अंतरात्म्यात कळ उठवणारा — हायवे

आज पहिल्यांदाच असं होतंय की मी एखाद्या चित्रपटाबद्दल लिहायला बसलोय, डोक्यात खूप वाक्यंही फिरतायत — हे सांगावं, ते सांगावं.. पण नेमकी सुरुवातच सुचत नाहीये. जिथे म्हणून कुठे सुरुवात करावीशी वाटतेय, तो प्रत्येकच मुद्दा शून्यवत् वाटतोय; मी जो अनुभव शब्दबद्ध करू पाहातोय, त्यापुढे साधा वाटतोय. एखादी कलाकृती पाहिली की कधीकधी काळजात सण्णकन् कळ उठते आणि तोंडातून आपसूकच ‘वाह..’ बाहेर पडते, परंतू क्वचितच असं होतं की, उठणारी कळ काळजातून न येता थेट आत्म्यातून येते आणि मग नकळतच त्या वेदनेला आवाज देणं ही गरज होऊन बसते. अशीच काहीशी विचित्र अवस्था “हायवे” पाहून झालीये माझी.

एका प्रथितयश व्यावसायिकाच्या पोरीचे अपहरण होते आणि काही दिवसांतच तिला तिच्या जगापेक्षा त्या अपराध्यांचं जग आणि ते अपहरणकर्ते हवेहवेसे वाटू लागतात. किती साधीशी कल्पना. तद्दन फिल्मी! परंतू खरं सांगू? कोणतीही कलाकृती अभिजात ठरायची असेल, तर मुळात ती साधीशी असणं हेच फार महत्वाचं परिमाण असतं. खरं सौंदर्य अवडंबरात नसून निखळ साधेपणातच असतं! आणि हो, खरं स्वातंत्र्य हे बंधनातच असतं!  हेच इम्तियाज अलीचा “हायवे” सिद्ध करतो. मुळात या माणसाला अशी कथा पडद्यावर साकारावीशी वाटलीच कशी, हा मला पडलेला प्रश्न आहे — कारण, आजच्या इंस्टंट जमान्यात काहीतरी साधंसोपं आणि तरीही अंतर्मुख करून सोडणारं काही पाहायची सवयच उरलेली नाहीये आम्हाला. मग का वीरा त्रिपाठीचा (आलिया भट) प्रवास आमच्यासमोर मांडतोस बाबा? का टोचणी लावतोस? का आमच्या आजूबाजूच्या जगाचा खोटारडा बुरखा फाडतोस? कश्यासाठी? मी वाचलंय की, इम्तियाजला या चित्रपटाद्वारे त्याच्या करियरची सुरुवात करायची होती. मग का इतका वेळ लावलास भाऊ? आता या चित्रपटापुढे तुझे (फक्त तुझेच नव्हे, तर बऱ्याच तथाकथित महान दिग्दर्शकांचे बरेचसे!) इतर सारेच चित्रपट निष्प्रभ वाटू लागलेत की रे! आता याला जबाबदार कोण? सिनेमातून अध्यात्म मांडायला माझी काहीच हरकत नाही रे बाबा, पण ते इतकं अंगावर येणारं — संवेदनांच्या थोबाडीत मारणारं..? असा कॅमेरा वापरावा? असं संपादन करावं? अरे इतकं चांगलं असं काही पाहायची — तेही मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपटांत — सवय नाही रे आम्हाला.. आम्ही आपली ठरवून काही ठरलेल्या चित्रपटकारांच्या कृतीला चांगले म्हणणारी दांभिक माणसं.. तू मात्र सगळ्या व्याख्याच बदलून टाकतोयस आमच्या!

सरळसोट पाहायला गेलं तर महाबीर भाटी (रणदीप हुडा)  आणि त्याच्या टोळीने वीरा त्रिपाठीचं अपहरण केलंय आणि ते लपतछपत वेगवेगळ्या राज्यांतून पळतायत. जुगनी — मोठा सुरेख शब्द वापरलाय ईर्शाद कामिलने — त्या जुगनीला अपह्रत करून आपणही या दुनियादारीत असेच लपतछपत फिरत असतो की! सुरुवातीला भीतीच्या छायेत वावरत निमूटपणे ते नेतील तिकडे जाणाऱ्या वीराच्या मागे हे अपहरणकर्तेच कसे आणि कधी गुपचुप चालू लागतात समजतही नाही. हळूहळू टोळीतला एकेक सदस्य गळू लागतो आणि अखेरिस उरतात दोघेच — वीरा आणि महाबीर! हा जितका वीराच्या आत्मबोधाचा प्रवास आहे, तितकाच तो महाबीरचाही आहेच ना! वीराला जशी आत्मिक स्वातंत्र्याची ऊर्मी आहे तितकीच अवघ्या जगाला गरीब-श्रीमंत भेदात तोलणाऱ्या आणि साऱ्या दुनियेला पाण्यात पाहाणाऱ्या महाबीरलादेखील आईच्या ऊबदार कुशीची लालसा आहे. एकदा का मोकळा श्वास अनुभवला की, वीराचा शोध संपेल आणि एकदा का ती मायेची ऊब अनुभवली की, महाबीरचाही! कोण कुठला तो अनोळखी महाबीर पण त्याला आपल्या लहानपणी घडलेला, मनाच्या डोहात खोलवर बुडवून टाकलेला प्रसंग सांगावासा वाटतो वीराला. आणि घर सांभाळणारी वीरा पाहून तीन खून पचवलेला महाबीर कसल्याश्या अनामिक वेदनेने हुंदके देत ढसढसा रडतो — शरीराने तिला बिलगतो पण तोंडाने मात्र ‘अम्मा.. अम्मा..’ म्हणतो. सतत जवळ बाळगलेली बंदुकही फेकून देतो. तीदेखील कित्येकदा संधी मिळूनही परत जात नाहीच ना! पण अखेरिस..

महाबीर वीराला म्हणतो, घरी निघून जा तुझ्या. ती ऐकत नाही. तो विवश होतो. चिडून ओरडतो, ‘तो क्या करेगी मेरे साथ रहके? शादी करेगी? बच्चे पालेगी मेरे”? ती प्रांजळपणे सांगते, “शादी का कोई प्लान नहीं हैं. बच्चे पालनेकाभी नहीं. बस चाहती हूँ ये थोडा और चले.. थोडा और..”. आणखी एका प्रसंगात ती म्हणते, ‘जिथून तू मला आणलंस तिकडं परत जायचं नाहीये मला आणि जिकडे कुठे घेऊन चाललायस तिकडं पोहोचायची इच्छा नाहीये. असं वाटतं हा प्रवास कधी संपूच नये”. कदाचित तिच्या जगातल्या लांडग्यांपेक्षा हा भयावह आणि कठोर वाटणारा पण प्रत्यक्षात माणूसकीचा खळाळता झरा असणारा महाबीरच तिला आश्वासक वाटला असेल. नाहीतरी तिचा होणारा नवरा असंबद्ध बडबडत पळूनच गेला होता ना? आणि इकडे अपहरण करणारा महाबीर मात्र तिचं सतत रक्षण करत होता. न बोलता, न अवडंबर माजवता. त्याच्या टोळीतला एकजण तिच्यावर अतिप्रसंग करू पाहातो, त्यावेळचं महाबीरचं समतोल वागणं आणि रणदीपचा तो अभिनय खरोखरच जबरदस्त!

आलिया भटबाबत मी कधी हे लिहीन असं खरंच वाटत नाहीये, पण पोरीने नैसर्गिक अभिनयाची परिसीमा गाठलीये. आणि रणदीप हुडानेही अगदी कायच्याकाय कमाल अभिनय केलाय! मात्र यात पुन्हा इम्तियाज अलीचेच कौतुक करावेसे वाटतेय की त्याने निवडलेले हे दोघेही त्या त्या भूमिकेसाठी इतके योग्य आहेत की बहुधा त्यांना वेगळं काही करावंच लागलेलं नाहीये. इतकी परिपूर्ण पात्रयोजना मी गेल्या कित्येक वर्षांत पाहिलेली नाही. आणि हो, चित्रपटात दाखवलेली ती ६ शहरंदेखील मुख्य पात्रांइतकीच महत्वाची आहेत बरं का! अर्थात नाही म्हणायला गालबोट म्हणून एक गोष्ट खटकते ती म्हणजे इम्तियाजची वीरा खूपश्या ठिकाणी गीतच (जब वी मेट) वाटते. पण इतक्या सुंदर कलाकृतीला अश्या शेकडो त्रुटी (चुका नव्हेत!) माफ आहेत!

संगीताबाबत काय बोलू? रहमान तर देवच आहे खरोखर. चित्रपटातल्या गीतांसाठी इतक्या सुरेख जागा असू शकतात यावर विश्वासच बसत नाही. त्याचबरोबर रहमान अनेकदा चित्रपटापेक्षा इतका मोठा होतो की, काही सन्माननीय अपवाद वगळता कुणीच त्याच्या संगीताला पडद्यावर न्याय देऊ शकत नाही; ही मला गेली कित्येक वर्षं सलणारी तक्रार “हायवे”ने पार धुवून टाकलीये! आणि पार्श्वसंगीत.. ती तर प्रत्यक्ष चित्रपटगृहातच अनुभवण्याची — त्या स्वर्गीय लाटांत हरवून जाण्याची बाब आहे! अर्थात यात रेसूल पोकुट्टीच्या दैवी ध्वनिसंयोजनाचाही अतिशय महत्वाचा वाटा आहे. परंतू कित्येक प्रसंगांना पार्श्वसंगीतच न देऊन रहमानने त्यांची खोली अधिकच वाढवलीये — अभिव्यक्ती अधिकच गडद केलीये! शिवाय रहमानभक्तांसाठी बातमी म्हणजे चित्रपटात ‘माही वे’मध्ये काही वेगळ्याच ओळी आहेत आणि ‘तू कुजा’चं तर थेट ‘मेल व्हर्जन’च आहे!

असो. लेख अपेक्षेपेक्षा खूपच मोठा होतोय. पण तरीही प्रामाणिकपणे सांगतो की, या चित्रपटाचं श्रेष्ठत्व एक टक्काही मांडता आलेलं नाहीये मला. खरोखर यावर्षीच्या चांगल्या चित्रपटांच्या यादीत “हायवे”चं नाव निश्चितच खूप वर असेल! चित्रपटगृहात जाऊन पाहावा, एकदा नव्हे तर पुन्हापुन्हा पाहावा, अनुभवावा — असा चित्रपट!!

*४.७५/५

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी क्लिक करा – www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *