रुणुझुणू वारा
२०१६ मध्ये माझ्याकडे एक मराठी चित्रपट-दिग्दर्शक आला होता, ‘मी एक रोमँटिक चित्रपट करतोय त्यासाठी गाणं लिहून द्याल का’ विचारत. मी त्याला चालीबद्दल विचारले. तो म्हणाला की, ‘तुम्ही लिहा आपले संगीतकार चाल लावतील’. असे म्हणून त्याने मराठीतल्या एका बरे नाव असलेल्या संगीतकाराचे नाव घेतले. म्हणजे गाणं आधी लिहून मग चाल लावली जाणार होती. प्रासंगिक गीत असल्यामुळे मी दिग्दर्शकाकडून संहिता मागवून घेतली. त्या तथाकथित रोमँटिक प्रसंगावर गाणे लिहिले आणि संगीतकाराला पाठवून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला संगीतकाराचा फोन आला.
“हे काय लिहिलेय तुम्ही”?
“गाणे”, मी.
“हे असं नकोय आपल्याला”.
“असं नकोय, मग कसं हवंय”?
त्यावर त्याने वापरलेले वाक्य अक्षरशः असे होते –
“तुम्ही खूपच चांगले गाणे लिहिलेय. इतके चांगले नकोय आपल्याला”!
आपल्याला? मी मनात म्हणालो की, मला तर चांगलेच हवे आहे, तुमचे मी काय सांगू? प्रत्यक्षात मात्र,
“तुमची काय अपेक्षा आहे नेमकी”?
“मी ही अशी चाल करत असतो”, असं म्हणून त्याने तोंडातून कोणत्याच लिपित न गावणारा ताल, चालीच्या नावाखाली म्हणून दाखवला.
“बरं, मग”?
“आता यावर काहीतरी गावरान लिहा”!
“गावरान”?
“होय, गावरान”!
मी म्हणालो, “साहेब तुम्ही चित्रपटाची संहिता वाचलीये का नीट? तुमची नायिका आयुष्यभर शहरात वाढलेली, क्लासवन ऑफिसरची मुलगी आहे. ती अचानक गावरान भाषेत का गाईल”?
“स्क्रिप्टवाल्यांना काय कळतंय हो? इथं गाणं हिट गेलं पाहिजे”, त्याने ज्ञान पाजळलं, “अहो हेच खपतं आज मराठीत”.
मी स्वतःवर ताबा ठेवत शांतपणे म्हणालो, “साहेब, मराठीत खूप चांगल्या चांगल्या गोष्टी खपतात. तुमची नजर त्याकडे जात नाही, याला कोण काय करणार? माफ करा, तुमच्या लहरीसाठी मी माझी लेखणी गुलाम बनवू शकत नाही. कृपया दुसरा गीतकार शोधा”.
मी फोन कट केला. पुढे नोटबंदीच्या काळात तो चित्रपटच बंद झाल्याचं समजलं.
************************************
संहितेत बसत नसतानाही गावरान गीताचा अट्टाहास धरणाऱ्या आणि ‘एवढे चांगले गाणे नको’ म्हणून गीत नाकारणाऱ्या त्या तथाकथित संगीतकारासाठी लिहिलेले, हेच ते गीत. सबंध गीत स्त्रीभूमिकेतून व एका प्रसंगानुरूप लिहिले आहे.
चाल: मुन्गिल तोट्टम (कडल)
************************************
रुणुझुणू वारा गाई भरारा
उजळुनि आला आसमंत सारा
आणि दिसते छवि सजनाची
अंगभर दाटे अवखळ शहारा
पहिलेच प्रेम हे पहिली नशा
पहिल्या खुणा या लपवू कशा!
सीता मी जरी रघुवर तू तरी
रुक्मिणी मी होतास तू कान्हा
जन्मांतरीचे हे नाते असूनही
जाणले नाही मी घडला हा गुन्हा
पहिलेच प्रेम हे पहिली नशा
पहिल्या खुणा या लपवू कशा!
कोवळी पाकळी की सोनसाखळी
तैसे प्रेम हे नाजुक ध्याससे
स्वप्नां माझिया चुंबुनि घेता तू
भवति रातभर हळवा मधुश्वाससे
पहिलेच प्रेम हे पहिली नशा
पहिल्या खुणा या लपवू कशा!
— © विक्रम श्रीराम एडके