हिंदू चैतन्याचे अवतार!!

बाजीराव सरकारांचे सार्वजनिक व्यक्तीमत्त्व कसे होते? चिमाजी अप्पा एका पत्रात लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३०), “वाटेस घोड्यावर बसोन चालले होते. तेव्हा एके गावचा पाटील भेटीस आला. तेव्हा असावध होते. त्यामुळे पाटलासी सहजात बोलले, जे कोंबड्यांचे प्रयोजन आहे. घेऊन येणे”. इथे चिमाजी खरे तर रागावून लिहितायत की, राऊंनी उघडउघड पाटलाकडे कोंबड्या मागितल्या. परंतु बाजीराव असेच होते. राजकारणात कुटील, मात्र त्याव्यतिरिक्त जे मनात असेल तेच ओठांवर ठेवणारे शिपाईगडी. ते उघडपणे मांसाहार करीत. मद्यप्राशन करीत. त्याकाळी पाहायला गेलं तर दोन्हीही ब्राह्मण्याला न शोभणाऱ्या गोष्टी. परंतु तसंच पाहायचं झालं तर, हिंदुपदपातशाही हे एकच उद्दीष्ट मनी बाळगून पायाला भिंगरी बांधल्यागत देशभर ससैन्य संचार करणे तरी कुठे ब्राह्मण्यात बसते? बाजीरावांना जाणीव होती की, सध्याचा काळ हा धर्म-धर्म करीत बसण्याचा नाही, तर त्या धर्माचं रक्षण करण्याचा आहे. खाणे-पिणे हे गौण आहे. ज्याला सबंध समाजाला आपलंसं करायचं असतं, त्याला आपल्या घरातल्या परंपरा बाहेरही लादण्याचा अट्टाहास करुन चालत नसतं. सतत फिरतीवर असणाऱ्याने, मुलुखगिरी-शिपाईगिरी करणाऱ्याने तर खाण्याचे चोचले करुच नयेत. तिथे सोवळेपणाची अपेक्षाही मूर्खपणाची आहे. जे मिळेल ते आणि जसे मिळेल तसे खाण्याची तयारी हवी, तरच मोहीमा साधतात.

बाजीराव असेच होते. त्यांचे सैनिकच नव्हे तर ते स्वतःसुद्धा कधीच मोहीमांवर शिदोरी नेत नसत. काय करायचेय निष्कारण ओझे? भूक लागली, तर शत्रूचा मुलुख लुटून खायचं. ते साधणारे नसेल, तर मिळेल त्या गावी, मिळेल ती मीठभाकरी खायची. कित्येकदा तर हे जगज्जयी मराठी सैन्य घोड्यावरुन उतरतही नसे. कुठूनतरी कणसं आणायची. हातावरच हुरडा मळायचा. पोटात ढकलायचा. आणि वरुन पाणी मारायचं. हे जसे शिंदे, होळकर, सोमवंशी, जाधव, पवार, विंचूरकर करीत; तसाच त्यांचा लाडका पेशवाही करी! सरदार, सैनिकांसोबत मोहीमा करायच्या आणि खाण्यापिण्याच्या वेळी मात्र स्वत:चं सामाजिक श्रेष्ठत्व कुरवाळायचं, असा दुटप्पीपणा बाजीरावांच्या स्वभावात नव्हता. ते आपल्या सर्व थरांतल्या सरदारांसोबत राहात. त्यांच्यासोबतच जेवत. सगळे मित्र गप्पा मारत. झोप आली तर आकाशाच्या पांघरुणाखाली फत्तराचं अंथरुण करीत ताणून देत. आपले धनी आपल्यातच मिळून मिसळून वागतात, हे जेव्हा सैन्याला दिसतं, तेव्हाच कुठे सैन्य एकजिनसी राहातं. आणि म्हणूनच पालखेडसारख्या मोहीमांमध्ये हजारों किलोमीटर्सचा प्रवास घडूनही सैनिकांपैकी कुणीच हूं की चूं केलं नाही अथवा बाजीरावांवर शंका घेतली नाही. कारण, त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत होतं की; ज्या परिस्थितीतून आपण जातोय, जे खातोय, जसं राहातोय, तसंच आपला पेशवाही राहातोय. त्याने स्वतःसाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा बादशाही थाट केलेला नाही. आपले भोग हेच त्याचेसुद्धा भोग आहे. मग क्षोभ कसा काय होणार? हेच बाजीरावांच्या सैन्याच्या अजिंक्यतेमागचं एक अतिशय महत्त्वाचं कारण होतं. बाजीराव सैन्यात राहून जसे थट्टामस्करी करायचे, सैन्यासोबत एकत्र बसल्यावर गाणी गायचे तसेच प्रसंगी कुणी चुकलाच तर “शिपाईगिरी कशास करता? रांडा जाले असते तर कामास येते” (मस्तानी – द. ग. गोडसे, पृ. १६२) असे अस्सल भाषेत सुनवायचेसुद्धा! त्यामुळेच सैन्याला ते जास्त आपल्यातले वाटायचे.

स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या ह्या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त), “..राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये”! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), “ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही”! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची.

दुर्दैव असे की, बाजीरावांचे हे वेगळेपण, देशकालपरिस्थितीनुरुप आवश्यक असलेली वागणूक, सामाजिक स्तरावर किती जरी क्रांतिकारक असली, तरी वैयक्तिक स्तरावर त्यांना कधीच समजून घेतले गेले नाही. मित्र, सैन्य आणि मालक कायमच बाजीरावांच्या बाजूने असताना त्यांना तत्कालीन इतरांची फारशी साथ लाभल्याचे दिसून येत नाही. राऊंच्या अकाली जाण्यामागे हेदेखील कारण आहे, असे वाटते. नासिरजंगला हरवून पुण्यासही न परतता खरगोण प्रांतातील जहागिरीची व्यवस्था पाहायला बाजीराव निघाले होते. जाताना त्यांनी “मस्तानीस तिकडे पाठवून द्या” असेही चिमाजींना सांगितले होते. चिमाजींनी ते मान्य केले. नानासाहेबांना लिहिलेल्या पत्रात चिमाजी लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३३), “पुण्यास गेल्यावर तिची रवानगी त्यांजकडे करावी, आपले निमित्य वारावे, त्यांचे प्राक्तनी असेल ते होईल ऐसा विचार केला आहे”. परंतु प्रत्यक्षात मात्र मस्तानीस न पाठवता काशीबाईंनाच रावेरखेडी पाठवण्यात आले. किचन-पॉलिटिक्सचे धागे हे असे गुंतागुंतीचे होते! काशीबाई येण्यापूर्वीच बाजीरावांना ताप भरला होता. त्या आल्यानंतर अवघ्या २-३ दिवसांतच बाजीराव गेले! इतरांचे माहिती नाही, परंतु स्वतः बाजीरावांच्या मनात अखेरपर्यंत कुणाबद्दलच किंतु नव्हता. २३ मार्च १७४० यादिवशी ते बुऱ्हाणपुराहून मातोश्री राधाबाईंना त्याच अप्पांबद्दलच्या काळजीपोटी लिहितात (रियासत, पृ. ३९५), “आपांस उष्णकाळामध्ये बाहेर जाऊ न द्यावे”.

समकालीनांनी व उत्तरकालीनांनी बाजीरावांबद्दल काही का गैरसमज करुन घेतलेले असेनात, सर जदुनाथ सरकार मात्र दिघेंच्या “Peshwa Bajirao I & Maratha Expansion” च्या प्रस्तावनेत म्हणतात, “Bajirao was a heaven born cavalry leader. In the long and distinguished galaxy of Peshwas, Bajirao was unequalled for the daring and originality of his genius and the volume and value of his achievements”! परंतु मला सर्वाधिक भावते ते इंग्रज इतिहासकार सर रिचर्ड कार्नॅक टेंपल यांचे मत. आपल्या “Shivaji & The Rise of Marathas” ग्रंथात ते बाजीरावांबद्दल लिहितात, “He died as he lived, in camp under canvas among his men, and he is remembered to this day among the Marathas as the fighting Peshwa and the incarnation of Hindu energy”! Incarnation of Hindu Energy, अर्थातच “हिंदुंच्या चैतन्याचा अवतार”! केवढे चपखल विशेषण आहे हे. बाजीरावांचे अवघे आयुष्य अवघ्या चारच शब्दांत पकडणारे अमोघ विशेषण!! खरोखर बाजीराव हे हिंदूंच्या चैतन्याचे अवतारच तर होते!! त्यांनी आमची मरगळ झटकून टाकली व आम्हांला स्वाभिमान शिकवला. हिंदुपदपातशाहीची कल्पना आमच्या मनांत ठाम केली. छत्रसालसारख्या दूरदेशीच्या राजाला मदत करुन “हिंदू तेवढा एक” हा संदेश आपल्या कृतीतून दिला. स्वराज्याचे साम्राज्य केले. आणि हे सारे करताना, वैयक्तिक ऐषाराम, सुखदुःख, तहान-भूक यांची काडीमात्रही पर्वा केली नाही. स्वार्थ नेहमीच दुय्यम मानला. अवघे ४० वर्षांचे आयुष्य. त्यात अवघ्या २०व्या वर्षी पडलेली पेशवाईची अवघड जबाबदारी. केवळ २०च वर्षांत स्वराज्याचा चारही बाजूंनी अतोनात विस्तार करण्याचे कर्तृत्व. त्यासाठी अथकपणे लढलेल्या लढाया आणि सर्वच्या सर्व लढायांमध्ये अजिंक्यपद!! खरोखर तो एक झंझावातच होता. आमच्या फाटक्या झोळीत कधीच न मावणारा झंझावात. म्हणूनच आम्ही त्याला कधीच गवसणी घालू शकलो नाही. तो आला, कर्तव्य केले आणि वै. शु. १३, अर्थात २८ एप्रिल १७४० यादिवशी निजधामी निघूनसुद्धा गेला, आज नाही तर काहीशे वर्षांनी तरी आपले कर्तृत्व ह्या निद्रिस्त हिंदुसमाजास समजेल, ह्या खात्रीने!!

— © विक्रम श्रीराम एडके
*लेखकाच्या नावाशिवाय अथवा स्वत:च्या नावाने कॉपी करुन या लेखामागील कष्टांचा अपमान करु नये.
(लेखक बाजीरावांच्या युद्धनीतीचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. अधिक माहितीसाठी पाहा www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *