नव्या भारताचा नवा चित्रपट : उरी – द सर्जिकल स्ट्राईक

१८ सप्टेंबर २०१६ यादिवशी पाकिस्तानच्या चार आतंकवाद्यांनी काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील आपल्या सैन्यतळावर हल्ला केला. आपण त्या चारही आतंकवाद्यांना नरकात धाडले परंतु हे होईपर्यंत आपले सुमारे एकोणावीस जवान हुतात्मा झाले होते तर सुमारे ऐंशी ते शंभर जखमी. युद्धाची दाहकता ही अशी असते आणि ती कधीच एकतर्फी शांतता राखून कमी होत नाही. आपण जर याचे काही उत्तर दिले नसते, तर उलट त्या अतिरेक्यांच्या मालकांची हिंमत अजूनच वाढली असती. आणि म्हणूनच भारत सरकारने आणि आपल्या भारतीय सैन्याने निर्णय घेतला सर्जिकल स्ट्राईक करण्याचा! शरीरावर शल्यकर्म करताना जसे फक्त त्या रोगग्रस्त भागापुरतेच केले जाते, तसाच हा हल्लादेखील सर्जिकल अर्थातच लक्ष्यांपुरता मर्यादित असतो. यात इतरांना लक्ष्य केलेले नसते. थोडक्यात कोलॅटरल डॅमेज शून्य ठेवण्याचा यात प्रयत्न असतो. नेमके हेच आपल्या सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात घुसून यशस्वीरित्या पार पाडले! ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ हा त्याच घटनांचे काल्पनिक रुपांतरण करतो.

‘उरी’ हा अतिशय रंगीत सिनेमा आहे. चित्रपटभर तुम्हाला वेगवेगळे रंग वापरलेले दिसतात. आजवर आपल्याकडे बनलेल्या युद्धपटांच्या तुलनेत हा अतिशय स्वागतार्ह बदल आहे. चित्रपटात खूप सारे खटकेबाज संवाद आहेत, पण चित्रपट त्यांच्यातही अडकून पडत नाही. उलट स्ट्राईक्सची थंड डोक्याने आखलेली योजना आणि तिची तितक्याच शिताफीने केलेली अंमलबजावणी यांच्यावर त्याचा जास्त भर आहे. याही चित्रपटात ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’सारख्याच खरोखरच्या राजकीय व प्रशासनिक व्यक्ती आहेत. त्यांची नावे चित्रपटात बदललेली असली, तरी त्या व्यक्ती प्रत्यक्षात कोण आहेत याबद्दल प्रेक्षकांना जराही संभ्रम निर्माण होत नाही. उलट ‘उरी’सोबतच प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’प्रमाणे यातील पात्रे या त्या त्या व्यक्तींच्या निव्वळ नकला वा अर्कचित्रे न वाटता जिवंत माणसे वाटतात, हे चित्रपटाचे मोठेच यश आहे. चित्रपट हा काही पातळ्यांवर प्रचंड भावनिक आहे. विशेषतः पूर्वार्धात. आणि तसा तो आहे म्हणूनच नंतर जे दाखवले गेलेय, त्याला एक तात्त्विक आधार प्राप्त होतो. तसं बघायला गेलं, तर चित्रपट पाहाण्यापूर्वीच आपल्याला त्याची सबंध कथा माहिती आहे. सुरुवात काय, शेवट काय; सारंच. इतकी सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट असूनही चित्रपट आपल्याला पूर्णवेळ खूर्चीच्या कडेवर बसवून श्वास वारंवार रोखायला लावतो, यासाठी लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धर आणि संपादक शिवकुमार पणिकर यांचे कौतुक करावे तितके थोडे! मोठी हुशारीने गुंफलेली पटकथा आणि जागोजागी वापरलेला नैसर्गिक विनोद, या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत तर शाश्वत सचदेव यांचे जबरदस्त पार्श्वसंगीत घटनांची खोली व चित्रपटाची उंची कैकपटींनी वाढवणारे आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेक्षकांवर विश्वास टाकून त्यांना कमीत कमी स्पून फीडिंग करणारा ‘उरी’ एक अतिशय स्मार्ट चित्रपट आहे. त्याची फ्रेमिंग आणि टेकिंग दिग्दर्शकीयदृष्ट्या अतिशय विचारपूर्वक केलेली आहे. पण!

पण म्हणून काही तो त्रुटी आणि दोषांपासून मुक्त आहे, असं अजिबात नाही. प्रचंड हुशारीने रचलेला चित्रपट शेवटाकडे जाताना किंचित फिल्मीपणाकडे झुकू लागतो. ‘शूट टू किल’ची जागा क्वचित ठिकाणी अनावश्यक मारामारी घेते. दोन मिनिटांत पोहोचतील अशी बातमी असलेले पोलिस सोयीस्करपणे उशिरा येतात. एवढ्या मोठ्या मिशनचा महत्त्वाचा भाग एक इंटर्न होऊन बसतो. परतीच्या प्रवासात मोक्याच्या क्षणी एका पात्राची फिल्मी पद्धतीची एंट्री होते. देशासाठी केल्या जात असलेल्या अभियानालाही वैयक्तिक सूडाची फोडणी दिली जाते. गुप्ततेबद्दल प्रसिद्ध असलेले एक पात्र रिक्षाच्या प्रवासात राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीच्या गोष्टी उघडपणे बोलते. हे आणि असे बरेच काही! सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात काहीच चूक नाही. परंतु एक प्रेक्षक म्हणून दिग्दर्शकाने अधिक वास्तववादी मार्ग चोखाळलेला पाहाणे मनापासून आवडले असते. कथा-पटकथा किती जरी आकर्षक असली, तरी त्यात संशोधनाचा अभाव जाणवतो.

अभिनय ही चित्रपटाची भक्कम बाजू आहे! विकी कौशल हा जर असेच काम करत राहिला, तर तो खचितच उद्याचा सुपरस्टार असणार आहे! परेश रावल यांच्याकडून तर वाईट कामाची अपेक्षाही नाही. मोठ्या पडद्यावर मोहित रैना या गुणी अभिनेत्याला पाहाणे अतिशय सुखद आहे. कीर्ती कुल्हारीने तिची भूमिका प्रामाणिकपणे केलीये तशीच मानसी पारेख व इतरांनीही. या सगळ्यांत यामी गौतम मात्र काहीशी खटकते. तिने वाईट काम केलेय असे नाही, परंतु इंटेलिजन्स ऑफिसरच्या भूमिकेत व संवादांतही ती जराशी नाजूकच वाटते. याखेरीज स्वरूप संपतना खूप दिवसांनी पाहाणे आनंददायी आहे. योगेश सोमण, राकेश बेदी, रुख्सार वगैरेंनाही छोट्याछोट्या परंतु महत्त्वाच्या भूमिका आहेत व त्या त्यांनी ताकदीने निभावल्या आहेत.

अर्थातच हल्ली प्रत्येक व्यक्ती, गोष्ट, कलाकृती यांना कोणत्यातरी एका गटात टाकायची फॅशन आलीये. त्या अर्थी बोलायला गेलं तर ‘उरी’ उजव्या गटातील सिनेमा आहे. तसा तो असेलही, पण त्यापेक्षाही जास्त तो बदलत्या काळाचा द्योतक आहे. चित्रपटाच्याच एका संवादाचा आधार घेऊन बोलायचं झालं, तर ‘उरी’ हा नव्या भारताचा चित्रपट आहे. तो काहीसा अडखळतो पण उठतो, उभा राहातो आणि त्याचं इच्छितस्थळ गाठतो, अगदी भारतासारखाच!!

*४/५

— © विक्रम श्रीराम एडके

(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

One thought on “नव्या भारताचा नवा चित्रपट : उरी – द सर्जिकल स्ट्राईक

  1. परखड व सत्य समीक्षण अपेक्षित होते तसेच.
    आम्ही सहकुटुंब पाहिला मुलांना प्रेरणादायी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories