“आवडलेला क्रिश-३”

काल फार्मास्युटिकल्स कंपनीचा कर्ताधर्ता असलेला काल (विवेक ओबेरॉय) हा अपंग आहे. लहानपणापासूनच त्याच्या गुणसूत्रांमध्ये दोष असल्याने तो आपल्या शरीरातील केवळ चेहरा आणि एका हाताची बोटेच तेवढी हलवू शकतो. परंतू त्याच्या शरीराची सारी शक्ती याच दोन अवयवांत एकवटून त्याच्याकडे अतिंद्रीय शक्तींचा भलामोठा संचय झालाय. काल जरी एक फार्मास्युटिकल कंपनी चालवत असला, तरीही त्याचा मुख्य व्यवसाय हा विषाणू बनवून कोणत्या तरी देशात सोडणं आणि नंतर त्याच देशाला प्रतिजैविक विकून पैसा कमावणं, हा आहे. या उपद्व्यापात कालने अनेक अमानव (म्यटंट्स / चित्रपटात वापरलेला शब्द – मानवर) तयार केले आहेत. त्यांच्याद्वारे तो आपल्या अपंगत्वावर इलाज शोधू पाहातोय आणि आपल्या जैवतंत्रज्ञानातील ज्ञानाचा वापर करून सबंध जगावर राज्य करू पाहातोय. त्याने भारतात सोडलेला एक अतिशय भयानक रोगजंतू प्रो. रोहित मेहरा (ह्रथिक रोशन) आणि क्रिश (ह्रथिक रोशन) हे दोघे निकामी करतात अन् त्यातून सुरू होते काल आणि क्रिशमधील संघर्षाची गाथा. या संघर्षगाथेला हळुहळू अनेक भावनिक पदर जोडले जातात आणि त्यातून उलगडत जाते “क्रिश ३” रुपी वस्त्र!

हिंदीतील पहिला सुपरहिरो-पट हे “क्रिश”च्या पहिल्या भागाचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. वर्तमान भागाद्वारे “क्रिश”च्याही पुढे जाण्याचे, हॉलिवूडमधील सुपरहिरोपटांशी साहजिकपणे होणाऱ्या तुलनेच्या कसोटीवर खरे उतरण्याचे आणि भारतीय प्रेक्षकांना आवडेल असा चित्रपट देण्याचे तिहेरी आह्वान दिग्दर्शक राकेश रोशनवर होते. भारतीय प्रेक्षक हा निव्वळ तंत्रज्ञानाला भुलणारा नव्हे (आठवा – रा.वन) वा निव्वळ सुपरहिरोपटासाठी जीव टाकणाराही नव्हे ( पुन्हा आठवा – रा.वन). तर आपल्याकडे तेच चालतं, जे आपल्या ह्रदयापर्यंत पोहोचतं. तांत्रिकदृष्ट्या कितीही सफाईदार चित्रपट जरी असला, तरीही तो जर भारतीय प्रेक्षकाच्या ह्रदयातील भावनेच्या कप्प्याला उघडणारा नसेल, तर तो आपल्याकडे चालणं शक्यच नाही. याउलट एखादा चित्रपट म्हणून सुमार असलेला चित्रपटही जर आवडून गेला तर आपल्याकडे चालतोच! राकेश रोशनने भारतीयांची ही मानसिकता बरोब्बर ओळखली आणि एका मानवी नातंसंबंधांच्या भावनिक कथेला अत्युत्कृष्ट तंत्रज्ञानाची फोडणी देऊन बनवला “क्रिश ३” नामक चविष्ट पदार्थ. असा पदार्थ जो आपल्याकडील प्रेक्षकांना नुसता आवडेल एवढेच नव्हे तर तिकीटबारीवर चालेलही! भावनेच्या मुद्यावर त्याने हॉलिवुडमधील भावनाहीन सुपरहिरोपटांना मात दिली, तर अद्वितीय दृक्परिणामांच्या (VFX) आणि एकूणच तंत्रज्ञानाच्या बळावरआपल्या देशात बहुसंख्येने असलेल्या हॉलिवूड-अंधभक्तांच्या काकदृष्टीलाही मात दिली! असा हा “क्रिश ३” व्यावसायिकदृष्ट्या अचूक जमवून आणलेला खेळ आहे! मला वैयक्तिक अतिशय आवडलाय आणि आपल्याकडील प्रेक्षकांनाही तो आवडणार याची १००% खात्री आहे.

अर्थातच चित्रपटात काही तांत्रिकदृष्ट्या न पटणाऱ्या गोष्टीही आहेत –
१) “जादू”ची उन्हापासून मिळणारी शक्ती नियंत्रित करण्यासाठी “बुद्धीमान गाळणी”चीच आवश्यकता का पडावी? गाळणी (फिल्टर) विविध प्रक्रियांमध्ये वापरले जाते. त्याला एक नियंत्रक (रेग्युलेटर) तेवढा बसवला तरी काम भागण्यासारखे असताना चित्रपटातील गाळणीला असलेली स्वयंप्रज्ञेची आवश्यकता काही पटत नाही. अर्थात राकेश रोशनने विज्ञानपट बनविण्याचा दावा केला नसल्याने आणि उपरोक्त चूक कथेच्या दृष्टीने आवश्यकच असल्याने तशी दुर्लक्षिण्याजोगी आहे.
२) शूर्पणखा म्युटंट (अमानवी) असल्याचे चित्रपटात सांगितलेय. ते चूक आहे. शूर्पणखा ही राक्षसी होती आणि राक्षसही एक नैसर्गिक प्रजातीच होते, म्युटंट नव्हे.
३) चित्रपटात आधी प्रियाच्या (प्रियांका चोप्रा) पोटातील मूल मेल्याचा प्रसंग दाखवलाय आणि नंतर कायाने (कंगना राणावत) तिची जागा घेण्याचा प्रसंग दाखवलाय. प्रत्यक्षात कायाने प्रियाची जागा घेतल्यामुळे डॉक्टरांना प्रियाच्या पोटातील बाळ मेल्याचा गैरसमज होतो. ही चित्रपटाच्या संपादनातली चूक आहे.
४) नुकताच ज्याचा बोन-मॅरो काढून घेण्यात आलाय तो रोहित मेहरा पुढच्याच प्रसंगी स्वत:च्या पायावर उभा असतो. हे अजिबातच पटणारे नाही.

अश्या अनेक लहानमोठ्या त्रुटी चित्रपटात असल्या तरीही चित्रपटाचा आस्वाद घेण्यात त्यांच्यामुळे किंचितही बाधा येत नाही, हे तितकेच खरे! उलट चित्रपटातले दृक्परिणाम तर इतके काही सुंदर जमून आले आहेत की हॉलिवूडपटांनीही तोंडात बोट घालावे. जे दृक्परिणाम जमवून आणण्यासाठी हॉलिवूडला अब्जावधी डॉलर्स ओतावे लागतात, त्याच दर्जाचे काम या भारतीय चित्रपटाने अवघ्या काही कोटी रुपयांमध्ये साधलेय – आणि तेही अगदी निर्दोष! ही गोष्ट हॉलिवूडला बापजन्मीही साधणारी नाही. आणि हेच “क्रिश ३”चं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. चित्रपटातील एकूण एक साहसदृश्ये अक्षरश: श्वासोच्छ्वास विसरायला लावण्याइतकी दर्जेदार झाली आहेत! परंतू संगीताच्या पातळीवर मात्र बोंबच आहे. पार्श्वसंगीत अतिशय उत्तम असताना गाणी मात्र कालविसंगत वाटताहेत. चाल वगैरे प्रकार क्षणभर बाजूला ठेवला तरीही राजेश रोशनचा ध्वनिच (साऊंड) मुळात शिळा वाटतोय. फुकट मिळतं म्हणून घरच्याच माणसाचं संगीत वापरायचं, हा प्रकार राकेश रोशनने थांबवला आणि राजेश रोशननेही आता आपला काळ संपलाय तेव्हा आपण एकतर निवृत्त व्हावं अथवा स्वत:च्या संगीताचा पुन्हा नव्याने शोध घ्यावा – अश्या दोन गोष्टी झाल्या तर प्रेक्षक आणि फिल्मक्राफ्ट दोघांसाठीही बरं होईल. आणखी एक अडचण म्हणजे, चित्रपटातली मुंबई ही मुंबई वाटतच नाही – उगाचच मुंबईचं शांघाय केल्यासारखं वाटतं.

अभिनयाच्या पातळीवर नेहमीचेच यशस्वी कलाकार असल्याने बोलण्यासारखे फारसे काही नाहीच. तरीही यावेळी मला आश्चर्यकारकरित्या कंगना राणावतचे काम सर्वात जास्त आवडलेय. एकतर तिची भूमिकाही अतिशय दमदार आहे आणि तिने ती व्यवस्थित, संयतपणे निभावलीय. त्यामानाने प्रियांका चोप्राला काहीच काम नाहीये. ह्रथिक रोशन हा निर्मितीसंस्था आणि भूमिका अश्या दोन्हीही बाबतीत घरच्याच मैदानावर असल्याने त्यानेही चांगलेच काम केलेय. “काल”च्या भूमिकेत विवेक ओबेरॉयही अतिशय शोभलाय – विशेषत: मध्यंतरानंतरच्या प्रसंगांमध्ये. परंतू त्याचे पात्र उगाचच स्टिफन हॉकिंग आणि “एक्स मेन”मधील पात्रे यांचे मिश्रण वाटते. ओरिजनल वाटत नाही.

तर असा हा कुठे कडू, कुठे गोड तर कुठे आंबट असलेला “क्रिश ३”. वर सांगितल्याप्रमाणे अतिशय स्वादिष्ट जमलाय. चाखणाऱ्या प्रत्येकाला तो निश्चितपणे आवडेल. अर्थात, तो दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा ताटात वाढून घ्यायचा की नाही, हे मात्र ज्याने त्याने आपापल्या चवीप्रमाणे ठरवावे!

*३.५/५

– © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

image

One thought on ““आवडलेला क्रिश-३”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *