असल उत्तर

१९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धातली घटना आहे. पाकिस्तान आधीपासूनच जिहादी मनोवृत्तीचे राष्ट्र, त्यामुळे ते युद्धखोरीसाठी सातत्याने तयारच असायचे. त्यातच अमेरिकेने त्यांना एम-४७ आणि एम-४८ पॅटन रणगाडे पुरवल्यामुळे तर त्यांची ताकद काहीच्या काहीच वाढली होती. याउलट भारताकडे मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळचे काही जुने एम-४ शेरमन रणगाडे, काही सेंच्युरियन रणगाडे आणि काही हलके एएमएक्स-१३ रणगाडे असे अत्यंत जुनाट आणि तुटपुंजे असे शस्त्रबळ होते. पाकिस्तानला ही गोष्ट पक्की ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी एक योजना आखली. पंजाबच्या खेमकरण क्षेत्रात त्यांनी १-२ नव्हे तर चक्क २२० पॅटन रणगाडे उतरवले. त्यांच्यापुढे आपल्या मोजक्या युद्धसामग्रीचा टिकाव लागणे कदापिही शक्य नव्हते. एवढे प्रचंड बळ उतरवून खेमकरण क्षेत्र झटक्यात जिंकून घ्यायचे आणि त्याच्या बदल्यात काश्मिरची मागणी करायची, असा पाकिस्तानचा डाव होता!

खेमकरण क्षेत्रात त्यावेळी आपली ४थी माऊंटन डिव्हिजन तैनात होती. त्यांच्याकडे थोडंफार पायदळ आणि उपरोक्त तिन्ही प्रकारचे प्रत्येकी ४५ रणगाडे होते. या डिव्हीजनचे नेतृत्व करत होते मेजर जनरल गुरबक्ष सिंह (की हरबक्ष सिंह?)!! इतक्या कमी सामर्थ्यानिशी पाकिस्तानशी भिडणं म्हणजे अक्षरशः आत्महत्या ठरली असती. त्यांनी ताबडतोब आपल्या डिव्हिजनला ते क्षेत्र रिकामे करत माघार घेण्याचा हुकूम सोडला. दिनांक होता ८ सप्टेंबर १९६५!!

पाकिस्तानच्या गोटात ही बातमी पोहोचताच त्यांना आनंदाचे भरतेच आले!! त्यांनी अजून जोरात आगेकूच आरंभली. आणि इथेच ते गुरबक्ष सिंहांच्या सापळ्यात अडकले!! गुरबक्ष सिंहांनी आपल्या सैन्याला माघार घेण्याचा हुकूम अवश्य दिला होता, पण माघार म्हणजे पळून जाणे नव्हे. गुरबक्ष सिंहांनी आपल्या सैन्याला खेमकरण भागातल्याच ‘असल उत्तर’ गावाला तिन्ही बाजूंनी घेरलेल्या अवस्थेत पेरून ठेवले होते. खेमकरण भाग मुळातच सुपीक आणि भुसभुशीत मातीचा. त्यातून दिवस ऊसाच्या हंगामाचे. बहरलेल्या ऊसांच्या शेतांमुळे भारतीय सैन्य सहजच लपून गेले होते. गावाला तिन्ही बाजूंनी घेरल्यामुळे आपोआपच इंग्रजी U सारखा आकार तयार झाला होता. आणि त्या व्यूहात समोरून पाकिस्तानी सैन्य आत घुसतच चालले होते!!

पण नुसती व्यूहरचना करून उपयोग नव्हता. जोपर्यंत पाकिस्तानकडे पॅटन रणगाडे होते, तोपर्यंत आपला कोणताही व्यूह भेदणे त्यांच्यासाठी डाव्या हाताचा मळ होता. दि. ९ सप्टेंबर!! पाकिस्तानी रणगाडे आपल्या व्यूहात अगदी आतवर शिरले. आणि काही कळायच्या आतच भारतीय सैन्याने त्यांच्यावर न भूतो न भविष्यति मारा करायला सुरुवात केली. आपले रणगाडे नुसते आग ओकत होते आग!! पाकिस्तान्यांनी उत्तर देण्यासाठी प्रयत्न केला, तर त्यांच्या रणगाड्यांची आतवर शिरलेली पहिली फळी जागची हललीच नाही! त्यांनी जरा अजून जोर लावून हलायचा प्रयत्न केला तर.. हाय रे दुर्दैवा.. त्यांचे रणगाडे जमिनीत रुतून बसले होते आणि जितकी जास्त हालचाल करू तितके अजूनच रुतत चालले होते. कसा काय झाला होता हा चमत्कार?

त्याकाळी भारत आणि पाकिस्तान दोघांकडेही रात्री युद्ध करण्याची क्षमता नव्हती. गुरबक्ष सिंहांनी ८ सप्टेंबरच्या रात्रीच त्याठिकाणची भुसभुशीत जमीन लक्षात घेऊन तिथे पाण्याचे टँकरच्या टँकर रिते केले होते. ते कमी म्हणूनच की काय, जवळच्या एका कालव्याचे सगळेच्या सगळे पाणी त्याठिकाणी वळवले होते. आधीच जमीन भुसभुशीत, त्यात प्रचंड पाणी!! दलदल तयार झाली अक्षरशः तिथे!! आणि दुसऱ्या दिवशी जडशीळ पाकिस्तानी रणगाडे अलगद त्या दलदलीत सापडले! एकदा पहिली फळी अडकली म्हटल्यावर मागच्या सर्व फळ्या आपोआपच अचल झाल्या!! भारतीय सैन्यासाठी आयती मेजवानीच जणू!! जणू काही रणगाड्यांचा सराव चाललाय अश्या थाटात निपचित पडलेल्या शत्रूवर तिन्ही बाजूंनी तुफान मारा केला आपण. पाकिस्तानने २२० रणगाडे म्हणजेच त्यांच्या समग्र क्षमतेच्या १/३ रणगाडे उतरवले होते. मात्र त्या एकाच दिवसांत आपण त्यांचे तब्बल ९७ रणगाडे उडवले आणि जवळजवळ ११ रणगाडे हस्तगत केले, आपल्या केवळ १० रणगाड्यांच्या मोबदल्यात!! इतर लोक तर सोडाच, पण पाकिस्तानचा कमांडर मेजर जनरल नासिर अहमद खान स्वतःच या लढाईत गंभीररित्या जखमी झाला!! भरपूर ताकद असलेल्या परंतु कवडीचीही अक्कल नसलेल्या पाकिस्तानला बिनशर्त माघार घ्यावी लागली, हे सांगावयास नकोच!! लवकरच त्यांचे वायुदल लाहोरहून झेपावणार होते. पण त्यांची अशी काही दातखिळ बसली, की ते वायुदल कधी झेपावलेच नाही!! याच युद्धादरम्यान कंपनी क्वार्टर मास्टर हवलदार अब्दुल हमिद यांनी एकहाती ६ रणगाडे मारले आणि ७ वा उद्ध्वस्त करताना त्यांना वीरमरण आले. या पराक्रमासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा सर्वोच्च लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला.

ही लढाई ‘असल उत्तरची लढाई’ म्हणून ओळखली जाते. ‘असल उत्तर’ जणू नीच पाकिस्तान्यांना भारतीय जवानांनी दिलेले ‘असल उत्तर’च (खरे प्रत्युत्तर!) ठरले!! दुसरं महायुद्ध वगळता रणगाड्यांनी लढलं गेलेलं हे जगातलं सर्वांत मोठं युद्ध!! पाकिस्तानच्या पराभवाचे स्मरण म्हणून त्या जागेचे नाव ‘पॅटन नगर’ असे ठेवण्यात आले!! ते गाव आजही उभे आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही म्हण सिद्ध करणारी भारताची विजयपताका उंचावत!!

— © विक्रम श्रीराम एडके.
[लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी अथवा विविध विषयांवर लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्या/आयोजिण्यासाठी क्लिक करा: www.vikramedke.com]

image

3 thoughts on “असल उत्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *