एक कृतिशील पूल: स्वामी विवेकानंद

मला एका बाबतीत कायम स्वामी विवेकानंदांचं उदाहरण द्यावंसं वाटतं. स्वामीजी हे आपल्या काळातल्याच नव्हे तर आत्ताच्या काळातल्याही कित्येक धर्मज्ञांहून अधिक धर्मज्ञ आणि कित्येक सुधारकांहूनही अधिक सुधारक होते. परंतू त्यांनी कधी निव्वळ निष्क्रिय अध्यात्म लोकांच्या माथी मारलं नाही, वा पराकोटीच्या इहवादाने लोकांच्या श्रद्धांची नासधूस केली नाही. लोकांमध्ये राहिले, लोकांचे बनून राहिले. आत्यंतिक धर्मवाद्यांचे बोट पकडून हळूच त्यांना आवश्यक ती भौतिकता शिकवली आणि आत्यंतिक धर्मवाद्यांना अध्यात्माची वैज्ञानिकता दाखवून दिली. हे सारे नुसते बोलून नव्हे बरं का, तर कृतीने!
आठवा त्या संस्थानिकाचा किस्सा! टोकाचा इहवादी असलेला तो संस्थानिक मूर्तीपूजेचा कट्टर विरोधक होता. स्वामीजींनी त्याच्याच दरबारात टांगलेली त्याचीच तसबीर मागवली. सारे पाहातायत.
“प्रधानजी, असे समोर या. जरा या तसबीरीवर थुंका बघू”! प्रधानजी दचकले. राजाच्या तसबीरीवर थुंकायचं? तेही राजा स्वत: समोर असताना? भलतंच! राजाच्याही डोळ्यांत रागाची छटा तरळली.
“अरे? तुम्ही थुंकत नाहीत? मग दुसरे कुणीतरी पुढे या”.
कोण पुढे येणार?
शेवटी राजाच म्हणाला, “स्वामीजी, असे कसे शक्य आहे? माझ्या तसबीरीवर थुंकायला सांगताय? तेही माझ्यात दरबारात?”
“काय फरक पडतो? निर्जीव तसबीर तर आहे!” — स्वामीजी!
“अहो पण ती ‘माझी’ तसबीर आहे ना. माझं चित्र काढलंय त्यात. दरबाऱ्यांच्या दृष्टीने त्यात मीच आहे. तिच्यावर थुंकणं म्हणजे माझ्यावरच थुंकणं! कोण कसा काय पुढे येईल? शिवाय तुम्ही सन्यासी. माझे अतिथी. माझ्याच घरी येऊन माझ्याच तसबिरीवर थुंकायला शिकवताय, हा माझा अपमान नाही का?”
“अगदी बरोब्बर बोललात राजे! आता जरा हेच तत्त्व मूर्तीपूजेला लावा पाहू”, स्वामीजी म्हणाले.
दुसऱ्याच क्षणी राजाच्या डोक्यात प्रकाश पडला! मूर्ती जरी निर्जीव असली तरी ती देवाची मूर्ती असते. भाविकाच्या दृष्टीने त्यात परमेश्वरच असतो. तो मूर्तीची उपासना करत नसतो, तर मूर्तीमधील ईश्वराची उपासना करत असतो. मूर्ती हे ईश्वराचे केवळ प्रतीक असते. सामान्य माणसांना थेट निर्गुण निराकार ईश्वर समजणार नाही म्हणून सगुणाची पूजा. ही पायरी आहे. सगुणाकडूनच निर्गुणाकडे जायचे असते! एवढं सगळं स्वामीजी समजावत बसले असते, तर ते त्या संस्थानिकाला समजलंच असतं, असं नाही. परंतू केवळ एकाच प्रात्यक्षिकाद्वारे स्वामीजींनी अघ्यात्मातली एवढी सूक्ष्म गोष्ट समजावून दिली, तीही एका आत्यंतिक इहवाद्याला!
स्वामीजींकडे एकदा एक म्हातारा साधू आला होता. म्हणाला, मी आयुष्यभर तप करून एक सिद्धी मिळवली आहे. स्वामीजी म्हणाले, दाखवा! तो स्वामीजींना घेऊन नदीकिनारी गेला. काठावर उभा राहिला आणि हाहा म्हणता म्हणता त्या खळाळत्या पाण्यावरून चालत-चालत नदी पार करून दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचला. परत तसाच स्वामीजींकडे आला. त्याच्या नजरेत विजयाची चमक होती!
स्वामीजींनी जवळच असलेल्या एका नावाड्याला विचारले, “मला पलिकडल्या किनाऱ्यावर जायचेय. नेशील का?”
“हो, नेतो ना!”
“किती पैसे घेशील?”
“चार आणे!”
स्वामीजी झटकन त्या साधूकडे वळले. म्हणाले, “आयुष्यभर तप करून अखेरिस काय मिळवले, तर चार आण्यांची सिद्धी”!
साधूचा चेहरा खाडकन उतरला.
स्वामीजी पुढे म्हणाले, “जी आयुष्याची बारा-पंधरा वर्षे तुम्ही ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी घातलीत, तीच जर गरीब-अशिक्षित-भोळ्याभाबड्या जनतेच्या उत्थानासाठी खर्च केली असती, आणि फार नाही पण चार-दोनच माणसांचे कल्याण केले असते, तर तुम्ही थेट परमेश्वराजवळच पोहोचला नसता का? सिद्धी नाही, तर साक्षात सिद्धीदाताच प्राप्त झाला असता तुम्हाला”!
साधूला आपली चूक उमगली! केवळ एकाच प्रात्यक्षिकाद्वारे स्वामीजींनी भौतिक जगात आवश्यक असलेले आध्यात्मिक कर्म समजावून दिले, तेही एका साधूला!
स्वामीजी आज दिडशे वर्षांनंतरही हवेहवेसे वाटतात, अनुकरणीय वाटतात. मला वाटते, स्वामीजींच्या या चिरंतनत्वाचे गमक त्यांच्या या वृत्तीतच असावे. त्यांनी इहवाद आणि अध्यात्म यांच्यातला दुवा बनून कार्य केले. दोहोंतल्या कमतरता ओळखून दोन्हींनाही एकमेकांचा हात धरून परिपूर्ण व्हायला, पुढे जायला शिकवले. हे करताना त्यांनी कधीच आततायीपणा नाही केला. अध्यात्म सांगताना विज्ञानाची कधी खिल्ली उडवली नाही आणि भौतिकता सांगताना आस्तिकतेला कधी अंधश्रद्धा ठरवले नाही. आज नेमकी हीच अडचण होऊन बसलीय. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या बाबा-बुवांना वाटतं मीच तेवढा खरा, बाकी जग झूठ! अंधश्रद्धा निर्मूलनछाप विवेकवादी विचारजंतांना वाटते, आम्हीच तेवढे खरे बाकी देव-बिव सगळं झूठ! यांचा त्यांना मेळ नाही आणि त्यांचा यांना मेळ नाही. वरून दोन्हीही विचारसरणींची सारखीच तक्रार असते, “काय सांगणार हो, आम्ही एवढी मेहनत घेतो, पण समाज आम्हाला स्वीकारतच नाही”. कसा स्वीकारणार? समाज हा प्रकार मुळातच बहुढंगी असतो. तो कधीच एकाच एक विचाराने चालत नाही. समाजातले ऐहिक प्रश्न ऐहिक उपायांनीच सोडवायला हवे, परंतू आध्यात्मिक निर्लेपता ठेवून! आणि अध्यात्म तर करायलाच हवं, परंतू सांसारिक कर्मे न विसरता! एका विचारसरणीने अहंकारापोटी दुसरीला वाईट ठरवण्यापेक्षा तिच्यातलं चांगलं कसं घेता येईल आणि त्याद्वारे आपली विचारप्रणाली अधिक समृद्ध कशी करता येईल हे पाहिलं पाहिजे. मला वाटतं, असं केलं तरच समाज एकसंध राहिल – तुटणार नाही.
भगवद्गीतेत एक मोठे सुंदर तत्त्व सांगितले आहे,
“न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् ।
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्त: समाचरन् ।। (गीता: ३/२६)
अर्थात, लोक समजा चुकीचे वागत असतील, परंतू त्यांची त्या वागण्यावर श्रद्धा असेल, तर शहाण्याने विनाकारण त्यांचा बुद्धीभेद करू नये. अन्यथा ते तुम्ही सांगता तसे तर करणार नाहीतच, कारण त्यांना ते पटलेलेच नाही. शिवाय ते जे श्रद्धापूर्वक वागायचे त्याबद्दलही त्यांच्या मनात तुम्ही शंका उत्पन्न करून दिल्याने त्यांना आता तेही मनापासून करता येणार नाही. म्हणजे ते सुधारणं तर दूरच, उलट निष्क्रिय होऊन बसतील. त्यापेक्षा शहाण्याने त्यांना त्यांची कर्मे करू द्यावीत, वर आपण मात्र योग्य वागून कृतीद्वारे त्यांना आदर्श घालून द्यावा. म्हणजे मग आपोआपच हळूहळू ती मंडळी तुमचा आदर्श पाहून नको त्या गोष्टी त्यागतील, आणि चांगले तेवढे घेऊन वागायला लागतील. हल्ली मॅनेजमेंट शिकवताना मोठमोठे जडजंबाल शब्द वापरून हेच तत्त्व शिकवतात ना? तेच गीतेने सहस्रावधी वर्षांपूर्वी सांगितले. आणि तेच स्वामीजींनी दिडशे वर्षांपूर्वी स्वत:च्या कृतीने दाखवून दिले. मला वाटते, स्वामीजींच्या चरित्रातून आपण हा एवढा एक बोध घेतला तरी पुरे!

– © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी अथवा “स्वामी विवेकानंद” या विषयावर लेखकाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क करा: www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *