होस्साना – जयघोष प्रेमाचा… जयघोष माझ्या "देवा"चा..!

११ किंवा १२ जानेवारी २०१० चा काळ असावा. मला त्या काळात तमिळ अजिबातच कळत नव्हतं (अजूनही फार कुठं कळतंय!). तिरूअनंतपूरम ते मदुराई या रेल्वेप्रवासात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला मी माझ्या “देवा”च्या गाण्यांचे शब्द आठवून-आठवून अर्थ विचारात होतो. त्यावेळी ते तमिळ कुटुंब भेटलं. नवरा-बायको आणि दोन लहान मुलं! ते “अण्णा” भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते पण संगीतात त्यांना प्रचंड रुची. आणि शिवाय कुणाही तमिळ व्यक्तीइतकेच “रहमानियन“! आम्ही खूप वेळ बोलत होतो. त्या भल्या माणसाने मला “सहाना सारल.. (शिवाजी – द बॉस – २००७)”, “एल्लापगळूम.. (आळगिया तमिळ माकन – २००७)” अशी कित्येक गीते संपूर्ण समजावून सांगितली. अचानक मी त्यांना विचारलं, “होस्साना म्हणजे काय हो”? ते थोडेसे विचारात पडले, म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे हा तमिळ शब्द नाहीये. इंग्लिशही नाही. त्याचा अर्थ कदाचित वेगळा काहीतरी होत असावा”.
  त्या काळात गौतम वासुदेव मेननच्या “विनईतांडी वरुवाया”ची गीते प्रकाशित झालेली होती. “देवा”ची गाणी “चढायला” थोडा वेळ घेतात पण आधी प्रकाशित झालेलं एकक-गीत (Single) “होस्साना” मात्र पूर्णपणे चढलं होतं. त्या भेटीत फक्त “होस्साना” हा तमिळ शब्द नाही एवढीच माहिती कळली.
  किती सुंदर गीत! अहाहा..! “देव” नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येतो. ‘मुखडा-अंतरा” पद्धतीची फिल्मी गीते ऐक्नार्यांसाठी “होस्साना” एक वेगळा अनुभव होता. गाणं आल्या-आल्याच “हिट” झालं. नगरला आल्यावर आधी “होस्साना”चा अर्थ शोधला. “ऑक्सफर्ड शब्दकोश”नुसार त्याचा अर्थ होतो “Shout of Adoration”. मूळचा हिब्रू असलेला हा शब्द माथ्यू – २१ : ९, १५ अश्या ठिकाणी येशूच्या जयघोषासाठी वापरला गेलाय.
  हे सारं कळल्यावर त्या गाण्याचा एक नवाच अर्थ उलगडला! होस्साना! जयघोष! प्रेमाचा जयघोष! नव्याने आयुष्यात येऊ घातलेल्या प्रेमाचा जयघोष! प्रेमाला सलाम! वाह, क्या बात हैं! किती सुंदर कल्पना! मानलं तामरईला (होस्सानाची गीतकार)! मानलं विजयप्रकाश-सुझेनला! आणि हो, मानलं माझ्या “देवा”ला! गाण्याच्या सुरुवातीला असलेल्या व्हायोलीनच्या सुंदर तुकड्याचाही अर्थ कळला! अहाहा, जणू “तो” त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रेमाचेच स्वागत करतोय! हे सारे कळाल्यावर माझी अवस्था खरोखर पहिल्या कडव्यात म्हटल्याप्रमाणे –
“नान आडीपोगिरेन..!
सुक्कू नुरागीरेन..!”
(I was shaken..!
I was broken into pieces..!)
अशीच झाली!

  हिंदीत हे गीत विजयप्रकाशच्याऐवजी “लिओन डिसुझा” या नव्या गायकाने गायलेय. RAP देखील त्यानेच गायलेय. सुरुवातीला ऐकताना तो “राशीद अली” वाटतो. पण अजून अजून ऐकल्यावर कळते कि लिओनला स्वत:चा असा एक अतिशय सुंदर आवाज आहे. आणि याउप्परही मी म्हणेन की, सनी लिओनच्या या काळात लिओन डिसुझा या नवख्या गायकाचे गाणे हिट करून दाखवणे हे माझ्या “देवा”चेच कर्तृत्व नव्हे काय? जावेद अख्तरने हिंदीत हे गीत तामरईइतक्याच ताकदीने लिहिलेय. तुम्हाला मूळ तमिळ गाण्याची सवय झाली असेल तर हे गीत चढायला थोडा वेळ लागेल. पण एकदा का हे गीत चढले, तर चढलेच! माझी तर अवस्था हे गीत ऐकून –
“अब क्या बताऊँ मैं,
किस हाल में हूँ मैं…
यहाँ-वहाँ बस अपना दिल और होश ढूंढ़ता हूँ मैं..!”
अशीच झालीय!
  या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यातील “ब्लाझे”च्या RAP चा भागदेखील लिओनने स्वत”च्या पद्धतीने गाण्याच्याच चालीत गायलाय. ब्लाझेचे RAP ऐकायची सवय असणार्यांना हे RAP वाटणारच नाही. चित्रपटातील प्रसंगाला हे अधिक धरून आहे. “देवा”च्या या प्रयोगशीलतेला दाद द्यावी तितकी कमीच! नव्याने ऐकणार्यांना तर हा इंग्लिश भाग अधिकच गोड वाटेल!

  आज माझ्या देवा”चा वाढदिवस! त्याचे संगीत तर अमर झालेच आहे, आणि संगीताच्या रूपाने तोही अजरामर! मग अश्या वेळी त्याला उदंड आयुष्य चिंतणारा मी कोण? मी फक्त त्याच्या चरणांवर हे वाकुडे लेखनपुष्प वाहून नतमस्तक होऊ शकतो. खरोखर माझी तेवढीच इच्छा आहे. मला खात्री आहे, “होस्साना” तुम्हालाही नक्की आवडेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *