नाव राखणारा अद्वितीय थरारपट : राक्षसन (रात्ससन)

अरुणकुमार (विष्णु विशाल) हा एक होतकरू चित्रपटकार आहे. अतिशय चिकाटीने, खूप सारं संशोधन करून त्याने एक संहितासुद्धा लिहिली आहे. अनेक निर्मात्यांना तो ती ऐकवतो. हाती काय लागतं? कोणत्याही स्ट्रगलरच्या हाती जे सुरुवातीची अनेक वर्षं लागतं तेच, बिनपैश्यांचा तरीही अमूल्य असा अनुभव! कुणीच त्याच्या कथेवर पैसा लावायला तयार होत नाही. हा दुसरे काहीच काम करत नाही, काहीच कमवत नाही त्यामुळे त्याची बहिण (विनोदिनी) आणि भावोजींची (रामदास) सतत भुणभुण चाललेली. अरुणचे वडील पोलिसांत होते. भावोजीही पोलिसच. त्यामुळे साहजिकच अरुणनेही पोलिस व्हावे हा सगळ्यांचा लकडा. शेवटी स्ट्रगल करून करून थकलेला अरुण त्याच्या मनाविरुद्ध पोलिस भरतीच्या परीक्षा देतो आणि उत्तीर्ण होऊन पोलिस खात्यात रुजूसुद्धा होतो. हा सगळा घटनाक्रम घडत असतानाच शहरात एक विचित्र खूनसत्र सुरू होतं. अरुण त्यात साहजिकपणे ओढला जातो. पुढे काय होतं याची थरारक हा शब्दही अपुरा वाटेल अशी भयचकित करणारी अविश्वसनीय कथा, नव्हे नव्हे थरारपट कसा असावा याचा अप्रतिम नमुना म्हणजे ‘राक्षसन’!

वरवर पाहायला गेलं तर ‘राक्षसन’चा परिसर अतिशय प्रेडिक्टेबल आहे. त्या अनुषंगाने काही घटनासुद्धा सहज ओळखता येतात. पण हे प्रमाण किती आहे, तर अगदी दहा-पाच टक्केही नसेल. मुळात हा पोलिसपट वाटावा अशी त्याची बाह्य आखणी आहे. परंतु हा थेटपणे पोलिसपट नाही. पोलिसपटांमध्ये हिरोसाठी त्याचा गणवेश, त्यापाठोपाठ येणारी कर्तव्याची भावना आणि आपसूकच येणारे नायकत्व सर्वोपरी असते. इथे अरुणमध्ये मुळातच तितके हिरोईझम नाही. तो तर अनिच्छेने पोलिस झालेला एक रिलक्टंट-हिरो आहे. आणि विश्वास ठेवा, रिलक्टंट-हिरो हे या चित्रपटासाठी नुसते कथाकथनाचे एक तंत्र नाही, तर या कमालीच्या घट्ट विणलेल्या कथेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि केवळ अरुणच नव्हे, तर यातील बहुतांश पात्रे, त्यांचा स्वभाव, त्यांचे व्यवसाय या गोष्टी कथेसाठी अत्यावश्यक ठराव्यात इतक्या चपखलपणे गुंफलेल्या आहेत. कथा-पटकथा कशी लिहावी याचा वस्तुपाठ म्हणावा असाच आहे हा चित्रपट. कित्येकदा गोष्टी आपल्या नजरेसमोर लपवलेल्या असतात, परंतु दिग्दर्शक दाखवेपर्यंत त्यांचा संदर्भच लागत नाही; या चांगल्या रहस्यपटाच्या निकषावर हा सिनेमा खरा उतरतो. कित्येक प्रसंगांमध्ये अतिशय संयत फोरशॅडोईंग केलीये, जी योग्य वेळीच उलगडते. आणि तशी ती उलगडताना अनुभवण्याचा स्वतंत्र असा आनंद आहे. स्पून-फिडींग अगदी कमीत कमी आणि तरीही मनोरंजनाची हमी, हा हिंदी-मराठीमध्ये क्वचितच कुणाला साधणारा समतोल या चित्रपटाला बरोब्बर साधलाय.

पण म्हणून हा चित्रपट फक्त बुद्धीचा खेळ आहे का? मी हा चित्रपट घरी पाहिला. प्रदर्शित झाला तेव्हा कसा कोण जाणे, पण राहून गेला होता माझ्याकडून. पण जवळजवळ अडिच तासांचा हा चित्रपट पाहाताना पहिल्या वीस-एक मिनिटांतच मी बायकोला म्हणालो की, ‘बंद करुया का?’ इतका प्रचंड अस्वस्थ झालो होतो मी. राग, भिती, काळजी, हतबलता, करुणा, घृणा, किळस या आणि अशा कित्येक भावना शतपटींनी अधिक तीव्रपणे भासायला लावण्याची अजब ताकद आहे या चित्रपटात. घरी, छोट्या पडद्यावर पाहाताना माझं असं झालं तर प्रत्यक्ष चित्रपटगृहात पाहाणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी. चित्रपट त्याची ही आत्यंतिक भावोत्कटता अगदी शेवटपर्यंत सोडत नाही. अमला पॉल वगैरे सगळ्यांनीच चांगली कामे केली आहेत. परंतु विनोद सागर या अभिनेत्याने मात्र अक्षरशः कमालच केली आहे. गिब्रनचे संगीत हे नेहमीप्रमाणेच जेवढ्यास तेवढे आणि कथेला पूरक आहे.

अतिशय धीटपणे लिहिलेला आणि तरीही शैलीदारपणे मांडलेला हा चित्रपट थरारपट किंवा रहस्यपट म्हणवण्याच्या दृष्टीने मात्र किंचित मोठा आहे. मी हे जे बोलतोय, ते आजकालच्या संयमशून्य आणि एकाग्रताविरहीत पिढीच्या संदर्भात. प्रत्यक्षात तीन-साडेतीन तासांचे चित्रपटही चवीने पाहाणारी माणसं आपण. परंतु असे चित्रपट अगदी नेमके तेवढेच मांडणारे असावेत, असं म्हणतात. कदाचित लेखक-दिग्दर्शक रामकुमारही याच विचाराला बळी पडला असावा. कारण प्रचंड स्मार्ट, तपशीलवार तरीही रहस्याच्या चाव्या राखून असलेला हा चित्रपट जसजसा शेवटाकडे येतो तसतसा किंचित घाई करू लागतो. त्याचं तर्कशास्त्र क्वचित गडबडू लागतं. परिणामतः उत्कर्षबिंदूत जेवढी मजा यायला हवी तेवढी ती येतच नाही. अर्थात, त्यातही जे काही घडतं ते हल्लीच्या भल्याभल्या चित्रपटांच्या कल्पनेच्याही पलिकडचं आहे. परंतु तरीही अजून पाच-दहा मिनिटे इकडे-तिकडे झाली असती, तर पोट पूर्ण भरलं असतं एवढंच!

पण तरीही खात्रीने सांगतो की, हा छोट्या बजेटचा आणि फारशी प्रसिद्ध स्टारकास्ट नसलेला तमिळ चित्रपट यावर्षीच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांपैकी आहे. किंबहूना आपल्याकडच्या सर्वोत्तम थरारपटांच्या यादीत याला पुढची अनेक वर्षे कुठे ना कुठे स्थान द्यावेच लागेल असा आहे. असा चित्रपट आपल्याकडे का बनत नाही, याची मनापासून खंत वाटते हा चित्रपट पाहाताना. राक्षस हा शब्द जरी आपण वाईट अर्थाने वापरत असलो, तरी त्याचा खरा अर्थ होतो राखणारा! आणि खरोखरच हा चित्रपट प्रयोगशील तरीही मनोरंजक अशा तमिळ चित्रपटसृष्टीचे नाव बरोब्बर राखणारा आहे. या जॉनरचेच नव्हे, तर एकूणच चित्रपट माध्यमाचे चाहते असाल, तर चुकूनही चुकवू नका हा ‘राक्षसन’!

*४/५

— © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

One thought on “नाव राखणारा अद्वितीय थरारपट : राक्षसन (रात्ससन)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *