प्रवासचित्रे : २. नीलेश

“स्टेशनला येणार का”?
“१०० रु. होतील”!
“म्हणजे? मीटरप्रमाणे नाही घेणार का? कश्यासाठी बसवलंय मग ते”?
“मीटरने परवडत नाही साहेब. तिकडून भाडं नाही मिळत लवकर. असं करा, ८० द्या”.
“स्टेशनवरुन भाडं मिळणार नाही? कोण विश्वास ठेवेल यावर! मीटरप्रमाणे नेत असलात तर चला, ८० च काय १८० सुद्धा देईन”.
“नाही जमणार”.
“ठिकंय. दुसरी रिक्षा पाहातो मी”.

एक बारीक चणीचा, तिशीचा दिसणारा मनुष्य आमची ‘चर्चा’ ऐकत होता. तो जवळ आला आणि मला म्हणाला,
“साहेब, माझ्यासोबत चला. मीटरप्रमाणं न्हेतो”.

मी जाऊन त्याच्या रिक्षात बसलो. त्याने खटका ओढला. जरा पुढं गेल्यावर तो बोलला,
“किती म्हणत होता हो साहेब तो मा×××द”?
“१००”, मी म्हणालो, “नंतर ८० पर्यंत आला होता”!
“आईची ×× त्याच्या! ह्या असल्या मा××××मुळे आम्ही लोक बदनाम झालोय. लईतलई ५५ रुपये होतील इथून. कमवायचंच, तर ६० सांगायचे. पण हाव काय जगू देती का मान्साला”?

त्याच्या बोलण्यावरुन मला दोन गोष्टी समजल्या. स्टेशनपर्यंत जायचे मीटरप्रमाणे ५५ रु. होतात, हे एक. आणि मकारारंभी शिवी त्याची आवडती दिसतेय, हे दुसरं! त्याच्या आवाजाने तंद्री भंगली माझी –
“स्टेशनवर कुठं सोडायचं साहेब”?
“शिवनेरी डेपोला”!

या प्रश्नानंतर तशी संवादाला फारशी जागाच उरली नव्हती. मीही मुंबईला पोहोचून द्यायच्या असलेल्या व्याख्यानाचे मुद्दे मनात घोळवत शांत बसलो. पण त्याला गप्पा मारण्याची सवय असावी. तोच बोलला –
“नीलेश नाव साहेब माझं. त्यो मा×××द तसलाचे! ह्या लोकांमुळं धंदा बदनाम होतो साहेब आमचा”!

खरं तर हे फारच फिल्मी वाक्य आहे. “चँद लोगोंकी वजहसे पूरी कौम बदनाम होती है”, लेव्हलचं. ते कितपत खरं, माहिती नाही. पण त्याच्या पुढच्या वाक्याने मात्र मला त्याच्या बोलण्यात रस निर्माण झाला. नीलेश म्हणाला,
“परवा एक ताई आलत्या. कल्याणीनगरला सोडा म्हणाल्या. मी न्हेलं. लई सामान होतं, त्ये मागं टाकलं त्यांनी. उतरल्या. गेल्या. मला तिथून बालेवाडीचं भाडं लागलं. तिकडून परत शिवाजीनगरला आलो एकाला घेऊन. तो उतरता उतरता म्हन्ला, तुमचं सामान मागच्या मागं कुणी मारुन न्हेईल, जपून ठेवा. मी विचार करायला लागलो, आपलं सामान? म्हनून मागं जाऊन पाहिलं तर ल्यॅप्टाप! जास्त डोकं खाजवावं नाही लागलं. सकाळच्या ताईशिवाय कुनाचा असनार? तसाच ग्येलो कल्याणीनगरला त्यांना जिथं सोडलं तिथं. त्या शोधतच होत्या. लई रडत होत्या. दिला ल्यॅप्टाप. आपल्याला काय करायचंय? मला १००० रु. काढून द्यायला लागल्या त्या. म्हने, माझं सगळं कालेजचं काम होतं ह्याच्यात, हरवला असता तर करियर बर्बाद झालं असतं. मी म्हन्लं, ह्ये माझं मीटर. चालूच ठेवून आलोय. ह्यात झालेयत त्येवढे द्या. वर काही नको मला”!

“मग”?

“त्यांनी दिले. मी आलो. आयुष्यात काय कमवायचं साह्येब? मानसं कमवली तर सगळं कमवलं. त्यांच्या १००० रु. वर मी माडी बांधनार न्हवतो. तुमच्या १०० रु. वर त्यो मा×××द माडी बांधनार न्हवता. आयुष्य ह्ये असलंये”!

मला त्याच्या साध्यासरळ तत्त्वज्ञानाची गंमत वाटत होती. कुणीतरी श्रोता लाभलेला पाहून त्यालाही बोलण्यात आनंद वाटत होता. तो उत्साहात येऊन म्हणाला,
“साहेब मी फक्त एकालाच मानतो. मानसं जोडनं पन मी त्याच्याकडूनच शिकलो. द्येव होता त्यो. ह्ये बगा..”
असं म्हणून त्याने त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला. मी की-पॅड उघडलं. समोर वॉलपेपरला एकच फोटो होता –
“बाळासाहेब ठाकरे”!
आम्ही दोघेही एकदमच म्हणालो. त्या प्रतिमेपुढे बोलणंच खुंटलं. शब्दाला नि:शब्द आणि काळाला स्तब्ध करणारा माणूस तो. त्यांना देव मानणारे लक्षावधी लोक मला सच्चे वाटतात. नीलेशही क्षणार्धात मनाला स्पर्शून गेला!!

— © विक्रम श्रीराम एडके
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा – www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *