चर्चेसची होताहेत मंदिरे : चाहूल बदलत्या प्रवाहाची

मी माझ्या व्याख्यानांतून आणि लेखनातून एक गोष्ट कायम मांडत असतो की, हिंदूंनी जर दांभिक-धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुतेची सद्गुणविकृती सोडली नाही, तर लवकरच जगभरात सर्वत्र हिंदुच हिंदू दिसतील परंतू सनातनच्या उगमस्थानी भारतात मात्र औषधालाही हिंदू सापडणार नाहीत. एकीकडे भारतातील सामान्य हिंदू आधुनिकतेच्या खोट्या कल्पनांपायी आपल्या समृद्ध धर्म आणि संस्कृतीपासून दूर जात असताना उरलेले जग (त्यातही विशेषत्वाने पाश्चात्य देश!) हळूहळू का होईना परंतू हिंदू संस्कृती अंगिकारत आहे. एवढेच नव्हे तर तिथे हिंदू धर्माचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतोच आहे.
हा मुद्दा मी पूर्वीदेखील फेसबुकवर आणि अन्यत्र मांडला आहे. त्यासाठी वेळोवेळी प्रसंगोपात उदाहरणेही दिली आहेत. मग तो श्रीमती लिसा मिलर या अमेरिकन विदुषीचा We Are Hindus Now हा “The Newsweek”मध्ये (सध्याचे “Daily Beast”) प्रकाशित झालेला लेख असो, वेगवेगळ्या देशांनी हिंदू देवीदेवतांची नाणी पाडण्याचे प्रसंग असो, कॅलिफोर्नियात साजरा होणारा हिंदू मास असो, घाना या आफ्रिकन देशातील स्थानिक आफ्रिकन रहिवाश्यांमध्ये वाढत जाणारा गणेशोत्सवाचा प्रभाव असो, वा अन्य काही! आज असेच अजून एक उदाहरण मी आपल्यासमोर मांडणार आहे.
दिनांक २९ जुन २०१२ रोजी Times Of India मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. तिचे शीर्षक आहे, “Churches are turning into temples in UK and US!” बातमीत लिहिलेय की, इंग्लंड आणि अमेरिकेत अनेकानेक एकरांत पसरलेल्या जुन्या चर्चेसचे रुपांतर हिंदू मंदिरांमध्ये होतेय. अनेक हिंदू संघटना अशी जुनी चर्चेस लक्षावधी डॉलर्सना विकत घेऊन, त्यांचे नुतनीकरण करून, हिंदू मंदिरे बनवत आहेत. यासाठी बातमीत अनेक उदाहरणेही देण्यात आली आहेत. श्रीस्वामीनारायण मंदिर संस्थानने सुमारे वर्षभरापूर्वी अनेक एकरांत पसरलेले ८० वर्ष जुने चर्च सुमारे १० लक्ष ३० सहस्र डॉलर्सना विकत घेतले व त्याचे मंदिरात रुपांतर केलेय. नुकतेच त्यांनी टोरोंटो (कॅनडा) येथील एक १२१ वर्ष जुने ऐतिहासिक चर्च सुमारे १० लक्ष ६० सहस्र डॉलर्सना विकत घेतले असून त्याच्याही मंदिरीकरणाचे काम जोरात सुरु आहे. बातमीनुसार अशी किमान पाच तरी चर्चेस आत्तापर्यंत मंदिरीकरणासाठी विकत घेण्यात आली आहेत! नुकतेच डल्लास (टेक्सास) येथील एक ४० वर्षे जुने चर्चदेखील याच उद्देशाने सुमारे ७ लक्ष डॉलर्स खर्चून विकत घेण्यात आले आहे. बातमीनुसार या सर्व खरेदीसाठी पैसा पुरवणारे लोक हे मुख्यतः विदेशांत स्थायिक झालेले गुजराती भाविक आहेत आणि अशी मंदिरे बांधली जावीत यासाठी ते वाट्टेल तेवढा पैसा मोजायला तयार आहेत.
या सगळ्याची सुरुवात १९८२ साली इंग्लंडमध्ये झाली. तेथील “सेण्ट निनीयन” हे जवळपास २.५ एकरांत पसरलेले चर्च सुमारे २ लक्ष पाउंड्स खर्चून विकत घेण्यात आले व त्याचे रुपांतर मंदिरात केले गेले. १९९८ साली बोल्टनमध्येही असेच एक ७० वर्षे जुने चर्च विकत घेऊन त्याचे मंदिर केले गेले. विशेष म्हणजे यांपैकी बहुतेक चर्चेसचे नक्षीकाम व त्यांवरील येशू ख्रिस्त आणि माता मेरी आदींची चित्रे ऐतिहासिक ठेवा असल्याने जसेच्या तसेच ठेवण्यात आले आहेत. या सर्व नवमंदिरांना केवळ हिंदुच नव्हे तर, परिसरातील सर्वच धर्मांचे भाविक भेट देतात.
धर्म ही किती जरी आध्यात्मिक आणि वैयक्तिक बाब असली तरीही वास्तव जगात केवळ मागणी असलेल्या गोष्टींचाच पुरवठा केला जातो. आणि ज्याअर्थी अमेरिका आणि युरोपात एवढा प्रचंड पैसा खर्चून चर्चेसचे रुपांतर मंदिरांत केले जातेय, त्याअर्थी तिकडे कश्याचा अस्त आणि कश्याचा उदय होतोय, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही; असे मला वाटते! सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्य जगतात लावलेला हिंदू धर्माचा वेलू गगनावरी गेला आहे, वरवरच जातोय! परंतू या वेलूचे भारतवर्षात असलेले बीज भारतीय हिंदूंच्या सद्गुणविकृतीमुळे नासणार तर नाही ना, अशी सार्थ भीतीही वाटतेय! स्वामी विवेकानंद भारतातील हिंदूंना “अमृतपुत्र” अश्या उपाधीने गौरवित असत. त्या अमृतत्त्वाची जाणीव मात्र येथील हिंदूंना कधी होईल, न कळे! ज्यांच्या जीवनशैलीची भ्रष्ट नक्कल करण्यात येथील आधुनिक समाज गुंतलाय, तीच मंडळी आज आपण प्रतिगामी म्हणून त्यागलेल्या सनातन जीवनशैलीकडे आशेने पाहातायत. अंगिकारतायत. हे सत्य आम्हांला उमगेल तो सुदिन! पाश्चात्यांकडून एखादी गोष्ट आल्यास तिचा डोळे झाकून स्वीकार करण्यात आम्ही पटाईत आहोत – भविष्यात हिंदू धर्म आणि त्याची महती पाश्चात्यांकडूनच समजावून घेण्याची वेळ आपल्यावर आल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये! आणि तसे झाले तर मात्र नक्कल करण्यात पटाईत असलेले एतद्देशीय दांभिक-धर्मनिरपेक्ष त्याच हिंदू धर्माला फॅशन स्टेटमेंट समजून डोक्यावर घेत नाचतील, हेही तितकेच खरे! अजूनही वेळ गेलेली नाहीये – हिंदू धर्म स्वत:हूनच समजून घ्या, आचरणात आणा – अभिमान बाळगा या दैवी परंपरेचा – येणारा काळ आपलाच आहे!

– © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी अथवा विविध क्रांतिकारक-महापुरुष आणि हिंदू संस्कृतीवर लेखकाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी संपर्क करा: www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *