मनोव्यापारांचा गूढ खेळ – जेराल्ड्स गेम

जेसी (कार्ला गुगिनो) आणि जेराल्ड (ब्रुस ग्रीनवूड) सप्ताहांत साजरा करण्यासाठी त्यांच्या अलाबामातील नदीकाठच्या घरी जातात. एकत्र वेळ घालवणं, मजा करणं आणि त्यायोगे आपलं रुक्ष होत चाललेलं वैवाहिक जीवन वाचवणं, हा त्यांचा हेतू असतो. परंतु जेराल्डची मजेची कल्पना जरा वेगळीच असते. प्रवासाला निघतानाच त्याने सोबत खरोखरीच्या हातकड्या घेतलेल्या असतात. तो जेसीला त्या हातकड्यांनी पलंगाला जखडून ठेवतो. आणि त्याची रेप फँटसी पूर्ण करण्यात तिला भाग घ्यायला लावतो. जेसीला ही कल्पना मनापासून आवडलेली नाहीये. परंतु ती तरीही प्रयत्न करते. तिला त्या प्रकाराची क्षणोक्षणी शिसारी येऊ लागते. ती जेराल्डला सोड म्हणते. आणि मी नाही सोडलं तर, जेराल्ड उत्तरतो. जेसी घाबरते. जेसी आणि जेराल्डच्या वयात बरंच अंतर आहे. तो तिच्यापेक्षा खूप मोठा, अगदी म्हातारा म्हणावा, असा आहे. परफॉर्म करता यावं म्हणून तो व्हायाग्रा घेतो, एक नव्हे दोन! जेसी बांधलेल्या अवस्थेत आहे. तो तिच्या असहकार्यामुळे तिच्याशी वाद घालतोय. अचानक त्याला ह्रदयविकाराचा झटका येतो. आणि जेराल्ड मरतो! आता आजूबाजूला दूरदूरपर्यंत मनुष्यवस्ती नाही. नोकरचाकर किमान दोन-तीन दिवस तरी फिरकणार नाहीयेत. किमान! आणि जेसी त्या भल्यामोठ्या घरात एकटीच, जखडलेली आहे!!

वरवर पाहाता “जेराल्ड्स गेम” हा सर्व्हायवल स्टोरी वाटू शकतो. नव्हे, त्याच्या या अश्या पार्श्वभूमीमुळे तो वाटतोच. परंतु चित्रपट पाहिल्यावर कळतं की, हा एक अतिशय गहिरा असा सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे! यात सर्व्हायवल दुय्यम आहे. प्राप्त परिस्थितीत सत्य आणि आभास यांचा मेळ राखणे, मनाचा समतोल राखणे ही जेसीची प्राथमिकता आहे. जवळच नवऱ्याचे प्रेत पडलेले आहे. घराजवळ पोहोचताना जेसीने एका भटक्या कुत्र्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता, जेराल्डने तिला रोखले होते. तो कुत्रा आता उघड्या दारातून आत आलाय. जेसी एकटी असूनही एकटी नाहीये. तिच्या सोबतीला तिचे अंतरात्मे आहेत. एक सोडून दोन! एक जेराल्डचं प्रतिनिधित्व करतोय तर एक जेसीचं. त्या दोघांच्या कल्लोळात जेसी अडकलीये, त्या साखळ्यांपेक्षाही घट्ट. पण या साखळ्या तरी खऱ्या आहेत का? की प्रतीकात्मक आहेत? जेसीला त्या दोघांच्या (की तिघांच्या!) संवादातून अश्याच अजून एका प्रसंगातल्या साखळ्या आठवू लागतात. कधीच, कुणालाच न सांगितलेली रहस्यं उचंबळून, उसळून वर येऊ लागतात. त्या एकाकी घरातल्या संध्याछाया अजूनच गडद होत जातात.

“जेराल्ड्स गेम”चं वेगळेपण काय आहे माहितीये? तो जरासुद्धा सस्पेंस राखण्याचा प्रयत्न करत नाही. किंबहूना कुठे फार सस्पेस राहिल असं वाटू लागलं, तर पात्रांच्या संवादातून लगेच स्पष्टिकरणच देऊन टाकतो. हा खरं तर हॉरर चित्रपटांसाठी दोष मानला जातो. परंतु इथे तो चित्रपटाच्या बाजूने अभूतपूर्व काम करतो. बोललेल्या, संकेत केलेल्या त्या भयावह घटना कधी होतील याची आपण नकळत वाट पाहू लागतो आणि त्याचवेळी त्या होऊ नयेत म्हणून मनोमन प्रार्थनासुद्धा करू लागतो! स्टिफन किंग माझा अतिशय आवडता लेखक. सूक्ष्म, छोटछोट्या, वरवर साध्यासुध्या भासणाऱ्या गोष्टींमधून ताण निर्माण करण्याची त्याची हातोटी विलक्षण आहे. त्याच्याच, त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाने हा आत्मा बरोब्बर पकडलाय!

हा चित्रपट त्याच्या पार्श्वभूमीमुळे “रागिणी एमएमएस”सारखा असेल की काय, अशी कुणाला शंका येऊ शकते. किंबहूना मला सुद्धा ती आली होती. परंतु हा चित्रपट इतका जास्त गहिरा आहे की, त्याच्यापुढे “रागिणी एमएमएस” नुसता भडक आणि बटबटीतच नाही तर अक्षरशः लहान पोरांचा खेळ वाटतो. “जेराल्ड्स गेम”मध्ये सांकेतिकतेचा मुक्तहस्ते वापर केलाय. विशेषतः ग्रहणाच्या. सस्पेंस कमीत कमी असूनही तो एका क्षणासाठीसुद्धा उत्कंठा कमी करत नाही. सरधोपट हॉरर अथवा थ्रिलरसारखे यात जम्प-स्केअर्स नसूनही तो सातत्याने धक्के देत राहातो. नैतिकता-अनैतिकतेचे प्रश्न उपस्थित करत राहातो. एक गंमत सांगतो, चित्रपटातली दोन्ही प्रमुख पात्रे, जेराल्ड आणि जेसी यांचे लग्न तुटण्याइतपत ताणलेले आहे. मी मूळ कादंबरी वाचलेली नाही. परंतु ही बाब स्थापित करण्यासाठी कदाचित कादंबरीत काही पानेसुद्धा खर्ची पडू शकतात. चित्रपट ही बाब एकाच वाक्यात स्थापित करतो. ही चित्रपट माध्यमाची असीम शक्ती आहे. तितकेच ते माईक फ्लॅनॅगन या दिग्दर्शकाचे कौशल्यसुद्धा आहे. कार्ला गुगिनोने अक्षरशः करिअर डिफाईनिंग म्हणावे असे जबरदस्त काम केलेय. ब्रुस ग्रीनवूडसुद्धा कमालच. हा छोटासा, कमी बजेट असलेला, बहुतांशी एकाच खोलीत घडणारा चित्रपट नेटफ्लिक्सने प्रदर्शित केलाय. नेटफ्लिक्सवर सहज मिळेल. हॉरर, थ्रिलर वगैरे जॉनर्समध्येसुद्धा काहीतरी वेगळं पाहू इच्छित असाल, तर “जेराल्ड्स गेम” बेस्ट चॉईस आहे!!

— © विक्रम श्रीराम एडके.
*५/५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *