हुतात्मा राजगुरू – काही शल्ये, काही प्रश्न!

हुतात्मा राजगुरू

हुतात्मा राजगुरू

आज २४ ऑगस्ट. अर्थात हुतात्मा राजगुरू यांची जयंती. विषय केवळ आजच्या दिवसापुरते त्यांना प्रणाम करण्याचा नाहीये. विषय आहे यानिमित्ताने जरासं आत्मपरिक्षण करण्याचा. जरा स्वत:ला विचारण्याचा की, ज्या माणसाने तुमच्या-माझ्या सुखासाठी अतिशय कोवळ्या वयात आपल्या प्राणांची आहुती दिली, त्याची आज जयंती आहे हे आपल्या लक्षात तरी होतं का? जयंती सोडा राजगुरूंचे संपूर्ण नाव तरी आपण गुगलचा आधार घेतल्याशिवाय अथवा कुणाला विचारल्याशिवाय सांगू शकतो का? संपूर्ण नावही राहू द्या, राजगुरू नावाची व्यक्ती कोण होती आणि तिने काय कार्य केले होते, हे तरी आपण धडपणे सांगू शकतो का? सौ बात की एक बात – मूळात आपल्याला राजगुरूंना प्रणाम करण्याचा तरी हक्क आहे का?
मला नकारात्मकता पसरवायची नाही, परंतू खेदाने सांगावेसे वाटते की यांपैकी बहुतांश प्रश्नांची उत्तरे “नाही” अशीच येतील. का म्हणून आपल्याला या देशासाठी झटणार्यांना विसरायची आणि भलत्यासलत्यांनाच डोक्यावर बसवण्याची सवय लागलीय? भगतसिंह आणि त्यांचे कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, याचं कारण आहे भगतसिंगांच्या स्मृती जपण्यासाठी पंजाबने घेतलेली अपार मेहनत. राजगुरूंसाठी महाराष्ट्राने काय केले? शासकीय गोष्टी जरावेळ राहूद्या बाजूला, तुम्ही-आम्ही मराठी म्हणवणार्या लोकांनी राजगुरूंसाठी काय केले? राजगुरूनगरातील त्यांचा राहाता वाडा आज काय अवस्थेत आहे हे पाहाण्याची, किमान चौकशी करण्याची तरी तसदी घेतलीये का आपण?
साधासा वेष करणारा, पोलादासारखे शरीर कमावलेला, अस्खलित संस्कृतात संभाषण करणारा, शब्दवेधी नेमबाजी करणारा, पिस्तुलाच्या केवळ एकाच गोळीने दूरवर असलेल्या स्कॉटचा मर्मभेद करणारा, मृत्यूलाही शहारे यावेत असे हाल तुरूंगात सोसूनही साथीदारांची नावे न सांगणारा, आपल्या अधिकारांखातर १०० दिवसांचे उपोषण करणारा (खरोखरचे उपोषण बरं का – मिडियाच्या गर्दीशिवाय आणि अन्नपाण्याविरहीत!), देशासाठी-धर्मासाठी फाशीचा दोरही हसत-हसत कवटाळणारा – असे सहस्रावधी गुण अंगी असणार्या या माणसात कधी आपण आपला आदर्श, आपला आयडॉल शोधण्याचा प्रयत्न केलाय? नाही केला. कोणत्या अचाट भावनेपायी हा मनुष्य वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी फाशी जाण्यास सिद्ध झाला, हे पाहण्याचा आपण कधी प्रयत्न केलाय? नाही केला. बाकी सारे राहू द्या हो – हा माणूस वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी फाशी गेला; जरा एकदा आपल्या मनाला विचारा की, आपण आपल्या वयाच्या २३व्या वर्षी काय करत होतो – तेव्हा कुठे आपल्याला राजगुरूंची थोरवी कळेल. खेदपूर्वक म्हणावंसं वाटतं की, कै. वि. श्री. जोशींचे “वडवानल” आणि तत्सम अन्य चार-दोन पुस्तके वगळता मराठी भाषेत राजगुरूंबद्दल सप्रमाण लेखनच झालेले नाही, यापरतें मोठे दुर्दैव कोणते? अर्थात हे दुर्दैव नेमके कुणाचे आहे, राजगुरूंचे की आपले, हा एक वेगळाच प्रश्न आहे. असो.
अशी शेकडो शल्ये आहेत. अनेक प्रश्न आहेत की, ज्यांची उत्तरे नकारार्थीच आहेत. आज राजगुरूंची जयंती आहे, परंतू मला वाटतं की उपरोक्त प्रश्नांपैकी काही प्रश्नांची तरी उत्तरे आपण जेव्हा आपण नकारातून होकारात बदलू शकू, तेव्हाच आपल्याला राजगुरूंना आदरांजली वाहाण्याचा वा नमन करण्याचा अधिकार असेल. अन्यथा मुर्दाडांचा आदरही मुर्दाडच असतो, नाही का!

– © विक्रम श्रीराम एडके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *