मानवाधिकारछाप गोष्ट

एकदा काश्मीरातील एका जिहादी आतंकवाद्याने तीन जणांना पकडले – एक पुढारी, एक मानवाधिकारछाप (हा शब्द “कछुआछाप”च्या चालीवर वाचावा) पत्रकार बाई आणि एक भारतीय जवान!
आतंकवादी म्हणाला, “तुम्ही तिघंही आता मरणार आहात. काही शेवटची इच्छा असेल तर बोला”.
इच्छापूर्ती म्हटली की सर्वात पुढे पळण्याचा पुढार्यांचा स्वभावच असतो! आपले पुढारीबुवाही त्याला अपवाद नव्हते. पण इच्छा पूर्ण झाली की लगेच मरावे लागणार या कल्पनेने ते काहीच बोलले नाहीत. अतिरेक्याच्याच काय मनात आलं कुणास ठाऊक, त्याने पुढार्याकडे बोट दाखवले, “तू बोल”.
पुढार्याने क्षणभर विचार केला. म्हणाला, “आयुष्यभर मला कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहायची, त्यांच्याकडून जयजयकार ऐकायची सवय. तुही माझ्या नावाने ‘की जय..!’ असे ओरड आणि हा जयघोष चालू असतानाच मला मार. म्हणजे मी समाधानाने मरेन”.
अतिरेकी “ठीक आहे” म्हणाला. आणि पुढार्याच्या नावाने जयजयकार करतच त्याने त्याला गोळ्या घातल्या!
आता क्रमांक सैनिकाचा होता. अतिरेक्याने त्यालाही शेवटची इच्छा विचारली. क्षणभर विचार करून सैनिकाने आपली इच्छा पुढे ठेवली,
“मला मारण्याआधी तू मला एक जोरदार लाथ घाल!”
अशी विचित्र इच्छा ऐकून शेजारी उभी असलेली बाईच काय(बाईंनी आजवर मानवाधिकाराच्या लंब्याचौड्या गप्पा खूप मारल्या होत्या, पण रक्त आणि त्यातही एखाद्याचा खून पहिल्यांदाच पाहिला होता. शिवाय पुढे काय वाढून ठेवलंय यामुळे भेदरल्याही होत्या बिचार्या!), तो अतिरेकीही चकित झाला! पण शेवटची इच्छा त्याने पूर्ण करायचे ठरवले होतेच.
त्याप्रमाणे त्याने जवानाला समोरून एक जोरदार लाथ घातली. जवान अतिरेक्याच्या पायाशी कोसळलाच. आता अतिरेकी बंदुक ताणून गोळी घालणारा, इतक्यात ते घडले! डोळ्याचे पाते लवायच्या आत आणि कुणाला काही कळायच्या आत घडले! सैनिकानेवीजेच्या वेगाने इतका वेळ आपल्या कपड्यांत बेमालूमपणे लपवून ठेवलेला चाकू काढला आणि अतिरेक्याचे डोळेही विस्फारायच्या आत त्याच्या पोटात तिरका फिरवला! फाटकी आतडी बाहेर पडत, तोंडातून रक्त ओकत अतिरेकी कोसळला, मेला!
शत्रूच्या रुधिराने न्हाऊन निघालेला तो शूर भारतीय जवान उभा राहिला. भेदरलेल्या बाईंना त्याने आधार देऊन बसवले. जरासे पाणी पाजले. शांत झाल्यावर न राहवून बाईंनी अखेर विचारलेच,
“तुमच्याकडं जर लपवून ठेवलेलं शस्त्र होतं आणि तुम्ही त्याला मारू शकत होता तर आधीच का नाही मारलंत? त्याला लाथ का मारायला लावलीत?”
सैनिकाने खांदे उडवले आणि शांतपणे म्हणाला, “त्याने जर मला आधी लाथ मारण्याआधीच मी त्याला मारलं असतं, तर परिस्थिती कशी का असेना, पण बाई, तुम्हीच उद्या तुमच्या चॅनेलवर मोठमोठ्याने ओरडत सुटला असता की, भारतीय सैन्य काश्मिरात गरीब बिच्चार्या काश्मिरींवर अत्याचार करते. शेवटी जे तुम्हाला टीआरपी मिळवून देतील, तुमच्या दृष्टीने मानवाधिकार केवळ त्यांनाच असतात ना!”
(काही महिन्यांपूर्वी वाचलेल्या इंग्रजी रुपककथेचा मी केलेला स्वैर अनुवाद. मूळ लेखक अज्ञात.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *