हुतात्म्यांचा गौरव

खरे तर आपण राजकुमार संतोषी आणि राकेश ओमप्रकाश मेहरांचे आभारच मानायला हवेत. कारण, आजच्या पिढीला भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद “बिस्मिल”, अशफाकउल्ला खान इ. वीर हुतात्म्यांबद्दल जी काही थोडेफार माहिती आहे आणि या लोकांनी या देशाच्या बंधमोचनासाठी काहीतरी त्याग केला होता हे त्यांना कळले, ते याच दोन दिग्दर्शकांमुळे. हवं तर दुर्दैवी म्हणा पण ही वस्तुस्थिती आहे की, आमच्या देशाचे क्रांतिकारक त्यांच्यावर चित्रपट निघेपर्यंत आम्हाला धड माहितीही नसतात! बर्याच जणांना तर या वीरांची कथा चित्रपटात सांगितली तेवढीच फक्त माहिती आहे. त्यापलीकडे जाऊन या व्यक्तीमत्वांचा शोध घ्यायचा प्रयत्न यांपैकी किती जणांनी केला? वाईट वाटतं!
चेतन भगतसारख्या सुमार लेखकाची सगळी पुस्तके वाचणारे अनेक तरुण सापडतील, पण एखाद्या थरारक कादंबरीहूनही अधिक रोमहर्षक आयुष्य जगलेल्या या हुतात्म्यांची पूर्ण नावेही त्यांना सांगता येणार नाहीत. हुतात्मा राजगुरूंचे किंवा सुखदेवांचे एवढेच कशाला अगदी भगतसिंहांचेही पूर्ण नाव काय असे विचारले तर हा लेख वाचणार्यांपैकी निम्मे जण गुगलचा आधार शोधतील.
पंजाबातील लोकांच्या जागृतीमुळे आपल्याला भगतसिंहांबद्दल त्रोटक तरी माहिती असते, परंतू राजगुरू मराठी असूनही आपल्याला त्यांची माहिती चार वाक्यांपलीकडे सांगता येणार नाही. ही काय दर्जाची किळसवाणी उपेक्षा म्हणायची? या महायोद्ध्याला तर चित्रपटातही विनोदी पात्र बनून राहाणेच नशिबी आले. मूळचा खेड (राजगुरुनगर) येथील असलेला हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता. ते इतके निष्णात होते की, संस्कृतमधून सहज संभाषण करीत असत. कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता. नेमबाजीत ते शब्दवेधी होते, एवढेच नव्हे तर उताणे झोपून पाठीमागे असलेले लक्ष्यही ते बाणाने सहज उडवित (कधी प्रयत्न करा मग कळेल ही गोष्ट किती अवघड आहे ते!). स्वत:स कणखर बनविण्यासाठी रात्रीतून धावत-धावत १५-२० मैलांवरील स्मशानात जात, तेथील विहिरीत पोहत आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपत, इतका त्यांचा दम (स्टॅमिना) होता. तासनतास मुंग्यांच्या वारुळावर बसून दाखवत, दंश झाले तरीही चेहर्यावरील रेषही न हलवता. एकदा तर त्यांनी एक जळती चिमणी एका हाताने दाबून फोडली, लोखंडी सांगाड्याचाही पार चुरा केला – हात भाजला, काचांनी रक्तबंबाळ झाले तरीही त्यांनी हुं की चूं देखील केले नाही! आणि त्याहूनही मोठी गोष्ट सांगतो. सॉंडर्स आपल्या टप्प्याबाहेर आहे, त्याला गोळी लागणे शक्य नाही अशी भगतसिंहांना शंका वाटत होती, परंतू राजगुरूंनी मात्र भगतसिंह नको नको म्हणत असतानाही तितक्याच अंतरावरून चालवलेला गोळी सॉंडर्सच्या दोन भूवयांच्या बरोब्बर मधोमध कपाळातून आरपार गेली. त्यांना परत लक्ष्याकडे पाहायचीही आवश्यकता भासली नाही. विश्वास न बसून भगतसिंहांनी नंतर त्या प्रेताला जवळून आठ गोळ्या मारल्या! असे होते राजगुरू!
हे सगळे रामायण लिहिण्याचे कारण म्हणजे, आता २३ मार्च येतोय. केवळ त्यादिवसापुरताच या हुतात्म्यांचा गौरव नको व्हायला. तर तो त्यांच्यासारखं बनण्याचा संकल्पदिन ठरावा. “दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल” च्या भ्रमातून आपण केव्हाच बाहेर पडलो आहोत. आता जरा “आझादी” कुणामुळे मिळाली याचा अभ्यास करुयात. तरच महासत्ता वगैरे स्वप्ने पाहण्यात अर्थ आहे, नाहीतर सारेच स्वाभिमानशून्य आणि म्हणूनच व्यर्थ आहे!
– © विक्रम श्रीराम एडके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *