किंचित भरकटलेला तरीही कमालीचा जबरदस्त: सुपर डिलक्स

वेंबूचं (समँता) लग्न मुगिलनशी (फ़हाद फ़ासिल) झालंय. पण ती अजूनही तिच्या जुन्या प्रियकरांपैकी एकाला विसरलेली नाहीये. एके दिवशी ती नवरा घरी नसताना प्रियकराला बोलावून घेते आणि एक अनपेक्षित गडबड होते. त्याच वेळी नवरासुद्धा घरी येतो आणि गोष्टी अजूनच वेगळं वळण घेतात. माणिकम (विजय सेतुपती) हा जवळ जवळ साडेसात वर्षांनंतर घरी येणार म्हणून त्याची बायको (गायत्री शंकर) आणि सगळंच कुटूंब खुश आहे. आता इतक्या वर्षांनंतर घरी येणाऱ्या माणसात थोडा फरक तर पडणारच ना? पण माणिकम मात्र अंतर्बाह्य बदललेला असतो. अगदी शब्दशः! किशोरावस्थेतील तीन-चार पोरं आहेत. एकाच्या घरी कुणी नाही म्हटल्यावर ते भाड्याने सिडी आणून थोडीशी मजा करायचं ठरवतात. त्यातल्या एकाला भूतकाळाबद्दल वेगळंच काही तरी समजतं आणि रागाच्या भरात त्याच्या हातून घडू नये ते घडतं. त्याच्या वडलांची (मिस्किन) तर अजूनच वेगळी तऱ्हा. त्यांनी स्वतःचाच एक पंथ स्थापन केलाय. अडनिड्या वयात भयंकर अडचणीत सापडलेला मुलगा आणि भौतिक जगात निष्क्रिय नवरा यांच्या कात्रीत आईचं (रम्या कृष्णन) अक्षरशः भजं झालंय!

त्यागराजन कुमारराजाच्या ‘सुपर डिलक्स’मधील या तीन कथा. तसं पाहायला गेलं तर त्यांचा एकमेकांशी काही एक संबंध नाही. त्या एकमेकींमध्ये गुंततात असं नाही आणि समांतर जातात म्हणावं तर तसंही नाही. त्या काही काही विवक्षित वेळी एकमेकींना छेदून जातात आणि एकमेकींवर परिणाम करतात, हे मात्र निश्चित. भौतिकशास्त्राचा तो सिद्धांत नाही का, फुलपाखरू परिणाम; ज्यात सगळ्या गोष्टी एकमेकींवर अवलंबून असतात आणि एखाद्या आखीव व अरेषीय संस्थेच्या प्राथमिक स्थितीतील साधासाच बदल सबंध संस्थेवरच खूप मोठा परिणाम घडवून आणतो? त्या बटरफ्लाय इफेक्टचं चपखल उदाहरण म्हणजे ‘सुपर डिलक्स’. आणि हा वैज्ञानिक संदर्भ घेऊन मी उगाचच स्वतःला हुशार दाखवत या सिनेमाला विज्ञानपट ठरवू इच्छितोय, असं नाही बरं का. उत्तरार्धात चित्रपटामध्ये खरोखरच साय-फायच्या काही घटकांचा समावेश होतो!

मागच्या परिच्छेदात एवढं जडजंबाल लिहिल्यावर साहजिकच कुणालाही वाटेल की मग हा त्या रटाळ, कलात्मकछाप चित्रपटांच्या वर्गातला आहे का? तर मी स्पष्टपणे सांगतो की, गेल्या अनेक दिवसांत मी थिएटरमध्ये चित्रपट पाहाताना क्वचितच एवढा हसलोय. ‘सुपर डिलक्स’ शेवटपर्यंत कमालीचा विनोदी आहे. अगदी चांगल्या अर्थाने आहे. त्यांच्या तिन्ही कथा अतिशय वेगळ्या धाटणीच्या आहेत, अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्या समाजातल्या वेगवेगळ्या मुद्यांना व्यवस्थित स्पर्श करतात. इतके असूनही त्यांनी विनोदी शैली कायम राखलीये. एवढी की, काही प्रसंगांत त्या त्या प्रसंगाचं गांभीर्य कमी होऊ न देताही दिग्दर्शक आपल्याला हसावं की रडावं हा प्रश्न पडायला भाग पाडतो.

इतका गुंतागुंतीचा चित्रपट लिहिणं हे एका व्यक्तीला क्वचितच जमण्यासारखं आहे. ‘सुपर डिलक्स’ लिहिलाय चार जणांनी. मिस्किन, नालन कुमारसामी, नीलन के. शेखर आणि त्यागराजन कुमारराजा. चौघेही दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी चित्रभाषा संहितेत अचूक उतरवलीये. आणि संहितेतील चित्रभाषा पी. एस. विनोद आणि निरव शाह या दोघा जबरदस्त छायाकारांनी अतिशय ताकदीने पडद्यावर अनुवादलीये! मध्यांतराचा प्रसंग तर एवढा कमाल जमलाय की बासच!! पण चार जणांचं डोकं लागल्यावर ते चार दिशांना जायलाही वेळ लागत नाही. मध्यांतरानंतर चित्रपट काही काळासाठी पूर्णपणे भरकटतो. इतका वेळ वास्तववादी अधिक विनोदी असणाऱ्या चित्रपटात काही अतर्क्य घटक समाविष्ट होतात. कथानकाचा वेग मंदावतो. शेवटी सगळे तुकडे जागेवर बसण्यासाठी बरीच ओढाताण होते. इतका वेळ संयतपणे होत असलेली मांडणी एकाएकी तात्त्विक प्रवचने देणारी व भाषणबाज होत जाते आणि एक चांगला नव्हे तर खूपच जास्त चांगला चित्रपट मास्टरपीस होता होता राहून जातो. त्याचं स्वज्ञानी असणंही तात्कालिकच राहातं मग!

पण या ही परिस्थितीत चित्रपटातल्या पात्रं हे वाहून जाणारं तारू समर्थपणे मार्गी लावतात. विजय सेतूपती हा माणूस अक्षरशः सोनं आहे सोनं! आणि तो सध्या ज्या कोणत्या चित्रपटाला हात लावतो त्याचंही सोनंच करून सोडतोय. प्रचंड ताकदीचा आणि तरीही स्वतःच्या मर्यादा पूर्णपणे ठाऊक असलेला, असे दोन्हीही दुर्मिळ गुण अंगी असणाऱ्या दुर्मिळ अभिनेत्यांपैकी एक आहे तो. आपल्या ताकद आणि मर्यादेच्या चौकटीत असा काही तुफान खेळतो तो की, काय सांगू! या चित्रपटात त्याने वापरलेला बोलण्याचा पोत आवर्जून ऐका. पण इथे विजय सेतूपतीच्या मदतीला निदान रंगभूषा आणि वेशभूषा तरी आहेत. दोन्हींपैकी कशाचीच साथ नसतानाही खरी मजा आणलीये ती फ़हाद फ़ासिलने. मलयाळम चित्रपटांच्या चाहत्यांना हा केवढा अफाट अभिनेता आहे हे पक्कं ठाऊक असेल. इथे तो त्या अफाट असण्याच्याही खूपच पुढे निघून जातो! विजय सेतूपतीने श्रेष्ठतम काम केलंय आणि फ़हादने त्याच्यापेक्षाही चांगलं काम केलंय, एवढंच सांगतो! या दोघांच्या खालोखाल भूमिकेत जान आणलीये ती रम्या कृष्णनने. तिची भूमिका काही फार मोठी नाही. पण जी आहे ती तिने एवढी जबरदस्त निभावलीये की विचारता सोय नाही. समँता तर अभिनेत्री कमाल आहेच. फक्त फ़हादसमोर किंचित फिकी वाटते, एवढंच. पण दोन व्यक्तींचा मात्र विशेष उल्लेख करावासा वाटतो. एक म्हणजे विजय सेतूपतीच्या मुलाचे काम करणारा लहानगा. दुर्दैवाने मला त्याचे नाव ठाऊक नाही. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे एस. आय. बर्लिनची भूमिका करणारा भगवती पेरुमाळ. बोलणं, हावभाव वगैरे तर आहेच, पण एखाद्या फ्रेममध्ये नुसत्या अस्तित्वानेसुद्धा किळस आणतो हा माणूस! या सगळ्यांनी चित्रपट तोलून तर धरलाच आहे, परंतु त्याचबरोबर त्याचं मनोरंजन-मूल्यसुद्धा अत्युच्च दर्जाचं राखलंय. पात्रांची नावंही सूचक वाटावीत अशी शंका घ्यायला जागा आहे. असा हा काहीसा भरकटलेला पण तरीही वेगळ्या वाटेवरचा अतिशय मजेदार चित्रपट त्याची वेगळी कथा, चलाख मांडणी आणि दैवी अभिनय या गोष्टींसाठी पाहायलाच हवा असा आहे!!

*३.७५/५

— © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *