अपेक्षाभंग करणारा : मणिकर्णिका

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील झाशीच्या राणीचे स्थान केवळ मराठीजनांसाठीच नव्हे, तर सबंध भारतीयांसाठीदेखील कायमच गौरवाचे राहिले आहे. राणीवर आजपर्यंत खूप सारे साहित्य लिहिले गेले, मालिका बनल्या, चित्रपटही बनले. परंतु जेव्हा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद, प्रसून जोशी, राधाकृष्ण जगर्लामुडी आणि कंगना राणावतसारखे दिग्गज या विषयासाठी एकत्र आले तेव्हा बनणारी कलाकृती निश्चितच वेगळ्या दर्जाची असणार होती. पण बुद्धीमंतांचा एक दोषच असतो की, बरेचदा ते एकत्र आल्यावर त्यांच्या बुद्धीच्या बेरजा होण्याऐवजी एकमेकांना छेद देऊन भागाकार तेवढा होऊन बसतो. माझ्या दृष्टीने ‘मणिकर्णिका’मध्येही तेच झाले.

सुरुवातीपासूनच कंगना आणि क्रिशमध्ये दिग्दर्शनावरून वाद होते, हे सर्वश्रृत आहे. कोण चित्रपटाची माती करत होतं आणि कुणी कोणते प्रसंग दिग्दर्शित केले याबद्दल दोघांचेही वेगवेगळे दावे आहेत. परंतु आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या दाव्यांना फारसा काही अर्थ नाही, कारण जवळपास सगळीच दृश्ये सारख्याच प्रमाणात दिशाहीन वाटतात. चित्रपट एका चांगल्या बिंदूवर सुरू होतो आणि त्यानंतर सतत कसली तरी घाई असल्यासारखा पडूच लागतो. अधूनमधून काही काळ तो वर उचललाही जातो, पण दुर्दैवाने तसे प्रसंग कमीच येतात. बरं त्यांना मुद्यावर येण्याची घाई आहे म्हणावं, तर ते ही होत नाही. मुद्याच्या आजूबाजूला घुटमळणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी घडत राहातात, पण मुद्दा काही फारसा येत नाही. आणि जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा तो इतक्या निष्काळजीपणे हाताळलाय की, त्याचे गांभीर्य नुसतेच जाणवते पण त्याची अनुभूती काही येत नाही. चित्रपट ऐतिहासिक सत्यतेचा दावा करत नाही, हे समजून घेण्यासारखे आहे. परंतु चित्रपटाच्या सुरुवातीलाच इतिहासाच्या अभ्यासकांचा सल्ला घेतल्याचे व इतरही काही कथा-लोककथांचा आधार घेतल्याचे सांगणाऱ्या चित्रपटाला राणीचे आडनाव नेवाळकर होते एवढी साधी गोष्टही समजू नये? चित्रपटात अनेकदा नवलकर असा उल्लेख आहे! हे एकीकडे तर दुसरीकडे झलकारीबाई आणि क्वचित राणी यांचे आयटम साँग टाकता? मग भन्साळी आणि तुमच्यात फरक काय राहिला? पात्रांचा स्वभाव, त्यांचं आयुष्य आणि त्यांच्या मौजेच्या कल्पना दाखवण्याचा एवढा एकच मार्ग बॉलिवूडला का दिसत असावा? सिनेमॅटिक लिबर्टीला माझा जराही आक्षेप नाही, आक्षेप आहे तो निष्काऴजी सिनेमॅटिक लिबर्टीच्या जंत्रीला!

चित्रपटाची कथा-पटकथा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची. साक्षात ‘बाहूबली’चे लेखक आणि राजमौलीचे वडील. त्यांनी लिहिलेले प्रसंग, त्यांची काल्पनिकता व ऐतिहासिकता यांच्या पलिकडेही उत्तमच आहेत. परंतु ते सगळेच दिशाहीन आणि जागा चुकल्यासारखे वाटतात. त्यांच्या जागा जर बदलल्या असत्या, तर ते बऱ्याच अंशी सुसह्य तरी झाले असते. आता हे पाप लेखकाचे, की दिग्दर्शकांचे, की संपादकांचे ते न कळे. राजमौली का थोर आहे ते इथे कळतं. त्याने एका काल्पनिक गोष्टीच्याही बारीकसारीक अंगांवर पाच वर्षे मेहनत घेतली. ‘मणिकर्णिका’कारांना मात्र कसली घाई होती, हेच समजत नाही. तुमचे नुसते सेट, कपडे वगैरे भारी असून चालत नाही, तुमचा दृष्टीकोन हा त्या सगळ्या भौतिक गोष्टींपेक्षा शंभरपटींनी भारी असला तरच असे शिवधनुष्य पेलले जाते. राणीच्या व्यक्तीमत्त्वाला उंची खूप दाखवलीये, पण तिला आणि इतरही पात्रांना खोलीसुद्धा तेवढीच दाखवली असती, तर बरं झालं असतं. एकूण एक पात्रं ही सपाट, एकमार्गी आहेत. त्यातही इंग्रज तर खूपच स्टिरीयोटिपिकल दाखवले आहेत. इतकी सरधोपट पात्रे निदान इतक्या मोठ्या स्तरावर बनलेल्या चित्रपटाकडून तरी अपेक्षित नव्हती. अतिशय सामान्य वाटणारे अंकित आणि संचित बलहारांचे पार्श्वसंगीत हे या पसाऱ्यात भरच तेवढी घालते. पार्श्वसंगीतात एके ठिकाणी वापरलेल्या महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे उच्चारही चुकीचे आहेत. छायांकन उत्तम पण व्हिएफएक्स काही काही ठिकाणी फारच सुमार आहेत. मला अजूनही न कळालेली गोष्ट म्हणजे कंगना राणावत काही प्रसंग वगळता युद्धात शिरस्त्राण का घालत नाही? मी काही राणीच्या चरित्राचा तज्ञ नाही, परंतु युद्धावर जाताना राणी नेहमीच शिरस्त्राण घालत असणार असे तर्कबुद्धी सांगते. कंगना मात्र प्रत्येक वेळी ते घालतेच असं नाही. का? केवळ पडद्यावर छान दिसावं म्हणून? इंग्रजांशी बाचाबाची झाल्यावर राणी अचानक घोडा दौडवत कुठे जाते, हे समजत नाही. ती उद्विग्न झाली म्हणावे तर त्याच प्रसंगात संग्रामसिंहशी भेट होते व अजूनच खटका उडतो. तो पूर्ण सिक्वेन्सच गोंधळात टाकणारा आहे. किमान मला तरी तो समजला नाही.

प्रसून जोशींनी लिहिलेले संवाद काही क्लिषे वगळता फारच जबरदस्त आहेत. ते भूतकाळाच्या माध्यमातून वर्तमानकाळावर अतिशय नेमके भाष्य करतात. पण त्या संवादांनाही अडसर आहे तो कंगना राणावतचा. ती अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे. पण तिची वाणी शुद्ध नाही. त्यामुळे तिने उच्चारल्यावर भलीभली वाक्येही सपाट वाटतात. अतुल कुलकर्णींच्या भूमिकेवरून काही ना काही कारणाने कात्री फिरवली गेली की काय असे वाटते, पण त्यांनी काम छान केलेय. जिशू सेनगुप्तांचेही काम उत्तमच, पण चित्रपट गंगाधररावांच्या मनोविश्वात डोकावण्याचे फारसे कष्टच घेत नाही. मुहंमद झीषान अय्युब, अंकिता लोखंडे, मिष्टी, डॅनी, वैभव तत्त्ववादी, सुरेश ओबेरॉय, कुलभूषण खरबंदा सगळेच आपापल्या भूमिकांत ठिकठाक. चित्रपटाची सगळ्यांत चांगली गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे गाणी! शंकर-अहसान-लॉयच्या संगीतदिग्दर्शनात प्रसून जोशींची शुद्ध हिंदीचा प्रभाव असलेली गीते फारच गोड, सुरेख आणि अर्थवाही झाली आहेत. पण चित्रपटात त्यांच्याही जागा काही वेळा चुकल्यायत.

राणी लक्ष्मीबाई हे खरोखर आपल्या इतिहासातील एक तेजस्वी पृष्ठ आहे. त्याचा रुपेरी पडद्यावर सन्मान करतानाच सिनेमा म्हणून त्याची मांडणीदेखील चांगली असणे अपेक्षित होते. दुर्दैवाने चित्रपट अनेक आघाड्यांवर निराशाच तेवढी करतो. सर्जनशील बाजूंवर नियंत्रण असणाऱ्या कुणीतरी हुशार व्यक्तीने या विषयाला स्पर्श करेपर्यंत थांबणे, एवढेच प्रेक्षक म्हणून आपल्या हाती आहे!

*२.५/५

— © विक्रम श्रीराम एडके

(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *