श्रीगणेश विज्ञान

श्रीगणेश विज्ञान

shri ganesh

खूप दिवसांपासून या विषयावर लिहायचे मनात होते. आजचा मुहूर्त अगदी योग्य आहे.
श्रीगणेश-जन्माची कथा आपणा सर्वांना माहितीच आहे. तरीही संदर्भासाठी थोडक्यात देतो.
“पार्वतीने आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार केली. त्यात प्राण फुंकून त्याला स्वत:चा मुलगाच मानले. पुढे या मुलाचे शिर श्रीशंकराच्या हातून उडवले जाते. पार्वतीचा विलाप पाहून शिवशंकर एखाद्या दुसर्या बालकाचे शिर आणण्याची आज्ञा …देतात. शिवगण चुकून एका हत्तीच्या पिल्लाचे शिर घेऊन येतात. मानवी शिर शोधण्याइतका वेळ उरला नसल्याने अखेरीस तेच शिर लावले जाते, आणि अश्याप्रकारे गणेशाचा जन्म होतो.”
आता या कथेत खालील गोष्टी महत्वाच्या आहेत.

१) देवी पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करतात. ही मूर्ती सजीव होते.

२) कोणतेच दुसरे शिर न मिळाल्याने शिवगण एका हत्तीच्या पिल्लाचे शिर आणतात. अखेरीस तेच शिर लावले जाते.

आता या कथेकडे व्यवस्थित पाहिल्यास कळते की ही कथा म्हणजे “क्लोनिंग” आणि “अवयावारोपण” करण्याचा जगातील पहिला प्रयोग असू शकतो. कसे ते पहा. पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करते, जी सजीव होते. जीवशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास, आपण जेव्हा एक साधी चुटकी वाजवतो, तेव्हाही सहस्रावधी पेशी शरीरापासून विलग होतात. पार्वतीने जाणून-बुजून अंगावरील मळ खरवडला होता. तिला जिवंत उति (tissues) मिळवावयाच्या असाव्यात ही शक्यता नाकारता येत नाही. तात्विक दृष्ट्या हे सहज-शक्य आहे. तसेच शंकराने गणेशाचे शिर उडवल्यावर घाईने दुसरे शिर हवे असते, कारण त्या बालकाचा प्राण गेला होता पण मध्ये फार काळ गेला नसल्याने “वैद्यकीय मृत्यू (Clinical Death)” झाला नसावा. शिवगणांनी वेंधळेपणा केल्यावर पुन्हा मानवी शिर शोधण्यात आणखी कालापव्यय झाला असता. म्हणून हत्तीचेच शिर बसवले गेले. हा तत्कालीन अवयावारोपणाचा प्रकार असण्यात अशक्य काय आहे? आजही विज्ञान मानवी अवयवांचे रोपण करू शकते. अजून थोडी प्रगती झाल्यावर प्राण्यांच्या अवयवांचे रोपण होऊ शकेलच ना? म्हणजे ही देखील गोष्ट तात्विक-दृष्ट्या अशक्य नाही.

आता हे सगळे वाचल्यावर काही लोक एक ठेवणीतला प्रश्न विचारतील, “एवढी प्रगती इतक्या प्राचीन काळी झाली असणे कसे शक्य आहे?” त्यांना मी विचारतो की, का अशक्य आहे? केवळ काळ फार प्राचीन आहे, हे काही कारण नाही होऊ शकत. या प्रश्नकर्त्या मंडळींचे खरे दुखणे काय असते माहितीय का? ते आहे “न्यूनगंड”. हो, न्यूनगंड. एखादी गोष्ट हिंदू म्हणजेच भारतीय म्हटली की ती वाईटच असली पाहिजे, हा तो न्यूनगंड होय. हीच गोष्ट जर कुणा युरोपीय अथवा अमेरिकन संशोधकाने (विशेषत: बायबलमध्ये) शोधली असती तर मात्र आम्ही ती मानानार्यांत अग्रभागी असलो असतो! कारण “साहेबं वाक्यं प्रमाणं!” आपण गोऱ्या कातडीच्या मानसिक गुलामीतून बाहेर यायला आजही तयार नाही हेच खरे! बरे, हिंदू संस्कृती आणि धर्म हा जगात सर्वाधिक विज्ञान-निष्ठ असल्याचे हिंदू सोडून जगातील सगळ्याच संशोधकांचे मत आहे. पण आमचा न्यूनगंड आणि आपसातील भांडण मात्र आपल्याला हे सत्य स्वीकारण्यापासून रोखतेय!
हिंदूंच्या विज्ञान-निष्ठेचे आजवर शेकडो पुरावे सापडले आहेत, पण ज्यांनी झोपेचे सोंग घेतलेय त्यांच्या नजरेला ही गोष्ट कशी पडणार? त्यांना मुळात आपले वेद-पुराणे हेच खोटे वाटतात. चला, क्षणभर वादासाठी तेही गृहीत धरू. आता पुन्हा वरील कथा पहा. याही परिस्थितीत वरील कथा पाहिल्यास ती वैद्यकीय-दृष्ट्या १००% योग्य असल्याचेच आढळेल! मग निदान व्यासांनी “विज्ञान-कथा” लिहिली एवढे तरी मान्य कराल? आणि कुठेतरी या गोष्टी खरोखर असल्याशिवाय इतकी “सुयोग्य” विज्ञान-कथा तरी कशी सुचेल? या कथेपेक्षाही कितीतरी प्राचीन काळात “ऋभू” नावाच्या ३ बंधूंनी विविध शस्त्रक्रिया केल्याचे पुरावे ऋग्वेदात आहेत. “चरक” हा “सर्जन” शस्त्रक्रियेपूर्वी आपली हत्यारे उकळून घेत असल्याचे त्यानेच लिहून ठेवलेय. याचा अर्थ त्याला इतक्या प्राचीन काळातही सूक्ष्मजीवांचे ज्ञान होते असाच होतो ना? विमान बनवण्याची प्राचीन भारतीय विधी मीच पूर्वी प्रसिद्ध केली होती. राजा भोज याच्या “समरांगण सूत्रधार” नामक ग्रंथात तर “यंत्रमानव” बनविण्याचीही विधी दिलीय. मग इतके सगळे विज्ञान असणार्या संस्कृतीत मी म्हणतो त्याच प्रमाणे गणेश-जन्म झाला नसेल कशावरून? पहा, विचार करा. “सूज्ञांना” पटेल.
“गणपती बाप्पा मोरया”
सर्व “सूज्ञांना” गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि “अज्ञांसाठी” बुद्धिदात्या गणेशाकडून बुद्धीची मागणी!

आपलाच,
– © विक्रम श्रीराम एडके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *