वसंत पंचमी

हल्ली “व्हॅलेंटाईन डे”चे सर्वत्र फॅड सुरू आहे. मी या दिवसाचा विरोधक आहे आणि म्हणून याला फॅड म्हणतोय असा कृपया समज करून घेऊ नका. मी फॅड म्हणतोय कारण, त्रयस्थपणे विचार केल्यावर कळते की या दिवसाचा आणि प्रेमाचा तसा काही संबंध नाही. ही फक्त प्रेमाच्या नावाखाली फुले, ग्रिटींग्ज आदी वस्तू विकण्याची मार्केटींग स्ट्रॅटेजी आहे, बाकी काही नाही. आणि पाश्चात्यांहूनही अधिक पाश्चात्याळलेले आपल्याकडचे तरुण याला बरोब्बर बळी पडतात. प्रेमाच्या नावाखाली या दिवसाची भलावण करीत अगदी पाच रुपयांचा गुलाब वीस रुपयांना घेण्यापासून सर्व मूर्खपणा सुरू असतो! मागे नाही का त्या हॉलिवूडवाल्यांनी त्यांचे पिक्चर चालत नाहीत म्हटल्यावर “डिसेंबर २०१२”चा बागुलबुवा उभा करून, त्यावर पिक्चर काढून, चालवूनही दाखवला होता! आणि वेडे लोक त्याच्याशी संबंधित सर्वच गोष्टी विकत घेत होते. मग त्यात पुस्तके आली, चित्रपट आले अगदी येऊ घातलेल्या जगबुडीपासून वाचण्याचे उपायही आले. थोडक्यात तुमच्या भावनांच्या नावावर तुम्हाला “येड्यात” (हा फारच सौम्य शब्द आहे. खरं तर इथे मला “च्यु”ने सुरू होणारा एक असंसदीय शब्द सुचतोय!) काढून त्यांच्या वस्तू त्यांनी तुमच्या गळ्यात मारल्या! व्हॅलेंटाईनच्या नावाखालीही तेच चालत नाही का? तुम्ही त्यांची दरवर्षीची हमखास बाजारपेठ आहात. चराऊ कुरण, बाकी काही नाही!
असो. तो ज्याचा त्याचा प्रश्न. माझा आणखी एक वेगळा मुद्दा आहे. आपल्याला प्रेमाचा दिवस उधार घेण्याची का बरे गरज पडावी? जगातील मोठमोठ्या संस्कृती असलेल्या मोठमोठ्या देशांतील लोकांना जेव्हा कपडे घालण्याचीही अक्कल नव्हती, तेव्हा भारतीय संस्कृती तिच्या चरमावस्थेस पोहोचलीही होती. प्रेम, विशेषत: कामभावनेचा आपल्या संस्कृतीत जितका सखोल विचार केलाय, तितका क्वचितच अन्यत्र कुठे केला गेला असेल. केवळ आपल्याकडेच या विषयाला शास्त्र म्हणून मान्यता आहे. हा विषय आपल्याकडे सर्व थरांत शिकवला तर जायचाच, इतकेच नव्हे तर आदी शंकराचार्यांचा पराभव एका स्त्रीने केवळ याच एका विषयाच्या आधारावर केला होता (आठवतेय ना परकायाप्रवेशाची गोष्ट?), इतका हा विषय महत्वाचा आहे. मग आपल्याकडे प्रेमासाठी एखादा दिवसही राखून ठेवलेला नसावा का? आहे ना, अवश्य आहे. फक्त जरा व्हॅलेंटाईनच्या प्रभावातून बाहेर येऊन पाहाता आले पाहिजे! त्या दिवसाचं नाव आहे “वसंत पंचमी”! आपल्या संस्कृतीनुसार प्रेम व्यक्त करण्याचा दिवस, रति-मदनाच्या पूजेचा दिवस! आणि यात अभिप्रेत असलेले प्रेम आई-वडलांवरील, भावा-बहिणीवरील प्रेम नाही बरं (हो, व्हॅलेंटाईनच्या समर्थनासाठी काही लोक अश्या गोष्टी बोलतात, म्हणून म्हटलं)! यात नर-मादी यांचे एकमेकांवरील प्रेमच अभिप्रेत आहे. हो, क्युपिडपेक्षा आमच्या कामदेवाचा इतिहास अधिक जुना आहे! वसंतपंचमी दरवर्षी माघ शुक्ल पंचमीला असते. यावर्षी योगायोगाने ती १४ फेब्रुवारीलाच येतेय.
आता पुन्हा एकदा आधीच्या “मार्केटींग स्ट्रॅटेजी” या विषयाकडे येऊ! किती दिवस परकियांची बाजारपेठ म्हणून जगणार आहोत आपण? आता प्रवाह उलटा फिरवायची वेळ आलीय असे नाही वाटत का? आधीच आपल्याकडील गोष्टींचे वेड असलेल्या पाश्चिमात्यांपुढे जर आपण वसंत पंचमीचे व्यवस्थित मार्केटींग केले, तर तिला व्हॅलेंटाईन डे ची जागा सहजच मिळवून देता येईल. नाहीतरी योग, पूजा, हवन आणि हिंदू अध्यात्म या गोष्टी पाश्चिमात्य जगात “स्टेटस सिम्बॉल” बनल्या आहेतच की! मग त्यात आणखी एकाची भर घालायला काय हरकत आहे? येऊ द्या की वसंतपंचमीच्या ग्रिटींग्स, रति-मदनाच्या “गुडीज्”, बाहुल्या वगैरे! विकूयात की त्यांना! कमवूयात की पैसे. घेऊ देत की क्युपिडची जागा कामदेवाला! आपल्याकडील हौशी उद्योजक तरुणांनी खरोखर वसंतपंचमीला एकप्रकारचे “थिमॅटीक” स्वरुप देण्यासाठी आत्तापासूनच जर मेहनत घ्यायला सुरुवात केली, तर पुढील वर्षीपर्यंत सहज मार्केटमध्ये उतरता येईल. फक्त या विषयाकडे एक संधी म्हणून पाहायची तयारी तेवढी हवी! एकतर स्वदेशी, त्यात हिंदू संस्कृतीशी घट्ट नाळ असलेले, भारताला परकीय चलन मिळवून देणारे आणि वर व्यवसायाची संधी, असा चौफेर फायदा! बरे वसंत-पंचमी संपूर्णतया वैज्ञानिकही आहे बरं का! यादिवसांत निसर्गाला नवी झळाळी प्राप्त झालेली असते, प्राणीही जोड्या बनवतात. अनेक प्रजातींचा हा विणीचा हंगामही असतो. म्हणून तर आपल्या हुशार पूर्वजांनी या काळाची निवड केली ना, प्रेम व्यक्त करण्यासाठी! इंग्रजांनी इंग्रजीची, किंबहुना त्यांच्याकडील सर्वच गोष्टींची व्यवस्थित जाहिरात केली, म्हणूनच तर आज आपण वेड्यागत त्यांचं अनुकरण करतो ना! आपल्याला फक्त गोष्टी “रिप्लेस” करता यायला हव्यात! काहीतरी सेलिब्रेट करण्यासाठी सतत झुरणारी चंगळवादी मंडळी ताबडतोब नवी फॅशन म्हणून आपल्यामागे पळतील! अर्थात, त्या गोष्टींची सात्विकता राखण्याचीही काळजी आपण घ्यायलाच हवी! आणि पाश्चात्य ती गोष्ट करू लागले की, पैजेवर सांगतो, आपल्याकडचे “काळे इंग्रज” त्यांच्याही पुढे चार पावले जाऊन त्यांचे अनुकरण करतील.
चीनने फेंगशुईच्या बाबतीत काय वेगळे केले? आता आपली वेळ आहे. यावर्षी तुम्ही तर वसंतपंचमी साजरी कराच, परंतू जगालाही ती कशी साजरी करायला लावता येईल याचाही विचार करा! अर्थातच परंपरा आणि आधुनिकता यांचा योग्य संगम करून!
व्हॅलेंटाईन डे ला नुसताच विरोध करीत राहिलात तर हाती काहीच लागायचे नाही. तरुणाई दुरावेल आणि विरोध होतोय म्हणून अधिकच जोषात व्हॅलेंटाईन साजरा करेल हा भाग वेगळाच. शिवाय विरोध करणार्यांकडे त्या तोडीची पर्यायी व्यवस्था आहे कुठे? या संधीच्या रुपाने तो पर्याय उपलब्ध होईल. तरुणांना त्यांना कळणार्या भाषेत हिंदू संस्कृती समजावून देण्याची संधी मिळेल. एक ना अनेक फायदे. गरज आहे ती हे सारे योजनाबद्धरित्या राबविण्याची. योजकस्तत्र दुर्लभ:!
– © विक्रम श्रीराम एडके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *