ब्राझीलच्या कार्निव्हलमध्ये शिवशंभो — एक नवी सुरुवात?

भारत देश किती जरी दांभिक-धर्मनिरपेक्षतेच्या गाळात रुतत असला, तरीही शेष जग कसे हळुहळू परंतू निश्चितपणे हिंदू धर्म, संस्कृती आणि हिंदुत्वाकडे आकर्षित होते आहे, याची अनेक उदाहरणे मी सातत्याने देत असतो. मग तो लिसा मिलर या अमेरिकन विदुषीचा “We Are All Hindus Now” हा अमेरिकेचे हिंदुत्वाकडे वाढते आकर्षण साधार सांगणारा लेख असो (लिंक: http://www.thedailybeast.com/newsweek/2009/08/14/we-are-all-hindus-now.html) वा कोस्टारिका देशाने पाडलेले श्रीगणेशाचे सुंदर नाणे असो वा घाना या आफ्रिकन देशात प्रतिवर्षी वाढत जाणारा गणेशोत्सवाचा प्रभाव असो (लिंक: http://www.patheos.com/blogs/drishtikone/2013/09/hinduism-growing-in-africa-without-proselytizing/) वा अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये सातत्याने चर्चेसचे मंदिरांमध्ये होत असलेले रुपांतर असो (लिंक: http://vikramedke.com/blog/churches-chi-hotayat-mandire-chahul-badalatya-pravahachi/) वा कॅलिफोर्नियात साजरा होणारा हिंदू-मास असो (लिंक: http://www.hafsite.org/CA_Declares_Oct_Hindu_American_Month) वा अन्य काही!

आजही मी असेच एक अगदी अलिकडचे उदाहरण सादर करतोय. रिओ-दि-जानेरोचा सांबा-महोत्सव (कार्निव्हल) अवघ्या जगात प्रसिद्ध आहे. “रिओ” या इंग्रजी चित्रपटातही त्याचे अतिशय मनोवेधक दर्शन सर्वांनी घेतले आहे! यावर्षीही (३ मार्च २०१४) तो अतिशय उत्साहाने साजरा होतोय. विविध सांबा-कलाकार आणि स्थानिक मंडळी या महोत्सवात अतिशय उत्साहाने सहभागी होत असतात. विविध मूर्त्या, आराशी यांची मिरवणुकीत रेलचेल असते! यावर्षीही या मिरवणुकीत अनेक प्रकारच्या आराशी होत्या. परंतू सर्वांचे लक्ष वेधून घेत होती ती ‘सल्गिरो सांबा स्कुल’च्या आराशीतील मूर्ती! तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ती होती देवाधिदेव महादेवांची अतिप्रचंड आकाराची मूर्ती! आहे की नाही गंमत.

इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, ब्राझील हा एक ख्रिश्चन देश आहे. किंबहुना ख्रिस्ताची अतिप्रचंड मूर्ती याच रिओ शहरात आहे. तेथील वार्षिक महोत्सवात शिवशंकरांची मूर्ती समाविष्ट करावीशी वाटणे, ही हिंदुत्वाच्या दृष्टीने निश्चितच अत्यंत आशादायी आणि सकारात्मक बाब आहे! इतर अनेक देशांप्रमाणे ब्राझीलनेही हिंदुत्वाचा सनातन मार्ग अनुसरण्याची ही केवळ सुरुवात आहे. तरीही प्रश्न उरतोच की, सबंध जग हळूहळू या मार्गावर चालू लागताना ही हिंदुत्वाची गंगोत्री मूळात जिथून उगम पावली तो हिंदुस्थान खोट्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा कधी उतरवणार? अन्यथा देव न करो, परंतू भविष्यात परिस्थिती अशी होईल की, जगभरात सर्वत्र हिंदूच हिंदू दिसतील परंतू हिंदुत्वाच्या पितृभूत मात्र हिंदू औषधालाही सापडणार नाही. हे होता उपयोगी नाही. शेवटी आपला वारसा जपणं आणि तो वाढवणं आपल्याच हाती आहे, हो ना?

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्यासाठी क्लिक करा:  www.vikramedke.com)

image

One thought on “ब्राझीलच्या कार्निव्हलमध्ये शिवशंभो — एक नवी सुरुवात?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *