Category: Reviews

  • “आवडलेला क्रिश-३”

    काल फार्मास्युटिकल्स कंपनीचा कर्ताधर्ता असलेला काल (विवेक ओबेरॉय) हा अपंग आहे. लहानपणापासूनच त्याच्या गुणसूत्रांमध्ये दोष असल्याने तो आपल्या शरीरातील केवळ चेहरा आणि एका हाताची बोटेच तेवढी हलवू शकतो. परंतू त्याच्या शरीराची सारी शक्ती याच दोन अवयवांत एकवटून त्याच्याकडे अतिंद्रीय शक्तींचा भलामोठा संचय झालाय. काल जरी एक फार्मास्युटिकल कंपनी चालवत असला, तरीही त्याचा मुख्य व्यवसाय हा विषाणू बनवून कोणत्या तरी देशात सोडणं आणि नंतर त्याच देशाला प्रतिजैविक विकून पैसा कमावणं, हा आहे. या उपद्व्यापात कालने अनेक अमानव (म्यटंट्स / चित्रपटात वापरलेला शब्द – मानवर) तयार केले आहेत. त्यांच्याद्वारे तो आपल्या अपंगत्वावर इलाज शोधू पाहातोय आणि आपल्या जैवतंत्रज्ञानातील ज्ञानाचा वापर करून सबंध जगावर राज्य करू पाहातोय. त्याने भारतात सोडलेला एक अतिशय भयानक रोगजंतू प्रो. रोहित मेहरा (ह्रथिक रोशन) आणि क्रिश (ह्रथिक रोशन) हे दोघे निकामी करतात अन् त्यातून सुरू होते काल आणि क्रिशमधील संघर्षाची गाथा. या संघर्षगाथेला हळुहळू अनेक भावनिक पदर जोडले जातात आणि त्यातून उलगडत जाते “क्रिश ३” रुपी वस्त्र!

    हिंदीतील पहिला सुपरहिरो-पट हे “क्रिश”च्या पहिल्या भागाचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. वर्तमान भागाद्वारे “क्रिश”च्याही पुढे जाण्याचे, हॉलिवूडमधील सुपरहिरोपटांशी साहजिकपणे होणाऱ्या तुलनेच्या कसोटीवर खरे उतरण्याचे आणि भारतीय प्रेक्षकांना आवडेल असा चित्रपट देण्याचे तिहेरी आह्वान दिग्दर्शक राकेश रोशनवर होते. भारतीय प्रेक्षक हा निव्वळ तंत्रज्ञानाला भुलणारा नव्हे (आठवा – रा.वन) वा निव्वळ सुपरहिरोपटासाठी जीव टाकणाराही नव्हे ( पुन्हा आठवा – रा.वन). तर आपल्याकडे तेच चालतं, जे आपल्या ह्रदयापर्यंत पोहोचतं. तांत्रिकदृष्ट्या कितीही सफाईदार चित्रपट जरी असला, तरीही तो जर भारतीय प्रेक्षकाच्या ह्रदयातील भावनेच्या कप्प्याला उघडणारा नसेल, तर तो आपल्याकडे चालणं शक्यच नाही. याउलट एखादा चित्रपट म्हणून सुमार असलेला चित्रपटही जर आवडून गेला तर आपल्याकडे चालतोच! राकेश रोशनने भारतीयांची ही मानसिकता बरोब्बर ओळखली आणि एका मानवी नातंसंबंधांच्या भावनिक कथेला अत्युत्कृष्ट तंत्रज्ञानाची फोडणी देऊन बनवला “क्रिश ३” नामक चविष्ट पदार्थ. असा पदार्थ जो आपल्याकडील प्रेक्षकांना नुसता आवडेल एवढेच नव्हे तर तिकीटबारीवर चालेलही! भावनेच्या मुद्यावर त्याने हॉलिवुडमधील भावनाहीन सुपरहिरोपटांना मात दिली, तर अद्वितीय दृक्परिणामांच्या (VFX) आणि एकूणच तंत्रज्ञानाच्या बळावरआपल्या देशात बहुसंख्येने असलेल्या हॉलिवूड-अंधभक्तांच्या काकदृष्टीलाही मात दिली! असा हा “क्रिश ३” व्यावसायिकदृष्ट्या अचूक जमवून आणलेला खेळ आहे! मला वैयक्तिक अतिशय आवडलाय आणि आपल्याकडील प्रेक्षकांनाही तो आवडणार याची १००% खात्री आहे.

    अर्थातच चित्रपटात काही तांत्रिकदृष्ट्या न पटणाऱ्या गोष्टीही आहेत –
    १) “जादू”ची उन्हापासून मिळणारी शक्ती नियंत्रित करण्यासाठी “बुद्धीमान गाळणी”चीच आवश्यकता का पडावी? गाळणी (फिल्टर) विविध प्रक्रियांमध्ये वापरले जाते. त्याला एक नियंत्रक (रेग्युलेटर) तेवढा बसवला तरी काम भागण्यासारखे असताना चित्रपटातील गाळणीला असलेली स्वयंप्रज्ञेची आवश्यकता काही पटत नाही. अर्थात राकेश रोशनने विज्ञानपट बनविण्याचा दावा केला नसल्याने आणि उपरोक्त चूक कथेच्या दृष्टीने आवश्यकच असल्याने तशी दुर्लक्षिण्याजोगी आहे.
    २) शूर्पणखा म्युटंट (अमानवी) असल्याचे चित्रपटात सांगितलेय. ते चूक आहे. शूर्पणखा ही राक्षसी होती आणि राक्षसही एक नैसर्गिक प्रजातीच होते, म्युटंट नव्हे.
    ३) चित्रपटात आधी प्रियाच्या (प्रियांका चोप्रा) पोटातील मूल मेल्याचा प्रसंग दाखवलाय आणि नंतर कायाने (कंगना राणावत) तिची जागा घेण्याचा प्रसंग दाखवलाय. प्रत्यक्षात कायाने प्रियाची जागा घेतल्यामुळे डॉक्टरांना प्रियाच्या पोटातील बाळ मेल्याचा गैरसमज होतो. ही चित्रपटाच्या संपादनातली चूक आहे.
    ४) नुकताच ज्याचा बोन-मॅरो काढून घेण्यात आलाय तो रोहित मेहरा पुढच्याच प्रसंगी स्वत:च्या पायावर उभा असतो. हे अजिबातच पटणारे नाही.

    अश्या अनेक लहानमोठ्या त्रुटी चित्रपटात असल्या तरीही चित्रपटाचा आस्वाद घेण्यात त्यांच्यामुळे किंचितही बाधा येत नाही, हे तितकेच खरे! उलट चित्रपटातले दृक्परिणाम तर इतके काही सुंदर जमून आले आहेत की हॉलिवूडपटांनीही तोंडात बोट घालावे. जे दृक्परिणाम जमवून आणण्यासाठी हॉलिवूडला अब्जावधी डॉलर्स ओतावे लागतात, त्याच दर्जाचे काम या भारतीय चित्रपटाने अवघ्या काही कोटी रुपयांमध्ये साधलेय – आणि तेही अगदी निर्दोष! ही गोष्ट हॉलिवूडला बापजन्मीही साधणारी नाही. आणि हेच “क्रिश ३”चं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. चित्रपटातील एकूण एक साहसदृश्ये अक्षरश: श्वासोच्छ्वास विसरायला लावण्याइतकी दर्जेदार झाली आहेत! परंतू संगीताच्या पातळीवर मात्र बोंबच आहे. पार्श्वसंगीत अतिशय उत्तम असताना गाणी मात्र कालविसंगत वाटताहेत. चाल वगैरे प्रकार क्षणभर बाजूला ठेवला तरीही राजेश रोशनचा ध्वनिच (साऊंड) मुळात शिळा वाटतोय. फुकट मिळतं म्हणून घरच्याच माणसाचं संगीत वापरायचं, हा प्रकार राकेश रोशनने थांबवला आणि राजेश रोशननेही आता आपला काळ संपलाय तेव्हा आपण एकतर निवृत्त व्हावं अथवा स्वत:च्या संगीताचा पुन्हा नव्याने शोध घ्यावा – अश्या दोन गोष्टी झाल्या तर प्रेक्षक आणि फिल्मक्राफ्ट दोघांसाठीही बरं होईल. आणखी एक अडचण म्हणजे, चित्रपटातली मुंबई ही मुंबई वाटतच नाही – उगाचच मुंबईचं शांघाय केल्यासारखं वाटतं.

    अभिनयाच्या पातळीवर नेहमीचेच यशस्वी कलाकार असल्याने बोलण्यासारखे फारसे काही नाहीच. तरीही यावेळी मला आश्चर्यकारकरित्या कंगना राणावतचे काम सर्वात जास्त आवडलेय. एकतर तिची भूमिकाही अतिशय दमदार आहे आणि तिने ती व्यवस्थित, संयतपणे निभावलीय. त्यामानाने प्रियांका चोप्राला काहीच काम नाहीये. ह्रथिक रोशन हा निर्मितीसंस्था आणि भूमिका अश्या दोन्हीही बाबतीत घरच्याच मैदानावर असल्याने त्यानेही चांगलेच काम केलेय. “काल”च्या भूमिकेत विवेक ओबेरॉयही अतिशय शोभलाय – विशेषत: मध्यंतरानंतरच्या प्रसंगांमध्ये. परंतू त्याचे पात्र उगाचच स्टिफन हॉकिंग आणि “एक्स मेन”मधील पात्रे यांचे मिश्रण वाटते. ओरिजनल वाटत नाही.

    तर असा हा कुठे कडू, कुठे गोड तर कुठे आंबट असलेला “क्रिश ३”. वर सांगितल्याप्रमाणे अतिशय स्वादिष्ट जमलाय. चाखणाऱ्या प्रत्येकाला तो निश्चितपणे आवडेल. अर्थात, तो दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा ताटात वाढून घ्यायचा की नाही, हे मात्र ज्याने त्याने आपापल्या चवीप्रमाणे ठरवावे!

    *३.५/५

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

    image

  • तरल संवेदनांची सरल गोष्ट – द लंचबॉक्स

      साजन फर्नांडिस (इरफान खान) हा एक मध्यमवयीन, विधुर, एकटाच राहाणारा, जरासा माणुसघाणा असा सरकारी कर्मचारी आहे. एकटेपणामुळे आणि मुंबईतल्या रोजच्या दगदगीमुळे लवकरच स्वेच्छानिवृत्ती घेऊन नाशिकला स्थायिक होण्याचा विचार आहे त्याचा. त्याने स्वेच्छानिवृत्तीचा अर्जही दिलाय आणि आता आपल्या कार्यालयात तो केवळ महिनाभराचाच पाहुणा आहे. एकटा राहातो, म्हणून घराजवळच मेस लावलीये त्याने. तिथून आलेला डबा मुंबईतले डबेवाले रोज त्याला कार्यालयात पोहोचवतात. अर्थात ही केवळ एक सोय आहे, कारण त्याच्या बिचाऱ्याच्या डब्यात रोज महाराष्ट्रातल्या सगळ्या खानावळींची खासियत असलेली “बटाट्याची भाजी”च तेवढी असते! थोडक्यात साजन एकाकी आहे. एकाकी अन् दु:खी. शिवाय जीवनाबाबतचा त्याचा आत्तापर्यंतचा अनुभवही वाईटच आहे. एके दिवशी मात्र चमत्कार घडतो. साजनच्या डब्यात चक्क वेगळी भाजी आणि सुग्रास जेवण असतं! अर्थातच साजन त्यादिवशी डबा चाटून-पुसून स्वच्छ करतो. संध्याकाळी मुद्दाम खानावळीत जाऊन सांगतोही – ‘असा डबा बनवावा’!
      इला (निमरत कौर) एक मध्यमवर्गीय आणि एका ७-८ वर्षांच्या मुलीची आई असलेली गृहिणी आहे. मुंबईतल्या बहुतेक चाकरमान्यांच्या बायकांचा असलेला प्रॉब्लेम – नवरा वेळ देत नाही – हा तिचाही प्रॉब्लेम आहे. त्यातून लग्नाला बरीच वर्षे झाल्यामुळं वैवाहिक आयुष्यही नीरस होऊन गेलंय तिचं. नवऱ्याचं आपल्याकडं लक्ष नाही एवढंच नव्हे तर त्याचं बाहेर लफडं चालू आहे असंही वाटतंय तिला. भाऊ वारलेला. वडील कॅन्सरने आजारी. आई त्यांचं करण्यात गुंतलेली. इला अगदी एकाकी आहे. एकाकी अन् दु:खी. तिच्या आयुष्यातला एकमेव चांगला भाग म्हणजे वरच्या मजल्यावर राहाणाऱ्या देशपांडे काकू (आवाज – भारती आचरेकर). त्यांच्याशी बोलणे, त्यांच्या टेपवरची गाणी ऐकणे, त्यांच्याकडून नवनव्या पाककृती शिकणे हा तिचा एकमेव विरंगुळा. वैवाहिक नातं जर पुन्हा फुलवायचं असेल तर नवऱ्याच्या डब्यात काहीतरी स्वादिष्ट पाठव ही त्यांचीच कल्पना. इला अनेक तास खपून डबा बनवते. डबेवाला तो घेऊनही जातो. संध्याकाळी ती आतुरतेने नवऱ्याच्या प्रतिसादाची वाट पाहात असते. नवरा मात्र ढिम्मच! काही बोलतच नाही. शेवटी न राहावून हीच विचारतो. तर ‘बटाट्याची भाजी ना, चांगली होती की!’ एवढेच उत्तर. तेव्हा तिला कळते की, आपली मेहनत दुसऱ्याच कुणाला तरी पोहोचलीये!
      या गैरसमजाबद्दल इला, दुसऱ्यादिवशी एक क्षमा मागणारी चिठ्ठी पाठवते. आणि इथून सुरू होतो ‘द लंचबॉक्स’च्या अनोख्या प्रेमकथेचा प्रवास!
      या कथेला एक तिसराही कोन आहे. साजनकडे शिकाऊ कर्मचारी म्हणून असणारा शेख (नवाझुद्दीन सिद्दिकी). त्याचाही या कथेत एक महत्वाचा आयाम आहे.
      अशी साधीच कथा. परंतू दिग्दर्शक रितेश बत्राने तिचा आलेख अतिशय उत्कृष्ट चितारलाय. इलाच्या सुरुवातीच्या भिडस्त चिठ्ठ्यांना साजनची खत्रुड उत्तरं मिळण्यापासून ते दोघांना एकमेकांची काळजी वाटणं, त्यांचं एकमेकांत गुंतत जाणं हा सारा प्रवास पाहाणाऱ्याला अक्षरश: जाणवतो. आणि कथेची खुबी म्हणजे, हा प्रवास घडवण्यासाठी कुठेच नाट्यमयता वापरावे लागलेले नाही. साधेच प्रसंग. किंबहुना इला आणि साजन एकमेकांशी वाटून घेत असलेले अनुभवही साधेच. रोजच्या आयुष्यातले. कधी आयुष्याचे चटके दाखवणारे, तर कधी नर्मविनोदाची पखरण असलेले. पण साधेच. आणि यामुळेच ही कथा जवळची वाटते. आपल्यातली वाटते. काल्पनिक असूनही शक्य कोटीतली वाटते. इला आणि साजनचं नातं त्या दोघांसाठी इतकं काही सुखद विश्रामस्थळ आहे, की ते कधीच चुकूनही विवाहबाह्य संबंध (अश्या संबंधांसाठी आवश्यक असणारं शारीरिक आकर्षण या नात्यात जवळजवळ नाहीच!)— वाटत नाही. उलट ते जितकं त्या दोघांना गरजेचं आणि हवंहवंसं वाटतं, तितकंच ते प्रेक्षकांनाही आवश्यक आणि हवंहवंसं वाटायला लावण्यात लेखक-दिग्दर्शक यशस्वी झालाय.
      चित्रपटात बहुतांशी त्याचत्याच जागा आहेत. पण तरीही मायकेल सायमण्ड्सने त्या आपल्या कॅमेऱ्यात इतक्या वेगवेगळ्या प्रकारे बद्ध केल्या आहेत ना, की त्या प्रत्येकवेळी नव्याच वाटतात. चित्रपटात गाणी नाहीत. पार्श्वसंगीतही जवळजवळ नाहीच. परंतू जे आहे ते खूपच सुखद आणि प्रत्ययकारी आहे. यासाठी मॅक्स रिक्टरचे कौतुक करायलाच हवे! चित्रपटात प्रसंग जोडण्यासाठी नव्वदच्या दशकातल्या हिंदी गीतांचा आणि डबेवाल्यांच्या भजनांचा मोठ्या खुबीने वापर करण्यात आलाय. अर्थातच हे श्रेय दिग्दर्शक रितेश बत्राचे! यासोबतच महत्वाची बाब अशी की, असे चित्रपट कायम बनतच असतात, परंतू ते केवळ काही महोत्सवांपुरतेच मर्यादित राहातात. या चित्रपटाबाबतीत मात्र करण जोहरने तोटा होण्याची शक्यता असूनही वितरणाची जबाबदारी उचलली. यासाठी त्याचे आणि ‘धर्मा प्रॉडक्शन्स’चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!
      अभिनयाच्या पातळीवर काही बोलले नाही तरी चालेल. कारण इरफान खान असो वा नवाझुद्दिन सिद्दिकी, दोघेही अतिशय नाणावलेले अभिनेते आहेत. निमरत कौरनेही इला आणि तिचे अंतर्द्वंद्व मोठ्या कौशल्याने साकारलेय. लिलिएट दुबे, भारती आचरेकर, नकुल वैद, डेन्झिल स्मिथ आदींच्या लहानश्याच परंतू महत्वपूर्ण भूमिका आहेत, आणि यांपैकी प्रत्येकानेच आपापल्या भूमिकेला व्यवस्थित न्यायही दिलाय.
      चित्रपटाची कथा छोटिशीच आहे. परंतू ती अतिशय तपशीलवार मांडल्यामुळे चित्रपट जवळजवळ दिड तासाचा झालाय (अर्थातच सामान्य हिंदी सिनेमाच्या तुलनेत हा काळ खूपच छोटा आहे!)! प्रत्येक घटनेला व्यवस्थित वेळ दिलाय, तिचे सारे कंगोरे व्यवस्थित मांडले आहेत. प्रत्येक पात्राचा पात्रपरिपोष हळूहळू परंतू निश्चितपणे होऊ दिलाय. उदाहरणार्थ, नवाझुद्दिन सिद्दिकीचे पात्र अनाथ आणि रोज दुपारच्या जेवणाच्या नावाखाली केळी आणि सफरचंद खाणारे आहे. त्याच्या हाती जेव्हा पहिल्यांदा इरफान खानचा डबा पडतो, तेव्हा तो अधाश्यागत एका हातात पोळी ठेवून खाऊ लागतो. हा तपशील आहे. असे शेकडो तपशील चित्रपटाच्या प्रत्येक चौकटीत भरलेले आहेत. अर्थातच अश्या तपशीलांमुळे चित्रपट काहींना कंटाळवाणा वाटण्याचीही शक्यता आहे. परंतू ही कथाच इतकी हळूवार आणि अंत:प्रवाही आहे ना की, जर ती इतक्या तपशीलांसह मांडली नसती तर ती विसविशीत वाटली असती, वरवरची वाटली असती!
      अखेरिस एकच सांगावंसं वाटतं की, सध्याचं युग इतकं काही धकाधकीचं होऊन बसलंय की, त्यात एखादी साधीसोपी गोष्ट केवळ ती साधी आहे एवढ्या एकाच कारणामुळे कंटाळवाणी वाटण्याची शक्यता आहे. तुम्हाला ‘द लंचबॉक्स’ आवडला नाही, तरी हरकत नाही परंतू जर आवडला नाही तर स्वत:च्या मनाला एक प्रश्न अवश्य विचारा की, ‘चित्रपट वाईट आहे म्हणून आवडला नाही की, केवळ तो साधा आहे – मसालेदार नाही, फिल्मी नाही म्हणून आवडला नाही?’. या एका प्रश्नाच्या उत्तरात, आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित इतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. ती उत्तरे आपल्या मानवी जाणीवांची आणि संवेदनांची घसरण दाखवून देणारी न ठरोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या चित्रपटात वापरलेल्या भाषेतच सांगायचं झालं तर, ‘कभी कभी गलत ट्रेनभी सही स्टेशनपर पहुँचा देती हैं’!
      ‘द लंचबॉक्स’बद्दल बोलण्यासारखे अजून बरेच आहे. मात्र प्रत्येकाने हा चित्रपट स्वत:च पाहून त्याचा आपल्याला भावेल तसा अन्वय लावावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि ही ‘द लंचबॉक्स’ नावाची तरल संवेदनांची सरल गोष्ट तितकी सक्षम आहे, अशी माझी खात्री आहे! ‘चित्रपट साक्षरता’ तरी दुसरे काय असते!

    *४.७५/५

    – © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

    image

  • तलाश – मंत्रावेगळे गंधर्वगान!

       कल्पना करा की तुम्ही एखाद्या मैफिलीला गेला आहात. चांगल्या नावाजलेल्या गायकाची मैफिल आहे ही. आज मात्र तो गायक गाताना सतत चुका करतोय. काही जागा जिथं खरं तर सूर असायला हवा होता, त्या मोकळ्याच सोडतोय. का असं करतोय तो? त्याला वेड लागलंय का? मैफिल पुढे सरकत जाते आणि अचानक, अचानक तुम्हाला साक्षात्कार होतो की, इतका वेळ आपण ज्याला संगीत समजत होतो, ते संगीत नव्हतंच मुळी! संगीत

    तर त्या सूर नसलेल्या मोकळ्या जागांतच होतं. गायकी चालू होती ती तिथं! मूर्ख तो गायक नव्हता, तर आपणच होतो, जे नसलेल्या गोष्टी पाहता पाहता असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो; किंबहुना त्यांना तुछ लेखत होतो. मला कल्पना आहे की, तुम्हाला माझे हे लेखन अतिशय विचित्र वाटते आहे. पण संगीताचा नव्यानेच साक्षात्कार व्हावा, समोरची मैफिल ही अचानक “गंधर्वगान” व्हावी अशी, अगदी अशीच अवस्था माझी “तलाश” पाहून झालीय.

        मी मुद्दामच “गंधर्वगान” हा शब्द वापरलाय. “गंधर्वगान” – असं संगीत जे या जगातलं नसतंच. “तलाश”ही हिट होण्यासाठी बनलेला नाहीये, तो वेगळा आहे, मंत्रावेगळा! आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी, कुठे ना कुठे अश्या घटना घडलेल्या असतात, ज्यांची कारणमीमांसा करणे अशक्य असते. जणू काही एखादी खिडकी उघडते आणि आपण “त्या” जगात क्षणभरासाठी डोकावून येतो. नीट विचार करा, आठवा, तुमच्या आयुष्यातही अश्या घटना नक्कीच घडलेल्या असणार. आपण त्या मनाच्या तळाशी गाडून टाकतो, कुणाला सांगत नाही कारण, एकतर या घटना सिद्धतेच्या कोटीतल्याच नसतात; आणि दुसरे म्हणजे हे अनुभव इतके व्यक्तीसापेक्ष असतात ना की, दुसर्या कुणाला सांगितले तर त्याचा विश्वास बसेल न बसेल यापेक्षा आपला, केवळ आपलाच असलेला हा ठेवा हरवेल की काय हीच भीती अधिक वाटत असते. खरं सांगू, मनाच्या तळाशी खोलवर जाऊन बसलेल्या माझ्या आयुष्यातील अश्या सर्व घटना “तलाश”ने ढवळून वर आणल्या आहेत.

        माझी माहिती कदाचित तोकडी असू शकेल पण, अश्या धाटणीचा चित्रपट याआधी क्वचितच कुठे बनला असेल. मुळात गूढकथा पडद्यावर मांडण्याची हिम्मत फारच कमी लोकांमध्ये आहे. नववास्तववाद आणि नवकाल्पनिकता यांच्या सीमारेषेवर कुठेतरी घुटमळणारा हा चित्रपट आहे. ही केवळ रहस्यकथा नाही. मी पाहतोय की काही लेक एसेमेस, फेसबुक पोस्ट्स यांच्याद्वारे “तलाश”चं रहस्य आपण काहीतरी फार मोठा तीर मारतोय या आविर्भावात आधीच सांगत आहेत. मुळात कोणत्याही प्रामाणिक कलाकृतीला मारक ठरेल असे काही वागणे हेच अतिशय ओंगळवाणे आहे. तरीही ज्यांना यात मजा वाटतेय, त्यांच्यासाठी आधीचं वाक्य पुन्हा एकदा लिहितो, ही केवळ रहस्यकथा नाही! रहस्य हे केवळ एक माध्यम आहे. “तलाश” आहे मुख्य पात्र (आमीर- सुरजन सिंह) घेत असलेला शोध – “स्व”चा. हा शोधच या कथेचा गाभा हे. त्यामुळे या कथेचं रहस्य किती जरी माहिती झालं तरीही दिग्दर्शिकेच्या हेतूला बाधा येत नाही. या चित्रपटातील प्रत्येक घटनेला, प्रत्येक पात्राला अनेक अर्थ आहेत; काहींची आपण कल्पना करू शकतो तर काहींची अजिबातच नाही. त्यातही मी ज्यांची कल्पना करेन त्यांची तुम्ही करालच असे नाही, आणि तुम्ही ज्यांची कराल त्यांची मी करू शकेनच असेही नाही.

        दिग्दर्शिकेने रहस्यकथेचे किंबहुना गूढकथेचे माध्यम स्वीकारले असल्याने मी या कथेची थोडीशीही कल्पना न देणे साहजिकच आहे. पण एका निरुपद्रवी गोष्टीचा उल्लेख मात्र मी करू शकतो. समोर येणाऱ्या कोणत्याही केसमधील घटनांचा संबंध आपल्या मुलाच्या मृत्यूशी नकळतपणे जोडण्याची आमिरच्या पात्राला सवय असते. या गोष्टीचे असे काही संयत चित्रण रीमा कागतीने केलेय की त्याला तोड नाही. खरं तर या एका कथेत अनेक कथा, अनेक पात्रं, त्यांची एकमेकांशी थेट संबंध नसलेली आयुष्यं इतकी बेमालूमपणे मिसळून टाकलीयत की, त्यांचा आपसूकच एक “कोलाज” तयार झालाय. त्यातील कोणताही एक तुकडा जरी काढून टाकला तरीही, सबंध कथा – सबंध चित्रपट चुकेल. या संदर्भात लेखिका-दिग्दर्शिका रीमा कागती आणि सहलेखिका झोया अख्तर यांची जितकी स्तुती करावी तेवढी थोडीच आहे (कोण म्हणतं बायकांना डोकं नसतं!).

        आमीर पोलीस अधिकार्याची भूमिका करतोय म्हणून तुम्ही जर “दबंग” अथवा “राउडी राठोड” डोक्यात घेऊन जाणार असाल तर तुमचा भ्रमनिरास होईल. तुम्ही अगदी “सरफरोश” जरी डोक्यात घेऊन गेलात तरीही भ्रमनिरासच होईल! हे पात्र या सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. पंचलाईन्स नाहीत किंवा मारधाडही नाही! मग आमिरचे पात्र आपल्याला अजिबातच इम्प्रेस करू शकत नाही का? तर शशीच्या मैत्रिणीला कामाठीपुर्यातून सोडवण्याचा प्रसंग पहा. छोटासाच आहे, पण आमिरचे डोळे अक्षरश: आग ओकतात आग! खरं तर आमीर खान आपल्या प्रत्येक नव्या चित्रपटात आधीच्या चित्रपटापेक्षाही चांगला अभिनय कसा काय करू शकतो, हे एक कोडेच आहे – त्याचीही एकदा “तलाश” झाली पाहिजे! राणी मुखर्जीने छोट्याश्या भूमिकेत सुंदर काम केलेय. करीना कपूरने तर कमालच केलीय. पण विशेष लक्षात राहतो तो नवाझुद्दिन सिद्दिकी या गुणी कलाकाराने साकारलेला तैमुर! खरोखर सलाम त्याला! राजकुमार यादव (देवव्रत कुलकर्णी) आणि शेरनाझ पटेल (फ्रेनी) या दोन कलाकारांचा उल्लेख न करणे म्हणजे त्यांच्या अभिनयकौशल्यावर अन्याय केल्यासारखे होईल.

        खरोखर हा चित्रपट शब्दातीत आहे. सत्याच्या शोधात अनेक असत्ये पुढे येतात, पण जेव्हा निखालस सत्य स्वत:हून समोर येते, त्यावेळी अनेकदा आपण त्यासाठी तयार नसतो. अवश्य चित्रपटगृहात जा आणि पहा “स्व”च्या या “तलाश”साठी तुम्ही तयार आहात का!

    *४/५.

    – © विक्रम श्रीराम एडके.
    (edkevikram@gmail.com)

  • "चांगले" आणि "वाईट"च्या पलीकडला – रॉकस्टार

    कोणताही कलाकार घ्या. किंवा आपापल्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ ठरलेली कुणीही व्यक्ती घ्या. ते जर आत्ता आहेत तसे नसते तर कसे असले असते? ए. आर. रहमान घ्या. त्याच्या संगीताला जर अध्यात्माची बैठक नसती तर? तर तो कसा असला असता? कसा सोडा. “काय” असला असता? सहस्रो नद्यांच्या जंजाळात समुद्र “एक”च असतो… पण मग त्याने “किनारा” घेऊनच जन्माला यावं ना? समुद्राला किनारच नसला तर कसे चालेल?
      “रॉकस्टार” पाहून प्रथमदर्शनी विचित्र वाटणारे असे शेकडो प्रश्न मनात उभे राहिलेयत. ही रॉकस्टारची समीक्षा नव्हे. रसग्रहण वगैरेही नव्हे. हा आहे एक प्रयत्न. रॉकस्टार पाहून मनात कल्लोळणार्या वादळाला शब्दांत पकडण्याचा एक निष्फळ प्रयत्न. प्रत्येकाने तो आपापल्या नजरेने पाहावा.
      “पता हैं, यहाँ से बहोत दूर… “गलत” और “सही” के पार एक मैदान हैं..! मैं वहाँ मिलूँगा तुझे..!” या “रुमी”च्या ओळींनी चित्रपट सुरु होतो. आणि शेवटपर्यंत याच भावनेच्या लाटांवर हेलकावे घेत राहतो. कधी त्या लाटा आपल्याला हलकेच भिजवतात तर कधी जोरदार शिपकारा मारतात. फाडकन कुणीतरी कानफटात वाजवल्यासारख्या. पण कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही आणि तुमची नाव या वादळाच्या पार काही जाऊ शकत नाही. जाउच शकत नाही.
      “त्या”ला “ती” भेटत नाही आणि भेटूनही भेटत नाही, हाच “त्या”च्या संगीताचा पाया आहे. “पुढे काय” याचा “तो” विचार करीत नाही, किंबहुना “तो” त्या पातळीलाच पोहोचलेला नाही. “त्या”चा शेवट अटळ आहे. प्रतिभेला दुखा:ची किनार देण्यापेक्षा जर अध्यात्माचे आसन जॉर्डन देऊ शकला असता, तर निश्चितपणे उस्ताद जमील खान (शम्मी कपूर) बनू शकला असता; ही भावना पाहणार्याला सतत जाळीत राहाते. शम्मीच्या डोळ्यांतील दयेतून तर ती त्याची अगतिकता अधिकच अधोरेखित करते. जॉर्डनला जर हे कळलं असतं तर? तर, तर कदाचित त्याचं कुढणं, तुटणं, जरासं कमी होऊ शकलं असतं. “ती” केवळ निमित्तमात्र. “त्या”चं दु:ख मात्र सनातन आहे. “ती” नसती तर “त्या”ला दुसरं काहीतरी निमित्त मिळालं असतं, आणि त्याही स्थितीत Dichotomy Of Fame कायमच राहिली असती. म्हणून श्रेष्ठतेला गरज असते अध्यात्माची. त्याशिवाय श्रेष्ठतेला तिचं श्रेष्ठत्व नाही सांभाळता येत. म्हणूनच कदाचित “बीटल्स” भारतात आले होते. “स्टीव्ह जॉब्स” इकडे सन्याश्यासारखा भटकला होता. आणि म्हणूनच कदाचित “स्वामी विवेकानंद” जगभर खर्या अर्थाने “रॉकस्टार” ठरले. म्हणूनच रहमान ऑस्करलाही साधेपणाने सामोरा जाऊ शकतो आणि एकेकाळचा “सम्राट” मायकेल जाक्सन काळाच्या वस्त्रावरील एका क्षुद्र ठिपक्यासारखा क्षणात नाहीसा होतो.
    “सौ दर्द बदन पे फैले हैं |
    हर करम के कपडे मैले हैं ||”
    हे कितीजारी खरं असलं तरी “नादान परीन्द्या”ला घरी यावंच लागतं. शेवटी डोळे मिटले तर भर सूर्यप्रकाशातही अंधारच अंधार आहे आणि डोळे उघडले तर पणतीच्या मिणमिणत्या उजेडातही सर्वत्र प्रकाशच प्रकाश आहे. तो “रंगरेज़” रंगवायला बसलेलाच आहे. फक्त आपली रंगवून घ्यायची तयारी मात्र हवी.
      हा आहे माझ्या भावनेचा कल्लोळ. कितीही प्रयत्न केले तरी शब्दांत न मावणारा.
    “जो भी मैं कहना चाहूँ |
    बर्बाद करे अल्फाज़ मेरे ||”
      नेहमीच्या धोपटमार्गाने जाऊन सांगायचं तर “रॉकस्टार” अवश्य पाहा. संवेदनशील असलात तर तुमच्याही मनात भावनेचा एखादा उठेल. कदाचित यापेक्षा वेगळा. पण निश्चित उठेल. रणबीरने त्याच्या वाटेला आलेल्या प्रत्येक दृश्यात सिद्ध केलेय की तो उद्याचा “सुपरस्टार” आहे. SSRK म्हणून आपण आज Super Star RajiniKanth ला ओळखतो. भविष्यातला SSRK निश्चितपणे रणबीर आहे. इम्तियाझने हा वेगळा विषय कमालीच्या प्रयोगशीलतेने मांडलाय. एकूणच चित्रपटक्षेत्रात त्याने मोलाची भर घातलीय. रहमान बद्दल काय लिहू? तो “देव” आहे एवढे पुरेसे नाही का? बाकी “नर्गिस” आणि “अदिती राव” यांनीही अतिशय उत्तम काम केलेय. कथानक आणि मांडणीच इतकी सशक्त आहे की, नायिका म्हणून कुणीही चालली असती.
      रेटिंग विचाराल तर थोड्याफार चुका लक्षात घेऊन मी ५ पैकी ४ गुण देईन. पण खरं सांगू? रॉकस्टार म्हणजे रूमीच्या कवितेसारखा आहे. “चांगले” आणि “वाईट” यांच्या पलीकडचा. त्याचं त्या पातळीला जाऊनच आस्वाद घ्यावा. बाकी
    “साड्डा हक़..!
    ऐत्थे रख़..!!”

    © विक्रम श्रीराम एडके.
    (इतरत्र प्रसिद्ध करण्याआधी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक.)