एका पेटंटची गोष्ट
आज आपण अगदी सहजपणे मोबाईल, रेडिओ इ. साधने वापरतो. परंतु या सर्व ‘बिनतारी संदेशवहना’चा (Wireless Telecommunication) शोध कुणी लावलाय माहितीये का? हा शोध लावणारी व्यक्ती एक भारतीय आहे, नव्हे आपल्या सर्वांच्या परिचयाचीदेखील आहे! त्यांचं नाव आहे, आचार्य जगदिशचंद्र बसू (१८५८-१९३७)!! होय, ‘वनस्पतींनाही जीव असतो’ ही हिंदूधर्मातील संकल्पना वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणारे व त्या तत्त्वावर आधारित ‘क्रेसोग्राफ’ या यंत्राची निर्मिती करणारे प्रा. जगदिशचंद्र बसू!! ते नुसते वनस्पतीशास्त्रज्ञच नव्हते, तर भौतिकशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, पुरातत्त्वविद, आणि विज्ञानकथालेखकदेखील होते! एवढेच कश्याला, आज वापरात असलेल्या ‘रेडिओ’च्या निर्मितीचेही श्रेय प्रा. बसू यांनाच दिले जाते, हे सर्वच वैज्ञानिक प्रगतीसाठी पाश्चिमात्यांकडे आस लावून पाहाणाऱ्या भारतीयांच्या गावीही नसेल! मग चंद्रावरील एका खळग्याला सन्मानपूर्वक त्यांचे नाव देण्यात आले आहे, हे माहिती असायची शक्यता तर आणखीनच धूसर!
मुळात आचार्यांचा स्वभावच निरीच्छ, त्यामुळेच त्यांनी ना कधी आपल्या संशोधनाचा व्यवसाय केला ना कधी पेटंट घेण्याच्या फंदात पडले. किंबहूना संशोधनांचे स्वामित्त्वाधिकार घेऊन त्यांचे बाजारीकरण करण्याला त्यांचा कायमच विरोध होता. ३० नोव्हेंबर १९१७ दिनी ‘बोस इन्स्टिट्यूट’ या आपल्या जगप्रसिध्द संशोधनसंस्थेचे उद्घाटन करताना त्यांनी दिलेल्या ‘Voice of Life’ या प्रसिद्ध व्याख्यानातही त्यांनी याच तत्त्वाचा पुरस्कार केलेला आढळतो! परंतु याच संस्थेच्या वेबसाईटवर (www.boseinst.ernet.in) मात्र त्यांच्या ‘Galena Detector’ या संशोधनाचे पेटंट त्यांच्या नावावर असल्याचे सांगितले आहे. हे काय गौडबंगाल आहे बुवा? वास्तविक स्वत: आचार्य बसू यांनीच लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट या विख्यात संस्थेत व्याख्यान देताना आपले ‘Galena Detector’ हे संशोधन मांडले होते व स्पष्टपणे नमूद केले होते की, ‘सदरचे यंत्र व त्यापाठचे संशोधन सर्वांनाच व्यावसायिक व इतर सर्व वापरासाठी मोफत उपलब्ध असेल’ (संदर्भ : ‘विज्ञान प्रसार’या शासकीय उपक्रमाच्या वेबसाईटने प्रकाशित केलेले सुबोध महंतीलिखित आचार्य बसू यांचे चरित्र). एवढेच कश्याला, त्याकाळात या संशोधनाच्या व्यावसायिक उपयोजनासाठी आलेले लठ्ठ रकमेचे सारेच प्रस्ताव आचार्य बसू यांनी धुडकावून लावले होते. तरीही या संशोधनाचे पेटंट आचार्यांच्या नावे कसे काय आढळते?
याचे उत्तर आहेत स्वामी विवेकानंद!! बसूंचे Galena Detector हे जगातील पहिलेवहिले ‘अर्धवाहक’ (Semi-Conductor) होय. यालाच पहिल्या पिढीतला ‘प्रकाशयोगी घट’ही (Photovoltaic Cell) म्हणता येईल! असे म्हणतात की, स्वामी विवेकानंदांना आचार्यांच्या या संशोधनाचे भविष्यकालीन महत्त्व जाणवले होते. तसेच, आपल्या विरक्त वृत्तीमुळे आचार्य या संशोधनाचे पेटंट घेऊ इच्छित नाहीत, हेही स्वामीजींनी ठाऊक होते (संदर्भ : The Monk As Man – The Unknown Life Of Swami Vivekananda, पृ. १४-२५, लेखक : मणिशंकर मुखर्जी, पेंग्विन बुक्स प्रकाशन). त्यामुळेच शिकागो येथील धर्मसभेसाठी अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी आचार्यांची भेट घेतली व त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यात यश येत नाहीसे लक्षात आल्यावर त्यांनी सदर यंत्राच्या प्रती तयार केल्या व आपल्यासोबत अमेरिकेला नेल्या. अमेरिकेतील वास्तव्याच्या काळात स्वामीजींनी नुसती व्याख्यानेच नाही दिली, तर आपली शिष्या व प्रख्यात लेखिका-समाजसेविका श्रीमती सारा बुल हिला सांगून सदरच्या यंत्राचे पेटंटदेखील आचार्य बसूंच्या नावे नोंदवले!!
आज सदर संशोधनाचे पेटंट पाहू गेल्यास ते अमेरिकेत नोंदवले आहे, हे दिसते (पेटंट क्र. US755840). आवेदक या नात्याने आचार्यांच्या नावासोबत श्रीमती बुल यांचेही नाव दिसते. शिवाय स्वामीजींची वैज्ञानिक संशोधनाबाबतची दूरदृष्टी व त्यांचा आचार्यांशी असलेला स्नेहदेखील सुपरिचित आहे. तेव्हा सदरचे पेटंट हे स्वामीजींच्याच सांगण्यावरून नोंदवण्यात आले हे उघड आहे. किंबहूना श्रीमती बुल व आचार्य यांचा परिचय स्वामी विवेकांनंदांमुळेच झाला. श्रीमती बुल यांनी आचार्यांना प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी ४००० डॉलर्सची मदत केल्याचेही उल्लेख आढळतात (संदर्भ : Swami Vivekananda – The Living Vedanta, पृ. २४०-२४२, लेखक : बद्रिनाथ चतुर्वेदी). परंतु स्वामीजी शिकागोसाठी मार्गस्थ झाले ३१ मे १८९३ दिनी आणि आचार्यांनी रेडिओलहरींवरील आपले संशोधन सुरु केले १८९४ साली. तेव्हा सदरचे पेटंट हे श्रीमती बुल यांनी स्वामीजींच्याच सांगण्यावरून नोंदविले हे जरी खरे असले (संदर्भ : Swami Vivekananda & Scientists, पृ. १४, विद्यार्थी विज्ञान मंथन), तरी स्वामीजी स्वत: ते यंत्र घेऊन अमेरिकेला गेले होते ही कथा खोटी असावी, असे मला वाटते. कारण, सदर पेटंटचा आवेदन दिनांक (Filing Date) हा ३० सप्टेंबर १९०१ असा आढळतो, तर संमति व प्रकाशन दिनांक (Granting & Publication Date) हा २९ मार्च १९०४ असा (Application No. : US19010077028 19010930) म्हणजेच, स्वामीजींच्या महानिर्वाणानंतरचा आढळतो.
परंतु सदर पेटंटची नोंदणी ही स्वामीजींच्या सांगण्यावरूनच झाली, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. आज जेव्हा भारताने हळद, बासमती तांदूळ इ. अस्सल भारतीय संशोधनांचे पेटंट्स वेळीच न नोंदविल्यामुळे झालेला प्रचंड त्रास अनुभवलाय, त्या पार्श्वभूमीवर तर स्वामीजींची दूरदृष्टी अधिकच खुलून दिसते. एवढेच नव्हे, तर संशोधनकार्यास व्यापक स्वरूप येण्यासाठी संशोधनसंस्था असावी ही टाटा इन्स्टिट्यूटची आधारभूत कल्पनादेखील स्वामीजींनीच सर जमशेदजी टाटा यांना जपान ते शिकागो या प्रवासात सांगितली होती (संदर्भ : टाटांनी स्वामीजींना दि. २३ नोव्हेंबर १८९८ रोजी लिहिलेले पत्र). थोडक्यात, स्वामीजी केवळ अध्यात्मातच रममाण होणारे नव्हते, तर भौतिक जगात मानाने व ताठ मानेने जगण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याचीदेखील जाण होती त्यांच्याठायी! एकप्रकारे अध्यात्म आणि विज्ञानाचा अपूर्व संगमच म्हणा ना! आजच्या भारताला याचीच सर्वाधिक आवश्यकता आहे. अध्यात्म व विज्ञान ही एकाच गाडीची दोन चाके आहेत. कोणतेही एक चाक जर पंगू असेल, तरीही गाडी मुक्कामी पोहोचू शकत नाही. भौतिक जगात जगण्यासाठी विज्ञान अत्यावश्यक आहेच, परंतु माणूस म्हणून उन्नत होण्यासाठी क्रियाशील अध्यात्मदेखील तितकेच आवश्यक आहे, हा संदेशच जणू स्वामीजींनी कृतीद्वारे दिला आहे!! स्वामीजींचा जन्म मकरसंक्रांतिचा! त्यानिमित्ताने तिळगुळ खाता-खाता आपण सर्वांनी स्वामीजींच्या चरित्रातून एवढा एक बोध घेतला तरी पुरे!!
— © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी तसेच स्वामी विवेकानंद या विषयावर लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी संपर्क करा: www.vikramedke.com)