प्रवासचित्रे : ३. भारद्वाज

व्याख्याने-कार्यक्रमांनिमित्त होणाऱ्या सततच्या प्रवासाने मला काय दिलं? तर जीवाभावाची माणसं आणि कोणत्याही, अगदी कोणत्याही पुस्तकातून कधीच मिळू शकणार नाही अशी शिकवण! परवा मुंबईच्या व्याख्यानावेळी मी अधिवक्ता श्री. भारद्वाज चौधरी यांच्या घरी राहायला होतो!

चौधरीसाहेब म्हणजे एकदा नव्हे तर चक्क दोनदा युपीएससी फायनल पार केलेला माणूस. साधेसुधे वकील नाहीत, तर गेली ९ वर्षे थेट सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करताहेत ते. अपार बुद्धीमत्ता, निढळाच्या घामाने कमावलेली श्रीमंती आणि कट्टर शिवसैनिकाचं भाबडं मन; यांचा त्रिवेणीसंगम म्हणजे आमचे भरद्वाज चौधरी! बोलता बोलता ते त्यांच्या लहानपणीचे किस्से सांगत होते.

घरी अठराविश्वे दारिद्र्य. पहाटेच लवकर उठायचं. आवरुन ५.२०ची गाडी पकडायची. ती शाळेपासून ३-५ किमी अंतरावर सोडायची. तिथून रोज पायपीट. एवढं करुन शाळेत पोहोचायला दोन-एक मिनिटं जरी उशिर झाला, तरी गेट बंद आणि दप्तर डोक्यावर घेऊन साडेसात एकरात पसरलेल्या मैदानाला पळत पळत चकरा मारण्याची शिक्षा! ठाण्यातली नामवंत शाळा ती. शाळा सगळी ब्राह्मणांची. शिक्षकही ब्राह्मण आणि विद्यार्थीही. हे एकटेच ब्राह्मणेतर – आगरी! सतत एवढ्यातेवढ्या कारणांवरुन शिक्षा व्हायच्या त्यांना. गृहपाठ तपासायचा असला की, शिक्षक म्हणायचे –
“भरद्वाज, उभा राहा”!
“केलाय मी गृहपाठ सर”!
“तुला विचारलं? विचारलं मी? चल वर्गाच्या बाहेर हो”!
अशी परिस्थिती. चूक कुणाचीही असो, मार भरद्वाजला!

ते भरद्वाज चौधरी, माझ्यासारख्या ‘ब्राह्मणा’चे एका फोरस्टार हॉटेलात आतिथ्य करत होते. सारी कामे बाजूला सारत सतत सोबत करत होते. माझ्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार आपली गाडी दिमतीला देत होते, स्वतः चालवत होते. भावना निखळ मैत्रीची!! न राहावून मी शेवटी विचारलंच –
“मग तुम्हाला नाही वाटलं इतरांसारखं ब्राह्मणद्वेष्टा बनावंसं? तुमच्याकडं तर कारणसुद्घा होतं. कुणीच दोष दिला नसता तुम्हाला ब्राह्मणद्वेष करण्यासाठी”!

ह्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मी आजवर ऐकलेलं सर्वोत्तम उत्तर होतं. तिथे फरक कळतो रिकामटेकडे बिग्रेडी आणि अतीव मेहनतीने सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला बुद्धिमंत ह्यांच्यातला! “तुम्हाला नाही वाटलं ब्राह्मणद्वेष्टा बनावंसं?”, ह्यावर भरद्वाज एकाच वाक्यात उत्तरले –
“ते लोक माझी गरीबी पाहून माझ्याशी वाईट वागले होते, माझी जात पाहून नव्हे”!!

— © विक्रम श्रीराम एडके
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *