इंटेलिजंट, मनोरंजक, परिपूर्ण — विक्रम-वेधा

सम्राट विक्रमावर एक अवघड जबाबदारी येऊन पडते. दूर जंगलातल्या झाडावरून वेताळाला घेऊन येण्याची. तो पराक्रमी राजा जरादेखील न कचरता जंगलात शिरतो. वेताळाशी दोन हात करून त्याला पकडतो व खांद्यावर टाकतो. तो जायला निघतो तेवढ्यात खांद्यावर लादलेला वेताळ विचारतो, “ओरऽ कधा सोल्टऽ”? (एक गोष्ट सांगू?)!! ही सुरुवात आहे पुष्कर-गायत्री यांच्या “विक्रम-वेधा”ची. अॅनिमेटेड सिक्वेन्समध्ये दिसणारा हा दृश्यक्रम त्या वाक्यासोबतच लाईव्ह-अॅक्शनमध्ये परिवर्तित होतो आणि काही समजायच्या आतच प्रेक्षकांना एका भरीव कथानकात शोषून घेतो. चित्रपट संपल्यावरही तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाहीत.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट विक्रम (आर. माधवन) हा उत्तर मद्रासमधील डॉन वेधाला (विजय सेतुपती) शोधतोय. वेधा, ज्याच्या भयकारितेच्या नुसत्या कथाच सांगितल्या जातात, जो अपराध जगतातला जिनियस समजला जातो आणि जो बऱ्याच दिवसांत कुणाच्याच नजरेस पडलेला नाहीये. तो वेधा एका एन्काऊंटरनंतर स्वत:हूनच पोलिसांच्या स्वाधीन होतो. आता उरलेय ते फक्त त्याने आजवर केलेल्या गुन्ह्यांचा कबुलीजबाब घेणे. पण आजवर कधीच हाती न लागलेल्या वेधाने आत्मसमर्पण कसे काय केले? विक्रमला ही शंका सतावत असतानाच, चौकशीदरम्यान वेधा विक्रमला पहिली कथा सांगतो आणि चित्रपटातले गूढ अजूनच गहिरे होत जाते. तिथून रंगू लागतो, आजवर १६ खुन केलेला वेधा आणि १८ एन्काऊंटर केलेल्या विक्रम या दोघांमधला जबरदस्त मानसशास्त्रीय खेळ. विक्रम आपल्या कामात अतिशय प्रामाणिक आहे. सुरुवातीलाच एका एन्काऊंटरनंतर तो आपल्या एका सहकाऱ्याला सांगतो, “मी प्रत्येक एन्काऊंटरनंतर शांतपणे झोपू शकतो, कारण मला माहितीये मी चांगल्याच्या बाजूने आहे आणि वाईटाचाच खात्मा करतोय”. वेधा वेगवेगळ्या टप्प्यावर भेटतच राहातो, कथानकात विविध कोडी निर्माण करणाऱ्या गोष्टी विक्रमला सांगतच राहातो आणि एका टप्प्यावर विक्रमला रात्रीची ती शांत झोप लागणे बंद होते. कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, कोण धर्माच्या बाजूने आहे आणि कोण अधर्माच्या बाजूने; यांच्यातल्या सगळ्याच सीमा पुसून जातात. आपल्यासमोर जे होते ते खरे होते की जे नाही ते खरे, असे प्रश्न आपला पिच्छा पुरवू लागतात. कधी विक्रम चांगला वेधा वाईट वाटू लागतो तर दुसऱ्याच क्षणी वेधा चांगला विक्रम वाईट वाटू लागतो, पुढच्याच क्षणी दोघेही सारखेच वाईट ठरतात तर कधी दोघेही सारखेच चांगले ठरतात. यातून शेवटी जे घडतं ते तर अजूनच कल्पनातीत असतं.

पुष्कर-गायत्री या द्वयीचं वैशिष्ट्य हे की, त्यांनी त्यांच्या प्रेक्षकांना काडीमात्रही स्पून-फिडिंग केलेली नाही. ते प्रत्येक वेळी आपल्याला विचार करायला लावतात, समोर जे चालू आहे त्यात भाग घ्यायला लावतात आणि निवड करायला लावतात. पण त्याचवेळी ते सतत प्रेक्षकांच्या चार पावले पुढे राहून रहस्याच्या चाव्या शेवटपर्यंत त्यांच्याच ताब्यात राहातील याची व्यवस्थित काळजीसुद्धा घेतात. असे चित्रपट जबरदस्त असतात. त्यांचं रहस्य एकदा पाहून उलगडलं तरीही निव्वळ त्यातल्या क्राफ्ट्समनशिफ्टसाठी ते वारंवार पाहावेसे वाटतात. “विक्रम-वेधा” तर आपल्या नॉन-लिनियर मांडणीमुळे अजूनच बहारदार होतो. निओ-न्वार प्रकारचा अतिशय इंटेलिजंट सिनेमा असतानाच “विक्रम-वेधा” त्याचवेळी जबरदस्त पॉप्युलर मासवालासुद्धा राहातो. त्यात खटकेबाज संवाद आहेत, तुफान अॅक्शन आहे, जबरी डान्स आहेत आणि श्वास रोखून धरायला लावणारी अमाप दृश्ये आहेत. हे खास तमिळ इंडस्ट्रीचं वैशिष्ट्य! क्लास आणि मासचा इतका अभूतपूर्व संगम इतरत्र क्वचितच आढळतो. दिग्दर्शनासाठी आणि स्टोरीटेलिंगसाठी दिग्दर्शक द्वयीला पूर्ण गुण द्यायलाच हवेत.

पण त्याचबरोबर पूर्ण गुण द्यायला हवेत ते जबरदस्त कास्टिंगसाठी. मॅडी आणि विजय यांच्याइतक्या परिपूर्णतेने त्या भूमिका दुसऱ्या कुणीच निभावल्या नसत्या. गेल्या काही वर्षांत मॅडीने जाणीवपूर्वक आपली चॉकलेट-बॉय प्रतिमा बदलून “इरऽधी सूट्रऽ”/”साला खडूस”सारखे (२०१६) वेगळ्या वाटेवरचे चित्रपट करायला सुरुवात केली आहे. मणिरत्नमच्या मुशीत घडलेला माधवन हा अतिशय संपन्न अभिनेता असल्याचे “विक्रम-वेधा”च्या प्रत्येक चौकटीत जाणवत राहाते. पण “विक्रम-वेधा” जर का खऱ्या अर्थाने कुणी खाल्ला असेल, तर तो आहे विजय सेतुपती! कोणतीही खास पार्श्वभूमी वा कोणताही गॉडफादर नसतानाही अतिशय संघर्ष करून केवळ आणि केवळ वेगळ्या भूमिकांच्या जोरावर या माणसाने स्वतःला ज्या उंचीवर नेऊन ठेवलेय, ती खरोखर अनुभवण्याचीच गोष्ट आहे. हा चित्रपट मी मुंबईतील एका उपनगरात पॅक-हाऊसमध्ये पाहिला. मॅडीच्या एन्ट्रीला टाळ्या-शिट्यांचा पाऊस पडला, पण विजयच्या एन्ट्रीच्यावेळी अक्षरशः कानठळ्या बसाव्यात इतका जबरदस्त जल्लोष झाला आणि पुढे प्रसंगोपात होतच राहिला. तमिळ प्रेक्षकांना खरोखर उत्तम अभिनेत्यांची जाण आहे, हेच खरे! वास्तविक अतिशय भव्य कॅनव्हासचा हा चित्रपट आणि शेकडो पैलू असलेली भूमिका. पण विजय सेतूपतीने तिचे अक्षरशः सोने केलेय सोने! त्याचे संवाद, चेहऱ्यावरील हावभाव, माफक विनोद, सहजपणे सांगितलेले तत्त्वज्ञान, अॅक्शन, नृत्य सारेच जणू काही वेगळ्या जगतातले वाटते. ते तीन तास पडद्यावर जणू फक्त आणि फक्त वेधा नावाचा राऊडीच होता, विजय नव्हेच! कहर आहे हा माणूस, कहर!! जेव्हा केव्हा संधी मिळेल त्यावेळी त्याचं काम पाहा म्हणजे पाहाच!! वरलक्ष्मी शरदकुमार, श्रद्धा श्रीनाथ, हरीश पेराडी, प्रेम वगैरे सगळ्यांचीच कामे बहारदार झालीयेत. सॅम सी. एस. या नवीन संगीतकाराने तर कमालच केली आहे. विशेषतः “करप्पऽ वेळ्ळई” तर काहीच्या काही भन्नाट झालंय.

निओ-न्वार क्राईम-थ्रिलर प्रकारातल्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांची यादी करायची म्हटली तर “विक्रम-वेधा”ला त्यात निश्चितच स्थान द्यावे लागेल, यात कसलीच शंका नाही. सर्वच बाजूंनी अतिशय परिपूर्ण असलेला, प्रेक्षकांना विचार करायला लावणारा, कोडी सोडवायला लावणारा आणि तरीही जबरदस्त मनोरंजन करणारा “विक्रम-वेधा” तुमच्या गावी अथवा जवळ जिथे कुठे लागला असेल, तिथे जाऊन आवर्जून पाहावा; पुन्हा-पुन्हा अनुभवावा असाच झालाय. असेच चित्रपट कोणत्याही चित्रपटसृष्टीला पुढे नेत असतात. तमिळ इंडस्ट्रीला इथूनपुढे वर्षानुवर्षे अभिमान वाटत राहील की, त्यांनी “विक्रम-वेधा” बनवला आणि त्यांच्या प्रेक्षकांनाही!!

*५/५

— © विक्रम श्रीराम एडके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *