इन नोलान वुई ट्रस्ट

अवघा ८ वर्षांचा होता तो, जेव्हा ‘नासा’त काम करणाऱ्या एका नातेवाईकाने त्याला ‘अपोलो’ मोहिमेच्या प्रक्षेपणाचे फुटेज पाठवले होते. पठ्ठ्याने ते आपल्या पद्धतीने संपादित केले आणि ‘स्टॉप मोशन अॅनिमेशन’ तंत्रज्ञान वापरुन आपली पहिलीवहिली फिल्म बनवली, “स्पेस वॉर्स” (१९७८)! त्याचे नाव ख्रिस्तोफर नोलान!! पुढे भविष्यात तो बनवणार असलेल्या “इंटरस्टेलर”सारख्या (२०१४) महागाथेची चुणूक ही अशी होती. पुढे ९०च्या दशकात त्याने खूप साऱ्या कॉर्पोरेट फिल्म्स आणि शॉर्टफिल्म्स बनवल्या. यातल्या बहुतांश त्याची तेव्हाची प्रेयसी व सध्याची पत्नी एमा थॉमसने प्रोड्युस केल्या होत्या. सिनेमा बनवण्याचे त्याचे प्रयत्न मात्र काडीमात्रही यशस्वी होत नव्हते. मोठाच निराशाजनक काळ होता तो. परंतु याच काळात त्याने आता जिला लोक शोधून शोधून पाहातात अशी “डूडलबग” (१९९७) नावाची शॉर्टफिल्म बनवली आणि सोबतच “जेंगिज ब्ल्यूज” (१९९९) या ऑस्कर नामांकनप्राप्त माहितीपटाच्या संपादनावरही काम केले.

चित्रपट बनवण्याचे प्रयत्न सर्वच बाजूंनी अपयशी ठरत असल्याचे पाहून शेवटी त्याने स्वतःचेच पैसे घालून सिनेमा बनवायचे ठरवले. प्रोड्युसर अर्थातच पत्नी एमा! आणि असा जन्म झाला त्याच्या “फॉलोईंग”चा (१९९८)! फक्त ६ सहस्र डॉलर इतक्या कमी खर्चात बनलेल्या “फॉलोईंग”ने सगळ्याच स्तरांवर वाहवा मिळवली. अगदी आजही “नो बजेट फिल्म्स”च्या विषयात हा सिनेमा मैलाचा दगड समजला जातो! आणि अश्याप्रकारे २१ व्या शतकातील सर्वाधिक सेलिब्रेटेड फिल्ममेकरचे, इंडस्ट्रित दणक्यात आगमन झाले! यानंतर त्याने लगेचच बनवलेला “मेमेंटो” (२०००) माहिती नाही, असा सिनेरसिक क्वचितच सापडेल! मग मात्र नोलानने मागे वळून पाहिलेच नाही!

नोलानच्या अनेक सिनेमांबद्दल आपण सविस्तर बोलू शकतो. नव्हे, त्याच्या जवळजवळ प्रत्येक सिनेमावर एक स्वतंत्र दीर्घलेखच होऊ शकतो. परंतु तरीदेखील त्यांच्यात काही समान सूत्रे आढळतात, जी माझ्या दृष्टीने नोलानच्या स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वाची प्रतिबिंबे मानता येतील. त्याचा आजवरचा प्रत्येक सिनेमा हा डार्क, न्वार वर्गात मोडणारा आहे. नोलानचा कोणताही सिनेमा असो, त्याचे नायक हे अतिशय त्रासदायक पार्श्वभूमीतून आलेले असतात. ते स्खलनशील असतात, ते चुकतात, पडतात, ते आपले प्रियजन गमावतात – ते रुढार्थाने नायक नसतातच – ती असतात माणसे! तुमच्या-माझ्यासारखी सामान्य माणसे!! आणि म्हणूनच अत्यंत गुंतागुंतीची बीजं आणि तितकेच गुंतागुंतीचे कथन असूनही त्याचे सिनेमे कुणाच्याही ह्रदयाला भिडतात. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे खलनायक हे जवळजवळ प्रत्येक वेळी त्या नायकाचेच प्रतिबिंब असतात. ही मोठी मजेशीर गोष्ट आहे. आणि नोलानच्या याच गुणांमुळे त्याचा “बॅटमॅन” (२००६-२०१२) जास्त आपल्यातला वाटतो. किंबहूना, बेन अफ्लेकच्या “बॅटमॅन”ची आपण वारेमाप स्तुती करु शकतो, परंतु आपला बॅटमॅन कोणता असा प्रश्न असेल तर मात्र क्रिश्चन बेलखेरीज दुसरे कोणतेच नाव समोर येत नाही. नोलानने नुसता बॅटमॅन अजरामरच नाही केला, तर त्याला, नव्हे नव्हे अगदी बॅटमॅनशी संबंधित प्रत्येक पात्राला एक कल्चरल आयकॉन बनवले. एक सबंध पिढी या बॅटमॅनने पोसली. एक अब्जाधीश तरुण जो केवळ आपल्या आईवडलांच्या हत्येमुळे बुरखाधारी रक्षक बनतो, त्याला प्रत्येक वर्गातील प्रेक्षकाने आपलंसं करणे हा शब्दातीत चमत्कार केवळ नोलानच करु शकतो!! या आणि अश्याच गोष्टींचा परिपाक म्हणून एक अर्बन म्हण बनलीये – “इन नोलान वुई ट्रस्ट”! नोलानच्या विचारसरणीच्या व ती मांडण्याच्या पद्धतीच्या यशाची यापेक्षा मोठी पावती कोणती हवी?

नोलानची गंमत अशी की, काही काही बाबतीत त्याची मतं ही खरोखरच तिरसट, जगावेगळी आणि तरीही यशस्वी आहेत. सांगून खरं वाटणार नाही, परंतु आज सगळं जग डिजिटल फिल्ममेकिंगच्या मागे धावत असताना एकटा नोलान मात्र रिळं वापरुन शूट करण्याच्या जुन्या पद्धतीचा प्रामाणिक पुरस्कर्ता आहे. त्याचा स्पेशल-इफेक्ट्सवर फारसा विश्वास नाही. त्याच्या कोणत्याही सिनेमात सीजीआय कमीत कमी असतात. त्याऐवजी जास्तीत जास्त दृक्श्राव्य युक्त्या वापरण्यावर त्याचा भर असतो. त्याची साहसदृश्ये ही त्यातल्या त्यात विश्वसनीय वाटावीत अशीच असतात. तो संपूर्ण शूट एकाच युनिटवर करतो. वेगवेगळ्या युनिट्सना वेगवेगळे भाग चित्रित करायला लावणे त्याला मुळातच मान्य नाही.

ही तर झाली त्याची व्यावसायिक बाजू. परंतु त्याच्या वैयक्तिक निवडीही तितक्याच जगाविरहीत आहेत. नोलानचा स्वतःचा असा एकही इमेल आयडी नाही. तो इमेल हा प्रकार मुळातच वापरत नाही. त्याच्या सगळ्या मेल्स या त्याच्या एका मदतनीसाच्या पत्त्यावर येतात, ज्याच्या प्रिंटआऊट्स काढून दिल्यावर नोलान त्या सवडीने वाचतो. आजच्या जगातल्या सर्वाधिक यशस्वी निर्माता-दिग्दर्शकांपैकी एक असूनही नोलान मोबाईल फोन वापरत नाही! असं नाही की, त्याने त्रासून वापरणे बंद केलेय; तर मुळात त्याने कधीही फोन घेतलाच नाही. त्याच्या शांतपणे काम करु शकण्याचं रहस्य यातच दडलं असल्याचं तो स्पष्टपणे सांगतो. ज्याला माझ्यापर्यंत पोहोचायचंय तो बरोब्बर पोहोचतो, हे त्याचं यावरचं गमतीदार, आजच्या काळात भयावह वाटू शकणारं परंतु तितकंच खरं मत. पूर्वीच्या काळातही लोक कोणत्याही प्रकारच्या संपर्क-बंधनांशिवाय आरामात जगतच होती ना! आज आपण स्वतःच स्वतःला अनेक प्रकारच्या सोशल बेड्यांमध्ये जखडून टाकलंय आणि स्वतःच त्यांच्यामध्ये गुदमरवणारी धडपड करत खितपत पडलोय. या पार्श्वभूमीवर नोलान कदाचित मूर्खही वाटेल. पण या काहींच्या दृष्टीने मूर्ख वाटू शकणाऱ्या माणसाने चित्रपटसृष्टीच्या इतिहासातले काही पराकोटीचे श्रेष्ठ चित्रपट दिलेयत, देतोय आणि देत राहील; हे सत्य कोण आणि कसे नाकारणार?

— © विक्रम श्रीराम एडके

********************************************
आज Christopher Nolan चा वाढदिवस. त्यानिमित्त मी पूर्वी ‘सामना’साठी लिहिलेला हा लेख. रिपोस्ट.
********************************************

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *