जो जीता वोही सिकंदर ???

काल दूरचित्रवाणीवर एक प्रसिद्ध गीत पाहात होतो. बोल होते, “वो सिकंदर ही दोस्तो कहलाता हैं, हारी बाजीको जीतना जिसे आता हैं”! चित्रपटाचंही नाव साजेसंच होतं, “जो जीता वोही सिकंदर”. गेले दोन दिवस मी असत्याधारित, विकृत आणि राष्ट्राचा तेजोभंग करणार्या इतिहासाबद्दल लिहितोय. जे आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलोय -” जो जीता वोही सिकंदर” असं खरंच होतं का?
अलेक्झँडर हा अतिशय महत्वाकांक्षी होता, विश्वविजयासाठी निघाला होता हे खरे. परंतू कोणत्याही अर्थाने विश्वविजयी नव्हता. ग्रीस ते इराणपर्यंतचे प्रदेश त्याने सहज जिंकले. भारताच्या सीमेवरील गांधारजवळची (अफगाणिस्तान) छोटीछोटी गणराज्ये पाहून त्याला नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असणार! मी यापेक्षा अनेकपट मोठी साम्राज्ये सहज जिंकली, ही छोटी राज्ये तर मी पाहातापाहाता फस्त करेन, अशी दर्पोक्तीही त्याने स्वत:शी केली असणार. परंतू कठ, ब्राह्मणक ही छोटीछोटी गणराज्येही संपूर्ण ताकदीनिशी अलेक्झँडरविरोधात उभी राहीली. शरण या सांगून कुणीच शरण जाईनात. प्रत्येकाने असा काही लढा दिला की, ग्रीक सैन्याला “विजय नको पण युद्ध आवर” असे होऊन गेले. त्यातच एक पूर्वी कधी न घडलेली गोष्ट घडली. स्वात खोर्यातील एका अज्ञात राष्ट्रवीराच्या विषारी बाणाने थेट अलेक्झँडरचाच वेध घेतला. प्रत्यक्ष सम्राटाचा वेध? त्याने कधी विचारही केला नव्हता की, एका लहानश्या राज्यातला एक अज्ञात सैनिक हे करेल! केवळ अलेक्झँडरचे सुदैवच की, तो वाचला. परंतू भारतीयांच्या पराक्रमाची त्याने धास्ती घेतली ती कायमचीच! त्याही परिस्थितीत त्याने वाटचाल चालूच ठेवली. परंतू पौरवांच्या छोट्याश्या राज्यानेही जेव्हा अलेक्झँडरला मार दिला तेव्हा त्याची अवस्था बिकट झाली. मनोधैर्य खचले. नि:संशय त्याने ही युद्धे जिंकली होती, परंतू या विजयाला काय महत्त्व होते? अहमदशहानेही पानिपत जिंकले होतेच की! परंतू तो विजय साजरा करण्याची त्याची कधी हिंमत झाली नाही. पळूनच जावं लागलं. दुसरीकडे ज्या मराठ्यांना इतिहास हरलेले म्हणून सांगतो, त्याच मराठ्यांनी अवघ्या दहाच वर्षांत पुन्हा दिल्ली काबीज केली! तेव्हा जय-पराजय हा तात्कालिक स्थितीवर अवलंबून नसतो तर दूरगामी घटनांवर अवलंबून असतो. अलेक्झँडरचेही असेच नाही का? त्याचे मनोधैर्य खचलेले, सैन्य पुढे जायला तयार नाही. सेनानायक बंडाची भाषा बोलू लागलेले. परत फिरण्यावाचून पर्यायच उरला नव्हता. विश्वविजयाला निघालेला अलेक्झँडर, भारताच्या सीमेवरूनच पळाला. छोट्याछोट्या गणराज्यांमुळे पळाला. मगधासारखी प्रचंड साम्राज्ये तर तो पाहूदेखील शकला नाही! सावरकर अगदी चपखल लिहितात,
“असो कुणाचा जरी शिकंदर परंतू भारतजेता ना
अंगणही ना तये देखिले कळलाही ना कुणा कुणा”
असा हा अलेक्झँडर भारताचे अंगणही पाहू शकला नाही आणि उरलेल्या भारताला तर कळलंही नाही की असा कुणी आक्रमक हा देश जिंकण्याच्या हेतूने आला होता. अश्या माणसाला आपण जगज्जेता म्हणायचं का? काय अर्थ आहे, “जो जीता वोही सिकंदर” या म्हणीला? विचार करा. भारतातून गेल्यानंतर काही काळातच अलेक्झँडरचा मृत्यू झाला हेही उल्लेखनीय. भारत मात्र अजिंक्यचा अजिंक्यच आहे. आपण ग्रीक पचवले, शक, हूण आणि कुशाणही पचवले. ज्या टोळधाडीखाली सारे काही रगडले जात होते, त्या तुर्कांना आणि मुघलांनाही आपण नुसते पचवलेच नव्हे तर मांडलिकही केले. हा इतिहास आहे. आपला तेजस्वी इतिहास. कुणीतरी काहीतरी सांगते म्हणून तेजोभंग करून घेण्यात काय अर्थ आहे. विचार करा. अभिमान बाळगा. भविष्यातील विजयासाठी प्रेरणा घ्या! कृतिशील व्हा!
– © विक्रम श्रीराम एडके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *