भाषाभिमान – एक स्फुट चिंतन.

   लॉर्ड मेकोले आपल्या २ फेब्रु. १८३५ रोजी ब्रिटीश संसदेत केलेल्या भाषणात म्हणतो,
I have traveled across the length and breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such caliber, that I do not think we would ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and, therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self-esteem, their native culture and they will become what we want them, a truly dominated nation“.
    दुर्दैवाने मेकोले यशस्वी झालाय असं नाही वाटत का आपल्याला? भाषेपुरताच विचार करू. आज आपण इंग्रजीत बोलणेच भूषण मानू लागलो आहोत. माझ्या माहितीत काही लोक असेही आहेत जे प्रसंगी उपाशी राहतात पण भरमसाठ शुल्क भरून मुलाला इंग्रजी शाळेतच टाकतात! का तर म्हणे, इंग्रजी ही जगाची भाषा आहे, इंग्रजी येत नसेल तर आजच्या जगात वावरणे अशक्य आहे, वगैरे.. खरंच तसं आहे का हो?
    चीनमध्ये इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता नाही. जपानमध्ये कुणी इंग्रजीत बोलत नाही. जर्मनी, फ्रान्समध्ये इंग्रजीत बोललात तर लोक तुमच्याकडे तुच्छतेने पाहतात. रशियात सर्व कारभार रशियन भाषेतच चालतो. इंग्लंडसारखे काही अपवाद वगळले तर सबंध युरोपात कोणताही देश इंग्रजी-भाषिक नाही. उपरोक्त सर्व देशांत शिक्षण, प्रशासन आणि व्यापार हे तिन्ही त्यांच्याच भाषेत चालतात. हे सर्व देश तथाकथित “प्रगत देश” या व्याख्येत बसतात. मग कश्याच्या आधारावर आम्ही इंग्रजीला “जगाची भाषा” म्हणतो? बरं, मी इंग्रजी अजिबातच शिकू नये असे म्हणतोय का? नाही. इंग्रजी शिकावी, अवश्य शिकावी पण कोणतीही इतर परकीय भाषा कामापुरती शिकतो तशी. याउप्पर तिचा अतिवापर टाळावा.
   एक उदाहरण सांगतो. विख्यात विद्वान श्री. रामदास कळसकर कामानिमित्त फ्रान्समध्ये जात, राहत असत. तिथे गेले कि नेहमीच एका फ्रेंच कुटुंबाकडे उतरत. काही वर्षांचा हा परिचय दाट स्नेहात बदलला होता. एकदा कळसकर तेथे काही काळासाठी वास्तव्यास असताना त्यांना भारतातून काही पत्रे आली. कळसकर बाहेर गेले होते म्हणून घरमालकिणीच्या मुलीने ती पत्रे स्वत:कडे ठेवली आणि ते आल्यावर त्यांना ती दिली. देताना तिने विचारले की, ‘मी पत्रे फोडली नाहीत पण पाकीटावरचा मजकूर वाचला. तो इंग्रजीत आहे. असे का?’ कळसकर तिला म्हणाले की, ‘आमच्या देशात बर्याचदा पत्रव्यवहारासाठी वगैरे इंग्रजीचा वापर होतो.’ ही गोष्ट त्या मुलीने आपल्या आईला सांगितली. जेवणाच्या वेळी त्या बाई कळसकरांना म्हणाल्या, ‘तुम्ही आमच्या घरातून कृपया दुसरीकडे राहायला जा. ज्या देशातील लोक स्वभाषेचा वापर करीत नाहीत त्या लोकांना आमच्याकडे रानटी समजतात. आणि अश्या व्यक्तीला मी आमच्या घरात ठेवू इच्छित नाही.’ गोष्ट थोडीशी तिखट वाटेल, पण अंजन झणझणीतच असायला हवे!
    याउलट पहा. स्वातंत्र्य मिळाल्यावर इस्रायेलने आपल्या हिब्रू भाषेच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. “शुद्ध हिब्रूत बोला आणि बक्षीस मिळवा” अश्या धर्तीच्या स्पर्धाही घेतल्या गेल्या आणि मृतप्राय झालेल्या हिब्रूचे पुनरुज्जीवन झाले. ही त्यांची निष्ठा!
    कुणाला काही शिकवावे इतका काही मी मोठा नाही, पण माझ्यासारख्या अतिसामान्य माणसालाही एवढं नक्की कळतं की आपल्या भाषेची काळजी आपणच घ्यायला हवी. इंग्रजीतच एक म्हण आहे – Alphabet follows the religion. दुर्दैवाने ही म्हण खरी ठरू पाहतेय. हे व्हायला नको. आपला श्रेष्ठ वारसा आपण आपल्याच कर्मांनी गमवायला नको. किमान माझ्याशी सहमत होणार्यांनी तरी आपल्या मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे. इंग्रजीचा दुराग्रह हा आपल्या मानसिक पारतंत्र्याच्या पाउलखुणा आहेत, त्या पुसायची जबाबदारी आपलीच आणि त्यासाठी स्वभाषाभिमानाची वाट बांधायची जबाबदारीदेखील आपलीच!

– विक्रम श्रीराम एडके.
(edkevikram@gmail.com)

One thought on “भाषाभिमान – एक स्फुट चिंतन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *