तरल संवेदनांची सरल गोष्ट – द लंचबॉक्स

  साजन फर्नांडिस (इरफान खान) हा एक मध्यमवयीन, विधुर, एकटाच राहाणारा, जरासा माणुसघाणा असा सरकारी कर्मचारी आहे. एकटेपणामुळे आणि मुंबईतल्या रोजच्या दगदगीमुळे लवकरच स्वेच्छानिवृत्ती घेऊन नाशिकला स्थायिक होण्याचा विचार आहे त्याचा. त्याने स्वेच्छानिवृत्तीचा अर्जही दिलाय आणि आता आपल्या कार्यालयात तो केवळ महिनाभराचाच पाहुणा आहे. एकटा राहातो, म्हणून घराजवळच मेस लावलीये त्याने. तिथून आलेला डबा मुंबईतले डबेवाले रोज त्याला कार्यालयात पोहोचवतात. अर्थात ही केवळ एक सोय आहे, कारण त्याच्या बिचाऱ्याच्या डब्यात रोज महाराष्ट्रातल्या सगळ्या खानावळींची खासियत असलेली “बटाट्याची भाजी”च तेवढी असते! थोडक्यात साजन एकाकी आहे. एकाकी अन् दु:खी. शिवाय जीवनाबाबतचा त्याचा आत्तापर्यंतचा अनुभवही वाईटच आहे. एके दिवशी मात्र चमत्कार घडतो. साजनच्या डब्यात चक्क वेगळी भाजी आणि सुग्रास जेवण असतं! अर्थातच साजन त्यादिवशी डबा चाटून-पुसून स्वच्छ करतो. संध्याकाळी मुद्दाम खानावळीत जाऊन सांगतोही – ‘असा डबा बनवावा’!
  इला (निमरत कौर) एक मध्यमवर्गीय आणि एका ७-८ वर्षांच्या मुलीची आई असलेली गृहिणी आहे. मुंबईतल्या बहुतेक चाकरमान्यांच्या बायकांचा असलेला प्रॉब्लेम – नवरा वेळ देत नाही – हा तिचाही प्रॉब्लेम आहे. त्यातून लग्नाला बरीच वर्षे झाल्यामुळं वैवाहिक आयुष्यही नीरस होऊन गेलंय तिचं. नवऱ्याचं आपल्याकडं लक्ष नाही एवढंच नव्हे तर त्याचं बाहेर लफडं चालू आहे असंही वाटतंय तिला. भाऊ वारलेला. वडील कॅन्सरने आजारी. आई त्यांचं करण्यात गुंतलेली. इला अगदी एकाकी आहे. एकाकी अन् दु:खी. तिच्या आयुष्यातला एकमेव चांगला भाग म्हणजे वरच्या मजल्यावर राहाणाऱ्या देशपांडे काकू (आवाज – भारती आचरेकर). त्यांच्याशी बोलणे, त्यांच्या टेपवरची गाणी ऐकणे, त्यांच्याकडून नवनव्या पाककृती शिकणे हा तिचा एकमेव विरंगुळा. वैवाहिक नातं जर पुन्हा फुलवायचं असेल तर नवऱ्याच्या डब्यात काहीतरी स्वादिष्ट पाठव ही त्यांचीच कल्पना. इला अनेक तास खपून डबा बनवते. डबेवाला तो घेऊनही जातो. संध्याकाळी ती आतुरतेने नवऱ्याच्या प्रतिसादाची वाट पाहात असते. नवरा मात्र ढिम्मच! काही बोलतच नाही. शेवटी न राहावून हीच विचारतो. तर ‘बटाट्याची भाजी ना, चांगली होती की!’ एवढेच उत्तर. तेव्हा तिला कळते की, आपली मेहनत दुसऱ्याच कुणाला तरी पोहोचलीये!
  या गैरसमजाबद्दल इला, दुसऱ्यादिवशी एक क्षमा मागणारी चिठ्ठी पाठवते. आणि इथून सुरू होतो ‘द लंचबॉक्स’च्या अनोख्या प्रेमकथेचा प्रवास!
  या कथेला एक तिसराही कोन आहे. साजनकडे शिकाऊ कर्मचारी म्हणून असणारा शेख (नवाझुद्दीन सिद्दिकी). त्याचाही या कथेत एक महत्वाचा आयाम आहे.
  अशी साधीच कथा. परंतू दिग्दर्शक रितेश बत्राने तिचा आलेख अतिशय उत्कृष्ट चितारलाय. इलाच्या सुरुवातीच्या भिडस्त चिठ्ठ्यांना साजनची खत्रुड उत्तरं मिळण्यापासून ते दोघांना एकमेकांची काळजी वाटणं, त्यांचं एकमेकांत गुंतत जाणं हा सारा प्रवास पाहाणाऱ्याला अक्षरश: जाणवतो. आणि कथेची खुबी म्हणजे, हा प्रवास घडवण्यासाठी कुठेच नाट्यमयता वापरावे लागलेले नाही. साधेच प्रसंग. किंबहुना इला आणि साजन एकमेकांशी वाटून घेत असलेले अनुभवही साधेच. रोजच्या आयुष्यातले. कधी आयुष्याचे चटके दाखवणारे, तर कधी नर्मविनोदाची पखरण असलेले. पण साधेच. आणि यामुळेच ही कथा जवळची वाटते. आपल्यातली वाटते. काल्पनिक असूनही शक्य कोटीतली वाटते. इला आणि साजनचं नातं त्या दोघांसाठी इतकं काही सुखद विश्रामस्थळ आहे, की ते कधीच चुकूनही विवाहबाह्य संबंध (अश्या संबंधांसाठी आवश्यक असणारं शारीरिक आकर्षण या नात्यात जवळजवळ नाहीच!)— वाटत नाही. उलट ते जितकं त्या दोघांना गरजेचं आणि हवंहवंसं वाटतं, तितकंच ते प्रेक्षकांनाही आवश्यक आणि हवंहवंसं वाटायला लावण्यात लेखक-दिग्दर्शक यशस्वी झालाय.
  चित्रपटात बहुतांशी त्याचत्याच जागा आहेत. पण तरीही मायकेल सायमण्ड्सने त्या आपल्या कॅमेऱ्यात इतक्या वेगवेगळ्या प्रकारे बद्ध केल्या आहेत ना, की त्या प्रत्येकवेळी नव्याच वाटतात. चित्रपटात गाणी नाहीत. पार्श्वसंगीतही जवळजवळ नाहीच. परंतू जे आहे ते खूपच सुखद आणि प्रत्ययकारी आहे. यासाठी मॅक्स रिक्टरचे कौतुक करायलाच हवे! चित्रपटात प्रसंग जोडण्यासाठी नव्वदच्या दशकातल्या हिंदी गीतांचा आणि डबेवाल्यांच्या भजनांचा मोठ्या खुबीने वापर करण्यात आलाय. अर्थातच हे श्रेय दिग्दर्शक रितेश बत्राचे! यासोबतच महत्वाची बाब अशी की, असे चित्रपट कायम बनतच असतात, परंतू ते केवळ काही महोत्सवांपुरतेच मर्यादित राहातात. या चित्रपटाबाबतीत मात्र करण जोहरने तोटा होण्याची शक्यता असूनही वितरणाची जबाबदारी उचलली. यासाठी त्याचे आणि ‘धर्मा प्रॉडक्शन्स’चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!
  अभिनयाच्या पातळीवर काही बोलले नाही तरी चालेल. कारण इरफान खान असो वा नवाझुद्दिन सिद्दिकी, दोघेही अतिशय नाणावलेले अभिनेते आहेत. निमरत कौरनेही इला आणि तिचे अंतर्द्वंद्व मोठ्या कौशल्याने साकारलेय. लिलिएट दुबे, भारती आचरेकर, नकुल वैद, डेन्झिल स्मिथ आदींच्या लहानश्याच परंतू महत्वपूर्ण भूमिका आहेत, आणि यांपैकी प्रत्येकानेच आपापल्या भूमिकेला व्यवस्थित न्यायही दिलाय.
  चित्रपटाची कथा छोटिशीच आहे. परंतू ती अतिशय तपशीलवार मांडल्यामुळे चित्रपट जवळजवळ दिड तासाचा झालाय (अर्थातच सामान्य हिंदी सिनेमाच्या तुलनेत हा काळ खूपच छोटा आहे!)! प्रत्येक घटनेला व्यवस्थित वेळ दिलाय, तिचे सारे कंगोरे व्यवस्थित मांडले आहेत. प्रत्येक पात्राचा पात्रपरिपोष हळूहळू परंतू निश्चितपणे होऊ दिलाय. उदाहरणार्थ, नवाझुद्दिन सिद्दिकीचे पात्र अनाथ आणि रोज दुपारच्या जेवणाच्या नावाखाली केळी आणि सफरचंद खाणारे आहे. त्याच्या हाती जेव्हा पहिल्यांदा इरफान खानचा डबा पडतो, तेव्हा तो अधाश्यागत एका हातात पोळी ठेवून खाऊ लागतो. हा तपशील आहे. असे शेकडो तपशील चित्रपटाच्या प्रत्येक चौकटीत भरलेले आहेत. अर्थातच अश्या तपशीलांमुळे चित्रपट काहींना कंटाळवाणा वाटण्याचीही शक्यता आहे. परंतू ही कथाच इतकी हळूवार आणि अंत:प्रवाही आहे ना की, जर ती इतक्या तपशीलांसह मांडली नसती तर ती विसविशीत वाटली असती, वरवरची वाटली असती!
  अखेरिस एकच सांगावंसं वाटतं की, सध्याचं युग इतकं काही धकाधकीचं होऊन बसलंय की, त्यात एखादी साधीसोपी गोष्ट केवळ ती साधी आहे एवढ्या एकाच कारणामुळे कंटाळवाणी वाटण्याची शक्यता आहे. तुम्हाला ‘द लंचबॉक्स’ आवडला नाही, तरी हरकत नाही परंतू जर आवडला नाही तर स्वत:च्या मनाला एक प्रश्न अवश्य विचारा की, ‘चित्रपट वाईट आहे म्हणून आवडला नाही की, केवळ तो साधा आहे – मसालेदार नाही, फिल्मी नाही म्हणून आवडला नाही?’. या एका प्रश्नाच्या उत्तरात, आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित इतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. ती उत्तरे आपल्या मानवी जाणीवांची आणि संवेदनांची घसरण दाखवून देणारी न ठरोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या चित्रपटात वापरलेल्या भाषेतच सांगायचं झालं तर, ‘कभी कभी गलत ट्रेनभी सही स्टेशनपर पहुँचा देती हैं’!
  ‘द लंचबॉक्स’बद्दल बोलण्यासारखे अजून बरेच आहे. मात्र प्रत्येकाने हा चित्रपट स्वत:च पाहून त्याचा आपल्याला भावेल तसा अन्वय लावावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि ही ‘द लंचबॉक्स’ नावाची तरल संवेदनांची सरल गोष्ट तितकी सक्षम आहे, अशी माझी खात्री आहे! ‘चित्रपट साक्षरता’ तरी दुसरे काय असते!

*४.७५/५

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *