Category: Reviews

  • किंचित भरकटलेला तरीही कमालीचा जबरदस्त: सुपर डिलक्स

    वेंबूचं (समँता) लग्न मुगिलनशी (फ़हाद फ़ासिल) झालंय. पण ती अजूनही तिच्या जुन्या प्रियकरांपैकी एकाला विसरलेली नाहीये. एके दिवशी ती नवरा घरी नसताना प्रियकराला बोलावून घेते आणि एक अनपेक्षित गडबड होते. त्याच वेळी नवरासुद्धा घरी येतो आणि गोष्टी अजूनच वेगळं वळण घेतात. माणिकम (विजय सेतुपती) हा जवळ जवळ साडेसात वर्षांनंतर घरी येणार म्हणून त्याची बायको (गायत्री शंकर) आणि सगळंच कुटूंब खुश आहे. आता इतक्या वर्षांनंतर घरी येणाऱ्या माणसात थोडा फरक तर पडणारच ना? पण माणिकम मात्र अंतर्बाह्य बदललेला असतो. अगदी शब्दशः! किशोरावस्थेतील तीन-चार पोरं आहेत. एकाच्या घरी कुणी नाही म्हटल्यावर ते भाड्याने सिडी आणून थोडीशी मजा करायचं ठरवतात. त्यातल्या एकाला भूतकाळाबद्दल वेगळंच काही तरी समजतं आणि रागाच्या भरात त्याच्या हातून घडू नये ते घडतं. त्याच्या वडलांची (मिस्किन) तर अजूनच वेगळी तऱ्हा. त्यांनी स्वतःचाच एक पंथ स्थापन केलाय. अडनिड्या वयात भयंकर अडचणीत सापडलेला मुलगा आणि भौतिक जगात निष्क्रिय नवरा यांच्या कात्रीत आईचं (रम्या कृष्णन) अक्षरशः भजं झालंय!

    त्यागराजन कुमारराजाच्या ‘सुपर डिलक्स’मधील या तीन कथा. तसं पाहायला गेलं तर त्यांचा एकमेकांशी काही एक संबंध नाही. त्या एकमेकींमध्ये गुंततात असं नाही आणि समांतर जातात म्हणावं तर तसंही नाही. त्या काही काही विवक्षित वेळी एकमेकींना छेदून जातात आणि एकमेकींवर परिणाम करतात, हे मात्र निश्चित. भौतिकशास्त्राचा तो सिद्धांत नाही का, फुलपाखरू परिणाम; ज्यात सगळ्या गोष्टी एकमेकींवर अवलंबून असतात आणि एखाद्या आखीव व अरेषीय संस्थेच्या प्राथमिक स्थितीतील साधासाच बदल सबंध संस्थेवरच खूप मोठा परिणाम घडवून आणतो? त्या बटरफ्लाय इफेक्टचं चपखल उदाहरण म्हणजे ‘सुपर डिलक्स’. आणि हा वैज्ञानिक संदर्भ घेऊन मी उगाचच स्वतःला हुशार दाखवत या सिनेमाला विज्ञानपट ठरवू इच्छितोय, असं नाही बरं का. उत्तरार्धात चित्रपटामध्ये खरोखरच साय-फायच्या काही घटकांचा समावेश होतो!

    मागच्या परिच्छेदात एवढं जडजंबाल लिहिल्यावर साहजिकच कुणालाही वाटेल की मग हा त्या रटाळ, कलात्मकछाप चित्रपटांच्या वर्गातला आहे का? तर मी स्पष्टपणे सांगतो की, गेल्या अनेक दिवसांत मी थिएटरमध्ये चित्रपट पाहाताना क्वचितच एवढा हसलोय. ‘सुपर डिलक्स’ शेवटपर्यंत कमालीचा विनोदी आहे. अगदी चांगल्या अर्थाने आहे. त्यांच्या तिन्ही कथा अतिशय वेगळ्या धाटणीच्या आहेत, अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्या समाजातल्या वेगवेगळ्या मुद्यांना व्यवस्थित स्पर्श करतात. इतके असूनही त्यांनी विनोदी शैली कायम राखलीये. एवढी की, काही प्रसंगांत त्या त्या प्रसंगाचं गांभीर्य कमी होऊ न देताही दिग्दर्शक आपल्याला हसावं की रडावं हा प्रश्न पडायला भाग पाडतो.

    इतका गुंतागुंतीचा चित्रपट लिहिणं हे एका व्यक्तीला क्वचितच जमण्यासारखं आहे. ‘सुपर डिलक्स’ लिहिलाय चार जणांनी. मिस्किन, नालन कुमारसामी, नीलन के. शेखर आणि त्यागराजन कुमारराजा. चौघेही दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी चित्रभाषा संहितेत अचूक उतरवलीये. आणि संहितेतील चित्रभाषा पी. एस. विनोद आणि निरव शाह या दोघा जबरदस्त छायाकारांनी अतिशय ताकदीने पडद्यावर अनुवादलीये! मध्यांतराचा प्रसंग तर एवढा कमाल जमलाय की बासच!! पण चार जणांचं डोकं लागल्यावर ते चार दिशांना जायलाही वेळ लागत नाही. मध्यांतरानंतर चित्रपट काही काळासाठी पूर्णपणे भरकटतो. इतका वेळ वास्तववादी अधिक विनोदी असणाऱ्या चित्रपटात काही अतर्क्य घटक समाविष्ट होतात. कथानकाचा वेग मंदावतो. शेवटी सगळे तुकडे जागेवर बसण्यासाठी बरीच ओढाताण होते. इतका वेळ संयतपणे होत असलेली मांडणी एकाएकी तात्त्विक प्रवचने देणारी व भाषणबाज होत जाते आणि एक चांगला नव्हे तर खूपच जास्त चांगला चित्रपट मास्टरपीस होता होता राहून जातो. त्याचं स्वज्ञानी असणंही तात्कालिकच राहातं मग!

    पण या ही परिस्थितीत चित्रपटातल्या पात्रं हे वाहून जाणारं तारू समर्थपणे मार्गी लावतात. विजय सेतूपती हा माणूस अक्षरशः सोनं आहे सोनं! आणि तो सध्या ज्या कोणत्या चित्रपटाला हात लावतो त्याचंही सोनंच करून सोडतोय. प्रचंड ताकदीचा आणि तरीही स्वतःच्या मर्यादा पूर्णपणे ठाऊक असलेला, असे दोन्हीही दुर्मिळ गुण अंगी असणाऱ्या दुर्मिळ अभिनेत्यांपैकी एक आहे तो. आपल्या ताकद आणि मर्यादेच्या चौकटीत असा काही तुफान खेळतो तो की, काय सांगू! या चित्रपटात त्याने वापरलेला बोलण्याचा पोत आवर्जून ऐका. पण इथे विजय सेतूपतीच्या मदतीला निदान रंगभूषा आणि वेशभूषा तरी आहेत. दोन्हींपैकी कशाचीच साथ नसतानाही खरी मजा आणलीये ती फ़हाद फ़ासिलने. मलयाळम चित्रपटांच्या चाहत्यांना हा केवढा अफाट अभिनेता आहे हे पक्कं ठाऊक असेल. इथे तो त्या अफाट असण्याच्याही खूपच पुढे निघून जातो! विजय सेतूपतीने श्रेष्ठतम काम केलंय आणि फ़हादने त्याच्यापेक्षाही चांगलं काम केलंय, एवढंच सांगतो! या दोघांच्या खालोखाल भूमिकेत जान आणलीये ती रम्या कृष्णनने. तिची भूमिका काही फार मोठी नाही. पण जी आहे ती तिने एवढी जबरदस्त निभावलीये की विचारता सोय नाही. समँता तर अभिनेत्री कमाल आहेच. फक्त फ़हादसमोर किंचित फिकी वाटते, एवढंच. पण दोन व्यक्तींचा मात्र विशेष उल्लेख करावासा वाटतो. एक म्हणजे विजय सेतूपतीच्या मुलाचे काम करणारा लहानगा. दुर्दैवाने मला त्याचे नाव ठाऊक नाही. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे एस. आय. बर्लिनची भूमिका करणारा भगवती पेरुमाळ. बोलणं, हावभाव वगैरे तर आहेच, पण एखाद्या फ्रेममध्ये नुसत्या अस्तित्वानेसुद्धा किळस आणतो हा माणूस! या सगळ्यांनी चित्रपट तोलून तर धरलाच आहे, परंतु त्याचबरोबर त्याचं मनोरंजन-मूल्यसुद्धा अत्युच्च दर्जाचं राखलंय. पात्रांची नावंही सूचक वाटावीत अशी शंका घ्यायला जागा आहे. असा हा काहीसा भरकटलेला पण तरीही वेगळ्या वाटेवरचा अतिशय मजेदार चित्रपट त्याची वेगळी कथा, चलाख मांडणी आणि दैवी अभिनय या गोष्टींसाठी पाहायलाच हवा असा आहे!!

    *३.७५/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • शक्तीशाली पात्रावरचा दुबळा चित्रपट : कॅप्टन मार्व्हल

    “A hero can be anyone, even a man doing something as simple and reassuring as putting a coat on a young boy’s shoulders to let him know that the world hadn’t ended”. नोलनच्या ‘द डार्क नाईट राईज़ेस’मधील (२०१२) श्रेष्ठतम संवादांपैकी एक असा हा संवाद. नायक किंवा नायिका कुणाला म्हणावं याची साधी-सोपी तरीही गहन अशी परिभाषा सांगणारा. या संवादाचं किंचितसं सामान्यीकरण केलं तर काय हाती येतं? नायक किवा नायिका कुणाला म्हणावं, तर ज्या व्यक्तीच्या ह्रदयात मानवता भरलेली आहे आणि गरज पडेल तेव्हा जी व्यक्ती त्या मानवतेला अभिव्यक्त करायला कचरत नाही, अशी व्यक्ती! मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा नुकताच प्रदर्शित झालेला २१वा चित्रपट ‘कॅप्टन मार्व्हल’ नेमक्या याच आघाडीवर तोकडा पडतो.

    चित्रपटाची सुरुवात होते ती क्रींच्या ‘हाल’ नावाच्या ग्रहावर. उदात्त योद्ध्यांचा हा ग्रह. त्यांच्यापैकी एक असते व्हिर्स (ब्री लार्सन). या ग्रहाची सत्ता सुप्रिम इंटेलिजन्स नामक शक्ती चालवते. ही शक्ती प्रत्येकाला ‘भाव तसा देव’ न्यायाने वेगवेगळी भासत असते. व्हिर्सला सातत्याने एकसारखीच स्वप्नं पडत असतात. त्यात दिसणाऱ्या व्यक्ती, घटना यांपैकी कशा कशाचीच तिला काही एक माहिती नसते. एवढंच नाही तर तिला सुप्रिम इंटेलिजन्सदेखील त्या स्वप्नातीलच एका व्यक्तीच्या स्वरूपात दिसते. लवकरच व्हिर्स ही त्यांच्या ग्रहाचं ज्या स्क्रल सभ्यतेशी सातत्याने युद्ध सुरू असतं, त्या युद्धातील एका अभियानावर जाते. गोष्टी चुकतात आणि व्हिर्स येऊन पडते ‘प्लॅनेट सी-५३’ अर्थात, पृथ्वीवर! पृथ्वीवर एकापाठोपाठ एक घटना घडू लागतात आणि व्हिर्ससमोर तिचा भूतकाळ साऱ्या दडलेल्या रहस्यांसह उभा राहातो. यातूनच व्हिर्स तथा कॅरोल डेन्व्हर्स बनते, शक्तीशाली कॅप्टन मार्व्हल!

    हे सारे वाचायला किती रंजक वाटते ना? पाहाताना नाही वाटत! का? कारणं बरीच आहेत. एक तर ही आगळीवेगळी कथा लिहिताना अतिशय घासूनघासून गुळगुळीत झालेल्या चौकटबद्ध रितीने लिहिलेली आहे. इतकी की आपण कोणतीही घटना घडण्याच्या ५-१० मिनिटं आधीच सांगू शकतो, नेमके काय घडणार आहे ते! क्लिषेज़ ठासठासून भरलेले आहेत चित्रपटात. त्यात दुसरी भर म्हणजे अॅना बोडेन आणि रायन फ्लेक या द्वयीचे दिग्दर्शन इतके काही नीरस आहे ना की, सगळी मजाच निघून जाते. ब्री लार्सन चित्रपटाची नायिका आहे. साधीसुधी नायिका नाही, तर मार्व्हलच्या पहिल्यावहिल्या ‘फिमेल सुपरहिरो लेड’ चित्रपटाची नायिका! तिचे पात्र कॅप्टन मार्व्हलदेखील साधे नाही, तर मार्व्हल युनिव्हर्समधील सर्वाधिक शक्तीमान पात्रांपैकी एक! इतके असून तिने काय केले? ती बनली चित्रपट कंटाळवाणा वाटण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण! “..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर”मधील सुमित राघवनच्या तोंडी असलेला “चेहरा असाच” संवादाचं जिवंत रूप म्हणजे ही ब्री लार्सन! चेहऱ्याची घडी बिघडली तर परत लाँड्रीवाल्याकडे पाठवायला लागेल या भितीमुळेच की काय, तिने बहुतांश वेळेस चेहऱ्यावर सुरकुतीसुद्धा पडू दिलेली नाही. कित्येक पंचलाईन्ससुद्धा तिच्या तोंडी सपाट वाटतात. ती पडद्यावर सुंदर दिसते, पण मार्व्हलचीच नताशा रोमनॉफ जशी इन्स्पायरिंग वाटते, तशी चुकूनसुद्धा वाटत नाही. उलट दिखाऊ वाटते! या बाबतीत तिच्या इतकाच दोष लेखक-दिग्दर्शकांचासुद्धा आहे. सबंध चित्रपटच बऱ्याच तथाकथित उदात्त मुद्यांवर दिखाऊ भूमिका घेतो आणि पात्रांनाही घ्यायला लावतो. चित्रपटांना काहीतरी राजकीय वगैरे धोरण असेल, तर हरकत नाही; पण तुमचे धोरण त्या कथेशी एकरूप करता नाही आले तर ते दिखाऊ आणि उथळच वाटते. भूमिका नीट लिहिल्या-मांडल्या न गेल्यामुळे म्हणा वा नीट न वठवल्यामुळे म्हणा, कॅरोल डेन्व्हर्स अर्थात कॅप्टन मार्व्हल ही चुकूनही डायना प्रिन्स अर्थात वंडर वुमनच्या तोडीची वाटत नाही.

    जवळजवळ १२४ मिनिटं चालणाऱ्या चित्रपटात मोजकेच प्रसंग निर्भेळ आनंद देतात. एक म्हणजे मार्व्हलचा लोगो येतो तो. तिथे त्यांनी काय मजा केलीये, ते चित्रपट पाहाताना आवर्जून पाहा. दुसरा म्हणजे स्टॅन-लीचा मरणोत्तर कॅमिओ. सबंध चित्रपट ज्या दोनच माणसांमुळे सहन होतो ते म्हणजे अत्यंत गुणवान अभिनेता सॅम्युअल जॅक्सन आणि दुसरा बेन मेंडेल्सन. यांपैकी सॅम्युअल एल. जॅक्सन तर एकमेवाद्वितीय आहेच, परंतु मेंडेल्सनला उत्तरार्धात जरासा वाव मिळताच त्यानेही त्याचे सोने केलेय. पण चित्रपटाची सगळ्यांत भारी गोष्ट जर कोणती असेल, तर ती आहे एक मांजर! या मांजराच्या एकही संवाद नसलेल्या पात्राने तिच्या वाट्याला आलेले जवळजवळ सगळेच प्रसंग शब्दशः खाऊन टाकलेयत. असा स्क्रिन-प्रेझेन्स मुख्य नायिकेलाही तिच्या अंतिम रूपांतर प्रसंगाचा अपवाद वगळता साधलेला नाही!

    सगळ्यांत सुरुवातीला जो नोलनचा संवाद दिलाय ना, तो दिसायला साधा असला तरीही हिरोईझमप्रधान चित्रपटांसाठी अक्षरशः वस्तुपाठ म्हणावा असा आहे. ‘कॅप्टन मार्व्हल’मध्ये लेखक-दिग्दर्शक त्यांच्या नायिकेला वेगवेगळ्या दिखाऊ धोरणांच्या बाजूने उभे करताकरता नेमके तिला मानवतेच्या बाजूने उभे करायलाच विसरले. म्हणजे ती बोलते मानवता वगैरे, पण नुसती बोलतेच. ते काही चित्रपटात तिच्या कॅरेक्टरचं मोटिव्हेशन ठरत नाही. यामुळेच चित्रपट सगळ्यांत जास्त अडखळतो. तिच्या भूतकाळातील प्रसंगही इतके जेमतेम दाखवलेयत आणि जे दाखवलेयत ते ही असे उथळपणे हाताळलेयत की, तिच्या पात्राबद्दल प्रेक्षकांना सहानुभूती तर सोडाच, साधी अनुभूतीदेखील वाटत नाही. या गोष्टीसाठी नोलनने ‘बॅटमॅन बिगिन्स’मध्ये (२००५) केवढा वेळ दिला होता, आठवा! आणि नोलनच कशाला, कोणताही चांगला सुपरहिरो-ओरिजिन चित्रपट घ्या, कथा, कादंबरी, कॉमिक्स किंवा मालिका घ्या. त्या प्रत्येकात त्या त्या नायक-नायिकेचं पूर्वायुष्य, त्या व्यक्तीच्या हिरो बनण्यामागच्या प्रेरणा, त्या व्यक्तीचा संघर्ष यांना पुरेसा वेळ दिला तरच नंतर त्या हिरोबद्दल आपल्याला ममत्त्व वाटते. पूर्वायुष्य जितकं ताकदवान तितकीच त्या नायकाबद्दलची सहानुभूती अधिक! इथे हा चित्रपट कॅप्टन मार्व्हल कशी अस्तित्वात आली ते सांगतो, पण कॅरोलच्या आयुष्यात, तिच्या संघर्षात, तिच्या सुख-दु:खात, तिच्या भावविश्वात पुरेसं डोकावतच नाही. त्यामुळे आपण चित्रपटगृहातून बाहेर पडताना कॅप्टन मार्व्हलच्या ताकदीची स्तुती करतो, पण जी आपुलकी आपल्याला मार्व्हलच्या इतर कोणत्याही अगदी दुय्यम पात्रांबद्दलसुद्धा वाटते, ती कॅप्टन मार्व्हलबद्दल वाटत नाही, हे चित्रपटाचं अपयश आहे. नि:संशय हा चित्रपट भरपूर पैसा कमावेल, पण तो चांगला चित्रपट म्हणून नव्हे तर मार्व्हलच्या आधीच्या सुमारे दिड डझन चित्रपटांची पुण्याई म्हणून! ती बाजूला काढली तर कॅप्टन मार्व्हल हा निव्वळ एका शक्तीशाली पात्रावर बेतलेला दुबळा चित्रपट बनून राहातो. मिड क्रेडिट सीनसुद्धा या चित्रपटापेक्षा ‘अँटमॅन अँड द वास्प’चा (२०१८) जास्त टिझिंग होता. थोडक्यात “एंडगेम”च्या उंबरठ्यावर प्रदर्शित होऊनही ‘कॅप्टन मार्व्हल’ कोणत्याच बाबतीत विशेष काहीही देत नाही!

    *२/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • मृद्गंधी झुळूक : गीता-गोविंदम

    विजय गोविंद (विजय देवेरकोंडा) तरुण प्राध्यापक आहे. कॉलेजमध्ये, खासकरून मुलींमध्ये पॉप्युलर आहे. पण त्याला मात्र हवी आहे एखादी सुसंस्कृत आणि पारंपारिक ललना! तशी ती त्याला दिसतेसुद्धा, गीताच्या (रश्मिका मांदण्णा) रुपात. किती घासून घासून गुळगुळीत झालेली पार्श्वभूमी आहे नाही? क्लिषे अगदी! परंतु याच क्लिषेच्या पायावर उभा राहिलेला “गीता गोविंदम” नावाचा २ तास २८ मिनिटे लांबीचा चित्रपट तुम्हाला अक्षरशः एका क्षणासाठीही बोअर करत नाही!

    बॉलिवूडचा आणि त्यांचं अनुकरण करणाऱ्या मराठी इंडस्ट्रीचाही काही प्रमाणात ‘आधुनिकता म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणं’ असा समज आहे. तमिळ इंडस्ट्री ही त्यांच्या वेगळ्या मांडणीसाठी ओळखली जाते तर मलयाळम इंडस्ट्री त्यांच्या वेगळ्या विषयांसाठी. परंतु तेलुगू इंडस्ट्री अशी आहे जी प्रेमकथा, कौटुंबिक मनोरंजन अश्या हल्ली दुर्मिळ होत चाललेल्या विषयांना पडद्यावर अतिशय सुरेखपणे मांडते. सिद्धार्थ आणि जेनेलियाचा “बोम्मारिल्लू” अथवा अल्लू अर्जुनचा “आर्या” पाहिलेले किंबहूना विजय देवेरकोंडाचाच “पेल्ली चुपूलू” पाहिलेले माझ्या मताशी सहजच सहमत होतील. अगदी त्याच रांगेत “गीता गोविंदम”सुद्धा येतो.

    सबंध चित्रपटभर नितळ विनोदाची पखरण आहे. परंपरेचा सन्मान आहे आणि कुटूंबाला प्राधान्य आहे. आणि तरीदेखील जागोजागी खटकेबाज ट्विट्ससुद्धा आहेत! बॉलिवूडवाल्यांची अडचण ही आहे की, ते ना धड भारतीय मुळं घट्ट धरून ठेवू शकताहेत ना त्यांच्या पाश्चात्यांकडे पसरवलेल्या फांद्यांवर फुलं उमलताहेत. याउलट दक्षिणेची मुळं भारतीय संस्कृतीत घट्ट आहेत. “गीता गोविंदम” पाहाताना ते पदोपदी जाणवतं. आणि तरीही आधुनिक हाताळणीमुळे तो आजच्या पिढीचाच चित्रपट वाटतो. याचे श्रेय लेखक आणि दिग्दर्शक परशुरामला दिलेच पाहिजे.

    गोपी सुंदर या संगीतकाराला तुम्ही ऐकलेय का? नसेल, तर तुम्ही एका खूप मोठ्या ठेव्याला मुकताहात. हिंदीतील तीच ती टेम्प्लेटछाप पंजाबी घुसडलेली किंवा बद्धकोष्ठ झाल्यासारख्या आवाजाच्या गायकांनी गायलेली किंवा जुन्या गाण्यांवर पाशवी अत्याचार केलेली गाणी ऐकून कंटाळला असाल, तर या सुरेल संगीतकाराच्या “चार्ली”, “बंगलोर डेज”, “उस्ताद हॉटेल” वगैरे एकाहून एक सुंदर चित्रपटांची गाणी ऐकाच. तशीच “गीता गोविंदम”ची गाणीसुद्धा ऐका. चित्रपट माध्यमाच्या चौकटीत राहूनही केवढं जिवंत संगीत तयार करता येतं याचा वस्तुपाठ आहेत ही गाणी. चित्रपटाच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

    तसाच सिंहाचा वाटा आहे विजय देवेरकोंडाचा. फारशी मोठी पार्श्वभूमी नसलेल्या या पोराने गेल्या तीन वर्षांत “पेल्ली चुपूलू”, “अर्जुन रेड्डी” आणि हा असे तीन ब्लॉकबस्टर दिलेयत. त्याचा अभिनय अक्षरशः घायाळ करणारा आहे! आवडत्या मुलीला अप्रोच करताना झालेली एकच चूक कायमची भोगणाऱ्या परंतु मुळात सरळ स्वभावाच्या विजयची भूमिका त्याने कमालीची सुंदर साकारलीये. ‘कर्नाटका क्रश’ म्हटली जाणारी रश्मिकाही गीता म्हणून अप्रतिम भासते. “बाहूबली – द कन्क्लुजन”मधील कुमारवर्माच्या भूमिकेने आपल्याकडे प्रसिद्ध झालेला सुब्बाराजू त्याच्या भूमिकेत चपखल शोभतो. आणि तुमच्याकडे जर कौशल्य असेल तर भूमिकेची लांबी वगैरे गोष्टी अंधश्रद्धा असतात, हे वेन्नेला किशोर त्याच्या छोट्याशाच भूमिकेतून सहज सिद्ध करतो. पाहुण्या भूमिकेत का होईना, पण नित्या मेनन आणि अनु इमॅन्युएलला पाहून अतिशय छान वाटते. अवघ्या ५ कोटीत बनलेल्या या चित्रपटाने केव्हाच १०० कोटींचा आकडा ओलांडलाय. खरोखरीच “गीता गोविंदम” आजकालच्या विसविशीत कलाकृतींच्या काळात पुन्हापुन्हा अनुभवाव्याश्या मृद्गंधी झुळुकेसारखाच आहे!!

    — © विक्रम श्रीराम एडके

    *४/५

  • अपेक्षाभंग करणारा : मणिकर्णिका

    १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील झाशीच्या राणीचे स्थान केवळ मराठीजनांसाठीच नव्हे, तर सबंध भारतीयांसाठीदेखील कायमच गौरवाचे राहिले आहे. राणीवर आजपर्यंत खूप सारे साहित्य लिहिले गेले, मालिका बनल्या, चित्रपटही बनले. परंतु जेव्हा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद, प्रसून जोशी, राधाकृष्ण जगर्लामुडी आणि कंगना राणावतसारखे दिग्गज या विषयासाठी एकत्र आले तेव्हा बनणारी कलाकृती निश्चितच वेगळ्या दर्जाची असणार होती. पण बुद्धीमंतांचा एक दोषच असतो की, बरेचदा ते एकत्र आल्यावर त्यांच्या बुद्धीच्या बेरजा होण्याऐवजी एकमेकांना छेद देऊन भागाकार तेवढा होऊन बसतो. माझ्या दृष्टीने ‘मणिकर्णिका’मध्येही तेच झाले.

    सुरुवातीपासूनच कंगना आणि क्रिशमध्ये दिग्दर्शनावरून वाद होते, हे सर्वश्रृत आहे. कोण चित्रपटाची माती करत होतं आणि कुणी कोणते प्रसंग दिग्दर्शित केले याबद्दल दोघांचेही वेगवेगळे दावे आहेत. परंतु आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या दाव्यांना फारसा काही अर्थ नाही, कारण जवळपास सगळीच दृश्ये सारख्याच प्रमाणात दिशाहीन वाटतात. चित्रपट एका चांगल्या बिंदूवर सुरू होतो आणि त्यानंतर सतत कसली तरी घाई असल्यासारखा पडूच लागतो. अधूनमधून काही काळ तो वर उचललाही जातो, पण दुर्दैवाने तसे प्रसंग कमीच येतात. बरं त्यांना मुद्यावर येण्याची घाई आहे म्हणावं, तर ते ही होत नाही. मुद्याच्या आजूबाजूला घुटमळणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी घडत राहातात, पण मुद्दा काही फारसा येत नाही. आणि जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा तो इतक्या निष्काळजीपणे हाताळलाय की, त्याचे गांभीर्य नुसतेच जाणवते पण त्याची अनुभूती काही येत नाही. चित्रपट ऐतिहासिक सत्यतेचा दावा करत नाही, हे समजून घेण्यासारखे आहे. परंतु चित्रपटाच्या सुरुवातीलाच इतिहासाच्या अभ्यासकांचा सल्ला घेतल्याचे व इतरही काही कथा-लोककथांचा आधार घेतल्याचे सांगणाऱ्या चित्रपटाला राणीचे आडनाव नेवाळकर होते एवढी साधी गोष्टही समजू नये? चित्रपटात अनेकदा नवलकर असा उल्लेख आहे! हे एकीकडे तर दुसरीकडे झलकारीबाई आणि क्वचित राणी यांचे आयटम साँग टाकता? मग भन्साळी आणि तुमच्यात फरक काय राहिला? पात्रांचा स्वभाव, त्यांचं आयुष्य आणि त्यांच्या मौजेच्या कल्पना दाखवण्याचा एवढा एकच मार्ग बॉलिवूडला का दिसत असावा? सिनेमॅटिक लिबर्टीला माझा जराही आक्षेप नाही, आक्षेप आहे तो निष्काऴजी सिनेमॅटिक लिबर्टीच्या जंत्रीला!

    चित्रपटाची कथा-पटकथा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची. साक्षात ‘बाहूबली’चे लेखक आणि राजमौलीचे वडील. त्यांनी लिहिलेले प्रसंग, त्यांची काल्पनिकता व ऐतिहासिकता यांच्या पलिकडेही उत्तमच आहेत. परंतु ते सगळेच दिशाहीन आणि जागा चुकल्यासारखे वाटतात. त्यांच्या जागा जर बदलल्या असत्या, तर ते बऱ्याच अंशी सुसह्य तरी झाले असते. आता हे पाप लेखकाचे, की दिग्दर्शकांचे, की संपादकांचे ते न कळे. राजमौली का थोर आहे ते इथे कळतं. त्याने एका काल्पनिक गोष्टीच्याही बारीकसारीक अंगांवर पाच वर्षे मेहनत घेतली. ‘मणिकर्णिका’कारांना मात्र कसली घाई होती, हेच समजत नाही. तुमचे नुसते सेट, कपडे वगैरे भारी असून चालत नाही, तुमचा दृष्टीकोन हा त्या सगळ्या भौतिक गोष्टींपेक्षा शंभरपटींनी भारी असला तरच असे शिवधनुष्य पेलले जाते. राणीच्या व्यक्तीमत्त्वाला उंची खूप दाखवलीये, पण तिला आणि इतरही पात्रांना खोलीसुद्धा तेवढीच दाखवली असती, तर बरं झालं असतं. एकूण एक पात्रं ही सपाट, एकमार्गी आहेत. त्यातही इंग्रज तर खूपच स्टिरीयोटिपिकल दाखवले आहेत. इतकी सरधोपट पात्रे निदान इतक्या मोठ्या स्तरावर बनलेल्या चित्रपटाकडून तरी अपेक्षित नव्हती. अतिशय सामान्य वाटणारे अंकित आणि संचित बलहारांचे पार्श्वसंगीत हे या पसाऱ्यात भरच तेवढी घालते. पार्श्वसंगीतात एके ठिकाणी वापरलेल्या महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे उच्चारही चुकीचे आहेत. छायांकन उत्तम पण व्हिएफएक्स काही काही ठिकाणी फारच सुमार आहेत. मला अजूनही न कळालेली गोष्ट म्हणजे कंगना राणावत काही प्रसंग वगळता युद्धात शिरस्त्राण का घालत नाही? मी काही राणीच्या चरित्राचा तज्ञ नाही, परंतु युद्धावर जाताना राणी नेहमीच शिरस्त्राण घालत असणार असे तर्कबुद्धी सांगते. कंगना मात्र प्रत्येक वेळी ते घालतेच असं नाही. का? केवळ पडद्यावर छान दिसावं म्हणून? इंग्रजांशी बाचाबाची झाल्यावर राणी अचानक घोडा दौडवत कुठे जाते, हे समजत नाही. ती उद्विग्न झाली म्हणावे तर त्याच प्रसंगात संग्रामसिंहशी भेट होते व अजूनच खटका उडतो. तो पूर्ण सिक्वेन्सच गोंधळात टाकणारा आहे. किमान मला तरी तो समजला नाही.

    प्रसून जोशींनी लिहिलेले संवाद काही क्लिषे वगळता फारच जबरदस्त आहेत. ते भूतकाळाच्या माध्यमातून वर्तमानकाळावर अतिशय नेमके भाष्य करतात. पण त्या संवादांनाही अडसर आहे तो कंगना राणावतचा. ती अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे. पण तिची वाणी शुद्ध नाही. त्यामुळे तिने उच्चारल्यावर भलीभली वाक्येही सपाट वाटतात. अतुल कुलकर्णींच्या भूमिकेवरून काही ना काही कारणाने कात्री फिरवली गेली की काय असे वाटते, पण त्यांनी काम छान केलेय. जिशू सेनगुप्तांचेही काम उत्तमच, पण चित्रपट गंगाधररावांच्या मनोविश्वात डोकावण्याचे फारसे कष्टच घेत नाही. मुहंमद झीषान अय्युब, अंकिता लोखंडे, मिष्टी, डॅनी, वैभव तत्त्ववादी, सुरेश ओबेरॉय, कुलभूषण खरबंदा सगळेच आपापल्या भूमिकांत ठिकठाक. चित्रपटाची सगळ्यांत चांगली गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे गाणी! शंकर-अहसान-लॉयच्या संगीतदिग्दर्शनात प्रसून जोशींची शुद्ध हिंदीचा प्रभाव असलेली गीते फारच गोड, सुरेख आणि अर्थवाही झाली आहेत. पण चित्रपटात त्यांच्याही जागा काही वेळा चुकल्यायत.

    राणी लक्ष्मीबाई हे खरोखर आपल्या इतिहासातील एक तेजस्वी पृष्ठ आहे. त्याचा रुपेरी पडद्यावर सन्मान करतानाच सिनेमा म्हणून त्याची मांडणीदेखील चांगली असणे अपेक्षित होते. दुर्दैवाने चित्रपट अनेक आघाड्यांवर निराशाच तेवढी करतो. सर्जनशील बाजूंवर नियंत्रण असणाऱ्या कुणीतरी हुशार व्यक्तीने या विषयाला स्पर्श करेपर्यंत थांबणे, एवढेच प्रेक्षक म्हणून आपल्या हाती आहे!

    *२.५/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • नव्या भारताचा नवा चित्रपट : उरी – द सर्जिकल स्ट्राईक

    १८ सप्टेंबर २०१६ यादिवशी पाकिस्तानच्या चार आतंकवाद्यांनी काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील आपल्या सैन्यतळावर हल्ला केला. आपण त्या चारही आतंकवाद्यांना नरकात धाडले परंतु हे होईपर्यंत आपले सुमारे एकोणावीस जवान हुतात्मा झाले होते तर सुमारे ऐंशी ते शंभर जखमी. युद्धाची दाहकता ही अशी असते आणि ती कधीच एकतर्फी शांतता राखून कमी होत नाही. आपण जर याचे काही उत्तर दिले नसते, तर उलट त्या अतिरेक्यांच्या मालकांची हिंमत अजूनच वाढली असती. आणि म्हणूनच भारत सरकारने आणि आपल्या भारतीय सैन्याने निर्णय घेतला सर्जिकल स्ट्राईक करण्याचा! शरीरावर शल्यकर्म करताना जसे फक्त त्या रोगग्रस्त भागापुरतेच केले जाते, तसाच हा हल्लादेखील सर्जिकल अर्थातच लक्ष्यांपुरता मर्यादित असतो. यात इतरांना लक्ष्य केलेले नसते. थोडक्यात कोलॅटरल डॅमेज शून्य ठेवण्याचा यात प्रयत्न असतो. नेमके हेच आपल्या सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात घुसून यशस्वीरित्या पार पाडले! ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ हा त्याच घटनांचे काल्पनिक रुपांतरण करतो.

    ‘उरी’ हा अतिशय रंगीत सिनेमा आहे. चित्रपटभर तुम्हाला वेगवेगळे रंग वापरलेले दिसतात. आजवर आपल्याकडे बनलेल्या युद्धपटांच्या तुलनेत हा अतिशय स्वागतार्ह बदल आहे. चित्रपटात खूप सारे खटकेबाज संवाद आहेत, पण चित्रपट त्यांच्यातही अडकून पडत नाही. उलट स्ट्राईक्सची थंड डोक्याने आखलेली योजना आणि तिची तितक्याच शिताफीने केलेली अंमलबजावणी यांच्यावर त्याचा जास्त भर आहे. याही चित्रपटात ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’सारख्याच खरोखरच्या राजकीय व प्रशासनिक व्यक्ती आहेत. त्यांची नावे चित्रपटात बदललेली असली, तरी त्या व्यक्ती प्रत्यक्षात कोण आहेत याबद्दल प्रेक्षकांना जराही संभ्रम निर्माण होत नाही. उलट ‘उरी’सोबतच प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’प्रमाणे यातील पात्रे या त्या त्या व्यक्तींच्या निव्वळ नकला वा अर्कचित्रे न वाटता जिवंत माणसे वाटतात, हे चित्रपटाचे मोठेच यश आहे. चित्रपट हा काही पातळ्यांवर प्रचंड भावनिक आहे. विशेषतः पूर्वार्धात. आणि तसा तो आहे म्हणूनच नंतर जे दाखवले गेलेय, त्याला एक तात्त्विक आधार प्राप्त होतो. तसं बघायला गेलं, तर चित्रपट पाहाण्यापूर्वीच आपल्याला त्याची सबंध कथा माहिती आहे. सुरुवात काय, शेवट काय; सारंच. इतकी सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट असूनही चित्रपट आपल्याला पूर्णवेळ खूर्चीच्या कडेवर बसवून श्वास वारंवार रोखायला लावतो, यासाठी लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धर आणि संपादक शिवकुमार पणिकर यांचे कौतुक करावे तितके थोडे! मोठी हुशारीने गुंफलेली पटकथा आणि जागोजागी वापरलेला नैसर्गिक विनोद, या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत तर शाश्वत सचदेव यांचे जबरदस्त पार्श्वसंगीत घटनांची खोली व चित्रपटाची उंची कैकपटींनी वाढवणारे आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेक्षकांवर विश्वास टाकून त्यांना कमीत कमी स्पून फीडिंग करणारा ‘उरी’ एक अतिशय स्मार्ट चित्रपट आहे. त्याची फ्रेमिंग आणि टेकिंग दिग्दर्शकीयदृष्ट्या अतिशय विचारपूर्वक केलेली आहे. पण!

    पण म्हणून काही तो त्रुटी आणि दोषांपासून मुक्त आहे, असं अजिबात नाही. प्रचंड हुशारीने रचलेला चित्रपट शेवटाकडे जाताना किंचित फिल्मीपणाकडे झुकू लागतो. ‘शूट टू किल’ची जागा क्वचित ठिकाणी अनावश्यक मारामारी घेते. दोन मिनिटांत पोहोचतील अशी बातमी असलेले पोलिस सोयीस्करपणे उशिरा येतात. एवढ्या मोठ्या मिशनचा महत्त्वाचा भाग एक इंटर्न होऊन बसतो. परतीच्या प्रवासात मोक्याच्या क्षणी एका पात्राची फिल्मी पद्धतीची एंट्री होते. देशासाठी केल्या जात असलेल्या अभियानालाही वैयक्तिक सूडाची फोडणी दिली जाते. गुप्ततेबद्दल प्रसिद्ध असलेले एक पात्र रिक्षाच्या प्रवासात राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीच्या गोष्टी उघडपणे बोलते. हे आणि असे बरेच काही! सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात काहीच चूक नाही. परंतु एक प्रेक्षक म्हणून दिग्दर्शकाने अधिक वास्तववादी मार्ग चोखाळलेला पाहाणे मनापासून आवडले असते. कथा-पटकथा किती जरी आकर्षक असली, तरी त्यात संशोधनाचा अभाव जाणवतो.

    अभिनय ही चित्रपटाची भक्कम बाजू आहे! विकी कौशल हा जर असेच काम करत राहिला, तर तो खचितच उद्याचा सुपरस्टार असणार आहे! परेश रावल यांच्याकडून तर वाईट कामाची अपेक्षाही नाही. मोठ्या पडद्यावर मोहित रैना या गुणी अभिनेत्याला पाहाणे अतिशय सुखद आहे. कीर्ती कुल्हारीने तिची भूमिका प्रामाणिकपणे केलीये तशीच मानसी पारेख व इतरांनीही. या सगळ्यांत यामी गौतम मात्र काहीशी खटकते. तिने वाईट काम केलेय असे नाही, परंतु इंटेलिजन्स ऑफिसरच्या भूमिकेत व संवादांतही ती जराशी नाजूकच वाटते. याखेरीज स्वरूप संपतना खूप दिवसांनी पाहाणे आनंददायी आहे. योगेश सोमण, राकेश बेदी, रुख्सार वगैरेंनाही छोट्याछोट्या परंतु महत्त्वाच्या भूमिका आहेत व त्या त्यांनी ताकदीने निभावल्या आहेत.

    अर्थातच हल्ली प्रत्येक व्यक्ती, गोष्ट, कलाकृती यांना कोणत्यातरी एका गटात टाकायची फॅशन आलीये. त्या अर्थी बोलायला गेलं तर ‘उरी’ उजव्या गटातील सिनेमा आहे. तसा तो असेलही, पण त्यापेक्षाही जास्त तो बदलत्या काळाचा द्योतक आहे. चित्रपटाच्याच एका संवादाचा आधार घेऊन बोलायचं झालं, तर ‘उरी’ हा नव्या भारताचा चित्रपट आहे. तो काहीसा अडखळतो पण उठतो, उभा राहातो आणि त्याचं इच्छितस्थळ गाठतो, अगदी भारतासारखाच!!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • बऱ्याच गोष्टींनी मारलेला पण अभिनयाने तारलेला : द अॅक्सिडेंटल प्राईममिनिस्टर

    ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ सुरू होतो तो काँग्रेसप्रणित संपुआने २००४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यापासून. त्यानंतर उभ्या राहिलेल्या पेचप्रसंगांतून मनमोहनसिंह (अनुपम खेर) यांना पंतप्रधानपदी निवडले जाते आणि चित्रपटात आरंभ होतो दोन सत्तास्थानांमधील अघोषित संघर्ष. याला मी लिहिण्याच्या सोयीसाठी संघर्ष म्हणतोय कारण, चित्रपटात एक सत्तास्थान खूपच सौम्य चितारलेय तर दुसरे जवळजवळ अप्रत्यक्ष. नेमके हेच सगळ्यांत मोठे कारण आहे की, यावर्षीच्या सगळ्यांत स्फोटक चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘टिएपीएम’ फारसा रंगत नाही.

    मनमोहनसिंह हे मुळातच मितभाषी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. चित्रपटातही त्यांची प्रतिमा तिच ठेवण्यात आलीये. असा परोक्ष नायक कसा काय चालेल? म्हणून मग त्यांचा आवाज बनतात संजय बारू (अक्षय खन्ना), सांकेतिक अर्थानेच नव्हे तर त्यांचे माध्यम सल्लागार या नात्याने प्रत्यक्षातही. सबंध चित्रपट आपण संजय बारूंच्या संदर्भबिंदूने पाहातो. अभिनयात एक वाक्प्रचार असतो, ज्याला म्हणतात ‘ब्रेकिंग द फोर्थ वॉल’. म्हणजे काय, तर अभिनेता रंगमंचाच्या तीन भिंतींच्या चौकटीत काम करतो आणि समोर अदृश्य अशा चौथ्या भिंतीच्या पल्याड प्रेक्षक असतात. जेव्हा काम करता करता अभिनेता थेट ही चौथी भिंत फोडून प्रेक्षकांशीच बोलू लागतो, तेव्हा त्याला म्हणतात ‘ब्रेकिंग द फोर्थ वॉल’. या तंत्राचा वापर अनेक चित्रपटांमध्ये केल्याचे तुम्ही पाहिले असेल. ‘हाऊस ऑफ कार्ड्स’मध्ये फ्रँक अंडरवूड (केव्हिन स्पॅसी) याच माध्यमातून सातत्याने आपल्याशी संवाद साधत असतो. तेच तंत्र इथेही वापरलेय. अक्षय खन्ना, संजय बारूंच्या रूपाने आपल्याशी सतत बोलत असतो, पात्रांच्या ओळखी करून देत असतो, राजकीय घडामोडी उलगडून सांगत असतो. थोडक्यात सगळ्याच गोष्टी, व्यक्ती, घटनांबद्दल त्याचं मत देत असतो. अर्थात, हे मत संजय बारूंचं किती आणि दिग्दर्शकाचं स्वतःचं किती, हा भाग वेगळा! राजकीय विषय असल्यामुळेच मी वर मुद्दामहून ‘एचओसी’चा उल्लेख केलाय. त्यात फ्रँक अंडरवूड आपल्याशी संवाद साधण्याचे प्रसंग खूप कमी येतात हे एक, दुसरे म्हणजे ते एकतर अचानक तरी येतात किंवा प्रचंड उपहासात्मक तरी येतात. त्यातील वाक्येसुद्धा विशेष असतात. इथे मात्र ते प्रसंग खूप वेळा येतात आणि ते प्रत्येकवेळी इंटरेस्टिंग असतीलच असे नाही. काही काही वेळा तर दिसत असते की सिनेमाची लांबी फार वाढू नये म्हणून संजय बारूंच्या तोंडून घटना सांगितली जातेय. याचा तोटा हा झालाय की, सिनेमा हा बरेचदा टिव्हीवरचा डॉक्युड्रामा वाटू लागतो आणि आपण ‘पंतप्रधान’ अथवा तत्सम कार्यक्रमाचा एखादा एपिसोड पाहातोय की काय, असे वाटू लागते.

    राजकीय विषयांवर चित्रपट करताना दोन मार्ग असतात. एक म्हणजे जे दाखवायचे आहे ते पूर्ण आत्मविश्वासाने, सगळ्या गुंत्याला तसेच ठेवून दाखवावे व प्रेक्षक हुशार आहेत यावर विश्वास ठेवावा; अथवा सारे काही उलगडून, सोपे करून चमच्याने भरवत राहावे. खरं तर राजकीयच कशाला, प्रत्येक सिनेमासाठी हेच दोन मार्ग असतात, त्यातला कोणता, कधी आणि कुठे वापरायचा यालाच चांगल्या लेखक, दिग्दर्शकांचं तारतम्य म्हणतात. या चित्रपटात दोन्हीही मार्ग वापरलेयत पण त्यांचे गणित काहीसे चुकल्यामुळे चित्रपटाचा एकजिनसीपणा कमी झालाय. काही गोष्टी फारच थेटपणे दाखवल्यायत तर काही खूपच संयतपणे. त्यामुळे दोन्ही प्रकारचे प्रेक्षक खुश न होता पटकथेच्या पातळीवर गोंधळ तेवढा उरतो. गंमत म्हणजे, तरीही चित्रपट प्रचंड एंजॉयेबल राहातो. दिग्दर्शकाने विषय हलक्या-फुलक्या, काहीश्या विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. काही ठिकाणी ही गोष्ट कमालीची भारी जमलीये तर काही ठिकाणी कमालीची चुकलीये.

    सिनेमा ज्या स्फोटक बिंदूवर सुरू होतो, तिथून पुढे एकामागोमाग एक धमाके होत जातील असं वाटतं. परंतु लवकरच तो असा काही ढीला पडतो की आपण केवळ त्या काळाबद्दलचा एखादा माहितीपट पाहातोय की काय, अशी शंका येऊ लागते. परत काही ठिकाणी स्फोटकता निर्माण होते आणि परत काही ठिकाणी ती ढेपाळते. पटकथेतला हा विस्कळीतपणा पार्श्वसंगीतातही जाणवतो. चित्रपटाचे वैशिष्ट्य असे की, त्यात अतिशय धीटपणाने खरी नावे वापरलीयेत, अगदी खलनायक म्हणून चितारलेल्या व्यक्तींचीसुद्धा. परंतु नावांच्या पलिकडे जाऊन सगळ्यांच गोष्टी उघड बोलणे कदाचित भारतीय परिप्रेक्ष्यात चालणार नाही किंवा इतर अडचणी (ज्या तरीही आल्याच!) येतील की काय असा विचार करून चाचरत चित्रपट बनवल्यासारखे मध्येच वाटून जाते. जर हे असेच झाले असेल, तर पटकथेच्या विस्कळीतपणाचे आणि चित्रपट पुरेसा नाट्यमय नसल्याचे खरे मूळ तिथे असू शकते. चित्रपट बनवायचाच आहे तर मग दिग्दर्शकाने बिनधास्त त्याचे म्हणणे तरी मांडायचे होते. ते बरोबर की चूक हा विषय वेगळा. उलट बोटचेप्या धोरणामुळे चित्रपट धीट राजकीयपट न राहाता फक्त बोटे दाखवून निर्देश करणारा प्रोपेगेण्डा होऊन राहातो. अर्थात, तेच जर दिग्दर्शकाला अपेक्षित असेल, तर मात्र गोष्ट वेगळी. मनमोहनसिंहांचा सबंध कार्यकाळ दाखवण्यापेक्षा सिनेमा जर एखाद्या विशिष्ट घटनेभोवतीच उभारला असता, तर चित्रपट कदाचित नेमका व चांगला होऊ शकला असता असे वाटते. तसे होण्यासाठी खूप घटनासुद्धा आहेत चित्रपटात. परंतु दहा वर्षांचा काळ दाखवण्याच्या नादात चित्रपट त्या प्रत्येक घटनेला फक्त खो देऊन पुढे सरकतो.

    अनुपम खेर यांनी केलेल्या मनमोहनसिंहांच्या भूमिकेबद्दल बरेच लिहिले बोलले गेले. त्यांनी काम उत्तमच केले आहे. परंतु त्यांना वेशभूषा आणि रंगभूषेचा प्रचंड आधार आहे. याउलट दोन्हीतले काहीच बाजूने नसतानाही, किंबहूना ती व्यक्ती किमान दिसते कशी हे देखील बहुतांशी जणांना माहिती नसतानाही, अक्षय खन्नाने उभे केलेले संजय बारू हे काहीच्या काही अप्रतिम वाटतात. इतर मुख्य पात्रांप्रमाणेच हेही पात्र काहीसे अंडर-रिटनच. तरीदेखील अक्षय खन्नाने वेगवेगळ्या मार्गाने त्यात अक्षरशः जीव ओतलाय. चित्रपट जरी मनमोहनसिंह आणि म्हणूनच अनुपम खेरबाबतीत असल्याचे प्रथमदर्शनी वाटले, तरीही त्याचा खरा नायक संजय बारू हे पात्रच आहे. अक्षय खन्नाने अक्षरशः खाऊन टाकलाय हा चित्रपट. मला या अभिनेत्याचे प्रचंड कौतुक वाटते. तुम्ही अक्षय खन्नाच्या कोणत्याही चित्रपटाला वाईट म्हणू शकता, परंतु कोणत्याही चित्रपटात अक्षय खन्नाला वाईट म्हणू शकत नाहीत. इतका हा कमाल अभिनेता इंडस्ट्रीला काही कारणामुळे सहन झाला नाही की तोच थोडासा अकडू होता कोण जाणे, परंतु दुर्दैवाने त्याचा उमेदीचा काळ सरल्यावरच आपल्याला त्याची किंमत कळू लागलीये. फक्त दोनच तास चालणारा असूनही ‘टिएपीएम’ खूप ठिकाणी रटाळ होतो परंतु अक्षय खन्नाने त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या समर्थ खांद्यावर चित्रपटाला अलगदपणे उचलून पुढे नेलेय. त्या मानाने अनुपम खेरना परोक्ष नायक रंगवायचा असल्यामुळे तितकासा वावच नाहीये. पण जो आहे, त्यात त्यांनीही मजा आणलीये. या दोघांच्या खालोखाल मी अभिनेता म्हणून अजून एका व्यक्तीचे नाव घेईन, तो म्हणजे विपिन शर्मा. बाकी काही अपवाद वगळता बहुतांश पात्रांना त्या त्या व्यक्तीची सहीसही नक्कल वाटण्यापलिकडे काहीही काम व अर्थ नाही!

    या चित्रपटात प्रोपेगेण्डा आहे का? आहेच! पण प्रोपेगेण्डा आहे, एवढ्या एकाच कारणासाठी काही माध्यमं त्याला टाकाऊ म्हणतायत ते बरोबर वाटत नाही. प्रोपेगेण्डाच्या पलिकडेही हा चित्रपट त्याच्या काही गुणांमुळे चांगला आहे आणि काही दोषांमुळे वाईट आहे. एक उदाहरण सांगतो. नुकतेच ‘गल्ली बॉय’ चित्रपटाचे ट्रेलर रिलिज झाले. सामान्य प्रेक्षकांना चटकन कळणारही नाही इतका बेमालूम प्रोपेगेण्डा ठासून भरलाय त्यात. म्हणून काही त्याला टाकाऊ थोडीच म्हणतील? किमान मेनस्ट्रीम मिडिया तरी नाही म्हणणार, किंबहूना त्यात काही प्रोपेगेण्डा असल्याचा उल्लेखही कुणी तथाकथित विचारवंत नाही करणार. प्रोपेगेण्डाचं असंच असतं ना, तो आपल्या लोकांनी केला तर चांगला आणि विरोधातल्या लोकांनी केला तर वाईट असतो. तसंच याही चित्रपटाचं आहे. काँग्रेसविरोधी विचारधारा ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चे सगळे दोष झाकून त्याचा उदोउदो करतील तर भाजपविरोधी विचारधारा त्याचे सगळे गुण झाकून त्याला कचरा म्हणतील. प्रत्येकाची काही ना काही राजकीय विवशता आहे त्यात, एवढेच. लोकशाहीची हीच तर खूबी आहे! याउप्पर आपापल्या विचारधारांच्या पलिकडे जाऊन प्रेक्षक म्हणून जर ‘टिएपीएम’ पाहावासा वाटला, तर अवश्य पाहावा आणि समजा त्यावर बहिष्कार घालावासा वाटला तर बहिष्कार घालावा, आपल्याला दोन्हींचेही स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य, ही सुद्धा लोकशाहीचीच तर खूबी आहे!

    *३/५

    — © विक्रम श्रीराम एडके.

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • गावाकडचे जॅझ – महेशिण्टे प्रतिकारम

    तुमच्याकडे नोकरी, व्यवसाय, शिक्षण वगैरेपैकी काहीतरी एक असतं. चार लोकांत तुमचं काहीतरी अस्तित्व असतं. तुमची लव्हलाईफ फार भारी नसते, पण जे आहे ते आपलं म्हणून तुम्ही त्याचा मनापासून स्वीकार केलेला असतो. थोडक्यात सारं काही छान चाललेलं असतं. संथ वाहाणाऱ्या कृष्णामाईसारखं. पण एक दिवस असा येतो की तुमची प्रतिष्ठा, अब्रू, तुमचं प्रेम सारं सारं काही एका क्षणात हिरावून घेतलं जातं. होत्याचं नव्हतं होतं. बरं झालेली गोष्टदेखील इतकी सहजपणे झालेली असते की, आपल्यावर फार मोठा अन्याय झालाय असं बोंबलायला जागाच नसते. गेलेली अब्रू परत मिळवण्यासाठी आपण जीवतोड प्रयत्न करतो. कारण, तेवढंच आपल्या हातात असतं. पण हरवलेलं प्रेम कुठून परत मिळणार? तुम्ही गेलाय कधी या परिस्थितीतून? मी तरी गेलोय. मोठाच उद्ध्वस्त काळ असतो तो. वर्षानुवर्षे ज्या व्यक्तीपलिकडे कधी विचारच केलेला नसतो आणि जिच्यावर आपल्या स्वतःपेक्षाही जास्त विश्वास दाखवलेला असतो, त्या व्यक्तीने एका क्षुल्लक, क्षुद्र स्वार्थापायी आपल्याला लाथाडून निघून जावं? का? इतके फालतू असतो आपण खरंच? लाख प्रश्नांचं काहूर माजतं आणि डोकं फुटेस्तोवर विचार केला, पार रात्रीच्या रात्री जागून काढल्या तरी उत्तर मात्र एकही मिळत नाही. कारण, उत्तर असतं काळ. तो जसं क्षणात होत्याचं नव्हतं करतो, तसंच हळूहळू आपल्याकडे होतं त्यापेक्षाही सुंदर आयुष्य आपल्याला देतो. माणूस म्हणून पार बदलूनच टाकतो तो आपल्याला. आपल्यातली निरागसता दगडाने ठेचून टाकतो आणि आपल्या भूतकाळातील स्वरूपाच्या काही हलक्या निशाण्या तेवढ्या मागे ठेवतो. यालाच परिपक्व होणे म्हणतात. मग खरं प्रेम काय असतं ते उलगडतं, एखादा पूर्वी कधीच नसलेला छंद गवसतो, करिअरची एखादी वेगळीच वाट सापडते. मग मागे वळून पाहाताना आपल्यालाच कळतं की, परमेश्वर ज्यावेळी आपल्याकडून काहीतरी हिसकावून घेत होता आणि आपण विरोध करून स्वतःलाच त्रास करून घेत होतो, त्यावेळी खरं तर तो आपल्याकडचं बिनकामाचं खेळणं काढून घेत होता, त्याहून मोठं आणि अधिक सुंदर काहीतरी देण्यासाठी!!

    नाही, मी माझ्या आयुष्याचे चिंतन मांडत नाहीये तुमच्यासमोर. म्हणजे हे तुमच्या-माझ्या आयुष्याचे चिंतन तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त ही आहे दिलीश पोदनच्या “महेशिण्टे प्रतिकारम”ची (२०१६) मूळ कल्पना. अगदी तुमच्या आमच्या आयुष्यातली संकल्पना वाटते ना ही? वाटणारच, कारण मुळातच ती केरळमधील आलप्पुळा जिल्ह्यातील तुरावूरमध्ये घडलेली सत्यकथा आहे. “महेशिण्टे प्रतिकारम” म्हणजे “महेशचा प्रतिकार” अर्थात महेशने केलेला प्रतिकार अथवा महेशने घेतलेला सूड. महेश (फ़हाद फ़ासिल) हा इडुक्की जिल्ह्यातील एका रमणीय खेड्यात राहाणारा एक साधासरळ छायाचित्रकार. तो म्हाताऱ्या वडलांचा सांभाळ करतो आणि गावातील सण-समारंभांची छायाचित्रे काढून गुजराण करतो. त्याचे आणि सौम्याचे (अनुश्री) लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम आहे. महेशला गावात मान आहे. छान, मस्त आयुष्य चालले आहे त्याचे. एकेदिवशी तो सहज गावात घडणारे एक भांडण सोडवायला जातो आणि ते लोक याच्यावरच राग काढतात. बेदम मारतात ते त्याला. याच दरम्यान त्याचे प्रेमही त्याच्यापासून दूर जाते. मार खाल्लेला, अपमानित, जखमी महेश तिरीमिरीत प्रतिज्ञा करतो की, जोपर्यंत मी मला मारणाऱ्याचा सूड उगवणार नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. पुढे काय होतं, याची दिल खुश करून टाकणारी गोष्ट म्हणजे हा चित्रपट!!

    “महेशिण्टे प्रतिकारम”ची सगळ्यांत जमेची बाजू ही की, ही कथा एका लहानश्या खेडेगावात घडते. त्यामुळे गावकऱ्यांचा इरसालपणा दाखवायला यात पुरेपूर जागा आहे आणि ती तितक्याच ताकदीने वापरून घेतल्यामुळे सबंध चित्रपटभर एक नर्मविनोदाची पखरण झालीये. याबाबतीत दिग्दर्शक दिलीश पोदनपेक्षाही लेखक श्याम पुष्करन ज्यांना या चित्रपटाच्या लेखनासाठी राष्ट्रपती पारितोषिक मिळालेय, त्यांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे. कुठेही संयतपणा न सोडता, चित्रपट-माध्यमाच्या समग्र कलात्मकतेशी प्रामाणिक राहूनदेखील एक खुसखुशीत मनोरंजक कलाकृती बनवता येऊ शकते, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे “महेशिण्टे प्रतिकारम”. किंबहूना समस्त मलयाळम इंडस्ट्रीकडूनच ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. चित्रपटात बेबीचेट्टा (अॅलेन्शिए लोपेझ), क्रिस्पिन (सौबिन शाहिर), व्हिन्सेंट भावना (के. एल. अँटनी कोची) अश्या दुय्यम भूमिकादेखील इतक्या चपखल विणल्या आहेत की, त्यामुळे सबंध चित्रटपटालाच एक कलात्मक रेखीवता प्राप्त होते.

    एका माणसाबद्दल न बोलणे अपराधच नव्हे तर अक्षरशः पाप ठरेल. तो माणूस म्हणजे महेशची भूमिका केलेला फ़हाद फ़ासिल. त्याने एवढे सुंदर, एवढे चांगले, एवढे जबरदस्त, एवढे संयत, एवढे सुरेख, एवढे कमाल, एवढे भारी काम केलेय की विचारता सोय नाही. पूर्वी हा माणूस मला अभिनेता म्हणून नुसताच आवडायचा. पण या चित्रपटापासून मात्र मी अक्षरशः फॅन झालोय त्याचा. काही काही प्रसंगी त्याने केलेला अभिनय असा काही बिनतोड आहे की, ते फक्त तोच करू शकतो. लग्नाच्या दिवशी तो दुरूनच सौम्याकडे ज्या नजरेने पाहातो; ती नजर, त्यातली हतबलता आणि तरीही तिच्यातील मनापासून चिंतलेली शुभेच्छा अक्षरशः काळीज कापत जाते. किंवा जिम्सनचा गळा आवळताना जो कर्तव्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर असतो, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आपल्याकडे जरा बरं काम केलं की, अभिनेत्यांना गगन ठेंगणे होते. पण ते सारेच बच्चे वाटावे असे एक एक अभिनयसम्राट दक्षिणेत आहेत. त्यांचं काम पाहिलं की, आपल्याकडच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या तथाकथित अभिनेत्यांवर हसू आल्याशिवाय राहावत नाही. नायकाला साजेशी पिळदार शरीरयष्टी नसताना, तिशीतच केसांची पीछेहाट झालेली असतानाही या दिसायला सामान्य फ़हाद फ़ासिलने जे काम केलेय, ते आपल्याकडच्या भल्याभल्यांना जमणारे नाही. दुर्दैवी आहे, परंतु सत्य आहे हे. आणि हे सत्य मान्य केलं तरच त्यावर उपाय काढता येणार आहेत.

    बिजिबालचे संगीत अतिशय सुरेख झालेय. विशेषतः “इडुक्की” आणि “मौनंगळ” ही गाणी. आपल्याकडे इतकी सुरेख गाणी का होत नाही, याची राहून राहून खंत वाटते. चित्रपटात मला जाणवलेली एकमेव त्रुटी म्हणजे तो मूळ विषयाकडे यायला फारच वेळ लावतो. दोन तासांच्या चित्रपटापैकी पहिला जवळ जवळ एक तास हा पात्रपरिपोष आणि वातावरणनिर्मितीसाठी घालवलाय. म्हटलं तर ही चांगली गोष्ट आहे आणि म्हटलं तर वाईट. कारण, सबंध चित्रपटच सुशेगात आहे. त्याचा धीमेपणानेच आस्वाद घ्यायचाय. जॅझ संगीतासारखा. किंवा अधिक मुद्देसूद बोलायचं झालं, तर “महेशिण्टे प्रतिकारम” हा चित्रपटच निसर्गरम्य केरळमधील गावाकडचे जॅझ आहे. रेंगाळणारे, संपल्यावरही चव ठेवून जाणारे आणि पुन्हापुन्हा आठवणी काढायला लावणारे. अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे परमेश्वर आपल्याकडून एक गोष्ट हिसकावून घेतो ते दुसरी त्याहून चांगली गोष्ट देण्यासाठीच. “महेशिण्टे प्रतिकारम”मध्ये ही बाब अतिशय कलात्मक ढंगाने आणि तरीही रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमधून सहजगत्या चितारलीये. कशी, ते चित्रपटात पाहूनच समजून घ्यावे. चुकूनही चुकवू नये असा गोड अनुभव आहे हा!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके

    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • नाव राखणारा अद्वितीय थरारपट : राक्षसन (रात्ससन)

    अरुणकुमार (विष्णु विशाल) हा एक होतकरू चित्रपटकार आहे. अतिशय चिकाटीने, खूप सारं संशोधन करून त्याने एक संहितासुद्धा लिहिली आहे. अनेक निर्मात्यांना तो ती ऐकवतो. हाती काय लागतं? कोणत्याही स्ट्रगलरच्या हाती जे सुरुवातीची अनेक वर्षं लागतं तेच, बिनपैश्यांचा तरीही अमूल्य असा अनुभव! कुणीच त्याच्या कथेवर पैसा लावायला तयार होत नाही. हा दुसरे काहीच काम करत नाही, काहीच कमवत नाही त्यामुळे त्याची बहिण (विनोदिनी) आणि भावोजींची (रामदास) सतत भुणभुण चाललेली. अरुणचे वडील पोलिसांत होते. भावोजीही पोलिसच. त्यामुळे साहजिकच अरुणनेही पोलिस व्हावे हा सगळ्यांचा लकडा. शेवटी स्ट्रगल करून करून थकलेला अरुण त्याच्या मनाविरुद्ध पोलिस भरतीच्या परीक्षा देतो आणि उत्तीर्ण होऊन पोलिस खात्यात रुजूसुद्धा होतो. हा सगळा घटनाक्रम घडत असतानाच शहरात एक विचित्र खूनसत्र सुरू होतं. अरुण त्यात साहजिकपणे ओढला जातो. पुढे काय होतं याची थरारक हा शब्दही अपुरा वाटेल अशी भयचकित करणारी अविश्वसनीय कथा, नव्हे नव्हे थरारपट कसा असावा याचा अप्रतिम नमुना म्हणजे ‘राक्षसन’!

    वरवर पाहायला गेलं तर ‘राक्षसन’चा परिसर अतिशय प्रेडिक्टेबल आहे. त्या अनुषंगाने काही घटनासुद्धा सहज ओळखता येतात. पण हे प्रमाण किती आहे, तर अगदी दहा-पाच टक्केही नसेल. मुळात हा पोलिसपट वाटावा अशी त्याची बाह्य आखणी आहे. परंतु हा थेटपणे पोलिसपट नाही. पोलिसपटांमध्ये हिरोसाठी त्याचा गणवेश, त्यापाठोपाठ येणारी कर्तव्याची भावना आणि आपसूकच येणारे नायकत्व सर्वोपरी असते. इथे अरुणमध्ये मुळातच तितके हिरोईझम नाही. तो तर अनिच्छेने पोलिस झालेला एक रिलक्टंट-हिरो आहे. आणि विश्वास ठेवा, रिलक्टंट-हिरो हे या चित्रपटासाठी नुसते कथाकथनाचे एक तंत्र नाही, तर या कमालीच्या घट्ट विणलेल्या कथेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि केवळ अरुणच नव्हे, तर यातील बहुतांश पात्रे, त्यांचा स्वभाव, त्यांचे व्यवसाय या गोष्टी कथेसाठी अत्यावश्यक ठराव्यात इतक्या चपखलपणे गुंफलेल्या आहेत. कथा-पटकथा कशी लिहावी याचा वस्तुपाठ म्हणावा असाच आहे हा चित्रपट. कित्येकदा गोष्टी आपल्या नजरेसमोर लपवलेल्या असतात, परंतु दिग्दर्शक दाखवेपर्यंत त्यांचा संदर्भच लागत नाही; या चांगल्या रहस्यपटाच्या निकषावर हा सिनेमा खरा उतरतो. कित्येक प्रसंगांमध्ये अतिशय संयत फोरशॅडोईंग केलीये, जी योग्य वेळीच उलगडते. आणि तशी ती उलगडताना अनुभवण्याचा स्वतंत्र असा आनंद आहे. स्पून-फिडींग अगदी कमीत कमी आणि तरीही मनोरंजनाची हमी, हा हिंदी-मराठीमध्ये क्वचितच कुणाला साधणारा समतोल या चित्रपटाला बरोब्बर साधलाय.

    पण म्हणून हा चित्रपट फक्त बुद्धीचा खेळ आहे का? मी हा चित्रपट घरी पाहिला. प्रदर्शित झाला तेव्हा कसा कोण जाणे, पण राहून गेला होता माझ्याकडून. पण जवळजवळ अडिच तासांचा हा चित्रपट पाहाताना पहिल्या वीस-एक मिनिटांतच मी बायकोला म्हणालो की, ‘बंद करुया का?’ इतका प्रचंड अस्वस्थ झालो होतो मी. राग, भिती, काळजी, हतबलता, करुणा, घृणा, किळस या आणि अशा कित्येक भावना शतपटींनी अधिक तीव्रपणे भासायला लावण्याची अजब ताकद आहे या चित्रपटात. घरी, छोट्या पडद्यावर पाहाताना माझं असं झालं तर प्रत्यक्ष चित्रपटगृहात पाहाणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी. चित्रपट त्याची ही आत्यंतिक भावोत्कटता अगदी शेवटपर्यंत सोडत नाही. अमला पॉल वगैरे सगळ्यांनीच चांगली कामे केली आहेत. परंतु विनोद सागर या अभिनेत्याने मात्र अक्षरशः कमालच केली आहे. गिब्रनचे संगीत हे नेहमीप्रमाणेच जेवढ्यास तेवढे आणि कथेला पूरक आहे.

    अतिशय धीटपणे लिहिलेला आणि तरीही शैलीदारपणे मांडलेला हा चित्रपट थरारपट किंवा रहस्यपट म्हणवण्याच्या दृष्टीने मात्र किंचित मोठा आहे. मी हे जे बोलतोय, ते आजकालच्या संयमशून्य आणि एकाग्रताविरहीत पिढीच्या संदर्भात. प्रत्यक्षात तीन-साडेतीन तासांचे चित्रपटही चवीने पाहाणारी माणसं आपण. परंतु असे चित्रपट अगदी नेमके तेवढेच मांडणारे असावेत, असं म्हणतात. कदाचित लेखक-दिग्दर्शक रामकुमारही याच विचाराला बळी पडला असावा. कारण प्रचंड स्मार्ट, तपशीलवार तरीही रहस्याच्या चाव्या राखून असलेला हा चित्रपट जसजसा शेवटाकडे येतो तसतसा किंचित घाई करू लागतो. त्याचं तर्कशास्त्र क्वचित गडबडू लागतं. परिणामतः उत्कर्षबिंदूत जेवढी मजा यायला हवी तेवढी ती येतच नाही. अर्थात, त्यातही जे काही घडतं ते हल्लीच्या भल्याभल्या चित्रपटांच्या कल्पनेच्याही पलिकडचं आहे. परंतु तरीही अजून पाच-दहा मिनिटे इकडे-तिकडे झाली असती, तर पोट पूर्ण भरलं असतं एवढंच!

    पण तरीही खात्रीने सांगतो की, हा छोट्या बजेटचा आणि फारशी प्रसिद्ध स्टारकास्ट नसलेला तमिळ चित्रपट यावर्षीच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांपैकी आहे. किंबहूना आपल्याकडच्या सर्वोत्तम थरारपटांच्या यादीत याला पुढची अनेक वर्षे कुठे ना कुठे स्थान द्यावेच लागेल असा आहे. असा चित्रपट आपल्याकडे का बनत नाही, याची मनापासून खंत वाटते हा चित्रपट पाहाताना. राक्षस हा शब्द जरी आपण वाईट अर्थाने वापरत असलो, तरी त्याचा खरा अर्थ होतो राखणारा! आणि खरोखरच हा चित्रपट प्रयोगशील तरीही मनोरंजक अशा तमिळ चित्रपटसृष्टीचे नाव बरोब्बर राखणारा आहे. या जॉनरचेच नव्हे, तर एकूणच चित्रपट माध्यमाचे चाहते असाल, तर चुकूनही चुकवू नका हा ‘राक्षसन’!

    *४/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • रुचकर तरीही अपुरा – सीताकाती

    जयन्ति ते सुकृतिना: रससिद्धा: कवीश्वरा: ।
    नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम् ।।
    कला म्हातारी होत नाही, किंबहूना कला कधीच मरत नाही. ती अजर असते, अमर असते. हे आपण नेहमीच तात्त्विक रूपाने आसपास पाहातो, अनुभवतो. असेच अय्या आदिमूलम (विजय सेतुपती) हे रंगमंचावरील निष्णात अभिनेते आणि दिग्दर्शक. वयाच्या दहाव्या वर्षापासून हा माणूस रंगमंचालाच सर्वस्व मानून वावरतोय. त्यांच्या अभिनयपटूतेला पाहून अनेक नावाजलेल्या चित्रपट दिग्दर्शकांनी त्यांना सिनेमाची ऑफर दिली, परंतु त्या साऱ्या धुडकावून त्यांनी फक्त आणि फक्त रंगभूमीची सेवा केली आजवर. आता काळ बदललाय. लोकांना जिवंत रंगभूमीपेक्षा रंगीबेरंगी चित्रपट जास्त भुरळ घालू लागलेयत. रंगमंच ओस पडू लागलेयत. तरुणाई त्याकडे पाठ फिरवू लागलीये. जसजसा जनप्रवाह आटत चाललाय, तसतसे अय्यांच्या समोर असलेले आर्थिक प्रश्न रौद्ररूप धारण करू लागलेयत. अय्यांचं वय ७३ आहे. ते थकलेयत, काहीसे हरलेयत. पण रंगभूमीवर असलेलं त्यांचं अपरंपार प्रेम अणुमात्रही उणावलेलं नाहीये. गोष्टी आकार घेता घेताच त्यांचा रोख बदलतो आणि सबंध चित्रपटच कल्पनाविलासाच्या, फँटसीच्या अद्भुत विश्वात शिरकाव करतो.

    चित्रपटात वापरलेला फँटसीचा घटक सहजी पटण्यासारखा नाही. परंतु प्रत्येक सिनेमाचे स्वतःचे असे एक विश्व असते. त्याचे त्याच्यापुरते काही नियमही असतात. आपल्या जगाचे नियम त्याला लागत नाहीत, किंबहूना ते लावूही नयेत. लेखक-दिग्दर्शक बालाजी धरणीधरनने पटकथेत उभारलेल्या विश्वात ती गोष्ट किंचितश्या संघर्षानंतर का होईना, पटते. आणि अतिशय शोकांत मार्गाला जाणारा चित्रपट अचानकच विनोदाची नाव पकडून झुलू लागतो! आणि विनोदही कसा, तर अतिशय नैसर्गिक; कोणताही छल न करता सहजसाध्या परिस्थितीतून उद्भवणारा. इतका निखळ की त्या परिस्थितीत दुसरं काही संभवतच नाही, असंच दिग्दर्शक आपल्याला वाटायला लावतो. हळूहळू ही विनोदाची गाडी प्रहसनाच्या राज्यात शिरते. इथे दिग्दर्शक विनोदाच्याच अंगाने कला आणि तिच्याशी संबंधित खूप साऱ्या गोष्टींवर भाष्य करतो.

    थोडक्यात सांगायला गेलं, तर ‘सीताकाती’चे तीन भाग पडतात. शोकांतिका, कल्पनाविलासात्मक विनोद, आणि प्रहसन. तिन्हीही भाग वेगवेगळे पाहिले तर ते अतिशय प्रभावी झाले आहेत. परंतु हे तीन भाग जेव्हा एकच चित्रपट म्हणून गुंफले जातात, तेव्हा ते एका मर्यादेपलिकडे प्रभाव पाडत नाहीत. विशेषतः शेवटचा भाग. १७३ मिनिटे, असा भलामोठा काळ चालणारा चित्रपट, पण तरीही त्याचा शेवट उरकून घेतल्यासारखा वाटतो. शिवाय पहिला जवळजवळ पाऊण तास आपल्याला अय्यांची मनोभूमिका सांगण्यासाठी दिलाय, परंतु नंतर मात्र त्या फँटसी घटकाचे विचार, मन:स्थिती, तिची बाजू यांपैकी काहीही समोर येत नाही. चित्रपट हा माणसांच्या नजरेतून पाहात असल्यामुळे हा मार्ग तर्कशुद्ध वाटतोही, परंतु याच मार्गामुळे चित्रपट अपूर्णही वाटतो. दुसरे असे की ‘सीताकाती’मध्ये अय्यांची भूमिकाच नसलेले चित्रपट त्यांच्या नावावर विकण्याचा निषेध केलाय. प्रत्यक्षात ‘सीताकाती’मध्येच विजय सेतुपतीची भूमिका एक्स्टेंडेड कॅमिओ म्हणता येईल एवढ्याच लांबीची आहे आणि तरीही पोस्टर्सवर त्यालाच मुख्य स्थान आहे. थोडक्यात, ज्या गोष्टीचा चित्रपटात निषेध केलाय, तीच गोष्ट अगदी किंचित प्रमाणात का होईना या चित्रपटाने सुद्धा केलीये. चित्रपटाचे छायांकन, संपादन अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आहे. परंतु तरीही काही काही दृश्यांची लांबी अतिशय खटकत राहाते. चित्रपटाच्या पूर्वार्धात एक अतिशय विनोदी प्रसंग येतो. उत्तरार्धातही बरोब्बर त्याच प्रकारचा एक प्रसंग आहे. दोन्हीतील कलाकार वेगळे, अभिनय वेगळा; पण तरीही पुनरावृत्तीचा दोष आल्याशिवाय राहात नाही. हे टाळता आले असते. विशेषतः इतकी वेगळी, जबरदस्त आणि अविश्वसनीय संकल्पना असताना, हाताशी श्रेष्ठतम कलाकार आणि तंत्रज्ञ असताना, लेखनावर जास्त मेहनत घेणे फारच गरजेचे होते. ती नाही घेतली तर चित्रपटाचा ‘षमिताभ’ होऊ लागतो.

    मी वर म्हटलंय की विजय सेतुपतीचा चित्रपटात एक्स्टेंडेड कॅमिओ असल्यासारखा वाटतो. याचा अर्थ असा बिलकुल नाही बरं का की तो वाईट आहे. उलट आपल्या पंचविसाव्या चित्रपटात त्याने केलेली भूमिका ही खचितच अविस्मरणीय आहे. या माणसाच्या एवढा जबरदस्त कारकीर्दीचा आलेख मी अलिकडच्या काळात कुणाचाच पाहिलेला नाही. वयाच्या पस्तिशीनंतर त्याने सुरुवात केली आणि एकामागोमाग एक वेगळ्या वाटेवरचे चित्रपट करत तो अल्पावधीतच शिखरावर जाऊन पोहोचला. आणि तरीही, तरीही तो प्रत्येक चित्रपटात त्याच्या आधीच्या चित्रपटातील अभिनयापेक्षा दोन पावले पुढेच जातोय! त्याच्या या वर्षीच्याच भूमिकांचे वैविध्य पाहा. ‘९६’मध्ये पहिल्या प्रेमासाठी सर्वस्व अर्पिलेला राम, ‘सीसीव्ही’मध्ये दारुडा व काहीसा भ्रष्ट पोलिस अधिकारी रसूल आणि यात ७३ वर्षांचा रंगकर्मी अय्या! केवढे वैविध्य आणि तरीही प्रत्येक भूमिका तितकीच ताकदीने वठवलेली. या चित्रपटात अय्यांची विविध नाटके दाखवताना एका नाटकात त्यांनी औरंगज़ेबची भूमिका केलेली दाखवलीये. तब्बल ८-१० मिनिटांचा प्रसंग आहे तो. आणि त्या प्रसंगाचं वैशिष्ट्य सांगू? सबंध प्रसंग एकाच शॉटमध्ये केलाय! या प्रसंगात कॅमेरा जेवढा उत्कृष्ट हालचाली करतो, त्याहूनही अनेकपटींनी उत्कृष्ट काम केलेय विजय सेतुपतीने. हा प्रसंग इतक्या प्रचंड ताकदीने करू शकणारे अक्षरशः हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक असतील सध्याच्या आघाडीच्या नायकांमध्ये! हा प्रसंग खरोखरच कोणत्या नाटकातून घेतलाय की काय, मला ठाऊक नाही. परंतु त्यातील एक वाक्य मला फारच आवडून गेलेय. म्हातारपणी एकट्या पडलेल्या औरंगज़ेबसमोर साक्षात संगीत उभे राहाते. तो संगीताशी वाद घालू लागतो. सच्चा मुसलमान असल्याचे दाखले देऊ लागतो. त्यावेळी संगीत त्याला म्हणते, ‘तू इतक्या वेळा स्वतःचा सच्चा मुसलमान म्हणून उल्लेख करतोयस की कधीकधी वाटतं तुझी तुलाच या बाबतीत शंका असावी’! एका वाक्यात सांगायचं झालं तर, प्रॉस्थेटिक्सच्याही पलिकडे जाऊन विजय सेतुपतीने अय्यांना आपल्या अंतरात्म्यात उतरवलंय, इतकं की पडद्यावर एका क्षणासाठीही विजय सेतुपती नसतोच, फक्त आणि फक्त अय्याच असतात! त्याची देहबोली, हावभाव, श्वासोच्छ्वासाचे गणित सारे सारे काही डोळ्यांत कायमचे साठवण्यासारखे झालेय!

    जितकी स्तुती विजय सेतुपतीची करायला हवी तितकीच अजून एका व्यक्तीचीही केली पाहिजे. गोविंद वसंता! हा अत्यंत प्रतिभाशाली संगीतकार, गायक आणि वादक तैक्कुडम ब्रिज ऐकलेल्यांसाठी नवा नाही. परंतु जेव्हापासून त्याने वेगळ्या नावाने संगीत द्यायला सुरुवात केलीये, तेव्हापासून त्याचे आधीच सर्वांगसुरेख असलेले संगीत विलक्षणच होऊ लागलेय. त्याचा ‘९६’ तर माझ्यामते यावर्षीचा सर्वश्रेष्ठ रहमानेतर अल्बम आहे. याही चित्रपटाची गाणी त्याने तितकीच सुरेख आणि कथेच्या मूडला बरोब्बर न्याय देणारी केली आहेत. ती जितकी प्रायोगिक आहेत, तितकीच गोडसुद्धा. त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो लिरिक्स चांगलेच असतील, यावर खूप भर देतो आणि त्यामुळे त्याच्या गाण्यांची एकूणच शेल्फ़ व्हॅल्यू अनेकपट वाढते. आजकालच्या बहुतांशी हिंदी, मराठी संगीतकारांनी त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे ही. जवळजवळ तीन तास चालणारा हा चित्रपट जरादेखील कंटाळवाणा वाटत नाही, याचेदेखील महत्त्वाचे कारण म्हणजे याच अवलियाचे अफलातून पार्श्वसंगीत! राजा, रहमान यांचे वैशिष्ट्य म्हणजे ही मंडळी कसाही प्रसंग असला तरी आपल्या पार्श्वसंगीताच्या जोरावर त्याला दैवी उंचीप्रत नेऊन ठेवतात. जर गोविंद वसंताने हेच सातत्य कायम राखले, तर त्याचेही नाव येत्या काही वर्षांत या सूचीत समाविष्ट होऊ शकते, एवढे सुंदर काम केलेय त्याने. विशेषतः विनोदी प्रसंग सारेच परिस्थितीजन्य असल्यामुळे ते खुलवण्यात तर संगीताचा वाटा जास्तच महत्त्वाचा आहे.

    थोडक्यात, ‘सीताकाती’ हा पदार्थ अतिशय रुचकर आहे. परंतु प्रत्येकच घासाला काही ना काही कमी वाटत राहाते. अखेरीस ताटभर खाऊनही जेवण अपुरेच राहिल्यासारखे वाटते. अर्थातच, चित्रपटाच्या काही त्रुटी आहेतच. परंतु त्यांचा हेतू, त्यांची संकल्पना अतिशय उदात्त व नावीन्यपूर्ण आहे. ती पडद्यावर मांडताना किंचित गडबड झालेली असली तरीही विजय सेतुपतीने जे काही केलेय ते अक्षरशः दैवी आहे. आणि आपल्याकडे, विशेषतः हिंदीत असा दैवी अभिनय क्वचितच पाहायला मिळत असल्यामुळे, अभिनय कशाशी खातात हा प्रश्न न पडण्यासाठी तरी त्याचे काम पाहाणे अत्यंत आवश्यक आहे. सिनेमा रंगभूमीचे सामर्थ्य जितक्या ताकदीने अधोरेखित करतो तितक्याच ताकदीने चित्रपट या माध्यमाचेही सामर्थ्य उत्तरार्धात मांडतो. दोन्हीही कलाप्रकार आपापल्या जागी केवढे श्रेष्ठ आणि तरीही एकमेकांपेक्षा वेगळे व समांतर रेषेवरून चालणारे आहेत हे न बोलताच मांडणारा ‘सीताकाती’ हा खरोखर वेगळाच चित्रपट आहे!

    *३/५

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

  • 2.0 नव्हे, ‘शंकर 2.0’

    मी परवाच एका व्याख्यानात बोललो होतो की, दिवसेंदिवस आपण सारेच तंत्रज्ञानावर नको तितके अवलंबून राहू लागलोय. याचे शारीरिक, मानसिक परिणाम कल्पनातीत आहेत. जणू काही एखाद्या टाईमबॉम्बचं टायमर सुरू करून त्यावर बसलो आहोत आपण. तो फुटेल तेव्हा काय होईल? भयंकर कल्पना आहे ही! भारतीय चित्रपटसृष्टीतील खऱ्या अर्थाने शो-मन म्हणावा अश्या दिग्दर्शक शंकरचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? तो अश्याच रोजच्या आयुष्यातल्या कल्पना घेतो. सत्य हे कल्पनेहून भंयकर असतं म्हणतात, परंतू शंकर त्या कल्पनेला सत्याहूनही भयंकर कल्पनेचा तडका देतो. त्यातून साकारतो तो शंकरचा कोणताही अतिप्रचंड सिनेमा! “2.0”ची कल्पनाही अशीच साधी. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे पक्ष्यांना विकिरणांचा होणारा त्रास सबंध मानवजातीला (जशी हॉलिवूडच्या चित्रपटांत मानवजात म्हणजे अमेरिका असते, तशी ती इथे चेन्नई आहे!) कडेलोटापर्यंत घेऊन जातो आणि त्याच्याविरोधात लढण्यासाठी माणसांना परत एकदा आणावा लागतो, काही वर्षांपूर्वी विंखडित केलेला चिट्टी (रजनीकांत)!

    वाचायला, ऐकायला ही कल्पना जेवढी जबरदस्त वाटते, तेवढीच ती साकारायला अवघड आहे. अगदी शंकरलासुद्धा! शंकरच्या बहुतांशी सिनेमांमध्ये नायक गुप्तरूपाने समाजातील वाईट शक्तींना संपवण्याचं काम करत असतो. आठवा, “जंटलमन” (१९९३), “इंडियन” (१९९६), “आन्नियन” (२००५). “2.0”मध्ये मात्र नेमका हाच घोळ झालाय की, ही हिरोगिरी करणाराच खलनायक आहे! त्यामुळे सुरूवातीला त्याचा द्वेष करणारे आपण, त्याची कथा समजल्यावर त्याचा द्वेष करूच शकत नाही. या त्रुटीवर मात करण्यासाठीच जणू शंकरला जवळजवळ अर्धा तास चालणारा उत्कर्षबिंदू लिहावा लागलाय. आणि तो ज्या प्रचंडाहूनही प्रचंड पातळीवर नेऊन मांडलाय, त्याला तोड नाही.

    रजनीकांत हा किती जरी सुपरस्टार असला, तरी त्याचा अखेरचा पूर्णार्थाने समाधानी करणारा सिनेमा हा शंकरचाच “यन्धिरन” (२०१०) होता. त्यानंतर रजनीने एक तर “कोचडय्यान” (२०१४), “लिंगा”सारखे (२०१४) चुकलेले सिनेमे तरी केलेयत अथवा “कबाली” (२०१६) आणि “काला”सारखे (२०१८) अजूनच जास्त चुकलेले सिनेमे तरी केलेयत. त्याच्या बॉक्सऑफिसवरील साम्राज्याला ओहोटी लागू लागलीये. त्या पार्श्वभूमीवर “2.0” हा त्याच्यासाठी अखेरच्या संधींपैकी आहे. आणि काय सांगू, रजनीने या संधीचे नुसते सोनेच नव्हे तर त्याहूनही खूपच जास्त केलेय. खूप वर्षांनी खऱ्या अर्थाने बहरलेला, बेभान असा रजनी पाहायला मिळाला. त्याने या चित्रपटात एक नव्हे तर तब्बल ४ वेगवेगळी रूपं साकारलीयेत आणि प्रत्येक रूप त्याच्या असीम क्षमतेची साक्ष देणारे आहे. तशीच गोष्ट अक्षयकुमारचीही. त्याचाही गेल्या वर्षापासून सॅच्युरेशन पॉईंट येऊ लागला होता. त्याचे चित्रपट यशस्वी होत होते, पण एका मर्यादेतच. त्यापलिकडे त्याचे आकडे जात नव्हते आणि तो सुद्धा स्वतःवर प्रयोग करत नव्हता वा स्वतःवर जोर लावत नव्हता. या चित्रपटात त्याने स्वतःवर घालून घेतलेले ते सगळे बरेवाईट नियम मोडलेयत आणि निकाल हा चांगल्याहूनही चांगला आलाय. हा खरा अक्षयकुमार आहे. त्यानेसुद्धा तब्बल २ वेगवेगळी रूपं साकारलीयेत आणि तितक्याच ताकदीने साकारलीयेत. अक्षयकुमार जर प्रत्येकच चित्रपटात अशी मेहनत घ्यायचे शिकला, तर तो आत्तापेक्षाही अनेक पटींनी पुढे जाईल. परंतु त्याची सवय त्याला हे करू देईल का, हा मोठाच प्रश्न आहे. अॅमी जॅक्सनची भूमिका या दोघांपेक्षाही चपखल जमलीये. ती एवढी सुंदर दिसते, एवढी सुंदर दिसते की, तिला अभिनय करण्याची कधी गरजच पडली नाही. त्यामुळेच की काय ती कायम निर्जीव, यांत्रिक पद्धतीचा अभिनय करते. तोच तिने इथेसुद्धा केलाय. पण गंमत अशी की, तिची भूमिकाच इथे यंत्रमानवीची असल्यामुळे तिच्या क्षमतेचा (खरं तर त्रुटीचा!) इथे शंभर टक्के वापर झालाय! मागच्या चित्रपटात जशी डॉ. बोहराला (डॅनी) साईडव्हिलनची भूमिका होती तसेच इथे सुधांशू पांडे या गुणी अभिनेत्याला डॉ. बोहराच्या मुलाची फुसकी भूमिका देऊन तितक्याच फुसक्या कामासाठी ठेवून घेतलेय.

    “2.0”चा मुख्य गुणधर्म हा, की तो पहिल्या दृश्यापासूनच विषयाला हात घालतो. त्यापासून कुठेच हटत नाही. ही जशी चांगली गोष्ट आहे, तशीच वाईटसुद्धा आहे. वाईट यासाठी की, शंकरचे वैशिष्ट्य असलेली कॉमेडी या चित्रपटात पाहायला मिळत नाही. जी काही कॉमेडी आहे ती निला (नाईस, इंटेलिजंट, लव्हली असिस्टंट) अर्थात अॅमी जॅक्सन तरी करते नाहीतर चिट्टी तरी करतो. चित्रपटात खूप सारे स्थानिक संदर्भ आहेत. खासकरून तमिळ सिनेमांचे. ते तमिळमध्ये जितके खुलतात, तितके हिंदीत खुलतीलच, असे नाही. शिवाय थेट विषयाला हात घालताना चित्रपटाचा पूर्वार्ध हा खूपच इन्व्हेस्टिगेटिव्ह पद्धतीचा झालाय. तो अजिबात कंटाळवाणा नाही. छानच आहे. परंतु हाती रजनीकांत आणि अक्षयकुमारसारखे योद्धे असताना, जितक्या ठिणग्यांची अपेक्षा करू, तितक्या त्या उडत नाहीत. उत्तरार्धात मात्र चित्रपट आपल्या अपेक्षा शतपटींहूनही अधिक पूर्ण करतो. तरीदेखील तो किंचित अधिक मानवी, भावनांचा अन्वयार्थ लावणारा, पक्षीराजनच्या दुसऱ्या रुपाच्या अंतरंगात डोकावणारा असायला हवा होता, असे वाटत राहाते. शंकरने भव्यतेच्या सर्वच सीमा अक्षरशः ओलांडल्या आहेत. नुसत्या ओलांडल्याच नव्हे, तर चोळामोळा करून, फेकून देऊन पुन्हा नव्याने आखल्यायत! हा चित्रपट जर तुम्ही थिएटरशिवाय अन्य कुठेही पाहाण्याचे ठरवत असाल, तर तुमच्यासारखे करंटे तुम्हीच! हा भारतातला पहिला खऱ्या अर्थाने त्रिमितीय सिनेमा आहे. त्याच्या ध्वनीमध्येही आजवर कधीच न करण्यात आलेले प्रयोग केलेयत. रहमानचं पार्श्वसंगीत गगनाच्याही मर्यादा ओलांडून कसे जाते, ते मोठ्या स्क्रिनवरच अनुभवले पाहिजे. तिच गोष्ट विभासांची. भारतात आजवर कधीच न अनुभवलेले विभास या मंडळींनी अतिशय यशस्वीरित्या बनवून दाखललेयत. आता तुम्ही जर याची तुलना हॉलिवूडशी करणार असाल, तर ते मुळातच चूक आहे. एक तर या मंडळींचे जे बजेट आहे, ते अतिशय कमी आहे. जेव्हा “बाहूबली”सारखा एखादा चित्रपट केवळ २५० कोटींच्या बजेटमध्ये विभासांचा भरपूर वापर करूनही पैसा कमावून दाखवतो, तेव्हा कुठे “2.0”ला ५५० कोटींचे बजेट मिळते. त्या अर्थी हे या विषयातल्या आपल्या अगदी सुरुवातीच्या पावलांपैकी आहे. जेव्हा आपल्याकडे हॉलिवूडइतके बजेट मिळायला लागेल, तेव्हा हॉलिवूडचे तथाकथित ब्लॉकबस्टर्स आपल्या प्रतिभेच्या भराऱ्यांपुढे पोरखेळ वाटू लागतील, लिहून ठेवा! मला जाणवलेला सगळ्यांत मोठा विरोधाभास मात्र हा की, मोबाईलच्या हव्यासापायी होणारे दुष्परिणाम मांडणारा हा सिनेमा बनवणारी लायका कंपनी मात्र मुख्यतः मोबाईलचेच उत्पादन करते!

    वाईटाच्या आघाडीवर सांगायला गेलं तर चित्रपटाला ठहराव नाही. गोष्टी स्थिर व्हायच्या आधीच पुढे नेण्याची घाई झाल्याचे जाणवते. दुसरे असे की, दुर्दैवाने हा सिनेमा शंकरच्या काही ठराविक, त्याच त्या गोष्टींपासून मुक्त होत नाही. परंतु असे असूनदेखील काही गोष्टी लक्षात घ्यायलाच हव्या. शंकरचाच “नन्बन” (२०१२) हा बोलूनचालून रिमेक होता. “ऐ”वर (२०१५) सगळ्यांत जास्त टिका झाली होती ती त्याच्या लांबीवरून आणि अनावश्यक साईडट्रॅक व गाण्यांवरून. शंकरने या गोष्टींची बरोब्बर नोंद या चित्रपटात घेतलीये. त्याचा स्क्रिनप्ले किंचित अवघडल्यासारखा वाटतो, परंतु त्याने जागा असूनही कॉमेडीट्रॅक टाळलाय. शंकरसारखी गाणी सबंध भारतातच काय, जगात कुणी करत नसेल, इतका तो गाण्यातील बारीकसारीक शॉटवर विचार आणि खर्च करतो. पण या चित्रपटात एकही गाणे वेगळे वापरलेले नाही. ३ गाण्यांपैकी २ पार्श्वभागी राहून कथेला पुढे नेतात तर एक थेट चित्रपट संपल्यावर येते. तो सगळा खर्च त्याने कामात वळवलेला जाणवतो. त्यामुळे चित्रपटाची लांबी आपसूकच कमी झालीये. हा शंकरचा आजवरचा सगळ्यांत छोटा सिनेमा आहे. ‘कधी संपतोय’ वाटण्यापेक्षा एखादा चित्रपट ‘अरेच्चा संपलासुद्धा’ वाटणे कधीही श्रेयस्कर! या सगळ्या अर्थांनी बोलायला गेलं, तर हा नुसता सिनेमाच “2.0” नाहीये, तर या सिनेमामुळे स्वतःचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करणारा “शंकर 2.0” दिसणे जास्त सुखद आहे!

    — © विक्रम श्रीराम एडके
    (लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

    *३.७५/५