व्यासांची विज्ञानकथा

भगवान परशुरामांवर जाहीर व्याख्याने देणारा मी महाराष्ट्रातील बहुतेक एकमेव वक्ता असेन. ही व्याख्यानेदेखील मी पारंपरिक भक्तिचरित्रात्मक ढंगाने देत नाही; उलट परशुरामांच्या चरित्राचे सामाजिक क्रांतिकारक, मुत्सद्दी राजकारणी इ. आजवर फारसे कुणाला माहिती नसलेले पैलू उलगडून विस्ताराने सांगत असतो. त्या ओघात खूप साऱ्या राजवंशांचे व ऋषिवंशांचे सविस्तर वर्णन येते. विशेषतः परशुरामांच्या भार्गववंशीय पूर्वजांच्या कथा येतात. त्यादेखील मी विस्ताराने सांगतो. हेतू हा की, लोकांना समजावे – ज्याकाळात इतर तथाकथित संस्कृतींना लज्जारक्षणासाठी वल्कले गुंडाळण्याचीदेखील अक्कल नव्हती आली, त्याकाळापासून भारत देश हा नुसता प्रगतच नव्हता तर आपल्याकडील थोर पुरुषांच्या व्यवस्थित वंशावळी राखण्याइतका काटेकोरदेखील होता. बायबलमध्येही अश्या वंशावळी येतात, मात्र काही अपवाद वगळता त्यांच्यामध्ये सर्वत्र परस्परविसंगतीच आढळून येते. हिंदू पुराणांमध्ये मात्र क्वचितच वंशावळी विसंगत आढळतात. याच व्याख्यानात मी ऋषि च्यवनांचीही कथा सांगतो. यांचा विवाह शर्याति राजाची कन्या सुकन्येशी झालेला होता.

आज मी तुम्हाला याच संबंधीची एक विज्ञानकथा सांगणार आहे. तुम्ही म्हणाल की आत्तापर्यंत तर हा माणूस पुराणात होता, आता अचानक विज्ञानात कसा काय घुसला? पण मी चुकून असे बोललेलो नाहीये. मी विज्ञानकथाच सांगणार आहे. आणि तीदेखील साधीसुधी नव्हे, तर संस्कृत विज्ञानकथा! स्वत: महर्षी व्यासांनी लिहिलेली!! भागवत पुराणाच्या ९व्या स्कंधातील ३ऱ्या अध्यायात श्लोक क्र. २७ ते ३६ पर्यंत ही विज्ञानकथा येते. ती मी थोडक्यात सांगतो. इच्छुकांना ती मुळातूनच सविस्तर वाचावी!

उपरोक्त राजा शर्यातिला सुकन्येखेरीज आणखी तीन मुले होती – उत्तानबर्हि, आनर्त आणि भूरिषेण! यांपैकी आनर्ताच्या वंशजांना ‘रेवत’ असे म्हणतात. त्यांची राजधानी होती कुशस्थली नावाची नगरी! या आनर्ताच्या मुलांमध्ये सर्वात मोठा होता ‘ककुद्मी’! त्याची मुलगी रेवती! खूप शोधूनही ककुद्मीला रेवतीलायक वर सापडत नव्हता. तेव्हा याबाबतीत मंत्रणा (सल्ला) घेण्यासाठी ककुद्मी रेवतीला घेऊन ब्रह्मलोकी ब्रह्मदेवांकडे गेला. तिथे पोहोचल्यानंतर ब्रह्मदेवांची भेट मिळण्यासाठी या दोघांना काही ‘क्षण’ (श्लोक ३०) थांबावे लागले. ब्रह्मदेव भेटल्यानंतर ककुद्मीने त्यांना नमस्कार केला. आपला येण्यामागचा उद्देश सांगितला आणि आपल्याला मुलीसाठी स्थळ म्हणून आवडलेल्या राजपुत्रांची यादीदेखील सांगितली व विनंती केली की, यातून कोणता मुलगा माझ्या मुलीसाठी नवरा म्हणून योग्य आहे, ते सांगावे. हे ऐकून ब्रह्मदेव हसले. म्हणाले, “महाराज, तुम्ही ज्यांची ज्यांची नावे सांगताहात, ते तर सर्व केव्हाच कालवश झाले. काहीकाहींच्या तर वंशातदेखील कुणी शिल्लक नाहीये सध्या. तुम्ही इकडे काही क्षण थांबलात, परंतु तिकडे पृथ्वीवर मात्र २७ चतुर्युगे (किमान २७ × १२००० × ४ = १२९६००० वर्षे) लोटली आहेत. तेव्हा तुम्ही परत जा. तुम्ही जाईपर्यंत नारायणाचा अंशावतार बलराम नावाने झालेला असेल. त्याच्याशी तुमच्या मुलीचा विवाह करा”. याप्रमाणे ककुद्मी व रेवती परत आले. रेवती व बलरामाचा विवाह झाला आणि ककुद्मी तपश्चर्येसाठी बद्रिनाथधामला निघून गेला.

तुम्ही म्हणाल, यात विज्ञान कुठे आहे? सांगतो. भौतिकशास्त्रात सापेक्षतेचा सिद्धांत सांगितला जातो. याच सापेक्षतेच्या सिद्धांतातून एक विरोधाभास (पॅरॅडॉक्स) निर्माण होतो, ज्याला म्हणतात ‘जुळ्यांचा विरोधाभास’ (ट्विन्स पॅरॅडॉक्स). एकाच वेळी जन्माला आलेली एकसारखीच दिसणारी जुळी भावंडे. समजा वयाच्या विसाव्या वर्षी त्यांच्यापैकी एक जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने अवकाशप्रवासाला गेला व समजा वीस वर्षांनी परत आला, तर इकडे पृथ्वीवर त्याचा भाऊ चाळीस वर्षांचा झालेला असेल. परंतु अवकाशगामी भाऊ मात्र त्यावेळीही विशीचाच असेल! हे घडते कारण, भौतिकशास्त्राचा नियम सांगतो की प्रकाशाच्या वेगाने जर एखादा कण मार्गक्रमण करत असेल, तर त्याच्यासाठी काळ हा थांबल्यासारखाच असतो. त्यामुळेच त्या अवकाशगामी भावंडाचे वय वाढत नाही. इकडे पृथ्वीवर राहाणारा भाऊ मात्र म्हातारा होतो! यालाच म्हणतात जुळ्यांचा विरोधाभास. हाच सिद्धांत ख्रिस्तोफर नोलानने आपल्या ‘इंटरस्टेलर’ (२०१४) या चित्रपटातही वापरला आहे. किंबहुना सध्याची अवकाशयाने प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत नसूनही त्यांच्यातून प्रवास करणाऱ्यांना हा सिद्धांत सूक्ष्मप्रमाणात लागू पडतो, ज्याला ‘कालविस्तार’ (टाईम डायलेशन) असे म्हणतात. अर्थात, या विरोधाभासाची खूप सारी उदाहरणे व पर्याय आहेत, आपण समजण्यास सोपे व्हावे म्हणून सर्वात आदर्श पर्याय तेवढा पाहातो आहोत.

उपरोक्त ‘जुळ्यांचा विरोधाभास’ सर्वप्रथम पॉल लँगेविन या शास्त्रज्ञाने १९११ साली मांडला. भागवताचा काळ हा इ. स. पू. ३५०० वर्षांपासून ते इ. स. ६०० पर्यंत वेगवेगळे संशोधक सांगतात. मात्र कुणीही संशोधक हा काळ १९११ नंतरचा असल्याचे सांगत नाही! परंतु तरीदेखील हाच जुळ्यांचा विरोधाभास व्यासांनी ककुद्मीच्या कथेत मांडल्याचे आढळत नाही का? ककुद्मी आणि रेवती प्रवास करत ‘ब्रह्मलोक’ नावाच्या ठिकाणी गेले, तिथे काही क्षण थांबले व परत आले. मात्र तेवढ्या काळात पृथ्वीवर लाखो वर्षे उलटून गेली होती. तरीदेखील परत आल्यानंतरही रेवती व ककुद्मीचे वय मात्र तेवढेच राहिले होते. ही ‘जुळ्यांचा विरोधाभास’ स्पष्ट करणारी कथाच नव्हे काय? व्यासांनी तर या कथेत ‘त्या लोकावर (ग्रहावर?) घालवलेला वेळ’ही विचारात घेतलाय!

एक हिंदू म्हणून माझा ठाम विश्वास आहे की, आपली पुराणे हा ललित अंगाने मांडलेला का होईना पण खरा इतिहास आहे. मात्र हल्ली काही आंग्लाळलेली मंडळी भारतीय संस्कृतीचे ऐतिहासिकत्व मुळापासून नाकारतात. तर ठिक आहे. वादात नको पडायला. सदर कथा भागवतपुराणात आहे? आहे! ती ‘जुळ्यांचा विरोधाभास’ मांडला जाण्याच्या खूप वर्षे आधी लिहिलेली आहे? आहे! त्यात आजच्या जगातले विज्ञान विचारात पाडण्याइतपत प्रमाणात आहे? आहे! तर मग व्यासांनी एक काल्पनिक का होईना परंतु विज्ञानकथा लिहिली, एवढे तरी आपल्याला मान्य करणे भागच आहे. शिवाय विज्ञानकथा लिहिण्यासाठीसुद्धा कुठेतरी त्या अचूक विचारांपर्यंत पोहोचण्याइतके प्रगत विज्ञान अस्तित्वात असावे लागते. भारतीय संस्कृती व्यासांच्या काळात तेवढी तरी वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत होती, हेही मान्यच करावे लागते. कारण कल्पनेलादेखील कुठे ना कुठे वास्तवजगतातील अनुभवाचा आधार असतो; इथे तर व्यासांनी एका अतिशय तात्त्विक व गणितीय बाबीचा आपल्या कथेत खुबीने वापर केल्याचे दिसतेय! तेव्हा कुणी नाकारो वा स्वीकारो, सदर कथा खरोखर घडलेली असो वा नसो; या कथेतील वैज्ञानिकता कदापिही दुर्लक्षिण्याजोगी नाही. धर्मग्रंथ म्हणून सोडून दिलेल्या संस्कृत ग्रंथांतरी या कथेसारखीच सहस्रावधी विज्ञानरत्ने पडून आहेत. अवकाश आहे तो केवळ कुणीतरी डोळसपणे शोधण्याचा!!

— © विक्रम श्रीराम एडके
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी, तसेच अनेकानेक विषयांवर लेखकाची व्याख्याने आयोजित करण्यासाठी संपर्क करा:  www.vikramedke.com]

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *