हवीहवीशी वाटणारी लबाडी – व्हाईट कॉलर

थेटपणे खून करणारे, हिंसा करणारे अपराधी तर घातक असतातच, पण त्याहून शतपटींनी घातक असतात ते तुमच्यातच राहून, तुमचा विश्वास संपादन करून गंडवणारे! पहिल्या प्रकारचे लोक तुमचे शारीरिक आणि आर्थिक नुकसान करतात. पण दुसऱ्या प्रकारचे लोक तुमच्या विश्वासाला कधीही भरून न येणारा तडा देऊन जातात. हे पांढरपेशा अपराधी कधी लाचखोर शासकीय अधिकारी बनून व्यवस्थेचा भाग असतात तर कधी व्यवस्थेलाच नाकारणारे अराजकवादी. त्यांची रुपं अनेक आहेत, त्यांचे मार्ग अनंत आहेत. साधर्म्य जर काही असेल, तर केवळ त्यांची ओरबाडण्याची, आपल्या मालकीच्या नसलेल्या वस्तू हिरावण्याची वृत्ती!

या पांढरपेशा अपराध्यांना तथा व्हाईट कॉलर क्रिमिनल्सना रोखण्यासाठी एफबीआयची एक स्वतंत्र शाखा आहे. या शाखेत धडाडीचा स्पेशल एजंट पीटर बर्क (टिम डिके) काम करतो. पीटर सलग तीन वर्षे एका अपराध्याच्या मागे होता. जगातील सर्वाधिक निष्णात चोर, तितकाच कुशल लबाड, तितकाच फसवा नक्कलकार, त्याहूनही हुशार कलाकार, हरहुन्नरी; हे आणि अशा शेकडो गुणावगुणांचा खजिना नील कॅफ्री (मॅट बोमर). इतक्या प्रवीण चोराला पीटर बर्कने महत्प्रयासाने पकडलं, म्हणजे तो स्वतः केवढा कमाल असेल याची कल्पना करा. पण या दोघांची कथा इथेच संपत नाही. खरं तर इथे सुरू सुद्धा होत नाही.

नील कारागृहातून पळून जातो. त्यात विशेष असं काही नाही. पण चक्रावणारी गोष्ट ही की, नील त्याची शिक्षा संपायला अवघे तीनच महिने राहिलेले असताना पळून जातो! का? कशासाठी? ते काहीही असो, पण अशा माणसाला पकडू शकणारी एकमेव व्यक्ती म्हणून पुन्हा एकवार पीटरला पाचारण केले जाते. पीटर नीलला दुसऱ्यांदा पकडतो. पण या वेळी नील पीटरला जो प्रस्ताव देतो, तो ऐकून पीटरसुद्धा विचारात पडतो. काय असतो तो प्रस्ताव?

बॉलिवूड हे अपराधी, माफिया वगैरेंचं उदात्तीकरण करण्यासाठी आधीपासूनच प्रसिद्ध आहे. संजय गढ़वीचा “धूम” (२००४) प्रदर्शित झाला, तुफान चालला आणि तेव्हापासून चोरी आणि लबाडी करणाऱ्यांवरील झगमगीत, शैलीदार चित्रपटांची लाटच आली. स्वतः “धूम” चित्रपटमालिकेनेच आजवर दहा अब्जांपेक्षा अधिक कमाई केल्याचे दिसते, चित्रपटागणिक त्यांचे दर्जात्मक अवमूल्यन होऊनही! मला व्यक्तिश: “धूम” चित्रपटमालिकेमधील सर्वांत मोठी चोरी कोणती वाटते सांगू? “धूम ३”ने केलेली ख्रिस्तोफ़र नोलनच्या “द प्रेस्टिज”च्या (२००६) प्लॉटची चोरी! मी “व्हाईट कॉलर” मालिकेबद्दल बोलत असताना अचानक “धूम”मध्ये का शिरलो? कारण, दोन्हींचे विषय जवळपास सारखेच आहेत. दोन्हीकडे चतुर पोलिस आहेत आणि पोलिसांहून वरचढ चोर आहेत. दोन्हींकडे शैलीच्या नादात बरेचदा तर्काला तिलांजली देण्यात येते. पण तरीही दोन्हींमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे “व्हाईट कॉलर”चे कथानक मुळातच शेकडों कंगोऱ्यांनी घट्ट विणलेले व सशक्त आहे! त्यांचा एक-एक एपिसोड हा “धूम”च्या वरचढ आहे आणि असे त्यांनी ८१ एपिसोड्स खणखणीत वाजवले आहेत!

हल्ली जरा कुठे दोन पुरुष पात्रं एकत्र पडद्यावर वावरले तर उथळ लोकांमध्ये त्याला ब्रोमान्स म्हणायची अहमहमिका लागते. खरा, अभिजात ब्रोमान्स पाहायचा असेल, तर पीटर आणि नीलमधील कमालीची केमिस्ट्री पाहा. पण मालिका केवळ मुख्य पात्रांमुळेच चांगली बनत नाही, तर सहाय्यक पात्रेसुद्धा तितकीच खतरनाक असावी लागतात. या बाबतीत “व्हाईट कॉलर”कडे एकापेक्षा एक सरस कलाकार आणि पात्रांची मालिकाच आहे. क्लिंटन जोन्स (शरीफ़ अॅटकिन्स), डायना बेरीगन (मार्शा थॉमसन), सारा एलिस (हिलरी बर्टन), अलेक्झँड्रा हंटर (ग्लोरीया व्होट्सिस), मॅथ्यू केलर (रॉस मॅक्कॉल), ज्युन एलिंग्टन (डायाहान कॅरोल), रिबेका लोव (ब्रिजेट रेगन), एलिझाबेथ बर्क (टिफनी थिएसन) ही सगळी पात्रं इतक्या तरलपणे लिहिलेली आहेत की ती सहजच आपल्या विचारविश्वाचा भाग बनून जातात. सुरुवातीचे काही एपिसोड्स तुम्ही मॅट बोमरच्या चार्मिंग मास अपीलमध्ये हरवून जाता पण हळूहळू ती खुमारी कायम ठेवूनही टिम डिकेचा क्लासिक जेंटलमन अॅक्ट तुम्हाला त्याचा चाहता बनवतो! पीटर आणि एलिझाबेथची प्रेमकथा, किंवा संसारकथा म्हणूया हवं तर, आजकालच्या तात्पुरत्या जगात खरोखरीच्या शाश्वत भावना जगणाऱ्या अल्पसंख्य मंडळींसाठी कपलगोल्स आहे अक्षरशः!! इतका अतूट विश्वास, इतकी जीवाला जीव देण्याची वृत्ती, इतकं समर्पण, इतकी अभिन्नता, इतका समजूतदारपणा आणि तरीही इतका आसपासच घडतोय असं वाटण्याइतका खरेपणा अमेरिकन मालिकांमध्ये क्वचितच दिसतो.

वर मी बहुतांशी पात्रांबद्दल लिहूनही एका विशेष पात्राबद्दल लिहिलेलं नाही, कारण मला त्याच्यासाठी स्वतंत्र परिच्छेद लिहायचा होता. ते पात्र आहे, विली गार्सनने साकारलेले मॉझीचे पात्र! प्रत्येक कमाल टिव्ही मालिकेत एक असे दुय्यम पात्र असते जे त्या गटात बसूनही गटात न बसणारे असते व त्यामुळेच जास्त लक्षात राहाते. उदाहरणच द्यायचं झालं तर “पर्सन ऑफ इंटरेस्ट”मध्ये (२०११-१६) एकापेक्षा एक खतरनाक लोक आहेत, पण त्यातही केव्हिन चॅपमनने साकारलेला लायनेल फस्को हा खतरनाक असूनही विविधरंगी भावनांचं क्यूट टेडी बेअर वाटतो. किंवा “मंक”मध्येदेखील (२००२-०९) सगळेच भारी आहेत, पण जेसन ग्रे-स्टॅनफर्डने साकारलेला येडचॅप रँडी भाव, शिव्या आणि लाड सगळं एकाचवेळी खाऊन जातो! तसाच आहे “व्हाईट कॉलर”मधील मॉझी. अफाट पात्र आहे ते. आणि जितके शैलीदारपणे लिहिलेय त्याहून अधिक दर्जेदारपणे, बारीकसारीक लकबींसह विली गार्सनने ते साकारलेय. मी या मालिकेचा किती जरी चाहता असलो, तरीही मुख्य कथेपेक्षा मॉझीचे प्रसंग सुरू होण्याची चातकासारखी वाट बघत बसायचो मी!

“व्हाईट कॉलर”चा ढाचा ठरलेला आहे. एक एपिसोड, एक केस. पण त्यातही प्रत्येक सीझनमध्ये जी एक मोठ्ठी, विस्तृत कथा त्यांना सांगायची असते, ती प्रत्येक सीझनच्या पहिल्याच एपिसोडपासून सुरू होते. त्यांचे स्वतंत्र एपिसोड तर भन्नाट असतातच, पण त्याहूनही जास्त भन्नाट त्यांची ती प्रत्येक सीझनमधील विस्तृत कथा असते! फक्त एकच दोष आहे त्यांचा की, ते चकचकीतपणात वाहावत जातात. झगमगाटाला भुलतात. आणि बहुतांशी वेळेस तर्कापेक्षा शैलीला झुकतं माप देतात! पण म्हणून त्यांच्या कथेमध्ये कस नाही असं नाही. प्रत्येक एपिसोडसाठी त्यांनी मेहनत घेऊन केलेले संशोधन त्या त्या कथेत दिसून येते. अपवाद फक्त एकच की, एका भागात ते देवी महालक्ष्मीचे चित्र दाखवतात आणि ती सीता असल्याचे सांगतात! ते एक असो.

पण इतकं लिहूनही मी “व्हाईट कॉलर”च्या कथानकाबद्दल तर काही सांगितलंच नाही! चांगल्या कॉन अथवा करामतीचं हेच लक्षण असतं. ती योग्य त्या गोष्टी उघड करते, पण त्याहून अनेकपटींनी जास्त गोष्टी लपवते! “व्हाईट कॉलर” हा बोलण्याचा विषयच नाहीये तर बघण्याचा, हरवून जाण्याचा, भुलण्याचा विषय आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं, तर “व्हाईट कॉलर” ही मालिका सर्वार्थाने हवीहवीशी वाटणारी लबाडी आहे!

*४/५

— © विक्रम श्रीराम एडके.
(अन्य लेख वाचण्यासाठी पाहा www.vikramedke.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *