खरेच गणेशविसर्जनाने प्रदूषण होते का ?

खरेच गणेशविसर्जनाने प्रदूषण होते का ?

गणेशोत्सव जवळ येऊ लागलाय त्याअर्थी आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन आणि त्याद्वारे होणार्या प्रदूषणाच्या नावाने शिमगा जोरजोरात सुरु होईल, हेही ओघाने आलेच. अर्थातच हिंदूंच्या प्रत्येक सणाला असा शिमगा होणे नित्याचेच असल्याने, सर्वांनाच या प्रकाराची सवय झाली आहे. हा आरडाओरडा करणारी मंडळी अन्यधर्मीयांच्या सणांच्या प्रसंगी विवेकवादी आणि पुरोगामी चिंतनात इतकी काही व्यस्त असतात की, त्यांना त्यातले प्रदूषण दिसतच नाही आणि दिसले तरी त्याबद्दल बोलावेसे वाटत नाही! असो.

परंतू खरंच प्लॅस्टरच्या गणेशमूर्तींनी प्रदूषण होते का हो? केलाय कधी विचार? किंबहूना असे काही प्रदूषण होते हीच जर अंधश्रद्धेचे निर्मूलन करू म्हणणार्यांची अंधश्रद्धा असली तर? तसे असेल तर त्यांच्या या अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हायला नको? त्यासाठी आधी प्लॅस्टर ऑफ पॅरिस (रेणूसूत्र – 2CaSO4.1/2H2O) म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसची निर्मिती CaSO4 अर्थात जिप्समला (सल्फेटच्या पाण्यात विरघळू शकणार्या प्रकारांपैकी एक – कॅल्शियम सल्फेट) सुमारे १५०° C तापमानावर तापवून केली जाते. सूत्राच्या दृष्टीने पाहिल्यास,

प्लॅस्टर ऑफ पॅरिस = जिप्सम + पाणी

बेल्जियमस्थित “युरोजिप्सम” या संघटनेने यासंदर्भात काही प्रयोग केले आहेत. या प्रयोगांचे निष्कर्ष १४ डिसेंबर २०१० रोजी अहवालरुपाने प्रसिद्ध करण्यात आले असून “सल्फेट पाण्याद्वारे पोटात गेल्यास त्यांचा मानवी शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नसल्याचे” त्यात स्पष्टपणे म्हटले आहे. या निष्कर्षाला ‘Sulphate in drinking water: interaction with human health’ by Dr. Maurice Arnaud – Eurogypsum workshop 25 Oct. 2007 चा ही आधार देण्यात आला आहे. अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, “पाण्यात मुळातच सल्फेट असते; एवढेच नव्हे तर पेय खनिजजल विकणार्या अनेक कंपन्यांच्या उत्पादनांतही सल्फेटचे प्रमाण बर्यापैकी असते”. PoP हे जिप्सम आणि पाणी यांपासून बनलेले असल्याने त्याचाही शरीराला काहीच अपाय नाही हेही ओघानेच आले.
अर्थात, हा अहवाल जिप्समउत्पादक कंपन्यांच्या संघटनेने प्रकाशित केलेला असल्याने तो ग्राह्य धरण्यात येऊ नये, असा युक्तिवाद कुणी करू शकतो. तेव्हा याबाबतीत भारताच्या “राष्ट्रीय हरित लवादा”चे (National Green Tribunal) काय म्हणणे आहे, हेही पाहूयात.
९ मे २०१३ रोजी लवादाच्या दिल्ली विभागाने एक निर्णय दिला, लवादाने “केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळा”चे (Central Pollution Control Board) म्हणणे अमान्य केले असून “प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे जलप्रदूषण होत नसल्याचे” स्पष्ट केले आहे. यासाठी लवादाने पुणेस्थित Srishti Eco-Research Institute (SERI) या संस्थेने Air Quality Management Cell यांच्यासोबत पुणे येथे केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आधारभूत मानला आहे.
२०१२ साली केलेल्या या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार मुठा नदीत दररोज सुमारे १५ टन कचरा जमा होतो. गणेशमूर्तींच्या विसर्जनाने या रोजच्या कचर्यात १% हूनही कमी भर पडते. तीही वर्षातून एकदाच.
SERI चे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी यांच्या मते, “CPCB च्या निर्देशांनुसार पाहू गेल्यास PoP प्रदूषक असल्याचे कुठेच आढळत नाही. नदीत PoP च्या गणेशमूर्ती विसर्जित केल्याने प्रदूषण होते, असे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळदेखील म्हणत नाही”. सुरेश वागवणकर या मूर्तीकाराच्या मते, “लोकांमध्ये उगाचच काहीतरी अपसमज आहेत. खरं तर PoP मुळे प्रदूषण होत नसून उलट शेतजमिनीची उत्पादनक्षमता वाढते”.
PoP पाण्यात लवकर विरघळत नाही, ते तळाशीच साचून राहाते, PoP मुळे पाणी अल्कली होते; इ. मतेही लवादाने आपला निर्णय देताना अमान्य केली आहेत.
यानिर्णयासंदर्भात “मिड-डे”च्या दि. १३ मे २०१३ रोजीच्या अंकात कै. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मत प्रसिद्ध झाले आहे. ते म्हणतात, “मूर्तीकार तर या निर्णयाचे स्वागत करणारच. परंतू आम्ही मात्र आमच्या मतांशी चिकटून राहाणार आहोत. आणि PoP च्या गणेशमूर्ती वापरू नयेत, असा प्रचार करीतच राहाणार आहोत”. आता डॉ. दाभोलकर आपल्यात नसल्याने मी त्यांच्याबद्दल काही टीप्पणी करीत नाही. परंतू न्यायिक संस्थेने दिलेले निर्णय मान्य न करणे, सत्याचा आधार नसतानाही आपल्याच मतांना चिकटून राहाणे, त्यांचा रेटून प्रचार-प्रसार करीत राहाणे इ. जर दुराग्रहाची आणि वैज्ञानिक दृष्टीच्या अभावाची लक्षणे असतील, तर डॉ. दाभोलकरांच्या उपरोक्त विधानाचे वर्गीकरण कश्यात करायचे याचा पुरोगामी विचारवंतांनी एकवार अवश्य विचार करावा.
आपल्याच मतांना चिकटून राहाणारे अंधश्रद्ध लोक निदान भोळेभाबडे तरी असतात, परंतू स्वत:ला विज्ञानवादी म्हणवणारे पुरोगामीही जर असेच करत असतील तर त्यांच्या अंधश्रद्धेला काय म्हणावे, याचा एकदा विचार व्हायला हवा. शिवाय “आम्ही सांगू तीच तेवढी अंधश्रद्धा आणि केवळ तिचेच निर्मूलन झाले पाहिजे” या विचारसरणीला काय म्हणतात, याचाही आता विचार होण्याची वेळ आली आहे. शाडूच्या मूर्ती तुलनेने महाग असतात. त्या घेणे लोकांना परवडतेच असे नाही. तेव्हा विरोधकांचे याबाबतीत काही “अर्थ”पूर्ण हितसंबंध आहेत की काय, याही शक्यतेवर विचार व्हावयास हवा. तूर्तास श्रींच्या आगमनाचा मुहूर्त जवळ आला आहे, तेव्हा सामान्यजनांनी कोणत्याही भुलाव्याला न भूलता सुखकर्त्याच्या आगमनाच्या तयारीला लागावे. PoP ची मूर्ती अवश्य आणावी परंतू तिचे रंग नैसर्गिकच असावेत असा आग्रह मात्र धरावा. मूर्तींचे आपल्या परंपरेनुसार, कायद्यानुसार आणि शास्त्रानुसारच विसर्जन करावे. देव मानणार्यांसोबत तो न मानणार्यांनाही बुद्धीदाता श्रीगणेश सद्बुद्धी देवो, हीच विघ्ननाशकाच्या चरणी प्रार्थना! सर्वे सुखिनो भवन्तु!!

One thought on “खरेच गणेशविसर्जनाने प्रदूषण होते का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *