वैनतेय

काल तू मला मारलं होतंस ना,
पाहा आज मी पुन्हा उभा राहिलोय!
तू करुन टाकलं होतंस छिन्नविच्छिन्न मला,
मी ते सगळे तुकडे गोळा केले
आणि सांधलंय बघ हे देहभर आभाळ!
आजपासून इथे बरसतील केवळ असण्याचेच मेघ,
होय मी आहे अजूनही, मी आहे आणि मी राहाणार,
मी असलो आणि नसलो तरीही नेहमीच तुझ्या अपराधगंडाने सडलेल्या मनात,
मी राहाणार!
कारण.. कारण, तूच तर होतास ना मला तोडून-मोडून फेकणारा?
तू मला तोडलंस आणि पाहा, मी झालोय कृष्णबासरी!
अवघं वृंदावन डोलवण्याची ताकद आहे माझ्यात आज!!
तुझा एक एक घाव जरी मला संपवण्यासाठी होता तरी नव्याने मला माझ्याच दगडात माझ्याच हक्काचा देव सापडत होता त्यातून..
कशी झळाळून उठलीये माझी मूर्ती नाही?
पण तू मला जाळलंस..
तू मला जाळलंस आणि पाहा तरी, मी स्वतःच बनलोय एक अग्निकंकण!!
वेड्या, तुझ्या क्षुद्र स्वार्थापायी माझी राख-राख करताना एक गोष्ट पार विसरुन गेला होतास तू अरे..
की सगळ्याच राखेतून फिनिक्स उभे राहात नसतात काही!
काही काही राखेतून वैनतेयसुद्धा जन्माला येत असतो!!

— © विक्रम श्रीराम एडके
[www.vikramedke.com]

image

One thought on “वैनतेय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *