" ते…. "

जेव्हा तुम्ही-आम्ही घालत असतो आपल्या कुजलेल्या दु:खाचे लोणचे,
तेव्हा ‘ते’ आशेचे अंकुर पेरत असतात..
जेव्हा तुम्ही-आम्ही ढाळत असतो वांझोटे अश्रू,
तेव्हा ते कष्टाच्या जमिनीवर घामाचं सिंचन करत असतात..!
आपल्याला अंधारात दिसतो बागुलबुवा,
अन् ‘ते’ आशेच्या किरणांना खेचत असतात..
दिवस सरतात, काळ जातो,
तुम्ही-आम्ही उचलत राहातो आयुष्याचे तेच जुने ओझे,
अन् तेव्हा ‘ते’ यशोशिखरावर स्वार झालेले असतात..
आपण बुजगावण्यासारखं जगतो, मरून जातो,
तेव्हा ‘ते’ अमर झालेले असतात..
असे कसे? कारण…
जेव्हा तुम्ही-आम्ही बडवत असतो परिस्थितीचा पोकळ ऊर,
तेव्हा ‘ते’ स्वप्नांची धारदार शस्त्रे करून मैदानात उतरलेले असतात..
आणि कदाचित म्हणूनच ‘ते’ सामान्य असूनही असामान्य ठरत असतात..

– © विक्रम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *