विरलेल्या काठाचे सुंदर रेशमी वस्त्र : लोकमान्य – एक युगपुरुष

ज्यावेळी कुणी एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर कादंबरी लिहायला घेतो, त्यावेळी लेखकाला पृष्ठसंख्येचं जराही बंधन नसतं. त्यामुळे लेखक त्याला हवी तितकी पाने लिहू शकतो. मग त्या कादंबरीत कधी चरित्रनायकाचं संपूर्ण आयुष्य चितारलं जातं, तर कधी त्याचा काही भाग तेवढा रंगवला जातो. परंतु चित्रपटाची तशी परिस्थिती नसते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, चित्रपटाला वेळेचं बंधन असतं. एका विविक्षित वेळेतच, प्रेक्षकांना सलगपणे पाहाताना कंटाळा येणार नाही; अश्या बेताने चरित्रपट बनवायचा असतो. मग त्यात नायकाचं संपूर्ण आयुष्य दाखवायचं म्हटलं तरी दाखवता येत नाही. काही विशिष्ट घटनांवरच तेवढा भर द्यावा लागतो व दृक्माध्यमाच्या दृष्टीने अनावश्यक असलेले तपशील हे टाळावेच लागतात. माझ्या मते, चरित्रपटांचं खरं कार्य हे निवडलेलं ऐतिहासिक चरित्र मांडणं नसतं, तर त्या चरित्राची स्थापना करणं हे असतं. चांगला चरित्रपट कश्याला म्हणावं, तर जो चित्रपट या माध्यमाला आवश्यक असणारा दृक्परिणाम तर साधतोच, परंतु त्या चरित्रनायकाबद्दल फारशी माहिती न देता प्रेक्षकाला त्या संबंधित नायकाबद्दल अधिकाधिक माहिती मिळवायला प्रवृत्त करतो. यामागे लेखक-दिग्दर्शकाचं संहिता निवडण्याचं आणि त्या संहितेचं चित्रपटात रुपांतरण करण्याचं कौशल्य अतिशय मोलाचं असतं. ते जर साधलं, तरच उत्तम चरित्रपट झाला असं समजावं. तो एखाद्या कादंबरीसारखा असावा, परिणामकारक!! आणि या सर्व विवेचनाच्या पार्श्वभूमीवर बोलायला गेलं, तर खूप साऱ्या उण्या बाजू असूनही ओम राऊतांचा ‘लोकमान्य – एक युगपुरुष’ हा चित्रपट, चांगल्या चरित्रपटांच्या श्रेणीत मोडतो!

चित्रपट सुरु होतो तो लोकमान्यांना (सुबोध भावे) ‘मंडाले’च्या कारावासाची शिक्षा सुनावली जाते त्या क्षणापासून. आणि मग आजच्या काळातील मकरंद (चिन्मय मांडलेकर) या संभ्रमित तरुणाच्या नजरेतून तो उलगडत जातो. दिग्दर्शक, छायाचित्रकार (प्रसाद भेंडे), रंगभूषाकार (विक्रम गायकवाड), नेपथ्यकार (नितीन चंद्रकांत देसाई?), कलाकार या सर्वांनी मिळून शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचा काळ जसाच्या तसा उभा केला आहे. चित्रपटाच्या शेवटी श्रेयनामावलीसोबत खऱ्या व्यक्तीमत्त्वांची व घटना आणि जागांची संदर्भासाठी वापरलेली ऐतिहासिक छायाचित्रे आणि त्यासोबत चित्रपटातील त्या त्या व्यक्ती, घटना व जागांची छायाचित्रे सरकत जातात, आणि ती सगळी इतकी हुबेहुब जमली आहेत, की आश्चर्याने तोंडात बोट घातल्याशिवाय राहावत नाही. यासोबतच, दिग्दर्शक (ओम राऊत)-लेखक (ओम राऊत, कौस्तुभ सावरकर)-संपादक (आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले) या त्रयीने निवडलेल्या घटना इतक्या काही चपखल आहेत, की त्यातून जरी लोकमान्यांचं चरित्र पूर्णपणे कळत नसलं, तरीही लोकमान्यांचं व्यक्तीमत्त्व आणि त्यांच्या कार्याचा आवाका पुरेपूर मनात ठसतो! अगदी लोकमान्यांबद्दल फारशी माहिती नसलेल्या प्रेक्षकाच्या मनात सुद्धा! अजित-समीर यांनी दिलेले चित्रपटाचे संगीत हे एक स्वतंत्र गीतमाला (अल्बम) म्हणून फारसे प्रभावी नसले, तरीदेखील चित्रपटात गीतांसाठी अगदी सोळा आणे नेमक्या जागा आहेत. एकही गीत पडद्यावर पाहाताना अनाठायी वाटत नाही, याबद्दल संगीतकारद्वयी आणि दिग्दर्शकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पार्श्वसंगीत मात्र काही काही महत्वाच्या प्रसंगांमध्ये कर्कश्य वाटते, एवढेच!

आणि सुबोध भावे!! लोकमान्य म्हणजे सुबोध भावे आणि सुबोध भावे म्हणजे लोकमान्य! हा चित्रपट पाहाताना एका क्षणासाठीदेखील ‘हा सुबोध भावे आहे’, असे वाटत नाही; इतका तो त्या भूमिकेत शिरलाय. नव्हे, ती भूमिका जगलाय तो शब्दश:!! अगदी सुरुवातीच्या काळात त्याचे ते आगरकरांसोबतचे (समीर विद्वांस) ठाम वादविवाद, आगरकरांनी “संमतीवयाचा कायदा” करू म्हटल्याबरोब्बर त्याचे ते त्वेषाने उसळून “म्हणजे इंग्रजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदूधर्मात सुधारणा करणार? शक्य नाही! हिंदूधर्मात काय सुधारणा करायची आणि काय नाही, हे हिंदूच ठरवतील. कायद्याने लादलेली बळजबरीची सुधारणा चालणार नाही”, म्हणणे, निव्वळ अप्रतिम! “हा माझा वर्ग आहे, डॉग्स.. अँड ब्रिटिश.. आर नॉट अलाऊड..!!” म्हणताना तर त्याचे ते इतरवेळी मृदू भासणारे डोळे आग ओकत असतात अक्षरशः,  आग! किंबहूना सर्वच पंचलाईन्स पार सीमारेषेपार वाजवल्या आहेत त्याने! सुधारकांची सभा उधळून लावल्यानंतर त्याचे ते कुटील हसणे आणि आसपासच्या गदारोळाला क:पदार्थ समजत ऐटीत निघून जाणे तर मी कधीच विसरू शकणार नाही. याबाबतीत ओम राऊतांची जितकी स्तुती करावी तेवढी थोडीच आहे. हाती सुबोध भावेसारखा हुकमाचा एक्का असताना तो कसा वापरायचा – कुठे त्याच्यातले नायकत्व बाहेर काढायचे, कुठे अभिनय खुलवून घ्यायचा हे सारे त्यांनी बरोब्बर साधले आहे. एवढंच नव्हे, तर कथेशी प्रामाणिक राहून खूप सारी हिंदुत्ववादी फटकेबाजी दे दणादण करून घेतली आहे, कुठेही प्रचारकी थाट न आणता! मग ते राजकारणात अहिंसा घुसडणाऱ्या बेगडी तत्त्वाच्या एकाच प्रसंगात चिंधड्या उडवणं असो, राष्ट्रहितासाठी कराव्या लागणाऱ्या वधाचे समर्थन करणे असो वा दृष्टांत देताना ‘अफज़लखान हिंदूंची मंदिरे फोडायला आला होता’ हे ऐतिहासिक सत्य बेधडक मांडणे असो; लोकमान्यांची हिंदुत्ववादी बाजू दाखवण्यात चित्रपट कुठेही कमी पडत नाही. किंबहुना लोकमान्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी – मग त्या स्वदेशी असो, असहकार असो, धर्मसुधारणा असो; सगळ्या मोजक्या प्रसंगांतून साकारतात, त्यापाठी असलेल्या लोकमान्यांच्या तत्त्वज्ञानासह!! ‘गीतारहस्य’च्या लेखनाची आणि त्याद्वारे लोकमान्यांना झालेल्या आत्मबोधाची दृश्ये तर निव्वळ अप्रतिम!!

परंतु चित्रपटाचा लोकमान्यांच्या काळातील घटनांचा मकरंदच्या आयुष्यातील आजच्या जगातल्या घटनांशी संबंध जोडण्याचा अट्टाहास पटत नाही. किंबहूना मकरंदची अतिआदर्शवादी कथा आणि त्यातून अखेरीस त्याने निवडलेला मार्ग; हे दोन्हीही मांडणीच्या पातळीवर खूपच कच्चे वाटतात. मकरंदची होऊ घातलेली बायको समीरा (प्रिया कामत) सदानकदा अतिवास्तववादी होत त्याच्यावर चिडत असते, तीच शेवटी त्याच्या अतिआदर्शवादी मार्गावरून चालू लागते; हे चुकीचं वाटतं. तिच्या काय वा मकरंदच्या काय, आयुष्यात एवढं मोठं स्थित्यंतर येण्यामागे लोकमान्यांचा वाटा खूपच ओढून ताणून वाटतो. समीराचे पात्र संपूर्ण चित्रपटभर दुय्यम भूमिकेत वावरते, तेच अखेरीस तत्त्वज्ञाच्या भूमिकेत जाऊन मकरंदचा संभ्रम दूर करते, हे पटत नाही. असाच समांतर कथेचा मार्ग याआधी ‘रंग दे बसंती’ (२००४) मध्येही वापरला होता. परंतु त्यात आजच्या काळातील कथादेखील कमालीची सशक्त रेखाटली होती. ऐतिहासिक घटनांपासून प्रेरणा घेत, त्यातली पात्रे आजच्या जगातही काही घटना घडवून आणतात, हे दाखवताना त्या पात्रांच्या आयुष्यात अपेक्षित स्थित्यंतर होण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला होता. खलनायकही त्या तोडीचे दाखवले होते. परंतु यापैकी काहीही मकरंद आणि समीराच्या कथेत होत नाही. त्यामुळेच ती कथा वरवरची वाटते. एखाद्या सुंदर, मऊ, तलम रेशमी वस्त्राचा काठच जर विरलेला असेल, तर कसे वाटेल, तशी! त्यामुळेच चिन्मय मांडलेकरने जबरदस्त आणि प्रिया कामतने चांगले काम करूनही त्यांची कथा मनाची जरादेखील पकड घेत नाही. असा दोन्हीही डगरींवर पाय ठेवण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा जर दिग्दर्शक-लेखक-संपादकांनी लोकमान्यांचाच काळ अजून वाढवला असता, तर बघायला अजून मजा आली असती. शेवटी चित्रपटातून काय शिकायचं आणि काय नाही अथवा मुळात काही शिकायचं की नाही, हा सर्वस्वी प्रेक्षकांचा प्रश्न असतो. लेखक-दिग्दर्शकांनी त्यांना अभिप्रेत असलेली शिकवण प्रेक्षकांवर लादू नये. प्रेक्षकांना मोकळीक द्यावी. तरच चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला जाण्याची शक्यता निर्माण होते. याउलट दोन्ही डगरींवर पाय ठेवल्यामुळे ‘लोकमान्य’चा दर्जा आणि पुनर्गमनाची शक्यता, दोन्हींवरही जाणवण्याइतपत परिणाम झाला आहे.

या सगळ्यात एका व्यक्तीचा विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे लोकमान्यांच्या पत्नीची भूमिका केलेल्या अभिनेत्रीचा. दुर्दैवाने आपल्याकडे चित्रपटांचे विकिपेडीया पेजेस बनवण्याच्या आघाडीवर अतिशय दुष्काळ आहे. त्यामुळे या गुणी अभिनेत्रीचे नाव समजू शकले नाही. परंतु तिने सुबोध भावेच्या तोडीस तोड अभिनय केला आहे. आभाळाएवढ्या नवऱ्याच्या मागोमाग जाताना होत असलेली फरपट, संसाराची धुळदाण होत असतानाची तिची विवश अगतिकता, नवऱ्याशी वेगवेगळ्या पातळ्यांवर असलेला दुरावा, सारे काही तिने मूकपणे व्यक्त केले आहे. तिचे पात्र तिने अतिशय ताकदीने उभे केले आहे. फारसे संवाद नाहीत तिच्या वाट्याला. परंतु तिचे डोळे बोलतात! आणि चित्रपटाच्या सुरुवातीला येणारी नाना पाटेकरांच्या प्रभावी आवाजातली कविता तर केवळ अवर्णनीय!

चित्रपटात ऐतिहासिकदृष्ट्या खूप साऱ्या चुकादेखील आहेत. उदा. सावरकर रेखाटताना त्यांचे १९०३ सालचे पुण्यात शिकतानाचे छायाचित्र संदर्भासाठी घेतले आहे. प्रत्यक्षात चापेकरांच्या हौतात्म्याच्या प्रसंगी सावरकर नाशिकमध्येच शिकत होते. चित्रपटात दाखवले तसे महाविद्यालयीन युवक मुळीच नव्हते. चापेकरांचाही उल्लेख चित्रपटात ‘चापेकर’ असा बरोबर तर श्रेयनामावलीत ‘चाफेकर’ असा चुकीचा आला आहे. गांधी-लोकमान्य अशी भेट झाली होती, हे खरे आहे. मात्र ती १९१५ साली, अर्थात लोकमान्य मंडालेहून सुटून आल्यानंतर. चित्रपटात मात्र हा प्रसंग मंडालेला जाण्यापूर्वीच दाखवलाय. काढायला गेल्यास अश्या खूप साऱ्या चुका काढता येतील. परंतु महत्वाचे हे आहे की; चित्रपटाचा उद्देश, त्यापाठची अमर्याद मेहनत आणि त्याची अत्युत्कृष्ट मांडणी हे सारे सारे अतिशय प्रामाणिक आहे. हे एकदा लक्षात घेतले की, त्रुटी आपोआपच गौण ठरतात आणि उरतो तो ‘लोकमान्य – एक युगपुरुष’! गांधी-नेहरुंना वाहिलेल्या शालेय पाठ्यपुस्तकांवर पोसलेल्या आजच्या पिढीने चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पाहायलाच हवे असे उत्तम चित्रशिल्प!!

*३.५/५

— © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *