आत्मबोध

‘धप्प’ असा जोरदार आवाज झाला आणि अरुळसामीने आवाजाच्या दिशेने पाहिले. काय घडले, हे लक्षात यायला क्षणभरही नाही लागला त्याला.लागलीच बोंब ठोकली त्याने! त्याचा आवाज ऐकून बघता-बघता इतर नावाडीही आसपास जमा झाले त्याच्या.
“काय झालं रं बोंबलायला”, एकाने विचारलं!
“त्यो.. त्यो सन्याशी.. त्यो मला दर्यापारच्या फत्तरावर न्हे म्हनत हुता.. त्यानी समिंदरात उडी मारलीन् ना..”
कुणाला काहीच लक्षात येईना हा काय सांगतोय ते. मग पुन्हा पुन्हा खोदून विचारल्यावर तुकड्या तुकड्यांनी माहिती हाती लागू लागली ती अशी की, एक कुणीतरी सन्यासी, ‘पलिकडे श्रीपादशिलेवर पोहोचवशील का’, असं विचारत नावाडी अरुळसामीकडे आला होता. हे तर अरुळसामीचे रोजचेच काम! त्याने ताबडतोब नेण्या-आणण्याचा दर सांगितला. सन्याश्याकडे तर एक फुटकी कवडीदेखील नव्हती. तो खट्टू झाला. त्याने अरुळसामीला विनवणी करून पाहिली, पण भाडं मिळाल्याशिवाय जायला नकार दिला अरुळसामीने! सन्याश्याने वाट पाहिली की कुणी भाविक आपला खर्च करेल का. पण तसं तिथे कुणीच दिसत नव्हतं. अखेरीस सन्याश्याने जरा विचार केला, काश्या आवळला आणि ‘जय माँ कालीऽ’ अशी आरोळी ठोकत समुद्रात उडी ठोकला व पोहत पोहत पुढे जाऊ लागला. हे दृश्य पाहून अरुळसामी घाबरला. पट्टीच्या पोहोणाऱ्यासाठीदेखील अंतर काही कमी नव्हते ते. शिवाय समुद्रात अनेकविध पाशवी जलचर भरलेले! पोहत पोहत श्रीपादशिलेपर्यंत पोहोचण्याची शक्यता जवळजवळ शून्यवत् होती! आपला दोन पैश्यांचा व्यवसाय एखाद्याच्या जीवावर बेतणार या भीतीने घाबरून जाऊन अरुळसामीने बोंब ठोकली!

“आरं पन तुला तरी काय येवढं नडलं होतं पैश्यांचं? नावेत येवढे लोक बसवून न्हेतोस, त्यांच्यात एकजण फुकट न्हेला अस्ता तर काय झिजली आस्ती तुझी व्हडी”, एकाने विचारले.
अरुळसामी अजूनच खचला. म्हणाला,
“माजी लई म्होटी चुकी झाली ह्ये तर खरंच, पन आता येळ दवडायला नगं! आधी त्या साधुबाबाला वाचिवलं पाह्यजे”!
हे म्हणणं सगळ्यांना पटलं. ताबडतोब एक नाव काढण्यात आली आणि तिच्यात बसून ८-१० कोळी श्रीपादशिलेच्या दिशेने निघाले. रस्त्यात ना कुठे सन्यासी दिसला ना काही झटापट झाल्याचं लक्षण! कुणा मगरीने वा माश्याने फाडलं तरी या समुद्रात काय समजणार म्हणा! अखेरची आशा म्हणून सारे श्रीपादशिलेवर पोहोचले. आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही – चिंब भिजलेला तो पंचविशीचा बलदंड सन्यासी शिलेवर ध्यानस्थ बसला होता. या मंडळींची चाहूल लागताच त्याने डोळे उघडले. एवढं दिव्य करीत श्रीपादशिलेवर पोहोचणे ही केवढीतरी मोठी गोष्ट होती. सन्यासी साधासुधा तर खचितच नव्हता. या दिव्यतेने दिपलेल्या सर्वांनी वाकून नमस्कार केला सन्याश्याला.

काही क्षण शांततेत गेले. पहिला शब्द अरुळसामीच्याच तोंडून बाहेर पडला,
“म्हाराज मला क्षमा करा. म्या चुकलो. पैश्यापायी खुळावलो हुतो म्या. तुमचं मोठंपण वळखू शकलो न्हाई मी. जो मानूस इथवर यायला सोत्ताच्या जीवाची बी पर्वा करत न्हाई, त्याचा हितं येन्यामागं नक्कीच कायतरी हेतू आसनार. कायतरी दैवी काम आसनार. मी मूर्ख तुमच्या या कानामध्ये येत होतो. नरकात बी जागा मिळनार न्हाई मला”!
अरुळसामी स्वत:च्याच थोबाडीत मारून घेऊ लागला. ते पाहून सन्यासी झटकन पुढे झाला. अरुळसामीचे हात धरले आणि आसपासच्या समुद्राहूनही अधिक शांत, धीरगंभीर आवाजात म्हणाला,
‘वेडे की खुळे नावाडीबाबा तुम्ही? का स्वत:ला प्रताडित करताहात? अहो आईची इच्छा होती लेकराने पोहत पोहत तिच्यापाशी यावं, ती तिने पूर्ण करून घेतली. तुमचा कुणाचाही काहीही दोष नाही यात. खरंच”!
सन्याश्याचा तो दृष्टीकोन आणि आभाळभर मोठेपण सर्वांना एका क्षणात वश करून गेले! एकाने धीर करून विचारले,
“म्हाराज हितं तुमची जेवनाची काही सोय..”?
“सोय अशी काहीच नाही. इथे ध्यान करण्यासाठी आलोय मी. मातेने जेवू घातलं तर जेवेन, अन्यथा ध्यान संपेपर्यंत उपवेशन!”, सन्यासी सहजपणे म्हणाला!
“त्ये काही न्हाई, माझ्यामुळं तुमास्नी तरास झालाय, तुमी हितं आसेपत्तुर रोज म्याच जेवन आनून द्येनार तुमाला. तुमी आरामात ऱ्हावा, ध्यान करा. म्या घेईन सारी काळजी. येवढं तरी प्रायश्चित्त घेऊंद्याच मला”, अरुळसामीने जाहीर करून टाकलं!
“जशी आईची इच्छा”, सन्याश्याने हसून मान डोलावली!
“पन म्हाराज, तुमचं नाव काय? कुठनं आलात? तमिळ तर वाटत न्हाईत तुमी?”, अरुळसामीने विचारले.
“होय, इथला नाही मी. बंगालहून आलोय. तीर्थयात्रा करतोय मी सध्या. अवघा देश फिरलो. अंती देशाच्या शेवटच्या टोकावर ध्यान करायचं म्हणून या कन्याकुमारीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिलेवर आलो! आणि नावाचं म्हणाल, तर बरीच नावे आहेत मला. कुणी विविदिशानंद म्हणतं, तर कुणी सच्चिदानंद म्हणतं! गेले काही दिवस लोक एका वेगळ्याच नावाने हाक मारतात मला. मलाही ते नाव आवडलंय – उच्चारायला सोपं, सुटसुटीत तरीही अर्थपूर्ण – विवेकानंद! तुम्हीही हवं तर याच नावाने हाक मारा मला!”, सन्याश्याचे निरागस उत्तर!
“स्वामी विवेकानंद”, अरुळसामीने एकवार हे नाव मनात घोळवले व सारे परत फिरले!
त्यानंतर तीन दिवस रोज दिवसातून दोनदा अरुळसामी जेवण घेऊन यायचा व खरकटं घेऊन जायचा. या तीन दिवसांत स्वामी एक शब्दही बोलले नाहीत. सातत्याने ध्यानमग्न असायचे ते. भोजनादी विधींसाठी उठत तेवढेच!

तिसऱ्या दिवशी चमत्कार झाला. आजवरचे सारे आयुष्य स्वामीजींच्या नजरेसमोरून सरकू लागले. प्रेमळ वडील विश्वनाथबाबू आठवले – त्यांनी शिकवलेल्या एकेक गोष्टी, बाळपणीचा रम्य, श्रीमंती काळ आठवला! दाट केसांतून मायेने हात फिरवणारी आई भुवनेश्वरी देवी आठवली! आपला झालेला नास्तिकतेकडून आस्तिकतेपर्यंतचा प्रवास नजरेसमोर उभा राहिला त्यांच्या! वडील गेल्यानंतर नशिबी आलेलं पराकोटीचं दारिद्र्य आणि त्या जीवघेण्या काळात सुखाचा झरा बनलेली श्रीरामकृष्णांची साजरी छवि डोळ्यांपुढे उभी राहिली! ठाकूर म्हणत होते, “अरे नोरेन, तुझा देव हिमालयात नाही! या.. या.. दरिद्री लोकांमध्ये आहे! होय नोरेन, हा दरिद्रीनारायणच तुझा परमेश्वर आहे! यांची सेवा कर, तीच ईश्वराची सेवा ठरेल! ना जीवाची सेवा कर ना शिवाची, ‘शिवभावे जीवसेवा’ कर नोरेन ‘शिवभावे जीवसेवा’ कर! तोच तुझा मार्ग आहे! हिमालयात जाऊन या दु:ख-दैन्यापासून पळू नकोस. लोकांमध्ये जा! त्यांचं दु:ख अनुभव! ही अनुभूतीच तुला मार्ग दाखवेल! मार्ग – दु:खहरणाचा आणि मोक्षाचाही”!
आणि आपणही कश्यातच, अगदी आश्रमातही न गुंतता तीर्थयात्रेला निघालो होतो! सारा भारत फिरलो आपण! पराकोटीची श्रीमंती पाहिली आणि तेवढंच दारिद्र्यही अनुभवलं! सोन्यारुप्यांत खेळणारे लोक पाहिले आणि एकवेळच्या जेवणाला मोताद माणसेही पाहिली! जनतेशी काहीही देणंघेणं नसलेले संस्थानिक जमिनदार पाहिले, जुलमी इंग्रज पाहिले; तर दुसरीकडे खेतडीच्या महाराजांसारखे जाणते शासकही पाहिले! अज्ञानात खितपत पडलेला समाज पाहिला, तसेच टिळकांसारखे ज्ञानीही पाहिले! हा देश शेकडो रंगांनी नटलेला तर खराच!
पण एक आहे, या देशातला गरीब माणूस उपाशीपोटी झोपेल एकवेळ, पण त्याच्या मनात समाधान असेल! आस्थेचं, आस्तिकतेचं आणि अध्यात्माचं समाधान! याउलट इंग्रज शासकांकडे पैश्याने विकत घेण्याजोग्या साऱ्या काही सुखसुविधा आहेत, पण शांत झोप नाही, समाधान नाही!
हे दोन्ही जोडलं पाहिजे! एकत्र केलं पाहिजे!! पाश्चात्यांची औद्योगिकता टिकवून त्यांना भारतीय अध्यात्म शिकवलं पाहिजे आणि भारतीयांचं समाधान टिकवून येथे पाश्चात्य सुखसोयी आणल्या पाहिजेत! कुणीतरी पूल बनून हे काम केलं पाहिजे!
स्वामीजींच्या नजरेसमोर दिव्य प्रकाश पसरला होता! आत्मबोधाचा हा क्षण! त्या प्रकाशात जराशी हालचाल झाली आणि स्वामीजींच्या अत्यधिक संवेदनशील झालेल्या ग्रहणक्षम मनावर तरंग उमटले,
‘कुणीतरी? कुणीतरी का? तूच का नाही? तूच का बनत नाहीस या दोन परस्परपूरक जगांना जोडणारा पूल?’
स्वामीजींच्या नजरेसमोर काही दिवसांपूर्वी वाचलेली ‘जागतिक धर्मपरिषदे’ची बातमी झळकू लागली! आज त्यांच्या प्रवासाची सांगता झाली होती. तीर्थयात्रेचं उद्यापन झालं होतं. आत्मबोधाची अनुभूती झाली होती. आणि आयुष्याला उद्देश मिळाला होता!

यानंतर काही महिन्यांतच शिकागोची ‘जागतिक धर्मपरिषद’ टाळ्यांचा कडकडाट आणि भावनातिरेकाने मारलेल्या आरोळ्यांनी दुमदुमून गेली! याला कारणीभूत होते पाच शब्द! होय, केवळ पाचच शब्दांत स्वामीजींनी उपस्थित सर्व धर्ममार्तंडांना सर्वश्रेष्ठ धर्म कोणता, ते सप्रमाण दाखवून दिले! तलवार न उगारता, कुणालाही न फसवता, रक्ताचा एकही थेंब न सांडता एका हिंदू सन्याश्याने अवघी अमेरिका जिंकून घेतली! बघायला गेलं तर केवळ पाचच शब्द! पण त्यांच्यामागे स्वामीजींची सारी तीर्थयात्रा, सारा अनुभव, भावना आणि सारी सारी आध्यात्मिक अनुभूती सामावलेली होती! ते पाच विश्वविजयी शब्द होते,
“सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका”!!

— © विक्रम श्रीराम एडके
(सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही स्वरुपात पुनप्रकाशित करू नये. केल्यास गुन्हा समजून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. आवडल्यास केवळ शेअर बटनावर क्लिक करून शेअर करावे, ही विनंती. लेखकाच्या अन्य कथा वाचण्यासाठी व ‘स्वामी विवेकानंद’ या विषयावर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *