परावर्तित प्रसिद्धीचे दिवाने!!

  ईस्माईल दरबार या संगीतकाराने “हम दिल दे चुके सनम”, “देवदास” आणि “किस्ना”ची काही गाणी सोडता काय संगीत निर्माण केलेय हा एक संशोधनाचाच विषय ठरावा. कुणाच्याही लक्षात नसलेला हा माणूस अचानकच प्रसिद्धीच्या झोतात आला ते “ए. आर. रहमानने ऑस्कर मिळवले नसून विकत घेतलेय” या विधानामुळे!
  अश्या प्रकारच्या प्रसिद्धीला मी परावर्तित प्रसिद्धी म्हणतो. म्हणजे, स्वत: तर काहीच कर्तृत्व दाखवायचे नाही, परंतू इतर कुणी स्वकष्टाने वर येत असेल तर त्याचेही प्रतिमाभंजन करायचा प्रयत्न करायचा. माझी रेष तुझ्या रेषेपेक्षा मोठी होऊ शकत नाही, तर थांब तुझी रेषच पुसतो – असा आकस दाखवायचा. सूर्यावर दगड फेकला की चार-दोन प्रकाशाचे शिंतोडे आपल्यावरही उडतील, असा हा साधासरळ हिशोब असतो.
  संस्कृतमध्ये एक फार सुंदर सुभाषित आहे –
“घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् ।
येनकेनप्रकारेण प्रसिद्धो पुरुषो भवेत् ।।”
अर्थात, प्रसिद्धीसाठी हपापलेला माणूस प्रसंगी स्वत:च्याच घरातली भांडी फोडतो, स्वत:चे कपडे फाडतो, एवढेच नव्हे तर गाढवावरही स्वार व्हायला तयार होतो; कारण त्याला कोणतीही किंमत देऊन प्रसिद्ध व्हायचेच असते!
  ऑस्कर ऍकॅडमीने ५ कोटी डॉलरचा दावा ठोकण्याची धमकी दिल्यावर तत्क्षणीच शेपूट घालणारा ईस्माईल दरबार आणि मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून जाईन या आपल्या विधानावरून पलटी मारणारे यू. आर. अनंतमूर्ती यांच्यात तत्त्वतः काहीच फरक नाही, असे मला वाटते! दोघांचीही जातकुळी एकच – दोघेही परावर्तित प्रसिद्धीचे दिवाने!!

– © विक्रम श्रीराम एडके
(www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *