जीओटी आणि भारतीय प्रतिभा

“गेम ऑफ थ्रोन्स” ही जगभरात पाहिली जाणारी, कदाचित जगातली आजघडीची सर्वाधिक प्रसिद्ध मालिका आहे. पण या मालिकेच्या न भूतो न भविष्यति यशात भारताचा सिंहाचा वाटा आहे, हे आपणापैकी किती जणांना ठाऊक आहे?

या मालिकेच्या एकूणएक सूक्ष्मातिसूक्ष्म तपशीलांवर बारीकसारीक काम केलेले दिसते. अगदी प्रत्येक संस्कृतीच्या पोषाखांमध्ये आणि विविध ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वस्त्रप्रावरणांमध्येदेखील अनेक अर्थ लपलेले आहेत. हे कपडे, तंबू वगैरे कुठे तयार होतात माहितीये? आपल्या दिल्लीतल्या लाजपतनगरमध्ये! अगदी पहिल्या पर्वापासून लाजपतनगरमधील “रंगारसन्स” ही कंपनी मालिकेतील सर्व वस्त्रप्रावरणे पुरवते.

आणि सांगतो! ड्रॅगन्स!! अतिशय तपशीलवार तयार केलेले हे घातक परंतु आपल्या लाडक्या आईसाठी जीवाची बाजी लावणारे प्राणी कुठे तयार होतात माहितीये? आपल्या मुंबईतल्या “प्राणा स्टुडिओज”मध्ये!

होय, ड्रॅगन्सचे विभास (व्हिज्युअल इफेक्ट्स) मुंबईत बनतात. याउप्पर, या मालिकेतल्या सुघड तलवारी. त्यादेखील भारतातच बनतात हे क्वचितच कुणाला ठाऊक असेल! जॉन स्नोची “लाँगक्लॉ” असो, नेडची “आईस” असो, ब्रिएनची “ओथकिपर” असो, सर आर्थर डेनची “डॉन” असो, आर्याची “नीड्ल” असो अथवा अन्य कोणतीही तलवार! नाव असलेली वा नसलेली, पण मालिकेतली एकूण एक तलवार भारतात बनते. अगदी व्हॅलेरियन स्टीलच्या तलवारीसुद्धा भारतातच बनतात. विण्डलास स्टीलक्राफ्ट्स ही देहरादूनस्थित कंपनी या सर्व तलवारी बनवते. केवळ तलवारीच नव्हे तर सगळी चिलखते, अगदी जॉनस्नोचा क्लोकसुद्धा!!

थोडक्यात मालिकेसाठी लागणारी बहुतांश प्रॉपर्टी ही भारतात बनते, भारतीयांकडून बनवली जाते. भारत हा खरोखर प्रतिभेचे आणि कारागिरीचे भांडार आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, हे समजायला आपल्याला एका पाश्चात्य मालिकेची गरज पडतेय. डेनेरिसचे ड्रॅगन्स जर आपण हुबेहूब बनवू शकतो तर आमच्या मेगाबजेट चित्रपटांमधील विभास सामान्य का? याचे कारण एकच आहे की, आपल्याकडचे चित्रपट-मालिकाकार आपल्या लोकांवर ना विश्वास दाखवतात ना त्यांच्या प्रतिभेला स्वातंत्र्य देतात. विशेषतः आपल्या मालिका या केवळ आणि केवळ त्या-त्या चॅनेल्सच्या लहरींवर चाललेल्या, टिआरपीपुरत्याच उरलेल्या बटकी वाटतात. कल्पना करा “गेम ऑफ थ्रोन्स”चे एखादे पर्व सुरू आहे, दरम्यान दिवाळी आली आणि अवघे सेव्हन किंग्डम्स आपली मूळ कथा सोडून दिवाळी साजरी करताना दाखवले. किंवा सगळे अचानकच करवाचौथ वा स्वातंत्र्यदिन साजरे करू लागले. कल्पनादेखील करवत नाही ना? पण हे आपल्याकडच्या मालिकांमध्ये सर्रास चालते! कारण आम्हाला कथेपेक्षा टिआरपी जास्त महत्त्वाचा वाटतो.

मला आठवते, माझ्या लहानपणी मर्यादित भागांच्या आणि कथानकावरच लक्ष केंद्रित करणाऱ्या सुंदर मालिका असायच्या. अगदी दूरदर्शनवरील “नुक्कड”पासून ते पार झीवरील “रिश्तें”पर्यंत.

सिनेमांच्या इतकेच किंबहूना त्यांच्यापेक्षाही जास्त सिनेमॅटिक आणि कथात्मक प्रयोग केलेले असायचे मालिकांमध्ये. आता प्रयोग आणि कथांकन औषधालाही सापडत नाही कुठेच आणि कुणालाच त्याचे काही पडलेलेही नाही. पाश्चात्य चॅनेल्सवरच्या अनेकानेक सर्वांगसुंदर मालिकांच्या पार्श्वभूमीवर आपण शून्यात तर सोडाच उणेमध्ये आहोत अक्षरशः! मध्यंतरी कोणते तरी चॅनेल सुरू झाले होते. नाव विसरलो मी त्याचे. पण जगभरच्या मालिका हिंदीत डब करून दाखवायचे त्यात. अगदी पाकिस्तानी, तुर्की, इराणीसुद्धा! सुंदर कथा आणि जबरदस्त मांडणी. त्यांच्यातल्या एकाचीही सर आपल्या मालिकांना येत नाही हो. केवढा दर्जा खालावून घेतलाय आपण आपला!!

गुलज़ारने एका साक्षात्कारात (मुलाखत) सांगितलेला किस्सा आहे. तो “ग़ालिब़” बनवत होता तेव्हा चॅनेलने सांगितलं की, ‘५२ भागांची मालिका बनवा’. तर तो म्हणाला की, ‘एवढी मोठी कथा नाहीये ती’. मग म्हणाले, ‘१३ भागांची बनवा’. तर तो म्हणाला, ‘एवढी छोटीसुद्धा नाहीये ती’. मग काय करुया? गुलज़ार म्हणाला, ‘बघा माझी जेवढी कथा आहे तेवढीच मी सांगणार. तुमच्या नियमांत बसायला मी ती कापणार नाही वा पाणी घालून वाढवणारही नाही’. शेवटी “मिर्ज़ा ग़ालिब़” १७ भागांची बनली. आज ना कथेसाठी नियम वाकवणारे चॅनेल्स राहिलेत ना आपल्या अवकाशासाठी हटून राहाणारे दिग्दर्शक राहिलेत ना इतके कष्ट करून बनवलेल्या मालिकांच्या दर्जाचे प्रेक्षक राहिलेत. कदाचित हे तिन्ही असतीलही आजसुद्धा, पण चौकटीच्या बाहेर पडायची हिंमत मात्र कुणाचीच राहिलेली नाही हे खरे. त्यामुळेच आमच्याकडचे प्रतिभेचे झरे “गेम ऑफ थ्रोन्स”सारख्या ठिकाणी जातात आणि आम्ही या ब्रेनड्रेनलाच भारी म्हणून खुश राहातो. दर्जेदार मालिका नाहीत म्हणून प्रेक्षक नाहीत आणि प्रेक्षक नाहीत म्हणून दर्जेदार मालिका नाहीत. हे दुष्टचक्र भेदले पाहिजे. पण ते भेदणार कोण, हा यक्षप्रश्नच आहे!!

— © विक्रम श्रीराम एडके
(संपर्क: www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *