सावरकरांचे सामाजिक कार्य : एक वस्तुनिष्ठ आकलन

सावरकरांच्या आयुष्याचे ढोबळमानाने ५ कालखंड पडतात. पहिला जन्मापासून ते अटकेपर्यंत. दुसरा अंदमानपर्व. तिसरा रत्नागिरीपर्व. चौथा सुटकेपासून ते स्वातंत्र्यापर्यंत. आणि पाचवा स्वातंत्र्यापासून ते आत्मार्पणापर्यंत. ह्या कालखंडांपैकी रत्नागिरीपर्वात सावरकरांनी अतुल्य समाजकार्य केलेले दिसते. इतके की, डॉ. आंबेडकरांच्या “जनता”ने (एप्रिल, १९३३; संदर्भ: सावरकर-चरित्र, कीर, आ. २००८, पृ. २०८) सावरकरांच्या कार्याची तुलना थेट भगवान बुद्धांशी केली आहे. परंतु सावरकरांवर जे अनेक आक्षेप घेतले जातात, त्यात प्रमुख आक्षेप हादेखील असतो की, सावरकरांनी रत्नागिरीतून सुटल्यानंतर अथवा रत्नागिरीत स्थलबद्ध होण्याआधी कोणतेही सामाजिक कार्य केलेच नाही. सदर आक्षेपाला सावरकरद्वेषाचे, जातीद्वेषाचे आणि राजकारणाचे अनेक कंगोरे आहेत. आपण त्यामध्ये न पडता केवळ ह्या आक्षेपात कितपत तथ्य आहे याचा वस्तुनिष्ठपणे विचार करु.

सावरकरांना शिक्षा झाली ती वयाच्या २७व्या वर्षी! अवघ्या पंचविशीतल्या पोराने का बरं काही समाजकार्य केले नाही, असा प्रश्न जर कुणाला पडणार असेल तर ते हास्यास्पद व म्हणूनच उत्तर देण्याच्याही योग्यतेचे नाही. याकाळातच सावरकरांनी केलेले क्रांतिकार्य भल्याभल्यांना जन्मभर अभ्यासावयाला पुरेल एवढे मोठे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अनेक सूक्ष्म पदर असलेले आहे. किंबहूना त्याच क्रांतिकार्याची शिक्षा म्हणून ब्रिटीशांनी सावरकरांना फाशीहूनही कठोर अशी काळेपाण्याची शिक्षा सुनावली (१९१०). परंतु त्याही काळात सावरकरांचे विचार काय होते ते मुख्यतः त्यांच्या काव्यातून समजतात. वास्तविक अभिजन वर्गात जन्माला आलेला हा मुलगा. त्यांना कोणत्याही प्रकारचा सामाजिक प्रश्न अजिबातच दिसला नसता, तरीदेखील तत्कालीन परिस्थितीला धरुनच असले असते ते. परंतु त्याही काळात सावरकर स्वदेश, स्वदेशी, स्वधर्म, स्वातंत्र्य इ. बाबत जागृत असल्याचे त्यांच्या लेखनातून पदोपदी दिसते. आपल्या “बालविधवा दु:स्थितीकथन” (१९०२) कवितेत अवघ्या १९ वर्षांचे सावरकर लिहितात —
“ज्यांच्या गृहिणी जाती कालांतराने ते गृहस्थ होतात ।
कन्यापुत्रही लाभती द्यायाला धीरही स्वस्थ हो तात ।।
वृद्धाचा सुत गेला स्वांकी तो दत्तकासि घेईल ।
स्वपिता मरता तद्विण सुत संसारी समर्थ होईल ।।
सर्वांसि उपाय असे शास्त्राने वा सुरुढिने विहित ।
परि न दया ये उभयान्वयी विधवांचे साधण्यास तेवि हित ।।
शास्त्रे उपेक्षिल्या त्या छळिल्या रुढिने तयांत शतपट हो ।
अबलांना विधवांना अजुनि तरी तारण्यास खटपट हो ।।
आताहि जरी उपेक्षा दु:स्थितीतुनि त्यांसि उद्धारायाते ।
तरि हा पातकपर्वत शक्त न होईल धरू धरा याते ।।
वैदिक हो, भिक्षुक हो, उद्धारक हो, अहो सुधारक हो ।
सदय मनाने कोणी अबलांना संकटात तारक हो ।।
अवलोकिता न पतिचे वदनही वैधव्य मात्र अवलोकी ।
क तत्पुनर्विवाहा प्राप्त असो संमती न तव लोकी? ।।”
हा सावरकरांचा खडा सवाल आहे. सावरकर ह्यावर उपायही सांगतात —
“सत्वर कडाड मोडा हानिद ह्या रुढिचा महा खोडा ।
तोडा दु:स्थितीबेडी अबला तारोनि धवलयश जोडा ।।”

किंबहुना सावरकरांच्या आयुष्याचा उद्देशच मुळी भारतभूमीचा सर्वंकष उद्धार करण्यासाठी शक्य होईल ते सारे काही करणे, हाच होता. हे जसे सावरकरांनी वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी घेतलेल्या प्रतिज्ञेत दिसते. तसाच त्याचा पुनरुच्चार “सागरास”मध्येही (१९०९) आढळतो. सावरकर लिहितात —
“जगदनुभवयोगे बनुनि मी, तव अधिकशक्त उद्धरणी मी”!

परंतु हिंदु धर्मातील जातीव्यवस्था व त्यायोगे राष्ट्राची होत असलेली हानी यांचे दाहक वास्तव सावरकरांना सर्वाधिक जाणवले ते अंदमानात. संख्येने मुठभर असूनही मुसलमान वॉर्डर हिंदू कैद्यांवर कसे काय अत्याचार करु शकतात, याचे उत्तर त्यांना सापडले ते हिंदू पाळत असलेल्या स्पृश्यास्पृश्यतेच्या घातक रुढीमध्ये! याविषयावर सावरकरांनी अंदमानात शक्य तेवढे कार्य केले. यातूनच जन्म झाला तो हिंदुसंघटनाचा. परंतु हिंदूंनी हिंदू म्हणून जगात एकत्र यायचे असेल तर जन्मजात जातीभेदाच्या बेड्या तोडल्या पाहिजेत, हे उघड होते. रत्नागिरीतील स्थलबद्धतेचा याकामी सावरकरांनी पुरेपूर वापर केला व जातीभेदावर सुसूत्रपणे हल्ला चढवला. एकप्रकारे स्थलबद्धता इष्टापत्तीच ठरली सावरकरांसाठी. जे कार्य डॉ. आंबेडकर विवर्ण स्तरातून करत होते तेच सावरकरांनी समाजाच्या सवर्ण स्तरातून केले. दोघांचेही कार्य परस्परपूरक होते. दोघांनाही एकमेकांबद्दल आदर होता व तो त्यांनी वेळोवेळी व्यक्तदेखील केलेला दिसतो. रत्नागिरीतील कीर-मंदिर अखिल हिंदूंना खुले करण्यात येणार होते. ह्या मंदिराचे उद्घाटन डॉ. आंबेडकरांच्या हस्ते व्हावे अशी सावरकरांची प्रामाणिक इच्छा होती. परंतु आधीच ठरलेल्या वेळापत्रकामुळे डॉ. आंबेडकरांना ते शक्य झाले नाही. याप्रसंगी त्यांनी सावरकरांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेख आंबेडकर व सावरकर दोघांचेही चरित्रकार असलेल्या धनंजय कीर यांनी (सावरकर-चरित्र, कीर, आ. २००८, पृ. २०२) केला आहे —
“सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करीत आहात त्याविषयी अनुकूल अभिप्राय देण्याची ही संधी घेत आहे. जर अस्पृश्यवर्ग हिंदुसमाजाचा अभिन्न भाग व्हायचा असेल, तर नुसती अस्पृश्यता जाऊन भागणार नाही; चातुर्वर्ण्याचे उच्चाटन झाले पाहिजे. ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटली आहे, त्यांपैकी आपण एक आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो”.
दोघांच्याही अश्या परस्परपूरकतेमुळेच दोघांचाही उल्लेख कीरांनी “समाजक्रांतिकारक” असा केला असल्याचा संदर्भ शेषराव मोरेदेखील (सावरकरांच्या समाजक्रांतिचे अंतरंग, संक्षिप्त आ. २०१५, पृ. १) देतात.

सावरकरांनी जर आपले कार्य सामाजिक क्रांतिपुरतेच मर्यादित ठेवले असते, तर अवघ्या ५ वर्षांच्या आतच त्यांनी सबंध हिंदुस्थानातून अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करुन दाखवले असते. हे मत आहे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे (कीर, २०८) यांचे! मग आता प्रश्न असा उभा राहातो की, सावरकरांनी बिनशर्त सुटकेनंतर हे कार्य का थांबवले? वरवर पाहाता सावरकरांनी खरोखरच कार्य थांबविल्याचे दिसते. याची कारणे २! एक म्हणजे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी राजकारणाचा व्याप अंगावर घेण्याची आवश्यकता. आणि दुसरे म्हणजे पाकिस्तानच्या रुपाने भारताचे तुकडे पडण्याची येऊन ठेपलेली वेळ. ह्या दोन्हीही गोष्टी तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने केव्हाही अधिक निकडीच्या होत्या. परंतु याचा अर्थ सावरकरांची समाजकार्याबाबतची आस्था संपली होती असे नव्हे. सावरकरांसाठी समाजकार्य हेच हिंदुसंघटन होते व हिंदुसंघटन हेच समाजकार्य होते. यामागचे साधेसोपे तर्कशास्त्र असे की, अस्पृश्यता नष्ट झाली तरच हिंदु संघटीत होऊ शकतील ना! त्यामुळे सावरकरांसाठी हिंदुसंघटनाचा अर्थ अस्पृश्यतानिर्मूलन हादेखील होताच. किंबहूना याच अर्थाने त्यांनी हिंदुमहासभेच्या ध्येयश्लोकात “अभ्युत्थानाय हिंदुनाम्” हे शब्द समाविष्ट करुन घेतले होते. “राजकीय सुधारणा व सामाजिक सुधारणा ही राष्ट्राच्या गाड्याची दोन चाके आहेत. यांतील कोणतीही सुधारणा मागे ठेवणे योग्य नाही. या दोन चाकांवर भारत देश पुढे न्यायचा आहे. कोणतेही चाक मागे राहून चालणार नाही” (समाजसुधारक सावरकर, केळकर, आ. १९८६, पृ. १२५). तसेच १९४३ मध्ये “सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर तीन दिवससुद्धा टिकणार नाही” (स्वा. सावरकर – अखंड हिंदुस्थान पर्व, बाळाराव सावरकर, आ. १९७६, पृ. २०२) ही सावरकरांची ह्याविषयावरील मते आहेत.

एवढेच नव्हे, तर १९४७ साली ‘हरिजन सेवक संघा’चे श्री. वि. न. बर्वे यांना पाठवलेल्या पत्रात सावरकरांनी प्रकृती ठिक झाली की अस्पृश्यतेच्या घातक रुढीवर आणखी एक अखिलभारतीय चढाई करण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे (तत्रोक्त, पृ. ३६९). दुर्दैवाने त्यानंतर वर्षभरातच गांधीहत्या झाली व स्वकीय सरकारच्या कारभारातही नाहक खटल्यात गोवले गेलेले सावरकर नवीन कार्य करण्याची उभारी कधीच धरु शकले नाहीत. अर्थातच वयाच्या १५व्या वर्षापासून जो देह सतत देशकार्यासाठी झिजला, त्यापायी नानाप्रकारचे त्रास व अपमान भोगले, त्याच्याकडून पुन्हा वार्धक्यातही नव्याने कार्य करण्याची अपेक्षा करणे हेच मुळी स्वार्थीपणाचे आहे. परंतु त्याही परिस्थितीत सावरकरांनी आपल्या मृत्युपत्रात हिंदुसंघटनासाठी तरतूद केल्याचे दिसून येते. यावरुनच सावरकरांना सामाजिक कार्याबाबत वाटत असलेली कळकळ लक्षात घ्यावी. सावरकरांचे मूल्यमापन द्वेषपूर्ण अथवा विरोधी भूमिकेतून न करता वस्तुनिष्ठपणे केल्यास, आजही भयाण असलेल्या सामाजिक वास्तवात सावरकरांचे कार्य व त्यासाठी त्यांनी वापरलेले अभिनव मार्ग दीपस्तंभ बनून मार्गदर्शन करताना दिसतील!!

— © विक्रम श्रीराम एडके
[सावरकरांच्या चरित्राचे अभ्यासक आणि सावरकरांवर व्याख्याने देणारे वक्ते. व्याख्यानांच्या आयोजनासाठी संपर्क www.vikramedke.com]

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *