रुचकर तरीही अपुरा – सीताकाती

जयन्ति ते सुकृतिना: रससिद्धा: कवीश्वरा: ।
नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम् ।।
कला म्हातारी होत नाही, किंबहूना कला कधीच मरत नाही. ती अजर असते, अमर असते. हे आपण नेहमीच तात्त्विक रूपाने आसपास पाहातो, अनुभवतो. असेच अय्या आदिमूलम (विजय सेतुपती) हे रंगमंचावरील निष्णात अभिनेते आणि दिग्दर्शक. वयाच्या दहाव्या वर्षापासून हा माणूस रंगमंचालाच सर्वस्व मानून वावरतोय. त्यांच्या अभिनयपटूतेला पाहून अनेक नावाजलेल्या चित्रपट दिग्दर्शकांनी त्यांना सिनेमाची ऑफर दिली, परंतु त्या साऱ्या धुडकावून त्यांनी फक्त आणि फक्त रंगभूमीची सेवा केली आजवर. आता काळ बदललाय. लोकांना जिवंत रंगभूमीपेक्षा रंगीबेरंगी चित्रपट जास्त भुरळ घालू लागलेयत. रंगमंच ओस पडू लागलेयत. तरुणाई त्याकडे पाठ फिरवू लागलीये. जसजसा जनप्रवाह आटत चाललाय, तसतसे अय्यांच्या समोर असलेले आर्थिक प्रश्न रौद्ररूप धारण करू लागलेयत. अय्यांचं वय ७३ आहे. ते थकलेयत, काहीसे हरलेयत. पण रंगभूमीवर असलेलं त्यांचं अपरंपार प्रेम अणुमात्रही उणावलेलं नाहीये. गोष्टी आकार घेता घेताच त्यांचा रोख बदलतो आणि सबंध चित्रपटच कल्पनाविलासाच्या, फँटसीच्या अद्भुत विश्वात शिरकाव करतो.

चित्रपटात वापरलेला फँटसीचा घटक सहजी पटण्यासारखा नाही. परंतु प्रत्येक सिनेमाचे स्वतःचे असे एक विश्व असते. त्याचे त्याच्यापुरते काही नियमही असतात. आपल्या जगाचे नियम त्याला लागत नाहीत, किंबहूना ते लावूही नयेत. लेखक-दिग्दर्शक बालाजी धरणीधरनने पटकथेत उभारलेल्या विश्वात ती गोष्ट किंचितश्या संघर्षानंतर का होईना, पटते. आणि अतिशय शोकांत मार्गाला जाणारा चित्रपट अचानकच विनोदाची नाव पकडून झुलू लागतो! आणि विनोदही कसा, तर अतिशय नैसर्गिक; कोणताही छल न करता सहजसाध्या परिस्थितीतून उद्भवणारा. इतका निखळ की त्या परिस्थितीत दुसरं काही संभवतच नाही, असंच दिग्दर्शक आपल्याला वाटायला लावतो. हळूहळू ही विनोदाची गाडी प्रहसनाच्या राज्यात शिरते. इथे दिग्दर्शक विनोदाच्याच अंगाने कला आणि तिच्याशी संबंधित खूप साऱ्या गोष्टींवर भाष्य करतो.

थोडक्यात सांगायला गेलं, तर ‘सीताकाती’चे तीन भाग पडतात. शोकांतिका, कल्पनाविलासात्मक विनोद, आणि प्रहसन. तिन्हीही भाग वेगवेगळे पाहिले तर ते अतिशय प्रभावी झाले आहेत. परंतु हे तीन भाग जेव्हा एकच चित्रपट म्हणून गुंफले जातात, तेव्हा ते एका मर्यादेपलिकडे प्रभाव पाडत नाहीत. विशेषतः शेवटचा भाग. १७३ मिनिटे, असा भलामोठा काळ चालणारा चित्रपट, पण तरीही त्याचा शेवट उरकून घेतल्यासारखा वाटतो. शिवाय पहिला जवळजवळ पाऊण तास आपल्याला अय्यांची मनोभूमिका सांगण्यासाठी दिलाय, परंतु नंतर मात्र त्या फँटसी घटकाचे विचार, मन:स्थिती, तिची बाजू यांपैकी काहीही समोर येत नाही. चित्रपट हा माणसांच्या नजरेतून पाहात असल्यामुळे हा मार्ग तर्कशुद्ध वाटतोही, परंतु याच मार्गामुळे चित्रपट अपूर्णही वाटतो. दुसरे असे की ‘सीताकाती’मध्ये अय्यांची भूमिकाच नसलेले चित्रपट त्यांच्या नावावर विकण्याचा निषेध केलाय. प्रत्यक्षात ‘सीताकाती’मध्येच विजय सेतुपतीची भूमिका एक्स्टेंडेड कॅमिओ म्हणता येईल एवढ्याच लांबीची आहे आणि तरीही पोस्टर्सवर त्यालाच मुख्य स्थान आहे. थोडक्यात, ज्या गोष्टीचा चित्रपटात निषेध केलाय, तीच गोष्ट अगदी किंचित प्रमाणात का होईना या चित्रपटाने सुद्धा केलीये. चित्रपटाचे छायांकन, संपादन अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आहे. परंतु तरीही काही काही दृश्यांची लांबी अतिशय खटकत राहाते. चित्रपटाच्या पूर्वार्धात एक अतिशय विनोदी प्रसंग येतो. उत्तरार्धातही बरोब्बर त्याच प्रकारचा एक प्रसंग आहे. दोन्हीतील कलाकार वेगळे, अभिनय वेगळा; पण तरीही पुनरावृत्तीचा दोष आल्याशिवाय राहात नाही. हे टाळता आले असते. विशेषतः इतकी वेगळी, जबरदस्त आणि अविश्वसनीय संकल्पना असताना, हाताशी श्रेष्ठतम कलाकार आणि तंत्रज्ञ असताना, लेखनावर जास्त मेहनत घेणे फारच गरजेचे होते. ती नाही घेतली तर चित्रपटाचा ‘षमिताभ’ होऊ लागतो.

मी वर म्हटलंय की विजय सेतुपतीचा चित्रपटात एक्स्टेंडेड कॅमिओ असल्यासारखा वाटतो. याचा अर्थ असा बिलकुल नाही बरं का की तो वाईट आहे. उलट आपल्या पंचविसाव्या चित्रपटात त्याने केलेली भूमिका ही खचितच अविस्मरणीय आहे. या माणसाच्या एवढा जबरदस्त कारकीर्दीचा आलेख मी अलिकडच्या काळात कुणाचाच पाहिलेला नाही. वयाच्या पस्तिशीनंतर त्याने सुरुवात केली आणि एकामागोमाग एक वेगळ्या वाटेवरचे चित्रपट करत तो अल्पावधीतच शिखरावर जाऊन पोहोचला. आणि तरीही, तरीही तो प्रत्येक चित्रपटात त्याच्या आधीच्या चित्रपटातील अभिनयापेक्षा दोन पावले पुढेच जातोय! त्याच्या या वर्षीच्याच भूमिकांचे वैविध्य पाहा. ‘९६’मध्ये पहिल्या प्रेमासाठी सर्वस्व अर्पिलेला राम, ‘सीसीव्ही’मध्ये दारुडा व काहीसा भ्रष्ट पोलिस अधिकारी रसूल आणि यात ७३ वर्षांचा रंगकर्मी अय्या! केवढे वैविध्य आणि तरीही प्रत्येक भूमिका तितकीच ताकदीने वठवलेली. या चित्रपटात अय्यांची विविध नाटके दाखवताना एका नाटकात त्यांनी औरंगज़ेबची भूमिका केलेली दाखवलीये. तब्बल ८-१० मिनिटांचा प्रसंग आहे तो. आणि त्या प्रसंगाचं वैशिष्ट्य सांगू? सबंध प्रसंग एकाच शॉटमध्ये केलाय! या प्रसंगात कॅमेरा जेवढा उत्कृष्ट हालचाली करतो, त्याहूनही अनेकपटींनी उत्कृष्ट काम केलेय विजय सेतुपतीने. हा प्रसंग इतक्या प्रचंड ताकदीने करू शकणारे अक्षरशः हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक असतील सध्याच्या आघाडीच्या नायकांमध्ये! हा प्रसंग खरोखरच कोणत्या नाटकातून घेतलाय की काय, मला ठाऊक नाही. परंतु त्यातील एक वाक्य मला फारच आवडून गेलेय. म्हातारपणी एकट्या पडलेल्या औरंगज़ेबसमोर साक्षात संगीत उभे राहाते. तो संगीताशी वाद घालू लागतो. सच्चा मुसलमान असल्याचे दाखले देऊ लागतो. त्यावेळी संगीत त्याला म्हणते, ‘तू इतक्या वेळा स्वतःचा सच्चा मुसलमान म्हणून उल्लेख करतोयस की कधीकधी वाटतं तुझी तुलाच या बाबतीत शंका असावी’! एका वाक्यात सांगायचं झालं तर, प्रॉस्थेटिक्सच्याही पलिकडे जाऊन विजय सेतुपतीने अय्यांना आपल्या अंतरात्म्यात उतरवलंय, इतकं की पडद्यावर एका क्षणासाठीही विजय सेतुपती नसतोच, फक्त आणि फक्त अय्याच असतात! त्याची देहबोली, हावभाव, श्वासोच्छ्वासाचे गणित सारे सारे काही डोळ्यांत कायमचे साठवण्यासारखे झालेय!

जितकी स्तुती विजय सेतुपतीची करायला हवी तितकीच अजून एका व्यक्तीचीही केली पाहिजे. गोविंद वसंता! हा अत्यंत प्रतिभाशाली संगीतकार, गायक आणि वादक तैक्कुडम ब्रिज ऐकलेल्यांसाठी नवा नाही. परंतु जेव्हापासून त्याने वेगळ्या नावाने संगीत द्यायला सुरुवात केलीये, तेव्हापासून त्याचे आधीच सर्वांगसुरेख असलेले संगीत विलक्षणच होऊ लागलेय. त्याचा ‘९६’ तर माझ्यामते यावर्षीचा सर्वश्रेष्ठ रहमानेतर अल्बम आहे. याही चित्रपटाची गाणी त्याने तितकीच सुरेख आणि कथेच्या मूडला बरोब्बर न्याय देणारी केली आहेत. ती जितकी प्रायोगिक आहेत, तितकीच गोडसुद्धा. त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो लिरिक्स चांगलेच असतील, यावर खूप भर देतो आणि त्यामुळे त्याच्या गाण्यांची एकूणच शेल्फ़ व्हॅल्यू अनेकपट वाढते. आजकालच्या बहुतांशी हिंदी, मराठी संगीतकारांनी त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे ही. जवळजवळ तीन तास चालणारा हा चित्रपट जरादेखील कंटाळवाणा वाटत नाही, याचेदेखील महत्त्वाचे कारण म्हणजे याच अवलियाचे अफलातून पार्श्वसंगीत! राजा, रहमान यांचे वैशिष्ट्य म्हणजे ही मंडळी कसाही प्रसंग असला तरी आपल्या पार्श्वसंगीताच्या जोरावर त्याला दैवी उंचीप्रत नेऊन ठेवतात. जर गोविंद वसंताने हेच सातत्य कायम राखले, तर त्याचेही नाव येत्या काही वर्षांत या सूचीत समाविष्ट होऊ शकते, एवढे सुंदर काम केलेय त्याने. विशेषतः विनोदी प्रसंग सारेच परिस्थितीजन्य असल्यामुळे ते खुलवण्यात तर संगीताचा वाटा जास्तच महत्त्वाचा आहे.

थोडक्यात, ‘सीताकाती’ हा पदार्थ अतिशय रुचकर आहे. परंतु प्रत्येकच घासाला काही ना काही कमी वाटत राहाते. अखेरीस ताटभर खाऊनही जेवण अपुरेच राहिल्यासारखे वाटते. अर्थातच, चित्रपटाच्या काही त्रुटी आहेतच. परंतु त्यांचा हेतू, त्यांची संकल्पना अतिशय उदात्त व नावीन्यपूर्ण आहे. ती पडद्यावर मांडताना किंचित गडबड झालेली असली तरीही विजय सेतुपतीने जे काही केलेय ते अक्षरशः दैवी आहे. आणि आपल्याकडे, विशेषतः हिंदीत असा दैवी अभिनय क्वचितच पाहायला मिळत असल्यामुळे, अभिनय कशाशी खातात हा प्रश्न न पडण्यासाठी तरी त्याचे काम पाहाणे अत्यंत आवश्यक आहे. सिनेमा रंगभूमीचे सामर्थ्य जितक्या ताकदीने अधोरेखित करतो तितक्याच ताकदीने चित्रपट या माध्यमाचेही सामर्थ्य उत्तरार्धात मांडतो. दोन्हीही कलाप्रकार आपापल्या जागी केवढे श्रेष्ठ आणि तरीही एकमेकांपेक्षा वेगळे व समांतर रेषेवरून चालणारे आहेत हे न बोलताच मांडणारा ‘सीताकाती’ हा खरोखर वेगळाच चित्रपट आहे!

*३/५

— © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *