जब तक है जान (संगीत-समीक्षण) : भाग – १

चित्रपटागणिक प्रगती करत करत कायम स्वतःची शैली बदलत राहणारा माझ्या माहितीतील एकमेव संगीतकार म्हणजे ए. आर. रहमान! १९९५ च रहमान २००५ साली आढळत नाही आणि २००५ चा रहमान २०१२ साली आढळणार नाही!
   परंतु मला सर्वाधिक आकर्षित करणारी गोष्ट हि नव्हे! मला कळतं तेव्हापासून मी रहमानचं सर्व संगीत ऐकत आलोय. सुरुवातीच्या काळात त्याने लता मंगेशकर, आशा भोसले, एस. पी. बालासुब्रह्मण्यम, येसुदास, एस. जानकी, के. एस. चित्रा आदी दिग्गजांसोबत खूप सुरेख गाणी दिली. आजही तो, गीताची तशी गरजच असेल तर या महानुभावांकडून गाऊन घेतोच. पण त्याने लवकरच बहुधा विचार सुरु केला असावा की, ‘ही मंडळी गेल्यानंतर काय‘? म्हणूनच त्याने जाणीवपूर्वक या लोकांची जागा नव्या गायकांना देणे सुरु केले. सुरुवातीला त्याच्यावर चहूबाजूंनी प्रखर टीकाही झाली, परंतु तो डगमगला नाही. १०-१२ वर्षे मेहनत घेऊन त्याने काही हिरे घडवले. आज हे गायक उपरोक्त दिग्गजांच्या तुलनेत कुठेही कमी तर नाहीतच, उलट या प्रत्येकाचा स्वत:च एक दिग्गज बनण्याकडे प्रवास चालू झाल्याचे स्पष्ट दिसते. ही काही नावे पहा – कार्तिक, जावेद अली, बेनी दयाल, चिन्मयी, हर्षदीप कौर, विजयप्रकाश, नरेश अय्यर, राशीद अली, विजय येसुदास – सगळीच नावे देणे मला शक्यही होणार नाही. कदाचित, घेतलेल्या नावांपेक्षा राहिलेली नावेच अधिक असतील!
   आता या लोकांना घडवलं म्हणजे नेमकं काय केलं? काही उदाहरणे देतो. जावेद अलीची रहमानकडे गायलेली जश्न-ए-बहारा (जोधा अकबर – २००८) पासून ते जोहरा जबीन (एक दिवाना था – २०१२) या चार वर्षांतली सारी गीते ऐका. तुम्हाला त्याचा ‘एक साधा गायक’ ते ‘एक दिग्गज’ असा झालेला प्रवास सहज जाणवेल. तीच गोष्ट चिन्मयीची, कार्तिकची आणि इतर सर्वांची! किलीमांजारो (एनधिरन – २०१०) हे गीत ज्या जावेद-चिन्मयी जोडीने गायलेय, त्याच जोडीने मैय्या यशोदा (झूठा हि सही – २०१०) देखील गायलेय हे खरेच वाटत नाही इतके वैविध्य त्यांनी आपल्या गायकीत आणलेय. यात त्यांचा गुरु असलेल्या रहमानचा वाटा काय असेल हे मी निराळे सांगायची आवश्यकता नाही! आता तर रहमानने के. एम. म्युझिक कॉन्झरवेटरीद्वारे असे हिरे अधिक शिस्तबद्ध पद्धतीने घडविणारे विद्यालयच सुरु केले आहे. याच विद्यालयात शिकलेला फणी कल्याण हा संगीतकार सध्या तमिळ चित्रपटसृष्टीत नाव कमावतो आहे. रहमानचा भाचा जी. व्ही. प्रकाशकुमार तिकडे तर प्रसिद्ध आहेच, शिवाय ग्यांग्स ऑफ वासेपूर (२०१२) आणि जोकर (२०१२) द्वारे तो इकडेही हळूहळू प्रसिद्ध होतोय. असो, विस्तारभयास्तव एवढीच उदाहरणे पुरे!
   यावेळी हाच ए. आर. रहमान रॉकस्टार (२०११) नंतर तब्बल वर्षभराने संगीतप्रेमींसाठी मेजवानी घेऊन आलाय ‘जब तक है जान’च्या रूपाने. एकीकडे यश चोप्रांचा शेवटचा चित्रपट असे वलय लाभलेले तर दुसरीकडे दिल से (१९९८) पासून ते रावण (२०१०) पर्यंत एकाहून एक सरस गीते देण्याची परंपरा असलेली रहमान-गुलजार ही जोडी! वर चर्चा केल्याप्रमाणे, इतका भव्य प्रकल्प असूनही बहुतांशी गीते नवोदितांनी गायली आहेत तर उरलेली गीते नवदिग्गजांनी! आता ही गीते खरोखरीच जमून आली आहेत किंवा काय हे पाहूया याच लेखाच्या पुढील भागात!

– © विक्रम श्रीराम एडके

(edkevikram@gmail.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *