पानिपत: पराभवाचा नव्हे, विजयाचा इतिहास

डोक्यात पराभव पक्का बसलेला असेल, तर सगळ्या गोष्टींत पराभवच दिसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पानिपतचे युद्ध! अर्थातच या युद्धात मराठ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र सगळेच म्हणतात त्याप्रमाणे हा मराठी साम्राज्याचा पराभव होता असे काही मला वाटत नाही.

पानिपताने मराठ्यांची दिल्ली आणि उत्तर भारतावरील सत्ता धुवून टाकली हे खरे. अहमदशहा अब्दाली हा विजेता ठरला हेही खरे. मात्र या युद्धात अफगाणांचे एवढे काही प्रचंड नुकसान झाले की, त्यांना भविष्यात ‘कधीच’ हिंदुस्थानकडे नजर वाकडी करून पाहाण्याची दुर्बुद्धी झाली नाही. याउलट १७६१ साली सुटलेली उत्तर हिंदुस्थानवरील पकड मराठ्यांनी १७७१ पर्यंत परत एकवार प्रस्थापित केली, तीही दुप्पट जोमाने! थोडक्यात, अहमदशहाचा विजय तात्कालिक होता आणि मराठ्यांचा पराभवही. मात्र अहमदशहाचे नुकसान हे सार्वकालिक होते तर मराठ्यांचे नुकसान केवळ तात्कालिक! तुलनाच करायची झाली तर अहमदशहाच्या विजयाची तुलना अलेक्झँडरच्या विजयाशी करता येईल. त्या तात्पुरत्या विजयाची जेवढी किंमत, तेवढीच या विजयाची आणि तेवढीच मराठ्यांच्या पराभवाचीही. मग याला पराभव कसे म्हणता येईल?

मराठ्यांची मोत्ये गळाली, खुर्दा उडाला; सगळे खरे. परंतू युद्धाची किंमत ही चुकवावीच लागते, मग विजय मिळो वा पराभव! पराभवी मानसिकता बदलून पाहा, मग जाणवेल की पानिपत हा तात्पुरता पराभव तर दीर्घकालीन विजयच होता.

खरं तर, आपला यात फारसा दोषही नाही. कारण शाळांमध्ये आपल्याला “पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला” हेच शिकवले जाते. मुळातच इतिहासाकडे सकारात्मकतेने पाहायची सवय लागणे गरजेचे आहे. ती नसेल तर सारेच विजय पराभव वाटू लागतील. बाकी पराभवी मानसिकतेचा इतिहास शिकून विजयी वीर कसे निर्माण होणार, हा एक यक्षप्रश्नच आहे!

– © विक्रम श्रीराम एडके
(लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि व्याख्याने ऐकण्यासाठी भेट द्या – www.vikramedke.com)

image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *