशाली पात्रावर बेतलेला दुबळा चित्रपट बनून राहातो. मिड क्रेडिट सीनसुद्धा या चित्रपटापेक्षा ‘अँटमॅन अँड द वास्प’चा (२०१८) जास्त टिझिंग होता. थोडक्यात “एंडगेम”च्या उंबरठ्यावर प्रदर्शित होऊनही ‘कॅप्टन मार्व्हल’ कोणत्याच बाबतीत विशेष काहीही देत नाही!

*२/५

— © विक्रम श्रीराम एडके

(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *