मेरा रंगदे बसंती चोला…

मेरा रंगदे बसंती चोला

मेरा रंगदे बसंती चोला


तिघा वीरांना फाशी होणार हे आता नक्की झालं होतं. तीन वीर – भगतसिंह, राजगुरु अन् सुखदेव – भारतमातेच्या उद्धारासाठी जन्माला आलेली त्रिमूर्तीच जणू! अवघ्या विशी-बाविशीतली कोवळी पोरं, परंतू आपलं आयुष्य आता संपणार याचं वैषम्य वाटण्यापेक्षा आपलं जीवन कृतार्थ झालं, याची धन्यताच त्यांच्या चेहर्‍यावर झळकत होती.
जन्मठेप न होता फाशी झाली याचं दु:ख होत नाही का, असं कुणीतरी विचारताच राजगुरु सहजपणे म्हणाले, “अहो, जन्मठेपेवर गेलो असतो तर मरायला वेळ लागला असता. त्यापेक्षा फाशीने चटकन् मरु म्हणजे स्वातंत्र्यलक्ष्मीच्या सेवेसाठी पटकन् पुन्हा जन्मासही येता येईल, काय!” आणि मिष्किल हसत टाळीसाठी हात पुढे केला! हे धैर्य!!
इकडे सबंध देश या तिघांसाठी आक्रंदत होता. आझादही अस्वस्थ होते. काय करावं? बाबाराव सावरकर तर सारे मतभेद विसरुन, मानापमान दृष्टीआड करून गांधींच्या भेटीसाठी वर्ध्यासही जाऊन आले. त्यांना विनंती केली, “बापू, लॉर्ड आयर्विनशी तुम्ही करत असलेल्या करारात क्रांतिकारकांच्या सुटकेचेही एक विधेय टाका”.
“तसे केल्यास मी माझ्या अहिंसेच्या मार्गापासून ढळून हीन नाही का ठरणार”? गांधी उत्तरले.
“असं कसं म्हणता बापू?”, सावरकरांचा प्रतिप्रश्न, “आणि जर तुम्ही हीन ठरणारच असाल, तर स्वामी श्रद्धानंदांचा खूनी असलेल्या अब्दुल रशीद या हिंसकासाठी रदबदली करून तुम्ही एकदा हीन ठरलाच आहात, तर मग यावेळी देशासाठी हीन ठरायला काय हरकत आहे?” यावर गांधींनी मौन बाळगले! त्या काळात गांधींच्या लॉर्ड आयर्विनशी तब्बल ८ भेटी झाल्या पण तिघा बाळांच्या सुटकेचा विषय काढून मौन सोडणे काही त्या महात्म्याच्या तत्त्वात बसले नाही.
होता होता फाशीचा दिवस उजाडला. २३ मार्च! संध्याकाळी ७ ची अडनिडी वेळ ठरवण्यात आली होती. फाशी शक्यतो सकाळी होत असते, परंतू हे कृष्णकृत्य सकाळच्या मंगलप्रहरी करायचं धाडस सैतानी इंग्रज सरकारलाही झालं नसावं! सर्वत्र आणि सर्वांवरच एकप्रकारचा तणाव होता, तीन नायक सोडून. त्या तिघांचे हास्यविनोद चालू होते. अखेरच्या आंघोळीसाठी पाणी दिले तर त्यावेळीही तिघे मजेत गात होते, “मेरा रंगदे बसंती चोला… आई मला भगवी वस्त्रे परिधान करू दे..” अन्य बंद्यांच्या अंगावर सरसरून काटा आला नसता तरच नवल!
त्रिदेवांना फाशीच्या तख्ताकडे चालवले. जातानाही तिघे मोठमोठ्याने घोषणा देत होते, “भारतमाता की जय!”, “लॉंग लिव्ह रिव्हॉल्युशन!” गुणगुणत होते,
“मरके भी न निकलेगी दिलसे वतन की उल्फत ।
मेरी मिट्टीसे भी खुशबु-ए-वतन आएगी ।।
तिघांना फाशीघरात आणण्यात आले. तेथे एक काळा जल्लाद आणि गोरा मॅजिस्ट्रेट असे दोघे उपस्थित होते. त्यातही भगतसिंहांना लहर आली, ते त्या मॅजिस्ट्रेटला म्हणाले, “मॅजिस्ट्रेटसाहेब, तुम्ही मोठे भाग्यवान बरं का! आजवर तुम्ही अनेकांना फाशी जाताना पाहिले असेल, परंतू भारतमातेचे पुत्र तिच्यासाठी कसे हसत-हसत फाशी जातात, हे आज तुम्ही पहिल्यांदाच अनुभवाल! हा अनुपम सोहळा पाहणे सर्वांच्याच नशिबी नसते बरं!” तो मॅजिस्ट्रेट बिचारा काय बोलणार यावर?
वेळ झाली. तिघांनी अभिमानभरल्या नजरांनी एकमेकांना अखेरचे पाहून घेतले. “वंदे मातरम्”चा जयघोष झाला. तिघांनाही फाशीच्या दोरांची चुंबने घेतली. चेहर्‍यावर मुखवटे चढले. जल्लादाने खटका ओढला. शरीरे थरथरली. यथावकाश खेळ संपला. तिघांपैकी कुणाच्याही माता-पित्यांस अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही इंग्रजांनी. तीन शरीरे संपली, तीन प्राण गेले. पण तीन आत्मे मात्र अमर झाले, कोट्यवधी भारतीयांच्या ह्रदयात…
– © विक्रम श्रीराम एडके.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *