अॅक्वामॅन – समतोलाच्या दिशेने

२००८ साली एमसीयू सुरू झाल्यापासून मार्व्हलने जी एक थीम जशीच्या तशी राखलीये, ती ही की ते त्यांच्या पात्रांना एका मर्यादेपलिकडे अजिबात गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळे त्यांचे चित्रपटदेखील हलकेफुलके, सगळे मिळून आनंद लुटू शकतील असे रंगीबेरंगी असतात. एकाचवेळी कॉमिकनर्ड्स आणि सामान्य प्रेक्षक यांना खुश करण्याचे समतोल सूत्रच जणू त्यांनी शोधलेय. याउलट डिसीने त्यांच्या अतिमानवी पात्रांची मानवी बाजू शोधण्यावर जास्त भर दिला. परिणामतः त्यांची पात्रे अधिकाधिक गंभीर, आयुष्यातील कटकटींनी सतावल्यामुळे सतत ओढलेल्या चेहऱ्यांची होत गेली. त्यांच्या रुक्ष जीवनात विनोद मृगजळासारखा झाला. त्यांचे चित्रपटही तितकेच भेसूर होत गेले. एकीकडे मार्व्हलच्या अतरंगी चित्रपटांनी प्रचंड यश पाहिले, तर दुसरीकडे डिसी जास्तीत जास्त श्यामरंगी व टीकेचे धनी होऊ लागले. आणि २०१७ साली ‘वंडर वुमन’ आला! याची २ वैशिष्ट्ये. एक म्हणजे हा चित्रपट स्त्रीकेंद्रीत होता. ही हिंमत मार्व्हलनेही आजवर कधीच दाखवली नव्हती. आणि दुसरे म्हणजे या अफलातून स्त्रीच्या आयुष्यात जरासा का होईना, विनोद होता! त्याच्या पुढच्याच वर्षी आलेला ‘डेडपूल २’ जरी एमसीयूचा भाग नसला, तरी त्यात विनोद, मनोरंजन आणि पात्रपरिपोष सगळ्याचाच समतोल ढळला होता. इथे पारडे झुकू लागले. आपल्या पात्रांचा स्वभाव कायम राखूनही त्यांच्या आयुष्यात किंचित रंग भरण्याची किमया डिसी हळूहळू शिकू लागले होते. या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालाय, डिसीचा ‘अॅक्वामॅन’!

कथा अगदीच साधी आहे. म्हणजे ‘बाहूबली’ (२०१५-१७) नावाची रुपेरी पडद्यावरील महागाथा जर दोन भागांत विभाजित न करता संपादित करून एकाच भागात बसवली आणि त्यात शब्दशः भरपूर ‘पाणी घातलं’, तर जी होईल ती! या कथेत बाहूबली आहे, भल्लालदेव आहे, कट्टप्पा आहे, देवसेना आहे, अवंतिका आहे, शिवगामी आहे; अगदी सगळा सगळा गोतावळा आहे. फक्त कोण नेमकं कोण आहे आणि ही पात्रं वेगवेगळीच आहेत की काहीवेळा एकमेकांमध्ये मिसळली आहेत, हे मी सांगणार नाही. लक्षात घ्या, कथा ‘बाहूबली’ची आहे याचा अर्थ ती ‘बाहूबली’वरून उचललीये किंवा ‘बाहूबली’ने त्यांची कथा मूळ ‘अॅक्वामॅन’वरून उचललीये, या दोन्हींपैकी काहीही मी सुचवू इच्छित नाही. मी पूर्वी कुठेतरी वाचलं होतं की, जगात मूळ कथा फक्त ५ च आहेत. त्याअर्थी कोणत्याही दोन कथा या कोणत्या ना कोणत्या पातळीवर एकमेकींसारख्या असणारच. ‘अॅक्वामॅन’चे ‘बाहूबली’शी जरा जास्तच साम्य आहे, एवढंच! तसं ते काही प्रमाणात ‘ब्लॅकपँथर’चंही (२०१८) होतंच. परंतु ‘बाहूबली’च्या मुळाशी महाभारत असल्यामुळे ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्’ न्यायाने या गोष्टी सहज शक्य आहेत. याला चोरी म्हणत नाहीत. गंमत अशी की, ‘बाहूबली – द कन्क्ल्युजन’मधील प्रसिद्ध गीत ‘ओक्क प्राणम्’सारख्याच थीमवर, त्याच प्रकारचे व्हिज्युअल्स असलेले एक गीत ‘अॅक्वामॅन’मध्येही आहे, आता बोला!! यह थोडा ज़्यादा हो गया!!

‘बाहूबली’चा विषय निघालाच आहे, तर एक मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे. त्या चित्रपटाचीही कथा काही फार वेगळी, पुढे काय होणार याचा अंदाज बांधता न येण्यासारखी होती का? तर अजिबातच नाही. तो चित्रपट त्याच्या कथेमुळे श्रेष्ठ नाहीये, तर त्या सामान्य कथेच्या असामान्य मांडणीमुळे तो श्रेष्ठ आहे. तीच बाब ‘अॅक्वामॅन’लाही लागू पडते. कथा (जिऑफ जोन्स, जेम्स वॅन, विल बिल) क्लिषेड असली, पटकथा (डेव्हिड लेस्ली जॉन्सन-मॅक्गोल्ड्रिक, विल बिल) उत्तरार्धात किंचित रस्ता चुकल्यासारखी असली, तरीही दिग्दर्शक जेम्स वॅनची हाताळणी मात्र लाल्याच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘एकदम कॅडॅक्क’ आहे! डिसी युनिव्हर्समध्ये एखादं जग एवढं सतरंगी असू शकतं, त्यातली सगळीच नाही परंतु मुख्य पात्रं एवढी मजेदार असू शकतात आणि त्यांची कहाणी एवढी तुफान मनोरंजक असू शकते या अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत अशक्य वाटणाऱ्या सगळ्याच गोष्टी जेम्स वॅनने प्रत्यक्षात आणून दाखवल्यायत. डिसीचा पार चेहरामोहराच बदलून टाकला वॅनभाऊंनी!! आणि या बाहूबलीयन (आपल्याकडे बाहूबली असताना उगाच हर्क्युलियन का म्हणू मी!) कार्यात भाऊंना खंबीर साथ दिलीये ती जेसनमामांनी! याला मराठी न जाणणारे लोक उगाचच जेसन मोमोआ वगैरे म्हणतात, पण ते एक असो. खाल ड्रोगो आणि बाहूबलीच्या मिश्रणामुळे हा ‘हाफ-ब्रीड’ (कोटी हेतुत:) काहीच्या काही जबरदस्त झालाय. तो जितका देखणा आहे, त्याहून जास्त तो पडद्यावर करतो ती प्रत्येकच गोष्ट देखणी वाटते. हिरोच तो! त्याला वेळोवेळी हिरोपदाला शोभेल अशा खूप साऱ्या ‘वाजीव शिट्ट्या, बडीव टाळ्या’ एण्ट्रीज आहेत. आणि सबंध चित्रपटात तो अशा काही आवेश, आत्मविश्वास आणि आविर्भावात वावरलाय की, त्याच्यासमोर साक्षात हल्क जरी आला तरी तो त्याला कुत्र्यासारखा मारेल आणि वर तो मेलाय याची खात्री करण्यापुरतंही मागे वळून पाहाणार नाही, हे शंभर टक्के सत्य भासतं! याउलट अॅम्बर हर्ड ही दृष्ट लागण्याइतकी देखणी दिसते, पडद्यावर निरनिराळ्या करामतीसुद्धा करते परंतु चेहरा मात्र कायम गर्दीत पर्स मारली गेल्यासारखा चिंताक्रांतच! म्हणजे मारामारी करतेय, चेहरा असाच. समजावून सांगतेय, चेहरा असाच. रोमान्स करतेय, चेहरा असाच! बाकी निकोल किडमन, टेम्युरा मॉरिसन, विल्यम डॅफो, पॅट्रिक विल्सन, डॉल्फ लंडग्रेन यांनी त्यांची कामे चोख बजावली आहेत. याह्या अब्दुल मतिन – दुसरा, याने साकारलेला ‘ब्लॅक-मॅण्टा’ मस्तच झालाय, परंतु पुढच्या भागांमध्ये त्याचा अधिक पात्रपरिपोष होईल, अशी अपेक्षा करुया. आणि हो, रुपर्ट ग्रेगसन-विल्यम्सचं संगीत ‘वंडर वुमन’प्रमाणेच याही चित्रपटात फारच कमाल आहे!

आर्थरच्या लहानपणी भल्यामोठ्ठ्या अॅक्वेरियममधील सगळे मासे त्याच्या पाठिशी गोळा होतात, हा प्रसंग अक्षरशः अंगावर काटा आणणारा झाला आहे. तसाच आर्थर आणि मेराने समुद्राखाली ट्रेंचच्या समूहातून वाट काढत जाण्याचा प्रसंगही वॅनच्या आधीच्या फिल्मोग्राफीची आठवण करून देणारा झाला आहे. पण राहून राहून वाटत राहातं की, मनुष्याने समुद्रात टाकलेला बेसुमार कचरा, या मुद्याला चित्रपटात केवळ हलका स्पर्श करून सोडून दिलंय, त्याऐवजी जर तोच मुख्य मुद्दा असता आणि त्याभोवतीच अॅक्वामॅनची ओरिजिन-स्टोरी गुंफली गेली असती तर? तर चित्रपट लाखपटींनी जास्त ससंदर्भ आणि मजेदार वाटला असता. असो, सारेच काही आपल्या मनासारखे थोडीच होते! परंतु’वंडर वुमन’च्या वेळी झुकू लागलेले पारडे ‘अॅक्वामॅन’ने समतोलाच्या दिशेने फारच जास्त झुकवलेय. एमसीयूची तिसरी फेज संपत आलेली असताना डिसीला सुर सापडू लागणे किंचित उशिर झाल्यासारखे वाटेल. परंतु उशिरा काय किंवा लवकर काय, समतोल हा शेवटी समतोलच असतो. तो साधणे महत्त्वाचे. ‘अॅक्वामॅन’लाही तो पूर्णार्थाने साधता आलेला नसला तरीही त्याने डिसीला समतोलाच्या कधी नव्हे इतक्या जवळ नेऊन ठेवलेय. ते कसे, हे थिएटरमध्येच आणि तेही थ्रीडीतच पाहाणे, ही एक वेगळीच मजा आहे!!

*४/५

— © विक्रम श्रीराम एडके
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *