खेळ

“Boom Beach मध्ये ना आपल्याला एक आयलंड दिलेलं असतं. त्यावर आपला बेस बनवायचा, रिसोर्सेस प्रोड्युस करायचे. तसेच दुसरे बीचेस शोधून त्यांच्यावर अटॅक करायचा. आणि ते जिंकून घ्यायचे”!
पाच वर्षांचा अर्णव बाबांना उत्साहाने सांगत होता. त्याचे बाबा, विख्यात अॅस्ट्रोफिजिसिस्ट डॉ. ज्ञानेश्वर लॅपटॉपवर काम करता करता नुसतेच “हं” म्हणाले!

“मी आत्ता लेव्हल 47 ला आहे, माहितीये. हे तर काहीच नाही, पार्थिव तर लेव्हल 61 वर आहे पार!”, बाबा ऐकताहेत म्हणून अर्णवने माहिती पुरवणे चालूच ठेवले.

“पण काय रे, ज्या आयलंडवर तुम्ही हल्ला करता, त्यांचेसुद्धा डिफेन्सेस असतीलच ना?”, लॅपटॉपच्या टकटकाटाच्या पार्श्वभूमीवर डॉ. ज्ञानेश्वरांनी विचारले.

“असतात ना”, अर्णव सांगू लागला, “आपण अटॅक करायला नेमकं असं आयलंड निवडायचं जे आपल्यापेक्षा लो-लेव्हलचं असेल, म्हणजे जिंकण्याची प्रोबॅबिलिटी वाढते”.

“आणि लो-लेव्हलचं आयलंड नसेल तर”?

“प्रत्येक रिअल-प्लेयर आयलंडसमोर एक आयकॉन असतो. तो टच केला की, त्याची लेव्हल शफल होते आणि त्याच्याजागी दुसरं आयलंड दिसू लागतं. लो-लेव्हलचं आयलंड आलं, तर अटॅक करायचा”!

डॉ. ज्ञानेश्वरांना गंमत वाटली, “इंटरेस्टिंग”, असं म्हणून त्यांनी लॅपटॉपवर एन्टरचे बटन दाबले. त्यासरशी त्यांना सापडलेल्या एका नवीन एक्स्ट्राटेरेस्ट्रिअल ऑब्जेक्टचा रिपोर्ट त्यांच्या इन्स्टिट्यूटला सेण्ड झाला. तो त्यांच्या लॅपटॉपमधून लहरींद्वारे सॅटेलाईटला आणि तिथून लहरींद्वारेच इन्स्टिट्यूटच्या डेटाबेसला काही सेकंदात जाणार होता, पण! पण सेकंद वाटतो तितका छोटा नसतो. हजारो नॅनोसेकंद असतात त्यात. शिवाय लहरी या अतिशय लहरी असतात, त्या थोडीच सरळ जातात!

सुदूर अंतराळात स्थिर उभ्या असलेल्या त्या स्पेसशिपच्या डिटेक्टरने एका खास पॅटर्नमध्ये दिव्यांची उघडझाप केली. त्यासरशी शिपमधल्या त्या दोघा एलियन्सनी एकमेकांकडे पाहून डोळे मिचकावले. समोरच्या स्क्रिनवर काही अगम्य भाषेतली अक्षरं लिहून आली होती. पृथ्वीच्या इमेजशेजारी लिहिलेल्या त्या अक्षरांचे इंग्रजी भाषांतर होत होते, “लो-लेव्हल आयलंड डिटेक्टेड”!!

— © विक्रम श्रीराम एडके
(सर्वाधिकार लेखकाधीन. शेअरच्या बटनावर क्लिक करूनच शेअर करावे. कॉपी-पेस्ट क्षमस्व.)
#Short_Story #Science #Fiction #SciFi #Horror #ScHorror #Science_Fiction #BoomBeach #Astro

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *