हिंदुत्व हे मोठे अजब रसायन आहे

हिंदुत्व हे मोठे अजब रसायन आहे. ते संपले म्हणून कुणी पोत खाली करू गेले तर त्याची ज्वाळा दुप्पट त्वेषाने वर वरच उफाळते.
   जगज्जेत्या शिकन्दराला भ्रम होता की हा हा म्हणता म्हणता हिंदुस्थान काबीज करेल. तो शिकंदर हिंदुस्थानचे साधे अंगणही बघू शकला नाही! कालौघात चाणक्यही गेले आणि चंद्रगुप्तही, केवळ हिंदुत्व तेवढे टिकून राहिले. म्लेन्छांनी या भूमीला उणीपुरी ६०० वर्षे गुलाम करून ठेवले. आता हिंदुत्व औषधालाही उरणार नाही असे वाटत असताना ते नुसते तगलेच नाही तर या भूमीत त्याने शिवप्रभून्सारखा संजीवन योद्धाही जन्मास घालून दाखवला. शिवप्रभूही गेले आणि शंभूछ्त्रपतीही पण तोवर हिंदुत्वाची धुरा बाजीराव बल्लाळ नावाच्या महायोद्ध्याने केव्हाच पेलली होती!
   इंग्रजी अंमलातही हे दैवी रसायन आपले अस्तित्व दाखवून देताच होते, कधी १८५७ च्या रूपाने तर कधी अनेकानेक क्रांतिकारकांच्या रूपाने! पुढे जन्माला आला तो विनायक दामोदर सावरकर नावाचा महानायक, हिंदू-हृदय-सम्राट! या महानायकाने हिंदुत्वाचा उद्घोष असा काही केला की सबंध देश ढवळून निघाला! पुन्हा तोच प्रश्न, सावरकरांच्या नंतर कोण?
   सावरकरांच्या नंतर कोण? अरे केव्हाच जन्माला आला होता एक हिंदू-हृदय-सम्राट! “बाळ” नावाचा “बाप” माणूस, ज्याने गेली पाच दशके केवळ हिंदूंच्याच कशाला, सर्वच सच्च्या देशभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
   आज हा बापही गेला. पण म्हणून हिंदुत्व पोरके झाले असे मानायचे काही कारण नाही. मराठी वाघ जरी अनंताच्या यात्रेवर प्रयाण करता झाला असला तरीही, गुजरातचा सिंह अजून जिवंत आहे. म्हणून म्हणतो, हिंदुत्व संपले नाही, हिंदुत्व संपत नाही. ते एक मोठे अजब रसायन आहे. ते संपले म्हणून कुणी पोत खाली करू गेले तर त्याची ज्वाळा दुप्पट त्वेषाने वर वरच उफाळते!
© विक्रम श्रीराम एडके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *