तलाश – मंत्रावेगळे गंधर्वगान!

   कल्पना करा की तुम्ही एखाद्या मैफिलीला गेला आहात. चांगल्या नावाजलेल्या गायकाची मैफिल आहे ही. आज मात्र तो गायक गाताना सतत चुका करतोय. काही जागा जिथं खरं तर सूर असायला हवा होता, त्या मोकळ्याच सोडतोय. का असं करतोय तो? त्याला वेड लागलंय का? मैफिल पुढे सरकत जाते आणि अचानक, अचानक तुम्हाला साक्षात्कार होतो की, इतका वेळ आपण ज्याला संगीत समजत होतो, ते संगीत नव्हतंच मुळी! संगीत

तर त्या सूर नसलेल्या मोकळ्या जागांतच होतं. गायकी चालू होती ती तिथं! मूर्ख तो गायक नव्हता, तर आपणच होतो, जे नसलेल्या गोष्टी पाहता पाहता असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो; किंबहुना त्यांना तुछ लेखत होतो. मला कल्पना आहे की, तुम्हाला माझे हे लेखन अतिशय विचित्र वाटते आहे. पण संगीताचा नव्यानेच साक्षात्कार व्हावा, समोरची मैफिल ही अचानक “गंधर्वगान” व्हावी अशी, अगदी अशीच अवस्था माझी “तलाश” पाहून झालीय.

    मी मुद्दामच “गंधर्वगान” हा शब्द वापरलाय. “गंधर्वगान” – असं संगीत जे या जगातलं नसतंच. “तलाश”ही हिट होण्यासाठी बनलेला नाहीये, तो वेगळा आहे, मंत्रावेगळा! आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी, कुठे ना कुठे अश्या घटना घडलेल्या असतात, ज्यांची कारणमीमांसा करणे अशक्य असते. जणू काही एखादी खिडकी उघडते आणि आपण “त्या” जगात क्षणभरासाठी डोकावून येतो. नीट विचार करा, आठवा, तुमच्या आयुष्यातही अश्या घटना नक्कीच घडलेल्या असणार. आपण त्या मनाच्या तळाशी गाडून टाकतो, कुणाला सांगत नाही कारण, एकतर या घटना सिद्धतेच्या कोटीतल्याच नसतात; आणि दुसरे म्हणजे हे अनुभव इतके व्यक्तीसापेक्ष असतात ना की, दुसर्या कुणाला सांगितले तर त्याचा विश्वास बसेल न बसेल यापेक्षा आपला, केवळ आपलाच असलेला हा ठेवा हरवेल की काय हीच भीती अधिक वाटत असते. खरं सांगू, मनाच्या तळाशी खोलवर जाऊन बसलेल्या माझ्या आयुष्यातील अश्या सर्व घटना “तलाश”ने ढवळून वर आणल्या आहेत.

    माझी माहिती कदाचित तोकडी असू शकेल पण, अश्या धाटणीचा चित्रपट याआधी क्वचितच कुठे बनला असेल. मुळात गूढकथा पडद्यावर मांडण्याची हिम्मत फारच कमी लोकांमध्ये आहे. नववास्तववाद आणि नवकाल्पनिकता यांच्या सीमारेषेवर कुठेतरी घुटमळणारा हा चित्रपट आहे. ही केवळ रहस्यकथा नाही. मी पाहतोय की काही लेक एसेमेस, फेसबुक पोस्ट्स यांच्याद्वारे “तलाश”चं रहस्य आपण काहीतरी फार मोठा तीर मारतोय या आविर्भावात आधीच सांगत आहेत. मुळात कोणत्याही प्रामाणिक कलाकृतीला मारक ठरेल असे काही वागणे हेच अतिशय ओंगळवाणे आहे. तरीही ज्यांना यात मजा वाटतेय, त्यांच्यासाठी आधीचं वाक्य पुन्हा एकदा लिहितो, ही केवळ रहस्यकथा नाही! रहस्य हे केवळ एक माध्यम आहे. “तलाश” आहे मुख्य पात्र (आमीर- सुरजन सिंह) घेत असलेला शोध – “स्व”चा. हा शोधच या कथेचा गाभा हे. त्यामुळे या कथेचं रहस्य किती जरी माहिती झालं तरीही दिग्दर्शिकेच्या हेतूला बाधा येत नाही. या चित्रपटातील प्रत्येक घटनेला, प्रत्येक पात्राला अनेक अर्थ आहेत; काहींची आपण कल्पना करू शकतो तर काहींची अजिबातच नाही. त्यातही मी ज्यांची कल्पना करेन त्यांची तुम्ही करालच असे नाही, आणि तुम्ही ज्यांची कराल त्यांची मी करू शकेनच असेही नाही.

    दिग्दर्शिकेने रहस्यकथेचे किंबहुना गूढकथेचे माध्यम स्वीकारले असल्याने मी या कथेची थोडीशीही कल्पना न देणे साहजिकच आहे. पण एका निरुपद्रवी गोष्टीचा उल्लेख मात्र मी करू शकतो. समोर येणाऱ्या कोणत्याही केसमधील घटनांचा संबंध आपल्या मुलाच्या मृत्यूशी नकळतपणे जोडण्याची आमिरच्या पात्राला सवय असते. या गोष्टीचे असे काही संयत चित्रण रीमा कागतीने केलेय की त्याला तोड नाही. खरं तर या एका कथेत अनेक कथा, अनेक पात्रं, त्यांची एकमेकांशी थेट संबंध नसलेली आयुष्यं इतकी बेमालूमपणे मिसळून टाकलीयत की, त्यांचा आपसूकच एक “कोलाज” तयार झालाय. त्यातील कोणताही एक तुकडा जरी काढून टाकला तरीही, सबंध कथा – सबंध चित्रपट चुकेल. या संदर्भात लेखिका-दिग्दर्शिका रीमा कागती आणि सहलेखिका झोया अख्तर यांची जितकी स्तुती करावी तेवढी थोडीच आहे (कोण म्हणतं बायकांना डोकं नसतं!).

    आमीर पोलीस अधिकार्याची भूमिका करतोय म्हणून तुम्ही जर “दबंग” अथवा “राउडी राठोड” डोक्यात घेऊन जाणार असाल तर तुमचा भ्रमनिरास होईल. तुम्ही अगदी “सरफरोश” जरी डोक्यात घेऊन गेलात तरीही भ्रमनिरासच होईल! हे पात्र या सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. पंचलाईन्स नाहीत किंवा मारधाडही नाही! मग आमिरचे पात्र आपल्याला अजिबातच इम्प्रेस करू शकत नाही का? तर शशीच्या मैत्रिणीला कामाठीपुर्यातून सोडवण्याचा प्रसंग पहा. छोटासाच आहे, पण आमिरचे डोळे अक्षरश: आग ओकतात आग! खरं तर आमीर खान आपल्या प्रत्येक नव्या चित्रपटात आधीच्या चित्रपटापेक्षाही चांगला अभिनय कसा काय करू शकतो, हे एक कोडेच आहे – त्याचीही एकदा “तलाश” झाली पाहिजे! राणी मुखर्जीने छोट्याश्या भूमिकेत सुंदर काम केलेय. करीना कपूरने तर कमालच केलीय. पण विशेष लक्षात राहतो तो नवाझुद्दिन सिद्दिकी या गुणी कलाकाराने साकारलेला तैमुर! खरोखर सलाम त्याला! राजकुमार यादव (देवव्रत कुलकर्णी) आणि शेरनाझ पटेल (फ्रेनी) या दोन कलाकारांचा उल्लेख न करणे म्हणजे त्यांच्या अभिनयकौशल्यावर अन्याय केल्यासारखे होईल.

    खरोखर हा चित्रपट शब्दातीत आहे. सत्याच्या शोधात अनेक असत्ये पुढे येतात, पण जेव्हा निखालस सत्य स्वत:हून समोर येते, त्यावेळी अनेकदा आपण त्यासाठी तयार नसतो. अवश्य चित्रपटगृहात जा आणि पहा “स्व”च्या या “तलाश”साठी तुम्ही तयार आहात का!

*४/५.

– © विक्रम श्रीराम एडके.
(edkevikram@gmail.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *