शांती नव्हे, "सद्गती"

कुणीही महत्वाची व्यक्ती गेली की मी फेसबूकवर पोस्ट्स वाचतो किंवा मला भ्रमणध्वनीवर संदेश येतात, “त्यांच्या आत्म्याला शांती लाभो” अथवा “Rest In Peace”. वास्तविक ही इंग्रजांनी रूढ केलेली पद्धत, आपली नव्हे. पण आपल्यातले बहुतांशी लोक कळत-नकळत हीच पद्धत पुढे चालवतायत. यालाच साध्या भाषेत मानसिक-पारतंत्र्य म्हणतात.
ख्रिशचन धर्मात अशी समजूत प्रचलित आहे की, व्यक्तीचा आत्मा त्याच्यासह कबरीत अंतिम निवाड्याचा

दिवस येईपर्यंत पडून राहणार आहे. मग इतकी हजारो वर्षे पडून राहण्याचे त्या आत्म्याच्या नशिबात आहेच तर ते किमान शांततेने होवो, म्हणून म्हणतात, “शांती लाभो”. याउलट भारतीय संस्कृतीत मृत्यूला एक मंगल-सोहळा मानतात. आपण ज्याप्रमाणे जुने कपडे टाकून देत नवीन कपडे घालतो, त्याप्रमाणेच आत्माही जुने शरीर टाकून मोक्षप्राप्ती होईपर्यंत नवनवीन शरीरे परिधान करत असतो. आपल्या संस्कृतीत मृत्यूला स्वल्पविरामच नव्हे, तर एका प्रवासाची, अनंताच्या यात्रेची सुरूवात मानतात. या अश्या प्रवासासाठी त्या आत्म्याला साहजिकच गतीची आवश्यकता असणार. म्हणूनच आपली संस्कृती जाणणारे म्हणतात, “त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो” किंवा “May His/Her Soul Attain Sadgati”.
आता काही तर्कट मंडळी प्रश्न करतील की, भारतीय संस्कृतीत खरी कश्यावरून? त्याच्यासाठी काही मुद्दे –
१) मृत्यूनंतर आत्म्याला शरीराबाहेर ढकलण्याचे काम अपान वायू करतो. वैज्ञानिकदृष्ट्या एक गोष्ट नक्की की, मृत्युसमयी शरीरातून “काहीतरी बाहेर जाते”. आता बाहेर जाते म्हटलं की गतीशी संबंध आलाच.
२) पाश्चात्यांकडून आपल्या संस्कृतीतली एखादी गोष्ट मान्य झाली तर आणि तरच ती मान्य करणारे काही महाभाग असतात. अश्यांनी कृपया विविध पाश्चात्त्य Theosophists ची या विषयावर मते वाचावीत आणि एक्टोप्लाझ्म वगैरे त्यांच्याच भाषेत समजून घ्यावे, कारण त्यांना आत्मा, गती वगैरे शब्द डाऊन-मार्केट वाटण्याची शक्यता आहे.
३) पाश्चात्य शांतीची संकल्पना बरोबर की आपली गतीची हे वैज्ञानिकदृष्ट्या अजूनतरी १००% सिद्ध झालं नाही. मग जर का दोन्हीही शंकास्पदच असतील तर त्यांची संकल्पना का वापरावी? जरासा स्वाभिमान वापरत खरं काय ते कळेपर्यंत आपलीच संकल्पना का वापरू नये?
इतर सूज्ञांनाही माझी नम्र विनंती आहे की, किमान स्वाभिमान आणि आपल्या संस्कृतीवरील विश्वास या दोन कारणांनी तरी आपण व्यक्तीस “सद्गती लाभो” असे म्हणावे. श्राद्ध या संकल्पनेमागेही मृतात्म्यास सद्गती देण्याचाच विचार असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *