2.0 नव्हे, ‘शंकर 2.0’

मी परवाच एका व्याख्यानात बोललो होतो की, दिवसेंदिवस आपण सारेच तंत्रज्ञानावर नको तितके अवलंबून राहू लागलोय. याचे शारीरिक, मानसिक परिणाम कल्पनातीत आहेत. जणू काही एखाद्या टाईमबॉम्बचं टायमर सुरू करून त्यावर बसलो आहोत आपण. तो फुटेल तेव्हा काय होईल? भयंकर कल्पना आहे ही! भारतीय चित्रपटसृष्टीतील खऱ्या अर्थाने शो-मन म्हणावा अश्या दिग्दर्शक शंकरचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? तो अश्याच रोजच्या आयुष्यातल्या कल्पना घेतो. सत्य हे कल्पनेहून भंयकर असतं म्हणतात, परंतू शंकर त्या कल्पनेला सत्याहूनही भयंकर कल्पनेचा तडका देतो. त्यातून साकारतो तो शंकरचा कोणताही अतिप्रचंड सिनेमा! “2.0”ची कल्पनाही अशीच साधी. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे पक्ष्यांना विकिरणांचा होणारा त्रास सबंध मानवजातीला (जशी हॉलिवूडच्या चित्रपटांत मानवजात म्हणजे अमेरिका असते, तशी ती इथे चेन्नई आहे!) कडेलोटापर्यंत घेऊन जातो आणि त्याच्याविरोधात लढण्यासाठी माणसांना परत एकदा आणावा लागतो, काही वर्षांपूर्वी विंखडित केलेला चिट्टी (रजनीकांत)!

वाचायला, ऐकायला ही कल्पना जेवढी जबरदस्त वाटते, तेवढीच ती साकारायला अवघड आहे. अगदी शंकरलासुद्धा! शंकरच्या बहुतांशी सिनेमांमध्ये नायक गुप्तरूपाने समाजातील वाईट शक्तींना संपवण्याचं काम करत असतो. आठवा, “जंटलमन” (१९९३), “इंडियन” (१९९६), “आन्नियन” (२००५). “2.0”मध्ये मात्र नेमका हाच घोळ झालाय की, ही हिरोगिरी करणाराच खलनायक आहे! त्यामुळे सुरूवातीला त्याचा द्वेष करणारे आपण, त्याची कथा समजल्यावर त्याचा द्वेष करूच शकत नाही. या त्रुटीवर मात करण्यासाठीच जणू शंकरला जवळजवळ अर्धा तास चालणारा उत्कर्षबिंदू लिहावा लागलाय. आणि तो ज्या प्रचंडाहूनही प्रचंड पातळीवर नेऊन मांडलाय, त्याला तोड नाही.

रजनीकांत हा किती जरी सुपरस्टार असला, तरी त्याचा अखेरचा पूर्णार्थाने समाधानी करणारा सिनेमा हा शंकरचाच “यन्धिरन” (२०१०) होता. त्यानंतर रजनीने एक तर “कोचडय्यान” (२०१४), “लिंगा”सारखे (२०१४) चुकलेले सिनेमे तरी केलेयत अथवा “कबाली” (२०१६) आणि “काला”सारखे (२०१८) अजूनच जास्त चुकलेले सिनेमे तरी केलेयत. त्याच्या बॉक्सऑफिसवरील साम्राज्याला ओहोटी लागू लागलीये. त्या पार्श्वभूमीवर “2.0” हा त्याच्यासाठी अखेरच्या संधींपैकी आहे. आणि काय सांगू, रजनीने या संधीचे नुसते सोनेच नव्हे तर त्याहूनही खूपच जास्त केलेय. खूप वर्षांनी खऱ्या अर्थाने बहरलेला, बेभान असा रजनी पाहायला मिळाला. त्याने या चित्रपटात एक नव्हे तर तब्बल ४ वेगवेगळी रूपं साकारलीयेत आणि प्रत्येक रूप त्याच्या असीम क्षमतेची साक्ष देणारे आहे. तशीच गोष्ट अक्षयकुमारचीही. त्याचाही गेल्या वर्षापासून सॅच्युरेशन पॉईंट येऊ लागला होता. त्याचे चित्रपट यशस्वी होत होते, पण एका मर्यादेतच. त्यापलिकडे त्याचे आकडे जात नव्हते आणि तो सुद्धा स्वतःवर प्रयोग करत नव्हता वा स्वतःवर जोर लावत नव्हता. या चित्रपटात त्याने स्वतःवर घालून घेतलेले ते सगळे बरेवाईट नियम मोडलेयत आणि निकाल हा चांगल्याहूनही चांगला आलाय. हा खरा अक्षयकुमार आहे. त्यानेसुद्धा तब्बल २ वेगवेगळी रूपं साकारलीयेत आणि तितक्याच ताकदीने साकारलीयेत. अक्षयकुमार जर प्रत्येकच चित्रपटात अशी मेहनत घ्यायचे शिकला, तर तो आत्तापेक्षाही अनेक पटींनी पुढे जाईल. परंतु त्याची सवय त्याला हे करू देईल का, हा मोठाच प्रश्न आहे. अॅमी जॅक्सनची भूमिका या दोघांपेक्षाही चपखल जमलीये. ती एवढी सुंदर दिसते, एवढी सुंदर दिसते की, तिला अभिनय करण्याची कधी गरजच पडली नाही. त्यामुळेच की काय ती कायम निर्जीव, यांत्रिक पद्धतीचा अभिनय करते. तोच तिने इथेसुद्धा केलाय. पण गंमत अशी की, तिची भूमिकाच इथे यंत्रमानवीची असल्यामुळे तिच्या क्षमतेचा (खरं तर त्रुटीचा!) इथे शंभर टक्के वापर झालाय! मागच्या चित्रपटात जशी डॉ. बोहराला (डॅनी) साईडव्हिलनची भूमिका होती तसेच इथे सुधांशू पांडे या गुणी अभिनेत्याला डॉ. बोहराच्या मुलाची फुसकी भूमिका देऊन तितक्याच फुसक्या कामासाठी ठेवून घेतलेय.

“2.0”चा मुख्य गुणधर्म हा, की तो पहिल्या दृश्यापासूनच विषयाला हात घालतो. त्यापासून कुठेच हटत नाही. ही जशी चांगली गोष्ट आहे, तशीच वाईटसुद्धा आहे. वाईट यासाठी की, शंकरचे वैशिष्ट्य असलेली कॉमेडी या चित्रपटात पाहायला मिळत नाही. जी काही कॉमेडी आहे ती निला (नाईस, इंटेलिजंट, लव्हली असिस्टंट) अर्थात अॅमी जॅक्सन तरी करते नाहीतर चिट्टी तरी करतो. चित्रपटात खूप सारे स्थानिक संदर्भ आहेत. खासकरून तमिळ सिनेमांचे. ते तमिळमध्ये जितके खुलतात, तितके हिंदीत खुलतीलच, असे नाही. शिवाय थेट विषयाला हात घालताना चित्रपटाचा पूर्वार्ध हा खूपच इन्व्हेस्टिगेटिव्ह पद्धतीचा झालाय. तो अजिबात कंटाळवाणा नाही. छानच आहे. परंतु हाती रजनीकांत आणि अक्षयकुमारसारखे योद्धे असताना, जितक्या ठिणग्यांची अपेक्षा करू, तितक्या त्या उडत नाहीत. उत्तरार्धात मात्र चित्रपट आपल्या अपेक्षा शतपटींहूनही अधिक पूर्ण करतो. तरीदेखील तो किंचित अधिक मानवी, भावनांचा अन्वयार्थ लावणारा, पक्षीराजनच्या दुसऱ्या रुपाच्या अंतरंगात डोकावणारा असायला हवा होता, असे वाटत राहाते. शंकरने भव्यतेच्या सर्वच सीमा अक्षरशः ओलांडल्या आहेत. नुसत्या ओलांडल्याच नव्हे, तर चोळामोळा करून, फेकून देऊन पुन्हा नव्याने आखल्यायत! हा चित्रपट जर तुम्ही थिएटरशिवाय अन्य कुठेही पाहाण्याचे ठरवत असाल, तर तुमच्यासारखे करंटे तुम्हीच! हा भारतातला पहिला खऱ्या अर्थाने त्रिमितीय सिनेमा आहे. त्याच्या ध्वनीमध्येही आजवर कधीच न करण्यात आलेले प्रयोग केलेयत. रहमानचं पार्श्वसंगीत गगनाच्याही मर्यादा ओलांडून कसे जाते, ते मोठ्या स्क्रिनवरच अनुभवले पाहिजे. तिच गोष्ट विभासांची. भारतात आजवर कधीच न अनुभवलेले विभास या मंडळींनी अतिशय यशस्वीरित्या बनवून दाखललेयत. आता तुम्ही जर याची तुलना हॉलिवूडशी करणार असाल, तर ते मुळातच चूक आहे. एक तर या मंडळींचे जे बजेट आहे, ते अतिशय कमी आहे. जेव्हा “बाहूबली”सारखा एखादा चित्रपट केवळ २५० कोटींच्या बजेटमध्ये विभासांचा भरपूर वापर करूनही पैसा कमावून दाखवतो, तेव्हा कुठे “2.0”ला ५५० कोटींचे बजेट मिळते. त्या अर्थी हे या विषयातल्या आपल्या अगदी सुरुवातीच्या पावलांपैकी आहे. जेव्हा आपल्याकडे हॉलिवूडइतके बजेट मिळायला लागेल, तेव्हा हॉलिवूडचे तथाकथित ब्लॉकबस्टर्स आपल्या प्रतिभेच्या भराऱ्यांपुढे पोरखेळ वाटू लागतील, लिहून ठेवा! मला जाणवलेला सगळ्यांत मोठा विरोधाभास मात्र हा की, मोबाईलच्या हव्यासापायी होणारे दुष्परिणाम मांडणारा हा सिनेमा बनवणारी लायका कंपनी मात्र मुख्यतः मोबाईलचेच उत्पादन करते!

वाईटाच्या आघाडीवर सांगायला गेलं तर चित्रपटाला ठहराव नाही. गोष्टी स्थिर व्हायच्या आधीच पुढे नेण्याची घाई झाल्याचे जाणवते. दुसरे असे की, दुर्दैवाने हा सिनेमा शंकरच्या काही ठराविक, त्याच त्या गोष्टींपासून मुक्त होत नाही. परंतु असे असूनदेखील काही गोष्टी लक्षात घ्यायलाच हव्या. शंकरचाच “नन्बन” (२०१२) हा बोलूनचालून रिमेक होता. “ऐ”वर (२०१५) सगळ्यांत जास्त टिका झाली होती ती त्याच्या लांबीवरून आणि अनावश्यक साईडट्रॅक व गाण्यांवरून. शंकरने या गोष्टींची बरोब्बर नोंद या चित्रपटात घेतलीये. त्याचा स्क्रिनप्ले किंचित अवघडल्यासारखा वाटतो, परंतु त्याने जागा असूनही कॉमेडीट्रॅक टाळलाय. शंकरसारखी गाणी सबंध भारतातच काय, जगात कुणी करत नसेल, इतका तो गाण्यातील बारीकसारीक शॉटवर विचार आणि खर्च करतो. पण या चित्रपटात एकही गाणे वेगळे वापरलेले नाही. ३ गाण्यांपैकी २ पार्श्वभागी राहून कथेला पुढे नेतात तर एक थेट चित्रपट संपल्यावर येते. तो सगळा खर्च त्याने कामात वळवलेला जाणवतो. त्यामुळे चित्रपटाची लांबी आपसूकच कमी झालीये. हा शंकरचा आजवरचा सगळ्यांत छोटा सिनेमा आहे. ‘कधी संपतोय’ वाटण्यापेक्षा एखादा चित्रपट ‘अरेच्चा संपलासुद्धा’ वाटणे कधीही श्रेयस्कर! या सगळ्या अर्थांनी बोलायला गेलं, तर हा नुसता सिनेमाच “2.0” नाहीये, तर या सिनेमामुळे स्वतःचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करणारा “शंकर 2.0” दिसणे जास्त सुखद आहे!

— © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

*३.७५/५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *